भावस्पर्शी बाबू Print

बाबू बॅण्ड बाजा
सुनील नांदगावकर - रविवार, २२ एप्रिल २०१२

altहलाखीची गरिबी, त्यातून कसाबसा उदरनिर्वाह करणारे कुटूंब आणि त्यांचा संघर्ष दाखविताना अतिशय गोळीबंद पटकथा, नेमके संवाद, गाण्यातून व्यक्त होणारे परिस्थितीवरचे भाष्य यामुळे राजेश पिंजानी दिग्दर्शित ‘बाबू बॅण्ड बाजा’ हा चित्रपट अतिशय भावस्पर्शी, संवेदनशील आणि परिणामकारक ठरतो. चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर प्रेक्षकाला संवेदनशीलही बनवतो हे सिद्ध करणारा हा चित्रपट आहे. निरागस बाबूमुळे चित्रपट हसवतोही, रडवतोही आणि खोल परिणाम करून जातो.
जग्गू (मिलिंद शिंदे), शिरमी (मिताली जगताप वराडकर) छोटा बाबू (विवेक चाबुकस्वार) आणि त्याची आजी (उषा नाईक) यांचे एक गरीब कुटूंब. बॅण्ड वाजविण्याचा परंपरागत व्यवसाय करणाऱ्या जग्गूची वाद्य पोटाची खळगी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे गहाण ठेवावी लागतात. बॅण्ड वाजविण्याची कामं कमी झाल्यामुळे हलाखीच्या परिस्थिततून बाहेर कसे यायचे याचा विचार करणारा जग्गू,  लोकांकडे जाऊन कपडे गोळा करून त्या बदल्यात भांडी विकण्याचे काम करणारी शिरमी असे दोघेजण काबाडकष्ट करून कशीबशी हातातोंडाची गाठ घालण्याचा संघर्ष करत राहतात. पण तिसरीत शिकणाऱ्या बाबूला शिक्षण देऊन मोठे करायचे हे एकच स्वप्न शिरमीच्या मनात आहे. मग त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी चालतील असे तिचे मत आहे. आडगावात, हलाखीच्या परिस्थितीत राहत असताना शिक्षण घेऊन नोकरी तरी मिळणार का त्यापेक्षा जुजबी शिकून बाब्याने बॅण्डमध्ये आपल्याला मदत केली तर चार पैसे तरी कमावेल असा विचार जग्गू करत असतो. त्यामुळे बाब्याच्या शिक्षणासाठी होणारा खर्च यावरून शिरमी व जग्गू यांच्यात वाद होतात. बाबू मस्त मजेत आपल्या मित्रांबरोबर भटकतो, बॅण्डमध्ये कधीकधी जग्गूसोबत जाऊन खुळखुळा वाजवतो. पण शाळेचा गणवेश नाही म्हणून गुरूजी रोज त्याला मारतात. एकदा तर बाबूचे दप्तर हरवते, त्यामुळे सगळी पुस्तक-वह्य़ा आणि बॅण्डमधला खुळखुळाही हरवतो. दादा  म्हणजे जग्गूपासून हे लपवायला हवे नाहीतर दादा मारेल आणि शाळेत पुस्तक-वह्य़ा नेले नाही तर गुरूजी मारतील अशा पेचात बाबू सापडतो. अखेरीस आईला सांगूनच काय तरी मार्ग निघेल असे त्याला वाटते. परंतु, दारिद्रयाचे दशावतार सुरू असताना मुलाचे दप्तर हरवले हे कळल्यावर शिरमीसुद्धा बाबूवर रागावते. बाबूचे शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून मग ती दप्तर, पुस्तके, वह्य़ा मिळविण्यासाठी काबाडकष्ट करते. नव्या कंपनीत नोकरी धरते आणि दप्तर घेतेसुद्धा पण तेव्हा एक अनपेक्षित घटना घडते.
बंदिस्त पटकथा, सर्वच व्यक्तिरेखांचा टोकदार, नेमका अभिनय, नेटके दिग्दर्शन, छायालेखन, तितकेच नेटके संकलन अशा सगळ्या बाजू उत्तम असलेल्या चित्रपटाला दिलेली गाण्याची, ताकदीच्या गीतलेखनाची जोड यामुळे चित्रपट खोलवर परिणाम करतो. मिताली जगताप-वराडकर आणि बालकलाकाराची भूमिका करणारा विवेक चाबूकस्वार यांच्याबरोबरच जग्गू ही व्यक्तिरेखा, त्यातले अनेक पदर प्रभावी पद्धतीने व्यक्त करणारा अभिनेता मिलिंद शिंदे यांनाही अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता इतकी ही भूमिका त्यांनी समरसून केली आहे.  शाळेतून हाकलल्यानंतर बाबूला पुन्हा शाळेत घ्या असे म्हणताना इन्स्पेक्शनसाठी शाळेत आलेल्या बाईंसमारे बाबूला पाढे, कविता म्हणताना पाहून त्याच्या आईच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे भाव आपल्या अभिनयातून अतिशय सार्थपणे मिताली जगताप वराडकर यांनी व्यक्त केले आहेत. व्यक्तिरेखांसाठी केलेली कलावंतांची निवड हा पटकथेइतकाच या चित्रपटासाठी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे चित्रपट योग्य परिणाम साधण्यात यशस्वी ठरतो.