खेळ मांडला भावस्पर्शी दासू-बाहुलीची गोष्ट Print

सुनील नांदगावकर -रविवार, २९ एप्रिल २०१२
altपिता-कन्या यांच्यातील भावनिक अनुबंध चित्रपटातून अनेकदा आपण पाहिले आहेत. तान्हुकलीचा बाबा बनल्यानंतर त्याला ‘आपण बाबा झाल्याचा आनंद’ व्यक्त करतानाही आपण आपल्या आजूबाजूला नेहमी पाहतो. शब्दात व्यक्त न करता येणारे हे भाव ‘बाबा झालेल्या’ सर्वाचेच असतात. तेच भाव दासूच्या व्यक्तिरेखेतून दाखवितानाही त्या पलिकडे जाण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने ‘खेळ मांडला’ या चित्रपटातून यशस्वीरित्या केलाय. कळसूत्री बाहुल्यांचा पारंपरिक खेळ दाखवून उदरनिर्वाह करणारा दादू (उदय सबनीस) आणि त्याचा मुलगा दासू (मंगेश देसाई) वास्तविक तुटपूंज्या कमाईने कातावलेले आहेत. तुटपूंज्या कमाईमुळे आजारी आईवर औषधोपचार न केल्यामुळे दासूची आई निधन पावली. हे एक कारण आणि या खेळातून कितीशी कमाई होणार या भावनेतून मुंबईला जाण्याचा हट्ट दासू धरतो. खेळ सोडून बाकी सगळी काम दासूला करायला आवडतात याचे दादूला दु:ख आहे. पण मुलाच्या मायेने तो मुंबईला येतो. मुंबईत आल्यावर हाताला काम मिळत नाही म्हणून नाराज झालेला दासू अखेर कळसूत्री बाहुल्यांचा खेळ मुंबईत दाखवून उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतो. दादूला त्याचा हा निर्णय आवडतो पण तेवढय़ात अपघातात त्याचे निधन होते. अनाथ दासू कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करत राहतो. एक दिवस अचानक एक तान्हं बाळ त्याला सापडतं आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते. मुकी-आंधळी-बहिरी असलेल्या या तान्हुकलीचे नाव तो आपल्या कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे बाहुली असे ठेवतो आणि तिला घेऊन खेळ करतो. पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात वादळ येते..
altचित्रपटाची गोष्ट आपल्याला थोडीफार माहीत असलेली आहे. परंतु, दिग्दर्शक, छायालेखक, गीतकार, प्रमुख कलावंत यांनी ज्या प्रत्ययकारी पद्धतीने ते पडद्यावर साकारलेय त्याला तोड नाही. अगदी चित्रपटाच्या सुरुवातीच्या श्रेयनामावलीपासूनच चित्रपटाची मांडणीचे वेगळेपण प्रेक्षकासमोर येते. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणाराच बाहुल्यांना नाचवतो हे माहीत असूनही ते पाहायला आगळी मजा असते. ‘उपरवाला चाहेगा वैसेही होगा’, आपण सगळे ‘उपरवाल्या’च्या हातात असतो, तोच आपल्याला नाचवत असतो हे चित्रपटाचे अंतर्गत सूत्र आहे. मुकी-आंधळी-बहिरी असलेल्या बाहुलीला दासू जीव लावतो, आपल्या अर्धपोटी आयुष्यात तीच त्याचा आनंद बनते. तिला समजत नसले तरी तिच्याशी तो संवाद साधतो. ज्या क्षणी दासू मुंबईतही आपला परंपरागत कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करण्याचा निर्णय घेतो आणि त्याचा बाप दादू हे पाहतो तेव्हा त्याला झालेला आनंद क्षणिक ठरतो, दुसऱ्याच क्षणी त्याचा अपघात होतो हा प्रसंग आहे. यातून पुन्हा कळसूत्री बाहुल्यांसारखेच आपले आयुष्य आहे खरा कर्ता-करविता तो ‘उपरवाला’ आहे हे दिग्दर्शक अगदी सहजपणे अधोरेखित करतो.
मंगेश देसाईने साकारलेला दासू केवळ अप्रतिम साकारला आहे. बाहुलीचा लळा दासूला लागल्यापासून तिला ऐकू येत नाही तरी तिच्याशी गप्पा करतानाचा अभिनय असो की त्या दोघांची स्पर्शाची भाषा असो मंगेश देसाई यांना मिळालेल्या प्रमुख भूमिकेचे त्यांनी सोने केले आहे. त्यानंतर कुशल भद्रिकेनेही जीभ कापल्याचे सांगताना केलेला अभिनय दाद देण्याजोगा झाला आहे.
बाहुली सुरुवातीपासून प्रेक्षकांना दासू आणि बाहुलीची गोष्ट सांगते ही कल्पना मराठी चित्रपटातून फारशी आलेली नाही. त्याचा गोष्ट सांगण्यासाठी दिग्दर्शकाने चांगला वापर केलाय. दंगलीत सापडलेल्या बाहुलीला घेऊन जाणारा दासू, नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एका बाईच्या हाती तिला दिल्यानंतर तिच्याकडून पुन्हा मिळविताना त्याने केलेला जीवाचा आटापिटा, धावाधाव हा प्रसंग आणि नंतर बाहुलीचे खरे आई-बाबा दासूकडून बाहुलीला घेऊन जायला येतात तेव्हा दासूने केलेले पलायन या दोन्ही प्रसंगांमुळे चित्रपट एक वर्तुळ पूर्ण करतो. उर्मिलाने साकारलेली अनुष्का सावंत असो की मानसी साळवीने साकारलेली संवेदनशील शीतल राजे सर्वच कलावंतांचा चोख अभिनय आणि दिग्दर्शकाची पात्रनिवड हेही या चित्रपटाचे बलस्थान आहे. त्याला समर्पक गीतरचना, संकलनाची जोड यामुळे चित्रपट अधिक प्रत्ययकारी ठरतो.     
खेळ मांडला
निर्माता : मिराह एण्टरटेन्मेंट प्रा. लि. आणि  अशोक नारकर (अमृता प्रॉडक्शन प्रा. लि.)
कार्यकारी निर्माता : श्रीश्याम सोनाळकर
दिग्दर्शन : विजू माने,
कथा-पटकथा-संवाद : विजू माने
छायालेखन : शब्बीर नाईक
संकलन : सतीश पाटील
संगीत : चिनार-महेश, गीते : अशोक बागवे, विजू माने, अभिजीत पानसे
कलावंत : मंगेश देसाई, अनन्या देवरे, उदय सबनीस, प्रसाद ओक, मानसी साळवी, उर्मिला कानेटकर, संतोष जुवेकर, प्रिया मराठे, कुशल बद्रिके व अन्य.