गोळाबेरीज ‘शून्य’! Print

सुनील नांदगांवकर ,शनिवार, ११ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altमहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे विपुल साहित्य, त्यातील विविध व्यक्तिरेखा अवघ्या मराठी वाचकांना तोंडपाठ आहेत. त्यांचा अभिनय, चित्रपट लेखन, दिग्दर्शन, संगीत, कथाकथन, आकाशवाणी, दूरदर्शनमधील कारकीर्द, रंगभूमीवरील देदीप्यमान कर्तृत्व, विशेषत: पु. ल. देशपांडे यांचा विनोदही हा मराठी वाचकांना चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे त्यांच्या लोकप्रिय व्यक्तिरेखांचे दर्शन घडविणारा चित्रपट करणे हे एक आव्हानच आहे. हे आव्हान स्वीकारण्याचे धाडस दिग्दर्शकाने दाखविले आहे. मात्र ते दाखविताना एकामागून एक भराभर व्यक्तिरेखा वेगवेगळ्या प्रसंगांतून प्रेक्षकासमोर उलगडत जातात. त्यात एकसंधता नाही. त्यामुळे चित्रपट म्हणून प्रभाव पडत नाही.
पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकातील हरितात्या, बबडू, सखाराम गटणे, नारायण, कुलकर्णी, अंत्या कुलकर्णी, भैय्या नागपूरकर, नामू परीट, रावसाहेब, नंदा प्रधान, अंतू बर्वा, पेस्तनकाका, चितळे मास्तर अशा अनेक वाचकप्रिय व्यक्तिरेखा, ‘सबकुछ पुल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गुळाचा गणपती’ चित्रपटातील ‘इंद्रायणी काठी, ‘पुढचं पाऊल’ चित्रपटातील ‘इथेच टाका तंबू’ आणि ‘जाळीमंदी पिकली करवंदं’ ही गाणी या चित्रपटात घेतली आहेत.
इतक्या  व्यक्तिरेखा चित्रपटांतून दाखविताना त्याची गुंफण करताना खूप घाई झाल्यासारखे वाटते. ‘हरितात्या’ ही व्यक्तिरेखा सुरुवातीलाच दाखविल्यानंतर पुढे चित्रपट संपल्यावर प्रेक्षक हरितात्याला विसरतो. ही व्यक्तिरेखा दाखविली नसती तरी चालले असते, असे वाटते. एका व्यक्तिरेखेनंतर दुसरी व्यक्तिरेखा दाखविताना पटकथेत करायची गुंफण प्रेक्षकाला समजत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखा एक एक तुकडा वाटते. त्यामुळे चित्रपट म्हणून परिणामकारक ठरत नाही. दिग्दर्शक राम गबाले (श्रीरंग देशमुख) आणि पु. ल. देशपांडे (निखिल रत्नपारखी) एकमेकांशी ‘दूधभात’ या चित्रपटाविषयी चर्चा करीत असताना मध्येच नामू परीट (शरद पोंक्षे) कपडे न्यायला येतो. नामू परीट या व्यक्तिरेखेचा इरसालपणा दाखविला असला तरी तो इतक्या झटकन येऊन पु. लं.च्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे आपला स्वभावविशेष दाखविणारे संवाद बोलतो आणि निघून जातो. त्यामुळे वाचताना त्याचे जसे समग्र शब्दचित्र वाचकापुढे उभे राहते, तसा प्रभाव चित्रपटात जाणवत नाही.  चितळे मास्तर (मोहन आगाशे), अंतू बर्वा (दिलीप प्रभावळकर), बबडू (संजय नार्वेकर), नारायण (आनंद इंगळे) आणि सखाराम गटणे (दुष्यंत वाघ) या व्यक्तिरेखा ठाशीवपणे चित्रपटात येतात. त्यातही अंतू  बर्वा, चितळे मास्तर, सखाराम गटणे आणि बबडू  या व्यक्तिरेखा, त्यांच्या तोंडी असलेली पुस्तकातील मूळ वाक्ये, त्यांचा स्वभावविशेष अधोरेखित करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरतो. सर्वच व्यक्तिरेखांसाठी केलेली कलावंतांची निवड यासाठीही दिग्दर्शकाला गुण द्यायला हवेत. कलावंतांनीही आपापल्या भूमिका समरसून करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.  
पु. ल. देशपांडे साकारताना निखिल रत्नपारखी यांनी संयत अभिनय केला आहे. पुलंच्या पत्नी, सुनीताबाईंची व्यक्तिरेखाही डॉ. नेहा देशपांडे यांनी अतिशय संयतपणे साकारली आहे. परंतु, सुनीताबाईंचा स्वभावातला ठामपणा, पुलंना क्वचितप्रसंगी चित्रपटाच्या लेखनात त्यांनी सुचविलेले बदल, पुस्तकासंदर्भात त्यांच्यात झालेल्या चर्चा यातून सुनीताबाईंचा पुलंच्या आयुष्यातील सहभाग अधिक ठाशीवपणे तरी दाखविता आला असता. पु. ल. देशपांडे आणि ग. दि. माडगूळकर (अभिजीत चव्हाण) किंवा पु. ल. आणि राम गबाले (श्रीरंग देशमुख) यांच्यावर चित्रित करण्यात राम गबाले व गदिमा यांच्याशी पुलंचा परिचय होता एवढेच दाखवायचे होते, हे समजत नाही.
या चित्रपटातून पुढील पिढय़ांना पुलंच्या व्यक्तिरेखांचे दर्शन घडविण्याचा हेतू चांगला असला तरी त्यातील विनोद, त्याचे तात्कालिक सांस्कृतिक, सामाजिक संदर्भ यांचा उलगडा होण्याची शक्यता जवळपास नाहीच. मात्र असे असले तरी हा चित्रपट पुलप्रेमींना किंवा यातील व्यक्तिरेखा मुळातून अनेकदा वाचल्या असणाऱ्यांना नक्की आवडेल.
डिफरण्ट स्ट्रोक्स कम्युनिकेशन्स प्रस्तुत
गोळाबेरीज
निर्माते - देवदत्त कपाडिया
पटकथा-दिग्दर्शन - क्षितिज झारापकर
छायालेखन - विजय देशमुख
संकलन - फैसल महाडिक
संगीतकार - मिलिंद जोशी
कला दिग्दर्शन - स्वप्निल केणी
कलावंत - निखिल रत्नपारखी, डॉ. नेहा देशपांडे, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, अविनाश नारकर, सुबोध भावे, सतीश पुळेकर, भार्गवी चिरमुले, पुष्कर श्रोत्री, मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, संजय नार्वेकर, सतीश शहा, प्रशांत दामले, आनंद इंगळे, संदीप पाठक, दुष्यंत वाघ, मनोज जोशी, श्रीरंग देशमुख, अभिजीत चव्हाण व अन्य.