चित्ररंग : ब्लडमनी रटाळ पटकथा; नाटय़ाचा अभाव Print

altसुनील नांदगावकर, रविवार, १ एप्रिल २०१२
altहॉलीवूडच्या चित्रपटांची कॉपी करायची ठरविले तरी भारतीय रसिकांच्या मनाचा ठाव घेताना बरेच काही दिग्दर्शकाला करावे लागते. परंतु, दिग्दर्शकाची आणि पटकथा लेखकाची तशी इच्छा तर असली पाहिजे तरच ते शक्य आहे. गुन्हेगारी विश्वात नायक अडकतो आणि सत्य परिस्थिती समजल्यावर खलनायकाने तयार केलेल्या चक्रव्यूहातून सहीसलामत बाहेर पडतो असे ढोबळ कथानक असलेल्या ‘ब्लडमनी’ चित्रपटात दिग्दर्शक-पटकथा लेखक यांची प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असा चित्रपट बनविण्याची इच्छाशक्ती कमी पडली असे चित्रपट पाहताना सारखे जाणवत राहते.
कुणाल कदम (कुणाल खेमू) हा एक एमबीए तरुण आपली भरपूर पैसा कमाविण्याची इच्छा मुंबईत पूर्ण होत नाही म्हणून एका ट्रिनिटी डायमण्ड नावाच्या हिरे व्यापारी कंपनीत आफ्रिकेतील केपटाऊन येथे आपली प्रिय पत्नी आरजू (अमृता पुरी) हिच्यासह येतो. हिऱ्यांचा व्यापार करण्यात, ग्राहकांशी बोलण्यात वाकबगार असल्याची चुणूक कुणाल दाखवतो आणि मालक झवेरी (मनिष चौधरी) कुणालवर एकदम खूश होतो. मग काय कुणालची हुशारी पाहून त्याला पटापट वरची पदे दिली जातात, स्वतंत्र केबिन altत्याला मिळते, पगार, गाडी, आलिशान घर, पैसा पायाशी लोळण घेऊ लागतो. आपल्या मेहनतीवर, आपल्या अक्कलहुशारीमुळे आपण यश संपादन करू शकलो या धुंदीत असतानाच कुणालला कंपनीचे काळेधंदे समजतात. मालकाला कळविण्यासाठी तो जातो आणि मालक त्याला हिरे विक्री, हिऱ्यांची चोरी, अंडरवर्ल्ड, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी विश्व यात गुरफटून टाकतो आणि मालकाबरोबर कुणालही गुन्हेगारीच्या गर्तेत लोटला जातो. पैसा कमाविणे, गर्भश्रीमंत जीवनशैलीची हाव यामुळे तो या चक्रव्यूहात अडकलाय असे त्याच्या लक्षात आल्यावर मालकाचा पर्दाफाश करण्यासाठी कुणाल कंबर कसतो आणि मालकाला धडा शिकवितो.
एमबीए ग्रॅज्युएट असलेला तरुण नशीब काढायला केपटाऊनच्या कंपनीत नोकरीसाठी येतो आणि तिथे यश मिळवितो. पण altहेराफेरीचे सत्य त्याला समजते त्यानंतर मालकाला धडा शिकविण्यासाठी, त्याच्या कचाटय़ातून सुटण्यासाठी तो कोणतेच विशेष प्रयत्न करीत नाही. भल्या मोठय़ा कंपनीतील मालकाच्या कार्यालयात जाऊन त्याच्या पापाचा हिशेब लिहिलेली म्हणे डायरी चोरायला तो जातो. दिग्दर्शकाने दाखविलेला हा प्रसंग इतका बालिश आहे की प्रेक्षक बालिश नाही हेही दिग्दर्शकाला ठाऊक नसावे असे दिसते. कुणाल आणि आरजूचे पती-पत्नी नात्याचे भावनिक बंध दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. सगळे स्वप्नवत चांगले घडतेय असे आरजू कुणालला म्हणते तेव्हा मध्यमवर्गीय पद्धतीने विचार करू नकोस. माझ्या मेहनतीचे हे फळ आहे असे कुणाल तिला सांगतो. परंतु, मध्यांतरापर्यंत नायकाला आणि प्रेक्षकालाही सत्य समजते. आता पुढे कुणाल शत्रुचा सामना कसा करणार याची उत्सुकता लागून राहते. परंतु मध्यांतरानंतर चित्रपट इतका रटाळ होतो आणि पटकथेत नाटय़ात्मकतेचा संपूर्ण अभाव असल्यामुळे अधिकच केविलवाणा होत जातो. नाही म्हणायला कुणाल खेमू, अमृता पुरी यांचा अभिनय चांगला झाला आहे. परंतु, एकूण चित्रपट कुठलाही प्रभाव प्रेक्षकावर पाडत नाही.
विशेष फिल्म्स प्रस्तुत
ब्लडमनी
निर्माता - मुकेश भट
दिग्दर्शक - विशाल महाडकर
कथा - उपेंद्र सिधये
छायालेखन - निगम बोमजान
संगीत - जीत गांगूली, प्रणय, संगीत व सिद्धार्थ हल्दीपूर
कलावंत - कुणाल खेमू, अमृता पुरी, मनिष चौधरी, शेखर शुक्ला, मिला उयेदा, करण मेहरा, संदीप सिकंद व अन्य.