चित्ररंग : रक्तरंजित प्रवास.. Print

मागच्या पानावरून पुढे
सुनील नांदगावकर - रविवार, १२ ऑगस्ट २०१२

‘जब तक हिंदुस्तान में सिनेमा बनते रहेंगे तब तक पब्लिक पागल बनती रहेगी’ असे संवाद रामादिर सिंग (तिग्मांशू धुलिया) म्हणजे चित्रपटाचा मुख्य खलनायक म्हणता येईल अशा व्यक्तिरेखेच्या तोंडून आपण ऐकतो. परंतु, तद्दन बॉलीवूड फिल्मीगिरीच्या पद्धतीच्या चित्रीकरण, लेखनाला फाटा देत अतिशय वेगळ्या पद्धतीने दिग्दर्शकाने मांडलेला चित्रपटाचा दुसरा भाग विलक्षण खिळवून ठेवतो. सूडाचा प्रवास दाखविणारे एक सलग कथानक पहिल्या भागापासून दुसऱ्या भागाच्या अखेपर्यंत आहे.
‘वासेपूर..’चा पहिला भाग ज्यांनी पाहिला नसेल त्यांना दुसरा भाग पाहताना पहिल्या चित्रपटाच्या कथेचा धागा पकडून दुसरा भाग सादर करण्यात आल्यामुळे आधीचे कथानक माहीत नसले तरी पडद्यावर चाललेला सूडाचा प्रवास, सातत्याने हिंसाचार, मधूनच गाण्यांच्या ओळी, विनोदाची पखरण यात गुंगून जाता येईल.
‘गँग्स ऑफ वासेपूर’चे दोन्ही भाग म्हणजे बॉलीवूड मेकिंगला पूर्णपणे छेद देत बनविलेले चित्रपट आहेत. इंग्रजीमध्ये ‘कल्ट’ फिल्म म्हणतात त्याप्रमाणे हे चित्रपट आहेत, असे प्रेक्षकाला वाटल्यावाचून राहात नाही.
सरदार खान (मनोज बाजपेयी) च्या खुनापासून चित्रपट सुरू होतो आणि सूडाचा प्रवास अख्ख्या वासेपूरला रक्ताने माखवून टाकतो. झारखंडच्या एका गावातील हा सूडाचा प्रवास पडदा व्यापून उरतो. दुसऱ्या भागाचा नायक आहे फैझल खान (नवाझुद्दिन सिद्दिकी) म्हणजे सरदार खानचा मुलगा. रामादिर सिंगच्या तोंडी असलेला सिनेमाविषयक संवाद हा चित्रपटातील विविध व्यक्तिरेखांना बॉलीवूडच्या सिनेमांविषयी असलेले अप्रुप जसे सांगतात तसेच वासेपुरचे माफिया, गुंड, एकामागून एक हत्यासत्र करणारे गँगस्टर, सुपारी घेऊन हत्या करणारे खुनी यांना बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये दाखविण्यात येणारे फिल्मी हत्याकांड याविषयी असलेले अप्रुपही दाखवितात.
सरदार खानच्या हत्येचा सूड उगविण्यासाठी दानिश (विनीत सिंग) म्हणजे फैझलचा मोठा भाऊ  खुन्यांपैकी दोघांना कंठस्नान घालतो आणि नंतर त्याचीही हत्या होते. तोपर्यंत घरात बसून अखंड गांजा ओढणारा फैझल खान हा अतिशय शांतपणे, काहीशा भेदरलेल्या अवस्थेत वावरताना दाखविलाय. वडिल, भाऊ यांची हत्या केली जाते तरी तो शांत राहिलेला बघून त्याची आई त्याला सूड घ्यावासा वाटत नाही का तुला असेही विचारते, तुझ्यात काही दम नाही, तुला पेटून उठावेसे वाटत नाही का असे फैझलला विचारते. त्यावरही तो आईला शांत करतो. काळजी करू नकोस मी सगळे काही ठिक करीन असे सांगतो तेव्हा फैझलच्या आईलाही ते पटत नाही आणि हा लुकडय़ा फैझल काय करणार असे प्रेक्षकालाही वाटते. परंतु, सरदार खानसह भावाच्या खुनामध्ये आपल्या खास दोस्ताचा सहभाग आहे हे त्याला पटते तेव्हा मात्र फैझल पेटून उठतो आणि मग सुरू होतो सूडाचा प्रवास..
आपल्या खास दोस्ताची तो निवडणूक जिंकल्यानंतरच्या जंगी सोहळ्यादरम्यान त्याला बाहेर बोलावून त्याच्यासोबत शांतपणे गप्पा करत गांजा ओढता ओढता फैझल त्याची अशा प्रकारे हत्या करतो की ते पाहिल्यानंतर वासेपूरमध्ये फैझलची अचानक दहशत पसरते. एका डॉनचा जणू उदय होतो. मग तो वासेपूरच्या गँगचा म्होरक्या बनतो. अपेक्षेप्रमाणे पुढे चित्रपट सूडाचा प्रवास पूर्ण करतो परंतु, दिग्दर्शकाची शैली, छायालेखनाचे कसब, संगीताची जोड, चित्रपटाला असलेला वेग यामुळे प्रेक्षकाला वासेपूरचा फैझल खिळवून ठेवण्यात कमालीचा यशस्वी ठरतो.
डेफिनिट, परपेन्डीक्युलर या दोन व्यक्तिरेखा म्हणजे वासेपूरच्या सरदार खान घराण्याचा सूडाचा प्रवास बघत ज्यांचे बालपण गेले असे दोघे असल्यामुळे आपल्या परिसरात सरदार खानसारखी दहशत निर्माण करून वासेपूरचे अनभिषिक्त सम्राट बनण्याची इच्छा बाळगणारे दोघेजण. डेफिनीट (झैशान कादरी) हा फैझलचा सावत्रभाऊ. सरदार खानची दुसरी बायको दुर्गा हिचा मुलगा. त्याच्याही मनात सर्व सत्ता, पैसा, अधिकार सरदार खानचा मुलगा दानिश, फैझल यांच्याकडेच आहे म्हणून त्यांच्याबद्दल द्वेषाची भावना लहानपणापासून आहे. याचा फायदा रामादिर सिंग (तिग्मांशू धुलिया) वेळोवेळी घेत आला आहे. आपल्या सत्तेला बाध आणणाऱ्या वासेपुरमधील प्रत्येकाला  साम, दाम, दंड, भेद या मार्गाचा वापर करीत नेस्तनाबूत करण्याचा त्याचा प्रघात आहे.   थंड डोक्याने हत्या करतानाचा फैझल आणि लग्न झाल्यावर मोहसीना आणि फैझल यांच्यातील नाते दाखविताना फैझलच्या वागण्यातील बदल दिग्दर्शकाने नेमकेपणाने दाखविलाय. तुरुंगात गेल्यावर आपले आवडते गाणे म्हण ना असे फैझल मोहसीनाला सांगतो तो प्रसंगही अतिशय सहजपणे चित्रीत करण्यात आलाय की त्यात कुठेही फिल्मीपणा वाटत नाही.  धनबाद आणि वासेपूरमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी केलेले राजकारण असो की पोलिसांवर हुकूमत गाजविण्याची तऱ्हा दोन्हीमध्ये भ्रष्टाचार अगदी तळापर्यंत पसरलाय हे सहजपणे अधोरेखित होते.
अप्रतिम संकलन, दिग्दर्शनाची वैशिष्टय़पूर्ण शैली, संगीत, पाश्र्वसंगीताची अचूक जोड आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्यक्तिरेखांसाठी केलेली कलावंतांची निवड या वासेपुर भाग दोनच्या जमेच्या बाजू असल्यामुळे चित्रपट निश्चितच परिणामकारक ठरतो.
गँग्स ऑफ वासेपूर भाग दुसरा
निर्माते - अनुराग कश्यप, सुनील बोहरा
लेखक - झैशान कादरी, अखिलेश, सचिन लाडिया, अनुराग कश्यप, छायालेखक - राजीव रवी, संगीत - स्नेहा खानवलकर, जी. व्ही. प्रकाश कुमार, कलावंत - रिचा चढ्ढा, नवाझुद्दिन सिद्दिकी, जमील खान, झैशान कादरी, आदित्य कुमार, रीमा सेन, हुमा कुरेशी, तिग्मांशू धुलिया, राज कुमार यादव, विनित सिंग