चित्ररंग : भारतीयत्वाचा अर्थ सांगणारा ‘भारतीय’ Print

रोहन टिल्लू - रविवार, १२ ऑगस्ट २०१२

मध्यंतरापर्यंत प्रेक्षकांच्या मनाची घट्ट पकड घेणारा हा चित्रपट मध्यंतरानंतरही प्रेक्षकांना त्याच उत्सुकतेने खिळवून ठेवतो. अंती विचार करायला लावतो. काही छोटय़ामोठय़ा चुका लक्षात घेऊनही ‘भारतीय’ चित्रपट चांगलाच जमला आहे. ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत..’ शाळेत असल्यापासून ते शाळेतून बाहेर पडेपर्यंत ही प्रतिज्ञा प्रत्येक मुलगा घोकत आला आहे. पण भारतीय म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न कधी त्या वेळी आपल्याला पडत नाही. आणि पडला, तरी ‘भारतात राहणारा तो भारतीय’ एवढं सोप्पं उत्तर स्वत:लाच देऊन आपण आपलं समाधान करतो. पण कधी कधी भारतीय म्हणजे काय, असा प्रश्न पडलाच, तर त्याचं खरं उत्तर शोधता सापडत नाही. हे उत्तर अल्लद मिळवायचं असेल, तर ‘भारतीय’ हा चित्रपट एकदा तरी पाहायलाच हवा.
चित्रपट बघताना आणि बघितल्यानंतर प्रेक्षक आपल्या भारतीयत्वाबद्दल विचार करायला लागतो आणि हेच या चित्रपटाचं यश आहे, असं मानायला हरकत नाही. चित्रपटाची संपूर्ण कथा घडते ती ‘अडनिडं’ या महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवरील एका छोटय़ाशा गावात. ही कथा प्रेक्षकांना दिसते ती गावोगावच्या तालेवार घराण्यांच्या वंशावळींची नोंद ठेवणाऱ्या एका हेळव्याच्या (मकरंद अनासपुरे) नजरेतून! नावाप्रमाणे गावही अडनिडं आणि सहसा पोहोचता येणार नाही असं! कोणत्याही दोन राज्यांच्या सीमेवरील छोटय़ाशा गावाला भेडसावणाऱ्या सर्व समस्या या गावातही आहेतच. मुख्य म्हणजे गावात ग्रामपंचायत नाही. तसंच दोन्ही राज्यांच्या कोणत्याही सरकारी कागदपत्रांत या गावाची नोंद नाही. या गावात घडणारी ही अलौकिक कथा सांगतो सगळ्यांच्या वंशावळींची नोंद ठेवणारा हेळवी (मकरंद अनासपुरे).
अशा या गावात लाडे पाटील (कुलदीप पवार) आणि अण्णा सरदेशमुख (डॉ. मोहन आगाशे) यांचे परंपरागत वैर सुरू आहे. लाडे पाटलाचा मुलगा श्रीपती (जितेंद्र जोशी) कोणत्याही गावातील एखाद्या निरागस पण तरीही वांड मुलासारखा आहे. तर सरदेशमुखांची मुलगी सुगंधा (मिता सावरकर) ही पुण्यात शिकून आलेली असल्याने त्या गावात थोडीशी पुढारलेली मुलगी आहे. श्रीपतीला सुगंधा खूप आवडते. पण गावातल्या एकमेव कानडी दुकानदाराची मुलगी मंगल (तेजश्री खेळे) ही श्रीपतीच्या मागे आहे. गावातील कोणतीही कामं अडली की, सरकारदरबारी थोडीशी चिरिमिरी देऊन ती करण्याचं काम महिपती (हृषिकेश जोशी) आवडीने करत असतो. अनेक शतकांपासून एका संथ गतीने गावगाडा सुरू आहे. गावात मोबाइल आले, पण पिण्याच्या पाण्याची किंवा सरकारी शाळेची सोय नाही.
तर अशा या गावात आपली मुळे शोधत अभय सरदेशमुख (सुबोध भावे) नावाचा एक तरुण येतो. गावाचे वतनदार सरदेशमुख ते आपणच, असा त्याचा दावा असतो आणि तशी कागदपत्रेही त्याच्याकडे असतात. मात्र आपल्या वाडय़ाचा सातबाराचा उतारा त्याला ना धड महाराष्ट्रात मिळत, ना कर्नाटकमध्ये. त्यामुळे हताश झालेला अभय पुढे काय करायचं या विचारात असताना त्याला त्याच्या आईने आणि सरदेशमुखांच्या वाडय़ात राहणाऱ्या एका म्हातारीने दिलेला इशारा आठवतो. तळघराचा दरवाजा न उघडण्याचा! मग तो तळघराचा दरवाजा उघडतो. या तळघरात त्याला नेमकं काय सापडतं, तहसीलदाराच्याही खिजगणतीत नसलेल्या गावाची दखल तो संयुक्त राष्ट्रांनाही कशी घ्यायला लावतो, भारताच्या पंतप्रधानांसह बडय़ा बडय़ा राजकीय नेत्यांना तो या गावात कसे येण्यास भाग पाडतो, याचा प्रवास पडद्यावर पाहण्यात अधिक मजा आहे.
एका हेळव्याच्या नजरेतून सुरू होणारी ही कथा पुढेपुढे रंगत जाते. ही कथा प्रेक्षकांचा ठाव घेते त्याला मुख्य कारण म्हणजे वेगवान कथानक आणि त्याला मिळालेली संकलन आणि छायाचित्रणाची साथ. संकलक नीलेश गावंड आणि छायालेखक श्रीनिवास आचार्य यांनी या चित्रपटात आपापली भूमिका चोख बजावली आहे. कथा ज्या गावात घडते, त्या गावासाठी जकीन पेठ या खरोखरच अडनिडय़ा ठिकाणी असलेल्या गावाची निवड करण्याचा दिग्दर्शक आणि निर्मात्याचा हट्ट किती योग्य आहे, हे ते गाव प्रत्यक्ष पडद्यावर पाहिल्याशिवाय पटणार नाही. संकलकाने कथानकाचा वेग प्रेक्षकांच्या अंगावर येणार नाही, अशा पद्धतीने संकलन केलं आहे. तसंच प्रेक्षकांची उत्कंठा ताणून धरण्याचं कामही त्यांनी आपल्या भूमिकेतून चोख निभावलं आहे. श्रीनिवास आचार्य यांनी छायालेखित केलेली अनेक दृश्यं प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडतात. त्याचप्रमाणे गावातले लोक, त्यांची वेशभूषाही लोकांना पटकन भावते.
या चित्रपटाची कथा-पटकथा अनिरुद्ध पोतदार यांची आहे तर गोळीबंद संवाद आहेत संजय पवार यांचे. संजय पवार हे नाव नाटय़ आणि एकांकिका क्षेत्रात प्रचंड आदराने घेतलं जातं. या चित्रपटातील संवाद आणि मुख्य म्हणजे अभय सरदेशमुखने पंतप्रधानांना उद्देशून केलेलं भाषण अत्यंत चोख आणि डौलदार झालं आहे. अनिरुद्ध पोतदार यांनी एक अत्यंत गंभीर विषय खूपच वेगळ्या आणि कल्पक पद्धतीने लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांना लाभलेल्या दिग्दर्शक, निर्माता आणि इतरांच्या साथीने ते त्यात यशस्वीही झाले आहेत. पण तरीही काही गोष्टींबाबत प्रश्नचिन्ह कायम राहतं. चित्रपटातून जो आशय पोहोचवायचा आहे, त्याबाबत याआधीही अनेक चित्रपट आले होते. त्या चित्रपटांतही एखाद्या भाषणातून चित्रपटाचे सार सांगण्याचा खटाटोप केला गेला होता. ‘क्रांतीवीर’ चित्रपट हे याचं उत्तम उदाहरण! या चित्रपटातही अभय सरदेशमुख याने पंतप्रधानांना उद्देशून केलेल्या भाषणातून चित्रपटाचे सार अखेरीस सांगितले आहे. मग केवळ या भाषणासाठी चित्रपटाचा घाट घातला का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर मध्येच नक्षलवादी टच देऊन चित्रपट काही प्रमाणात ट्रॅक सोडून जात आहे का, अशी भीतीही वाटते. तसेच उत्तरार्धात महिपतीचा मृत्यूही लढय़ातील बलिदान म्हणून घडवल्यासारखा वाटतो. मात्र तरीही पोतदार यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
एवढय़ा चांगल्या विषयाला तेवढय़ाच उत्तम संगीताची साथ मिळाली, तर दुग्धशर्करा योग जुळून येतो. मात्र अजय-अतुल या संगीतकार जोडीनं या चित्रपटात फार करिष्मा दाखवलेला नाही. त्यांचं संगीत प्रभावी वाटत नाही. अत्यंत चर्चिल्या गेलेल्या ‘अय्ययो.’ या गाण्याचं चित्रपटातील नेमकं प्रयोजन कळत नाही. ‘तरी आम्ही सॉल्लिड आहोत..’ हे गाणं थिम साँगसारखं वापरलं असलं, तरीही अत्यंत जोरदार संगीतरचनेमुळे गाण्याचे शब्दच कळत नाहीत. मात्र पोवाडा आणि भजन ही दोन गाणी अत्यंत उत्तम जमली आहेत. अभय सरदेशमुख याच्या पूर्वजांची कथा सांगताना पोवाडा अचानक येतो आणि उत्तम प्रकारे ती कथा सांगून जातो. दिग्दर्शकाने या पोवाडय़ाला दिलेली ‘ऐतिहासिक’ ट्रीटमेंटही त्याची कल्पकता दाखवते. त्याचप्रमाणे भजनही चपखल बसले आहे.
नंदेश उमपने आपल्या बुलंद आवाजात पोवाडा अमर केला आहे. पण इतर गाण्यांसाठी श्रेया घोषाल, कुणाल गांजावाला आणि रुपकुमार राठोड या तीन प्रसिद्ध गायकांना खास गायला बोलावण्यामागचं प्रयोजन समजू शकलं नाही. त्यांनी गाणी उत्तमरीत्या गायली आहेत, यात वादच नाही. पण तरीही ग्रामीण पाश्र्वभूमी असलेल्या या चित्रपटात तशाच प्रकारचा आवाज जास्त चांगला वाटला असता.
अभिनय आणि दिग्दर्शन या दोन गोष्टी चित्रपटात शंभर टक्के खणखणीत वाजल्या आहेत. गिरीश मोहिते यांना आपल्या हातात काय ऐवज आला आहे, त्याची पुरेपूर माहिती आहे. त्यांनी त्या गाभ्याला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने आपलं दिग्दर्शकीय कौशल्य वापरून चित्रपट अत्यंत उत्तम बनवला आहे. अभिनयाचा विचार केला, तर या चित्रपटातील सर्वात जमेची बाजू म्हणजे कुलदीप पवार आणि डॉ. मोहन आगाशे यांच्या अभिनयाची जुगलबंदी. तब्बल ४० र्वष मराठी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कुलदीप पवार यांच्या इतर भूमिकांच्या पठडीतलीच ही भूमिका होती. पण तरीही पवार यांनी अनोख्या पद्धतीने ती सादर करत वाहवा मिळवली आहे. डॉ. मोहन आगाशे यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्याने अण्णा सरदेशमुखांच्या भूमिकेतील बेरकी तरीही निरागसपणा अत्यंत खुबीने दाखवला आहे. मिता सावरकर ही शुद्ध की अशुद्ध बोली यात अडकल्यासारखी वाटली, तरी तिने काम चांगलं केलं आहे. तेजश्री खेळे हिनेही आपल्या वाटय़ाची छोटेखानी पण महत्त्वाची भूमिका चोख निभावली आहे.
सुबोध भावेने आपली छाप याआधीच पाडली आहे. पण तरीही या चित्रपटात तो ज्या सहजतेनं वावरला आहे, त्यासाठी तो खरंच कौतुकाला पात्र आहे. त्याने पंतप्रधानांना उद्देशून केलेलं भाषण तर खूपच चांगलं जमलं आहे. तुकारामसारखी गंभीर आणि मनस्वी भूमिका साकारल्यानंतर अवखळ आणि चंचल श्रीपतीची भूमिका साकारणं आव्हानात्मक होतं. पण जितेंद्रने ते आव्हान अगदी सहज पेललं आहे. पण या सर्वातही हृषिकेश जोशी आणि मकरंद अनासपुरे या दोघांचं विशेष कौतुक करावंसं वाटतं. मकरंदने साकारलेला हेळवी तर त्याच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीतील सवरेत्कृष्ट भूमिका ठरावी. हृषिकेशनेही महिपतीच्या स्वरूपात आपल्या अभिनयाची ‘रेंज’ दाखवली आहे. त्याशिवाय निर्माता अभिजित घोलप, मनोज जोशी, सुशांत शेलार, प्रदीप वेलणकर, उज्ज्वला जोग आदींनीही छोटय़ा भूमिकांमध्ये चांगले काम केले आहे.
सीमेवरील गावाच्या समस्या, सीमाप्रश्न, गावपातळीवरील राजकारण, नक्षलवाद, सरकारची भूमिका, सामान्य माणसाची ‘चलता है’ मनोवृत्ती, अशा सगळ्या गोष्टी या चित्रपटात अगदी मस्त जुळून आल्या आहेत. ‘देऊळ’ या चित्रपटाच्या यशानंतर अपेक्षा वाढल्या असून अपेक्षाभंग होईल का, अशी शंका होती. मात्र ‘देविशा फिल्म्स’ने आपली दर्जेदार चित्रपटांची परंपरा कायम राखली आहे.
देविशा फिल्म्स प्रस्तुत
भारतीय
निर्माते - अभिजीत घोलप
दिग्दर्शक - गिरीश मोहिते
कथा-पटकथा - अनिरुद्ध पोतदार
संवाद - संजय पवार
छायालेखन - श्रीनिवास आचार्य
संगीत - अजय अतुल
संकलन - नीलेश गावंड
कलावंत - मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, मोहन आगाशे, हृषिकेश जोशी, कुलदीप पवार, मीता सावरकर, शुभांगी लाटकर, उज्ज्वला जोग, तेजश्री खेळे