शाब्दिक विनोदावर भर |
![]() |
सुनील नांदगावकर - रविवार, १९ फेब्रुवारी २०१२ This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it ![]() निकी आणि पक्या ऊर्फ प्रकाश (मंगेश देसाई) हे दोघे जण अण्णा (विजय कदम) यांच्या घरात भाडय़ाने राहत असतात. सिनेमात करिअर करण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू असल्यामुळे पैशाची प्रचं ड वानवा असते. त्यामुळे अर्थातच अण्णा नेहमी त्यांच्या मागे लागतात, नेहमी हे दोघे अण्णांच्या हातावर तुरी देऊन पसार होतात. ‘स्ट्रगलर’ म्हणून त्यांना दीपक (पुष्कर श्रोत्री) मदत करत असतो. मोटरसायकलवरून जाताना सानिका (तेजस्विनी पंडित) हिला पाहताक्षणी निकी तिच्या प्रेमात पडतो. पण घरच्या मंडळींसोबत चर्चा करून मगच लग्न लावून देऊ असे सानिकाची मावशी (किशोरी अंबिये) सांगते. त्यामुळे खोटी आत्या, खोटे वडील उभे करण्यापासून सगळे प्रयत्न निकी करतो. मुळात एका ओळीच्या कथेभोवती चित्रपट काढायचा असल्यामुळे पक्या, सानिकाची मावशी, दीपक आणि अण्णा यांसारख्या अन्य प्रमुख व्यक्तिरेखा, त्यांचा बिनडोकपणा दाखवून विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्दर्शकाचा हा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वीही झाला आहे. ![]() चित्रकाराला भेटल्यानंतर त्याच्या बंगल्यात निकी आणि पक्या एकटे राहतात इथपर्यंत ठीक आहे. परंतु, चित्रकार परत येतो तेव्हा त्यांना पाहिल्यानंतर तो स्वत:च्याच बंगल्याबाहेर पडताना दाखविला असून त्यानंतर तो कधीच स्वत:च्या बंगल्यात जात नाही ही गोष्ट अनाकलनीय आहे. चित्रकाराची व्यक्तिरेखा कशासाठी आहे याचा शेवटी उलगडा होत असला तरी निकीच्या तोंडी शेवटी संवाद आहे की हा सगळा प्रकार त्यानेच घडवून आणला होता. हे म्हणणेही पटत नाही. महत्त्वाचे एकाच बंगल्यात स्वत: निकी, त्याची आत्या, त्याचे वडील या तिन्ही व्यक्तिरेखा एकाच वेळी साकारत असतानाही त्याच बंगल्यात असलेल्या सानिका, सानिकाची मावशी, दीपक व अन्य कुणालाच त्याचा अजिबात थांगपत्ता लागत नाही हेही पटत नाही. सानिकाला पाहिल्यावर निकीला ती आवडते. पण नाटय़अभिनय करण्याच्या एका स्पर्धेत ते भेटतात, त्यानंतर थेट बागेत एका स्वप्नदृश्यानंतर निकी-सानिका भेटतात काय, एकमेकांना आवडतात काय आणि लग्न करायचे ठरवतात काय हे सारे इतके घाईने दाखवून व्यक्तिरेखा प्रेक्षकाच्या मनावर न ठसविताच दिग्दर्शकाला काय साधायचे आहे ते समजत नाही. तेजस्विनी पंडितसारख्या पदार्पणातच निवडक व वैशिष्टय़पूर्ण भूमिका साकारून या चित्रपटातील अतिशय तकलादू भूमिका कशी काय स्वीकारली याचे आश्चर्य वाटते. चित्रपटाचे शीर्षक, त्याला अनुसरून असलेले गाणे हे ठीक असले तरी शीर्षकाला अनुसरून निकी ही व्यक्तिरेखा फुलवलेली नाही. आणखी चिकार मसाला घालून निकीबद्दल अन्य सर्व व्यक्तिरेखांच्या मनात त्याच्याविषयी फसविल्याची भावना तीव्रपणे दाखविले असते तर नायक पराकोटीचा ब्लफमास्टर आहे हे प्रेक्षकालाही पटविता आले असते. अंबाजोगाई चित्र, मुंबई निर्मित ब्लफमास्टर निर्माते - वैभव बढे, राजेश उत्तमचंदानी, नयना रानडे दिग्दर्शक - किशोर साव कथा - अनिल दीक्षित पटकथा - राजेश कोलन संवाद - विजय पटवर्धन, अनिल दीक्षित छायालेखन - संजय खानझोडे कलावंत - अंकुश चौधरी, मंगेश देसाई, पुष्कर श्रोत्री, तेजस्विनी पंडित, किशोरी अंबिये, विजय कदम, जयवंत वाडकर, पूर्वा पवार व अन्य. |