चित्ररंग : पुनर्जन्मांचा टाईमपास Print

सुनील नांदगावकर ,रविवार, १३ मे २०१२
altपुनर्जन्मावर आधारित चित्रपट यापूर्वी हिंदीमध्ये भरपूर आले आहेत. किंबहुना गूढ चित्रपट म्हटले की हमखास पुनर्जन्मावर आधारित असणार. अशा चित्रपटांचा एक जमाना होता. आता हा जमाना सरला आहे. म्हणूनच अनेक पुनर्जन्मांचा सिलसिला असलेला ‘डेंजरस इश्क’ हा विक्रम भट दिग्दर्शित चित्रपट केवळ घटकाभर टाइमपास या पठडीतला झालाय. रॅम्प मॉडेल असलेली संजना (करिष्मा कपूर) आणि गर्भश्रीमंत उद्योगपती रोहन (रजनीश दुग्गल) यांचे प्रेमसंबंध दोन वर्षांपासून असले तरी अद्याप त्यांचे लग्न झालेले नाही. मॉडेलिंगच्या एक वर्षांच्या कामासाठी संजना पॅरिसला जायला निघते खरी पण रोहनशिवाय राहण्याचा विचार तिला सलतो. पॅरिसला जायला निघण्यापूर्वी ते दोघे भेटतात आणि तितक्यात रोहनच्या आलिशान बंगल्यात शिरून काही बुरखाधारी लोक त्याचे अपहरण करतात. त्या वेळी संजना बेशुद्ध पडते, तिच्या मेंदूला धक्का लागतो. रुग्णालयात दाखल होते. त्यातून शुद्धीत आल्यानंतर तिला एकदम आधुनिक वर्तमानकाळाऐवजी मुघल कालीन वेशातील माणूस ‘गीता’ अशी हाक मारतो आणि ती पाहते तो रोहन असतो. फक्त मुघलकालीन पोषाखातला. त्याला मारण्यासाठी मोठा जमाव येताना ती पाहते आणि त्याला लपवते. तेवढय़ात रुग्णालयात संजनाला शोधत तिची मैत्रीण नीतू येते. मग तिला वर्तमानकाळ आणि प्राचीन काळाचा उलगडा होतो. पण भांबावून गेलेल्या संजनाला काय altचाललेय तेच कळत नाही. पुढे पुढे मुघल काळानंतर एकदम चित्तोडगडमधील दुर्गमसा (रवी किशन) या राजाच्या साम्राज्यात पुन्हा प्राचीन काळात संजना जाते. तिथेही तिचा प्रियकर रोहन असतो, फक्त त्याचे नाव राजदत्त असते. नंतर फाळणीपूर्व पाकिस्तानमध्ये गीता नावाने करिष्मा दिसते. तिथेही तिच्या इकबालपासून तिला आरिफ (आर्य बब्बर) दूर करण्याचा प्रयत्न करतो. एकामागून एका अशा वेगवेगळ्या अनेक प्राचीन काळापासून रोहन आणि संजना वेगवेगळ्या रूपांत पडद्यावर येत राहतात. वर्तमानकाळात रोहनचे अपहरण कोण आणि का करतो, रोहन सापडतो का वगैरे गोष्टींभोवती सिनेमा फिरत राहतो.
‘हॉन्टेड’ या सार्वकालिक सुपरहिट थरारपटानंतर दिग्दर्शक विक्रम भट यांचा ‘डेंजरस इश्क’ आलाय आणि करिष्मा कपूरने या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. थरारपट आणि विनोदपट अशा दोन्ही प्रकारांतील चित्रपट गाजल्यानंतर हा चित्रपट येत असल्यामुळे याबद्दल वास्तविक खूप अपेक्षा होत्या. परंतु, ती अपेक्षा फोल ठरते. कारण एकामागून एक पुनर्जन्माचा सिलसिला दाखवत दिग्दर्शक चित्रपटातील गूढ कमी कमी करत नेतो. आपल्या आयुष्यात हे काय घडतेय याचा अचंबा वाटल्यानंतर संजना लगेच मानसोपचारतज्ज्ञाकडे जाते. तिथेच तिला पूर्वजन्मातील गोष्टी घडत आहेत हे समजते. त्यामुळे पुनर्जन्म-पूर्वजन्म याविषयी प्रेक्षकाला गूढ वाटत नाही. धक्कातंत्राचा वापर, altपूर्वजन्मांतील घटनांवर आधारित वर्तमानकाळातील रोहनच्या अपहरणाचे प्रकरण, त्यातील गूढ उकलण्यासाठी लेखकाने केलेला प्रयत्न घटकाभर का होईना प्रेक्षकाला खिळवून ठेवतो. व्यावसायिक हिंदी चित्रपटांची नायिका करिष्मा कपूरने रंगवली आहे. गोविंदा, शाहरूख, आमिर यांच्याबरोबर ९० च्या दशकात तिचे गाजलेले तद्दन गल्लाभरू चित्रपट येऊन गेले आहेत. परंतु, गेल्या पाच-सात वर्षांत हिंदी चित्रपटांमध्ये भरपूर बदल झाले आहेत. त्यामुळे विक्रम भट स्टाइलच्या चित्रपटाद्वारे पुनरागमन करण्याचा करिष्माचा निर्णय हा ‘सेफ गेम’ आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. परंतु, वरचेवर अखंड चित्रपटभर वेगवेगळ्या पुनर्जन्मांमध्ये जाऊन दिग्दर्शकाने प्रेक्षकाचा रसभंग केला आहे. थ्रीडीमध्येही त्याची मजा प्रेक्षकाला लुटता येत नाही. त्यामुळे केवळ पुनर्जन्मावर आधारित घटकाभर टाइमपास एवढेच प्रेक्षकाला मिळते.
करिष्मा कपूरचा पडद्यावर सर्वाधिक वावर आणि अभिनय बेताचा म्हणण्याइतपत असला तरी रजनीश दुग्गल, रवी किशन, रुसलाना मुमताज, जिमी शेरगील यांना फारसा वाव नाही. त्यामुळे त्यांच्या अभिनयाबद्दल न बोललेले बरे. छायालेखन आणि संगीत या चित्रपटाच्या त्यातल्या त्यात जमेच्या बाजू आहेत. थ्रीडीमध्ये प्रेक्षकांना चित्रपट सुसह्य़ होतो इतकेच.
डेंजरस इश्क
निर्माता - रिलायन्स एण्टरटेन्मेंट
दिग्दर्शक - विक्रम भट
लेखक - अमीन हाजी
संगीत - हिमेश रेशमिया
कलावंत - करिष्मा कपूर, रजनीश दुग्गल, जिमी शेरगील, दिव्या दत्ता, रुसलान मुमताज, आर्य बब्बर, ग्रेसी सिंग, रवी किशन व अन्य.