चित्ररंग :बालिशपट Print

सुनील नांदगावकर ,रविवार ८ एप्रिल २०१२
altकाही चित्रपट मोठय़ांसाठी असतात तर काही चित्रपट बच्चे कंपनीसाठी असतात, परंतु हल्ली हिंदी चित्रपटांमध्ये ‘मॅड कॉमेडी’च्या नावाखाली अनेक बालिशपट बनविले जातात. साजिद खान दिग्दर्शित ‘हाऊसफुल्ल २’ हा त्यापैकीच एक बालिशपट आहे. यातील व्यक्तिरेखा तीन तास हसविण्याच्या नादात स्वत:चेच हसे करून घेतात. altसाजिद नाडियादवाला, अक्षयकुमार आणि साजिद खान हे त्रिकूट यात असले तरी पहिल्या ‘हाऊसफुल्ल’पेक्षा अधिक मोठी कलावंत मंडळी या चित्रपटात आहेत हे याचे वैशिष्टय़ आहे खरे, परंतु अंगावर येणारी संवादफेक, व्यक्तिरेखांचे अतिरंजित रूप ‘मॅड कॉमेडी’ करताना अनेकदा आवश्यक वाटत असले तरी त्यामुळे रसभंग होतो.
ऋषी कपूर आणि रणधीर कपूर हे दोघे भाऊ एकमेकांचे कट्टर वैरी. सारखी एकमेकांमध्ये स्पर्धा करून एकमेकांवर मात करण्याच्या प्रयत्नात असतात. आपापल्या मुलींसाठी गर्भश्रीमंत जावई शोधून दाखवितो की नाही बघच असा यांचा खाक्या. सतत पडद्यावर भडक पद्धतीने अभिनय करत त्याच पद्धतीने आततायीपणे संवादफेक करताना दोघांना पाहणे हे प्रेक्षकाला जिवावर न आले तरच नवल. चिंटू म्हणजे ऋषी कपूर आणि डब्बू म्हणजे रणधीर कपूर या दोघांचे वैर तर आहेच, परंतु त्यांच्या बायका आणि त्यांच्या मुली यांच्यातही हे पिढीजात वैर आले आहे. त्यामुळे प्रत्येकजण एकमेकांना कायम पाण्यात पाहत असतात. जेडी नामक इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मुलाशी आपल्या मुलींचा विवाह व्हावा या जबरदस्त हट्टाने पेटलेले चिंटू आणि डब्बू यांची कशी फसगत होते त्याची कथा सांगताना त्यात अक्षयकुमार, जॉन अब्राहम, श्रेयस तळपदे, रितेश देशमुख यांचा समावेश होतो आणि एकामागून एक बालिश घटना-प्रसंगांतून हसविण्याचा प्रयत्न करत दिग्दर्शक शेवटाला पोहोचतो.
चित्रपट अधिक लांबीचा असल्यामुळे हसण्याचा प्रयत्न करत प्रेक्षक चित्रपट कधी संपतो याची वाट पाहत ताटकळत बसून राहतो. चार नायकांच्या चार नायिकांना चित्रपटात अजिबात अभिनय करण्यास वाव दिलेला नाही. बोमन इराणीचा तोचतोपणाही आवडत नाही. अक्षयकुमार विनोदी आणि मारधाडपट या दोन्हींमध्ये चपखल बसत असला तरीसुद्धा या चित्रपटातील त्याचा अभिनय सुमारच आहे. काही काही प्रसंगांमध्ये रितेश देशमुखने विनोदी अभिनय चांगला करण्याचा प्रयत्न केला असला तरी चित्रपटाचा नायक अक्षयकुमारच आहे. जॉन अब्राहम अशा प्रकारच्या चित्रपटात काम करत असला तरी तो यात उठून दिसत नाही, किंबहुना चित्रपट करताना तो स्वत:ही खूप गोंधळलेला आहे असे जाणवत राहते. सतत भांडत, ओरडत बसणारा चिंटू त्याच्या मुलीला पाहायला आलेल्या वराचे वडील हृदयविकाराचे रुग्ण आहेत असे समजल्यानंतर मोठय़ाने ओरडून बोलतो हेही खटकते.
परदेशी चित्रीकरण स्थळे, निर्जन बेटावरील चांगल्या छायालेखनामुळे चित्रपट नेत्रसुखद असला तरी बिनडोक आणि पाणचट विनोदांमुळे बालिशपट ठरतो.
हाऊसफुल्ल २
निर्माता - साजिद नाडियादवाला
दिग्दर्शक - साजिद खान
पटकथा - तुषार हिरानंदानी, साजिद-फरहाद
संगीत - साजिद-वाजिद
कलावंत - अक्षयकुमार, जॉन अब्राहम, श्रेयस तळपदे, रितेश देशमुख, असिन थोटूकमल, जॅकलिन फर्नाडिस, झरिन खान, शहजान पदमसी, बोमन इराणी, मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर, रणधीर कपूर, जॉनी लिव्हर, मलायका अरोरा व अन्य.