चित्ररंग : कशाला उद्याची बात: आहे ‘अनुपम’ तरी.. Print

सुनील नांदगावकर, रविवार, १५ एप्रिल २०१०
altमुंबईसारख्या महानगरात नव्हे तर जगभरातील नोकरी-धंदा करणारे सारेच रविवारच्या सुट्टीची आतुरतेने वाट बघत असतात. रविवार उजाडला की तो संपूच नये असे वाटत असते.

रविवारी शहरात रस्तेही सामसूम असतात. रविवार म्हणजे सुट्टी, सुट्टी म्हणजे मजा, आराम, विश्रांती, कुटुंबासोबत धमाल करण्याचा दिवस असतो. परंतु, ‘कशाला उद्याची बात’ चित्रपटातील आदित्य प्रधान (सचिन खेडेकर) याला मात्र रविवार नकोसा वाटतो. आता असाही आपल्यापैकी कुणी आहे यावर खरेतर विश्वासच बसणार नाही कदाचित. पण आहे बुवा एक आदित्य प्रधान. वन रूम किचनमध्ये राहून करिअरला सुरुवात करणारा आदित्य, त्याच्या सुखी त्रिकोणी कुटुंबाला घेऊन आता तीन कोटींच्या बंगल्यात राहतोय. माहिती तंत्रज्ञान कंपनीचा तो उपाध्यक्ष आहे. ऐहिक सुख त्याच्या पायाशी लोळण घेतेय. परंतु, अधिक पैसे कमाविण्याच्या नादात, कंपनीची भरभराट करण्याच्या वेडात आदित्य काहीतरी गमावून बसलाय याची त्याला सुतराम कल्पना नाही. एका रविवारी ‘काळ’ त्याल इंगा दाखवितो आदित्य खडबडून जागा होतो. काय हरवलंय, आपण काय गमावलंय याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो, एक दृष्टिहीन ‘बेनामकुमार’ (अनुपम खेर) त्याला मार्ग दाखवितो.
चित्रपटाचे कथासूत्र एवढेच असले तरी ते दाखविताना उत्तम संवाद, संगीत आणि नेत्रसुखद चित्रणाच्या माध्यमातून दिग्दर्शकाने यामार्फत दैनंदिन जीवनातील तोचतोचपणा, पैशाच्या, ऐहिक सुखाच्या हव्यासापायी महानगरांतील माणूस किती यांत्रिक पद्धतीने वागतोय, ते करीत असताना तो छोटय़ा छोटय़ा गोष्टीतील निव्र्याज आनंद कसा गमावून बसतो यावर हसतखेळत भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
अतिमहत्त्वाकांक्षी आदित्य प्रधानसाठी आता स्वर्ग जणू दोन बोटे उरलाय. सोमवारी १०० कोटीचे कंत्राट त्याला मिळाले की तो पूर्वीपेक्षा दुप्पट-तिप्पट नफा कमावण्यासाठी सज्ज होणार आहे. परंतु, शनिवारी त्याच्या मुलीच्या ‘अरंगेत्रम’ला जायचे तो विसरतो. म्हणून साक्षी (मृणाल कुलकर्णी) आणि आदित्यची मुलगी दोघीही खट्टू होतात. परंतु, १०० कोटीच्या कंत्राटापुढे आदित्यला ही गोष्ट खटकत नाही. कारण तो स्वत:त इतका मग्न झालाय की बायको-मुलगी, नातेवाईक, शेजारी, सोसायटीतले लोक, मित्र अशी सगळी त्याची जिवलग माणसे यांच्यापासून तो शेकडो योजने मनाने दूर गेला आहे. दिवसभर भरपूर काम, सतत कामाचा विचार, त्यातून मिळणाऱ्या नफ्याचा विचार यातच तो गुरफटला आहे. बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या मते नगण्य आहेत. महानगरीय माणसांची ही स्वमग्नता, फक्त आपल्यापुरता विचार करून समाजात घडणाऱ्या अन्य घडामोडी, व्यक्ती यांच्याशी तुटलेले नाते सचिन खेडेकरने आपल्या अभिनयातून चोख व्यक्त केले आहेत. अंध बेनामकुमार (अनुपम खेर) आदित्यला भेटतो. आदित्य त्याचा शोध घेऊन त्याला हुडकून काढतो. माझ्या आयुष्यात हे काळाचं गणित असं पुन्हा पुन्हा चुकतंय का, रविवार सलग दोन-तीन दिवस का येतोय याचं उत्तर तो विचारतो. निसर्गापासून तू दूर गेला आहेस, आनंद, समाधान, हास्य म्हणजे काय हे तू विसरला आहेस. तो निरामय, निव्र्याज आनंद मिळाला तर काळाची पुनरावृत्ती होत असलेल्या गर्तेतून तू बाहेर येशील. उद्या किती नफा मिळणार यापेक्षा आज तुझे मन आनंदी कसे राहील याची चिंता कर असा उपदेश देतो. काही मार्ग दाखवितो.
अनोखा विषय, अनोख्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला असला तरी त्याच त्याच घटनांची पुनरावृत्ती आदित्यसोबत प्रेक्षकांनाही पाहावी लागते तेव्हा प्रेक्षक गोंधळतो. परंतु, गाणी, संवाद यामुळे प्रेक्षक थोडासा रमतो. संवाद हेच या चित्रपटाचे सामथ्र्य आहे. साधे पण अर्थवाही संवादांतून चित्रपट उलगडतो. सचिन खेडेकर यांचे काम उत्कृष्ट आहे मात्र अनुपम खेरने साकारलेली अंध व्यक्तीची भूमिका बेगडी वाटते. चित्रपटातला हा निनावी अंध माणूस म्हणजे आदित्यच्या मनातील किंवा मेंदूतील आहे की खराखुरा आहे याचा उलगडा शेवटपर्यंत होत नाही. आदित्यच्या घरातील कामवाली, इस्त्रीचे कपडे आणणारा धोबी, आदित्यचे शेजारी यासारख्या छोटय़ा छोटय़ा व्यक्तिरेखा अधिक प्रभावी झाल्या असत्या तर कदाचित चित्रपटाची गंमत अधिक वाढली असती.