संगीतमय, भावस्पर्शी Print

सुनील नांदगावकर - रविवार, २० मे २०१२
altम्युझिक रिअॅलिटी शो आणि डान्स रिअॅलिटी शोंचे प्रमाण सध्या प्रचंड आहे. भारताच्या खेडोपाडय़ांतील गुणवान गायक, नृत्य कलावंतांना व्यासपीठ मिळवून देणारे हे कार्यक्रम आहेत ही चांगली बाब आहे. परंतु, कधी कधी अल्पवयात मिळालेल्या यशाने, प्रसिद्धीमुळे मुलांचे बालपण हरवून जाते, बालकलावंत म्हणून गौरव होत असल्यामुळे अनेकदा त्यांची अन्य लोकांशी वागणूक बदलते. या सगळ्यावर प्रकाशझोत टाकून अतिशय हळुवार पद्धतीने ‘आरोही..गोष्ट तिघांची’ या चित्रपटाद्वारे नकळत भाष्य करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. भार्गवी (केतकी माटेगावकर), स्नेहा (मृणाल कुलकर्णी) आणि मंदार (किरण करमरकर) असे तिघांचे सुखी-उच्चमध्यमवर्गीय छान कुटुंब आहे. लहानपणापासून भार्गवीची गाण्याची आवड जोपासली जाते. स्वरझंकार रिअॅलिटी शोमध्ये भार्गवी विजेती ठरते आणि सगळ्यांकडून होणाऱ्या कौतुकाच्या वर्षांवाने हुरळून जाते. पुढे एक इव्हेण्ट मॅनेजमेंट कंपनी लाखो रुपये देऊन भार्गवीला करारबद्ध करून घेतात आणि मग शाळा, अभ्यास आणि ठिकठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम करताना भार्गवीची दमछाक होते. वारंवार प्रसिद्धी मिळू लागल्यामुळे आता आपण स्टार झालो आहोत, मनात येईल तसे वागू शकतो असे भार्गवीला वाटू लागते. दरम्यान एका गाण्याच्या रेकॉर्डिगमध्ये अचानक भार्गवी कोसळते आणि तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते.
गाण्यांच्या रिअॅलिटी शोमध्ये नायिका भार्गवी असल्यामुळे चित्रपट संगीतमय झाला आहे. त्यातही भार्गवीची व्यक्तिरेखा साकारणारी केतकी माटेगावकर ही स्वत:च रिअॅलिटी शोची स्पर्धक सहभागी असल्यामुळे तिने अगदी सहजपणे व्यक्तिरेखा साकारली आहे. प्रेक्षकांना केतकीची ओळख आधीपासून गायिका अशीच असल्याने या चित्रपटात तिचा वावर अगदी सहज होतो. किंबहुना ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. त्यामुळे गोष्ट सांगणे दिग्दर्शकाला सोपे ठरले. फक्त भार्गवीची वाटचाल दाखवली गेली असती तर चित्रपट पूर्ण वाटला नसता. म्हणूनच दिग्दर्शकाने भार्गवीला झालेला आजार, तिची परवड आणि तिचे वडील मंदार आपटे यांना कॉपरेरेट कंपनीत करावा लागणारा मंदीचा सामना, त्यामुळे निर्माण झालेला तणाव याची जोड देऊन चित्रपट अधिक रंगतदार केला आहे.
उच्च मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करताना होणारी मानसिक ओढाताण मंदारच्या व्यक्तिरेखेतून चांगल्या पद्धतीने दाखवली आहे. तर दुसरीकडे उच्च शिक्षित असूनही भार्गवीच्या प्रगतीसाठी तिची काळजी घेण्यासाठी नोकरी सोडणारी भार्गवीची आई स्नेहा, भार्गवीच्या सतत बरोबर राहून तिच्यावर संस्कार करणारी आई मृणाल कुलकर्णीने समर्थपणे साकारली आहे. सततच्या कामाच्या ताणामुळे भार्गवी आणि तिचे वडील यांच्यात निर्माण झालेला दुरावा, त्यावरून मंदार-स्नेहा यांच्यात होणारे वाद याचा सूक्ष्मपणे भार्गवीच्या मनावर परिणाम होतोय हेही दिग्दर्शकाने अतिशय हळुवार पद्धतीने दाखविले आहे.
केतकीच्या आवाजातली गाणी सुमधुर तर आहेत. सुंदर छायालेखन आणि चांगले संकलन याची जोड आणि शेवटी सुधीर मोघे यांनी संगीतबद्ध केलेले ‘रंगूनी रंगात सारा रंग माझा वेगळा’ हे सुरेश भटांचे गाणे यामुळे चित्रपट एक वर्तुळ पूर्ण करतो आणि भावस्पर्शी प्रसंग, अभिनय यामुळे प्रेक्षकाला अंतर्मुख करण्यातही चित्रपट यशस्वी ठरतो.
श्री सत्यसाई मुव्हिज प्रस्तुत आरोही..गोष्ट तिघांची
निर्माती - अमृता राव, दिग्दर्शक - प्रमोद जोशी, कथा-पटकथा-संवाद - प्रमोद जोशी, अमृता राव,
छायालेखन - सलील सहस्रबुद्धे, संकलन - मयूरेश मुरकुडकर, संगीत - प्रवीण जोशी, सुधीर मोघे , कलावंत - केतकी माटेगावकर, मृणाल कुलकर्णी, किरण करमरकर, रेशम टिपणीस, गिरिजा ओक व अन्य.