तेरे नाल लव्ह हो गया : ‘तेरे साथ बोअर हो गया’ Print

सुनील नांदगावकर ,शनिवार, २५ फेब्रुवारी २०१२
altरितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांचे लग्न नुकतेच झाले आहे आणि त्या पाश्र्वभूमीवर प्रदर्शित होत असणारा रोमॅण्टिक कॉमेडी प्रकारातला ‘तेरे नाल लव्ह हो गया’ हा चित्रपट आणि रितेश-जेनेलिया ही जोडी कदाचित पडद्यावर पाहणे प्रेक्षकाला शक्य होऊ शकेलही. परंतु, तोच तोपणाचा कळस आणि त्याला थोडासा पंजाबी, हरयाणवी तडका अशी भट्टी जमविण्याचा जेमतेम प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. बॉलीवूडपटात ‘रोमकॉम’ करताना पंजाबी संस्कृतीच्या प्रभावाखालीच चित्रपट करता येतो असा एक गैरसमज निर्माण झाला आहे. त्याला  ‘तेरे नाल..’ हा चित्रपट आणखी भरीस घालणारा आहे.
वीरेन (रितेश देशमुख) हा एक साधासुधा रिक्षावाला. रिक्षा चालवून, पैसे साठवून मग गाडी घ्यायची पर्यटनाचा व्यवसाय करायचा असे वीरेनचे स्वप्न असते. रिक्षाचा मालक भट्टी (टिनू आनंद) एक दिवस रिक्षा विकून टाकतो आणि वीरेनने साठवून रिक्षाच्या सीटखाली ठेवलेले पैसेही जातात. एकीकडे ही ष्टोरी सुरू असतानाच दुसरीकडे भट्टीची मुलगी मिनी (जेनेलिया डिसूजा) हिचे लग्न जबरदस्तीने एकाशी लावून देण्याचा घाट घातला जातो. वडील लग्न लावून देणार असलेल्या मुलगा ऐतखाऊ असल्यामुळे मिनीला पसंत नसतो. पैसे गेल्याच्या दु:खात वीरेन दारू पिऊन भट्टीकडे पैसे मागायला येतो. मग बंदूक काय हातात घेतो, गोळ्या काय झाडतो हे सगळे पाहून मिनीला पळून जाण्याची कल्पना सुचते आणि ती वीरेनसोबत पळून जाते. मग ओघाने त्यांच्यात प्रेम होते, मग या दोघांना आणखी कुणीतरी पळवून नेते आणि पुढे चित्रपट सुरूच राहतो. अर्थात अखेर राजा राणी सुखाने संसार करू लागतात हा नेहमीचा ‘द एण्ड’ आल्याशिवाय चित्रपट संपतच नाही.
दिग्दर्शक आणि निर्मात्यांनीही कुठलीही फारशी कल्पनाशक्ती न लढविण्याचे चित्रपट करण्यापूर्वीपासूनच ठरविलेले असावे. बॉलीवूड मसालापटाला लागते ती सगळी भट्टी एकदा जमवली की ठरीव गल्ला गोळा करून गप्प बसायचे असा ‘टिपिकल’ धंदेवाईक विचार करून ‘तेरे नाल..’ची निर्मिती केली आहे. मध्यांतरापूर्वी वीरेन-मिनी पलायन करतात आणि नंतर त्या दोघांना भलतेच कुणी पळवून नेईपर्यंतचा चित्रपटाचा भाग सोडला तर बाकी सगळा चित्रपट रटाळ, कंटाळवाणा, अपेक्षित शेवटाची प्रतीक्षा करीत प्रेक्षकाला बळेबळे खुर्चीत बसायला लावतो.
अर्थात रितेश-जेनेलिया नुकतेच विवाह बंधनात अडकल्यामुळे त्या पाश्र्वभूमीवर पाहताना घटकाबरोबर मनोरंजन होतेसुद्धा परंतु ‘घिसापिटा’ फॉम्र्युलाबाज रटाळपणा कंटाळा आणल्याशिवाय राहणार नाही.      

यूटीव्ही मोशन पिक्चर्स-टिप्स इंडस्ट्रीज प्रस्तुत
तेरे नाल लव्ह हो गया
निर्माते - रमेश तौरानी, सिद्धार्थ रॉय कपूर
दिग्दर्शक - मनदीप कुमार
कथा - अभिजीत संधू
संगीत - सचिन-जिगर
कलावंत - रितेश देशमुख, जेनेलिया डिसूझा, ओम पुरी, टिनू आनंद,