भिंत.. एक भावविश्व! Print

alt

लता दाभोळकर , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलांनी भिंतीवर साकारलेलं विश्व सर्वस्वी त्यांचं असतं. त्यात ती रमतातही. त्यांच्या या व्यक्त होण्यातून मुलांच्या मनात चाललेल्या भावनांच्या कल्लोळाची जाणीव आपल्याला होऊ शकते. मुलांचं मन समजून घेण्याचं ते एक उत्तम माध्यम ठरू शकतं.
पाच वर्षांची मीनाक्षी भिंतीवर चित्र काढते.. लिहिते.. त्या वेळचा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीयच! भिंतीवरच्या तिच्या चित्रांमध्ये तिनं तिचं सारं भावविश्व साकारलेलं असतं.. त्या चित्रांमध्ये ती आणि तिचा बाबा, शाळेतल्या लाडक्या बाई असतात. आणि हो तिला घाबरवून टाकणारी चेटकीणही! त्यातही एक चांगली आणि दुसरी दुष्ट! मग त्यांच्याशी बराच वेळ चालणारा तिचा संवाद.. आणि रोज आई ऑफिसमधून घरी आल्यावर तिला त्या चित्रांचा अन्वयार्थ उलगडून सांगताना तिची चाललेली शब्दांची जुळवाजुळव.. सारं काही मोहवून टाकणारं.. पण लहानग्या मीनाक्षीचं भिंतीवरचं हे भावविश्व तिच्या आजीआजोबांना फारसं रुचत नाही. त्यांच्या लेखी मीनाक्षीचा हा ‘उद्योग’ म्हणजे भिंती घाण करणं. मग कधी रागाने, कधी एखाद्या फटक्याने तिला भिंतीवर लिहिण्यापासून परावृत्त केलं जातं; पण त्याने लहानग्या मीनाक्षीवर फारसा फरक पडत नाही, कारण ती भिंत म्हणजे तिचं सारं भावविश्व असतं; जे तिच्या आनंदीवृत्तीला अधिक रूचणारं असतं.
मुलांनी भिंतींवर लिहिणं, हे आपल्याकडच्या अनेकांना न रुचणारंच!  मुलांनी भिंतीवर लिहिलं तर पुढे त्यांना तीच घाणेरडी सवय लागेल, कोणी पाहुणे आले तर त्यांना भिंत खराब झालेली दिसेल, मग ते आपल्याला नावं ठेवतील, अशी अनेक कारणं त्यामागे असतात. परिणामी मुलांना भिंतीवर लिहिण्यापासून अनेक घरांमधून रोखलं जातं. दटावलं जातं. आपल्या घराच्या किमती सजावटीत त्या मुलाचं भिंतीवर लिहिणं (अनेकांच्या दृष्टीने भिंत खराब करणं) आपल्याला खटकतं. पण त्याचं ते लिहिणं ही मुलांची मानसिक गरज आहे, हे आपण लक्षात घेत नाही.
मुलांसाठी ही एखादी खास भिंत वा या भिंतीवरील एखादा कोपरा अवश्य राखून ठेवा, जिथे ही लहानगी मंडळी व्यक्त होतील. अनेकदा त्यांना त्यांच्या भावना मोठय़ांसमोर व्यक्त करता येत नाहीत वा त्या व्यक्त कराव्याशा वाटत नाहीत. त्या भावना त्या बिनदिक्कत या भिंतीवर, भिंतीच्या कोपऱ्यावर, भिंतीवरील फळ्यावर व्यक्त करू शकतील. या भिंतीवर मुलं आपलं विश्व साकारू शकतील. घरातली एक जागा  किंवा कोपरा खास आपल्यासाठी राखून ठेवला असला असल्याची भावना त्यांच्या मनाला उभारी देणारी ठरते. भिंतीवरचं हे विश्व सर्वस्वी त्या मुलांचं असतं. त्यात ती रमतातही. त्यांच्या या व्यक्त होण्यातूनही मुलांच्या मनात चाललेल्या भावनांच्या कल्लोळाची जाणीव आपल्याला होऊ शकते. मुलांचं मन समजून घेण्याचं ते एक उत्तम माध्यम ठरू शकतं.
याबाबत शैक्षणिक सल्लागार असलेल्या  मिथिला दळवी म्हणाल्या की, कुठल्याही उभ्या पृष्ठभागावर लिहिताना मुलांच्या खांद्याच्या स्नायूंवर ताण येतो आणि ते स्नायू विकसित होण्यात मदत होते. भिंतीवर वा फळ्यावर लिहिताना नेमकं हेच होतं. मुलं जेव्हा भिंतीवर लिहितात तेव्हा त्यांना भिंत खराब होऊ नये म्हणून आपण त्यांची अडवणूक करतो. त्यांना लिहू नको म्हणून ओरडतो. अशा वेळी भिंत खराब होईल हे जरी खरं असलं तरी तुम्ही मुलं करीत असलेल्या कृतीपासून रोखण्यापेक्षा त्यांना एका भिंतीवर फळा लावून द्या. हा फळा सफेद नसावा तो हिरवा किंवा काळ्या रंगाचा असावा आणि तो गुळगुळीत नसावा. लिहिण्यासाठी खडूचा वापर केला जावा. मी एक येथे आवर्जून नमूद करेन की, मुलं जेव्हा लिहायचा प्रयत्न करीत असतात तेव्हा आपल्या घरात फळा असावाच असावा. मुलं जेव्हा कागदावर लिहितात तेव्हा त्यांच्या बोटांचे स्नायू विकसित होत असतात. फळ्यावर लिहिताना मुलांना कागदापेक्षा भरपूर मोठा पृष्ठभाग मिळतो आणि कागदांचाही अतिरेकी वापर होत नाही. त्यामुळे पर्यावरणालाही ही कृती पूरक ठरते. फळ्यामुळे वेगळा पृष्ठभाग व वेगळं लेखन साहित्य हाताळायला मिळतं. फळ्याचा पुढे अभ्यासासाठीही खूप उपयोग होतो. ज्या मुलांना वाचन-लेखन अवघड जातं त्यांना हा फळा खूपच आवश्यक ठरतो, कारण फळ्यावर लिहिलेलं सतत नजरेखालून जातं. त्यातूनच त्यांचा सराव होतो. हा फळा मूल मोठं झाल्यावरही उपयुक्त ठरतो. तसेच आपल्या वैयक्तिक कामांसाठीही त्याचा उपयोग होतो. या फळ्यावर मुलं आपल्या कल्पना मांडू शकातात. एखाद्या विषयांवरचे पर्याय या फळ्यावर लिहू शकतात. त्यावर चित्र काढू शकतात. या फळ्यामुळे alt
भिंतीवर न लिहिण्याची शिस्तही मुलांमध्ये हळूहळू विकसित होत जाते. या फळ्यांवर रोज सुविचार लिहूनही मुलांचं मन आपण संस्कारित करू शकतो. या भिंतीचा म्हणजे भिंतीवरील फळा मुलांच्या शैक्षणिक अभ्यासासाठीही खूप उपयुक्त ठरतो, असंही त्या म्हणाल्या.
आपण जेव्हा घर सजवतो तेव्हा मुलांसाठीच्या या भिंतीचाही आवर्जून विचार करायला हवा. ही भिंत त्याचं भावविश्व रमविणारी असते. त्याच्या मानसिक-शारीरिक वाढीत मोलाची भर घालणारी असते.
मुलांच्या भावनांकाविषयी विशेष अभ्यास असलेले बालरोगतज्ज्ञ
डॉ. संदीप केळकर म्हणाले की, घरात  खास मुलांसाठी एक भिंत असावी. त्या भिंतीतला एखादा कोपरा खास त्यांच्यासाठी राखून ठेवावा. जेथे ते आपल्या मनातलं भावविश्व उलगडतील. परंतु त्यांना भिंतीचा विशिष्ट भाग  लिहिण्यासाठी अनुमती देताना वाट्टेल तिथे लिहू नये, याची लक्ष्मणरेषाही आखून द्यावी. ज्यामुळे मुलांना काय करावं व काय करू नये, ही संकल्पना स्पष्ट होईल. त्यातून त्यांच्या वर्तनाच्या लक्ष्मणरेषा आखून देऊ शकतो. या कोपऱ्याच्या माध्यमातून मुलं आपली क्रिएटिव्हिटी वापरू शकतील. त्यांच्या छोटय़ा छोटय़ा इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न रेखाटतील. या माध्यमातून मुलं त्यांच्या मनोभावना व्यक्त करू शकतील. मुलं जेव्हा भिंतीवर काही रेखाटतात तेव्हा आपल्याला ते अवास्तव व अकाल्पनिक वाटतं; परंतु त्या त्यांच्या विश्वात खऱ्या असतात. अशा वेळी त्यांच्या भावनांचा स्वीकार करा. त्यांच्या भावनांना मोकळी वाट करून द्या, असंही डॉ. केळकर यांनी नमूद केलं.
आपल्या मुलांचं भिंतीवर व्यक्त होतानाच्या आठवणींबद्दल अनिहा सांगते, ‘शार्दूल चार वर्षांचा होता तेव्हा त्याने भिंतीचा एक कोपरा रंगवला होता. विविध आकार काढून त्याने त्या आकारांचं हा हत्ती, ससा, वाघ असं नामकरण केलं होतं. मग तिथे झाडंही होती आणि तळंही.. भिंतीच्या त्या कोपऱ्याला त्यानं हे माझं ‘जंगल’ अशीच मनोकल्पना केली होती. मग तिथंच जाऊन तो जेवायचा. त्या चित्रांशी गप्पा मारायचा.. सुरुवातीला मी त्याच्या भिंत रंगविण्याकडे थोडं नकारात्मक दृष्टीनेच पाहिलं. थोडं टोकलंही, पण फारसा उपयोग झाला नाही. मग मीही दुर्लक्ष केलं. परंतु जेव्हा मला कळलं की भिंतीच्या त्या कोपऱ्याने त्याचं भावविश्व व्यापून टाकलं आहे, तेव्हा मी त्याला कधीही आडकाठी केली नाही. अनेकदा तो जास्त प्रमाणात कार्टून बघत आहे, हे लक्षात आल्यावर मी त्याला तुझ्या जंगलातले प्राणी तुझी वाट पाहतायत, ते रुसले आहेत, त्यांच्याशी गप्पा मार, असं सांगायचे. मग कार्टून बघायचं सोडून तो तासन् तास त्याच्या भावविश्वातील जंगलातल्या प्राण्यांशी तो गप्पा मारत असे. त्यातून तो गोष्ट तयार करीत असे. पुढे पुढे मलाही त्याच्या त्या भावविश्वाची मोठी गंमत वाटायला लागली आणि मीही त्याचं ते भिंतीवर लिहिणं एन्जॉय करायला लागले.’
आपल्या घरात बाळाच्या आगमनाची चाहूल लागताच आपण घरात आवर्जून अनेक गोष्टी खास त्याच्यासाठी करवून घेत असतो. त्यांचं रांगणं, चालणं, पळणं हे जसं तुम्ही सहजपणे स्वीकारता, एन्जॉय करता तसंच त्यांचं भिंतीवर लिहिणंही सहज स्वीकारा. त्याला लगेचच नकारार्थी वा अटकाव करण्यापेक्षा त्यांना पर्याय द्या. प्रत्यक्षात भिंतीवर न लिहिताही भिंतीला कागद चिकटवून, फळा लावून वा भिंतीचा छोटासा कोपराच त्यांच्यासाठी राखीव ठेवून भिंतीवरील त्याचे भावविश्च त्याला साकारू द्या आणि भावनिकदृष्टय़ा त्यांना समृद्ध होऊ द्या. मुलांना भिंतीवर सर्रास लिहून देतेवेळी त्याला कुठे  व कधी थांबवायचं, याची लक्ष्मणरेषा आखून द्या; म्हणजे मुलांना कुठेही लिहिण्याची वाईट सवय लागेल ही उगीचच वाटणारी धास्ती तुम्हाला वाटणार नाही.
आपली भिंत मुलांनी लिहून खराब करून ठेवलीय म्हणून पाहुणेमंडळी शेरेबाजी करतील या धास्तीपेक्षा आपल्या मुलांचं भावविश्व समृद्ध होणं अधिक गरजेचं आहे.