चित्ररंग : सत्याचा थरारक शोध Print

रोहन टिल्लू - रविवार, २९ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मराठी चित्रपटसृष्टीने आतापर्यंत अनेक चांगले रहस्यपट पाहिले आहेत. ८०-९०च्या दशकात महेश कोठारे यांचे काही विनोदी अंगाने जाणारे रहस्यपटही आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे रहस्यपट हा प्रकार मराठी रसिकाला नवीन नाही. तरीही ‘सत्य, सावित्री आणि सत्यवान???’ हा चित्रपट आतापर्यंतच्या रहस्यपटांपेक्षा वेगळा वाटतो आणि हीच या चित्रपटाची जमेची बाजू आहे. चित्रपटाचं शीर्षक वाचल्यानंतरच अनेकांच्या मनात उत्कंठा निर्माण होते. सत्यवान आणि सावित्री यांची पुराणातली गोष्ट अनेकांना चांगलीच माहितीची आहे. आपल्याकडे पतिव्रतेला सावित्रीची उपमाही दिली जाते. अकाली मृत्यू झालेल्या आपल्या पतीचे प्राण साक्षात यमराजाशी भांडून परत आणणाऱ्या सावित्रीला आपल्या धर्मात आणि संस्कृतीत फार मोठं स्थान आहे. त्यामुळे चित्रपटातही अशीच काही भानगड आहे का, असा विचार सर्वसामान्य रसिकांच्या मनात आल्यास वावगं नाही. पण केवळ ही गोष्ट विचारात घेऊन हा चित्रपट बघायला जाल तर कदाचित विरस होण्याची शक्यता अधिक!
आडगाव नावाच्या एका तालुक्याच्या गावात जिल्हा परिषद अध्यक्ष बाळकृष्ण पवार (गणेश यादव) यांचा खून होतो. बाळकृष्ण पवार हा सत्ताधारी आमदार काकासाहेब थोरात (प्रदीप वेलणकर) यांचा जावई असल्याने जिल्हा स्तरावरील राजकारण ढवळून निघते. पवारचा खून त्याचा एक अंगरक्षकच करतो. त्या वेळी तेथे असलेला दुसरा अंगरक्षक पहिल्या अंगरक्षकाला गोळ्या घालून जागीच ठार करतो. मेलेल्या अंगरक्षकाची बायको सुप्रिया (श्रुती मराठे) या प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी करते. त्या मागणीनुसार इन्स्पेक्टर सुनील गावस्कर (सचित पाटील) या गावी येऊन चौकशीला सुरुवात करतो.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची रिकामी झालेली जागा, त्या खुर्चीसाठी बाळकृष्ण पवारची बायको व काकासाहेब थोरात यांची मुलगी संध्या (अमृता पत्की) आणि पवारच्या अंगरक्षकाची पत्नी दोघीही उभ्या राहतात. यामागे आपल्या नवऱ्याला न्याय मिळावा ही भूमिका असते की त्या दोघी केवळ बडय़ा राजकारण्यांच्या हातामधल्या सोंगटय़ा असतात, हे चित्रपट पाहतानाच समजेल. सुनील गावस्कर यांच्या चौकशीदरम्यान जवळच्या एका गावातील सरपंच मेश्राम बेपत्ता असल्याची आणि नंतर त्याचाही खून झाल्याची बाब उघडकीस येते. बाळकृष्ण पवार हा सत्ताधारी आमदार काकासाहेब थोरात यांचा जावई असतो. त्यामुळे जिल्हास्तरीय राजकारण, स्थानिक पोलीस आणि राजकारणी यांचं साटंलोटं, सेक्स आणि रहस्य यांचा पुरेपूर मसाला या चित्रपटात अगदी योग्य प्रमाणात आला आहे. इन्स्पेक्टर सुनील गावस्कर विनाअडथळा हा तपास पूर्ण करतो का, या तीनही खुनांमागे कोणाचा हात असतो, या प्रश्नांची उकल यातच चित्रपटाचे रहस्य दडलेले आहे.
या चित्रपटाची मुख्य जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचं दिग्दर्शन आणि संकलन. सर्वेश परब यांनी आपला संकलनातला सगळा अनुभव दिग्दर्शन करतानाही पणाला लावल्याचं लख्ख दिसतं. विशेष म्हणजे हा परब यांचा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न आहे, हे कुठेही जाणवत नाही. रहस्यांची मालिका एकामागोमाग एक गुंफण्यात त्यांना चांगलंच यश आलं आहे. एकच घटना, मात्र ती तीन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नजरेतून दाखवण्याचा विचार, फॅशब्लॅक सुरू असताना सेपिया टोनचा वापर, मात्र त्यातही ज्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तो प्रसंग दिसतोय, त्या व्यक्तीचे कपडे रंगीत दिसणं ही कल्पकता त्यांनी नक्कीच चांगली केली आहे. विशेष म्हणजे चित्रपटात एकही गाणं नसूनही किंवा नसल्यामुळेच प्रेक्षक तीन तास या तीन खुनांच्या रहस्याभोवती खिळून राहतो.
राजीव जोशी यांनी मूळ कथा लिहिली आहे. संजय मोने यांनी या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. ही कथा महाराष्ट्रातल्या नेमक्या कोणत्या जिल्ह्य़ात घडते, हे संवादांच्या भाषेवरून चटकन लक्षात येत नाही. म्हणजे काही पात्रं ही वैदर्भीय हेल काढून बोलतात, तर काही मराठवाडय़ात सर्रास बोलल्या जाणाऱ्या मराठीचा लहेजा पकडून बोलतात. त्यामुळे हा दोष चित्रपट पाहताना जाणवतो. मात्र हा दोष वगळता चित्रपटाचे संवाद खूपच चमकदार आणि टोकदारही झाले आहेत. ‘जगात जेवढी म्हणून युद्धं झाली आहेत ती सर्व एकतर सत्तेसाठी किंवा स्त्रीसाठी झाली आहेत,’ ‘क्राइमचा रेकॉर्ड असलेला वाल्मीकीनंतर दुसरा ऋषी नाही झाला,’ ‘वाघाची शिकार करायला जाताना वाटेत डुक्कर आडवं आलं की, आपण वाघ मारायला जातोय डुक्कर नाही, असं म्हणून आपण परत फिरतो का?’ अशा अनेक दर्जेदार संवादांची पखरण संपूर्ण चित्रपटात आहे.अभिनय हीदेखील या चित्रपटाची जमेची बाजू म्हणावी लागेल. गणेश यादव यांनी साकारलेला बाळकृष्ण पवार हा खूपच चांगला जमला आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच मराठीत काम करणाऱ्या अमृता पत्कीने तर विशेष दखल घ्यावी, असं काम केलं आहे. एका आमदाराची मुलगी, झेडपी अध्यक्षाची पत्नी आणि राजकारणात महत्त्वाकांक्षा असलेली स्त्री असे विविध पैलू असलेली संध्याची भूमिका तिने चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. सचित पाटील यानेदेखील त्याच्या वाटय़ाचा सुनील गावस्कर चांगला रंगवलाय. तो रूढ पोलिसांपेक्षा जास्त ग्लॅमरस दिसला आहे, हेदेखील तेवढंच खरं. श्रुती मराठेनेही बबनच्या (पवारचा खुनी अंगरक्षक) बायकोची, एका शाळा मास्तरणीची भूमिका उत्तम वठवली आहे. त्याशिवाय इन्स्पेक्टर फुलपगारेच्या भूमिकेत आनंद इंगळेचं एक वेगळंच काम लोकांसमोर आलं आहे. प्रदीप वेलणकर यांनीही आमदाराची भूमिका त्यांच्या लौकिकाला साजेशीच केली आहे.हा चित्रपट पाहत असताना प्रेक्षक प्रत्येक शक्यतेचा विचार करीत असतो. एखादा विचार मनात पक्का होत असतानाच दुसरं रहस्य समोर उभं राहतं आणि मनातली पहिली शक्यता धुळीला मिळते. मग पुन्हा एकदा त्या रहस्याची उकल करण्यात इन्स्पेक्टर सुनील गावस्कर आणि प्रेक्षकही रंगून जातात. एखाद्या रहस्यपटाकडून यापेक्षा अधिक अपेक्षा काय करणार?
यमाई पिक्चर्स प्रस्तुत सत्य, सावित्री आणि सत्यवान???
निर्माती - श्यामल परब, दिग्दर्शक व संकलक - सर्वेश परब, छायालेखक - एकेन सॅबेस्टियन, कथा - राजीव जोशी, पटकथा-संवाद - संजय मोने, कलावंत - श्रुती मराठे, अमृता पत्की, सचित पाटील, गणेश यादव, संजय मोने, अनंत जोग, आनंद इंगळे, प्रदीप वेलणकर, अतुल काळे, किशोर प्रधान, हेमलता बाणे, सुनील गोडसे, जनार्दन परब, संतोष मयेकर, लक्ष्मीकांत करपे, संतोष नारकर, संजय तोरसकर, मृणाल परब, अंगद म्हसकर, राहुल गोरे, अंजली कोराणे.