चित्ररंग : निखळ अॅक्शनपट Print

सुनील नांदगावकर- रविवार, १९ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सलमान खानचा चित्रपट म्हटला की सबकुछ सलमान असणार असे प्रेक्षकाला वाटल्यावाचून राहत नाही. या चित्रपटात मात्र सलमान खानबरोबरच कतरिना कैफलाही बऱ्यापैकी वाव दिग्दर्शकाने दिला आहे. अर्थात ‘लार्जर दॅन लाइफ’ टायगरच्या भूमिकेतील सलमान भाव खाऊन न गेला तरच नवल. रोमॅण्टिक थ्रिलर या पठडीतला हा चित्रपट असला तरी ‘अॅक्शनपट’ असेच वर्णन करावे लागेल. बिनडोक करमणुकीचा खजिना असलेला हा सलमानपट निखळ अॅक्शनपट म्हणून नक्कीच प्रेक्षकांची आणि त्यातही सलमानच्या चाहत्यांची करमणूक करणारा आहे.
यशराज फिल्म्सचे बॅनर असल्यामुळे रोमान्स आणि श्रवणीय गाणी असतील असे वाटत असेल तर मात्र फसगत होईल. चवीपुरता रोमान्स फॉम्र्युला आहे आणि अजिबात गुणगुणावीशी वाटणार नाहीत अशी दोन-तीन गाणी यात आहेत. त्यामुळे यशराज फिल्म्सचा चित्रपट म्हणून प्रेक्षक चित्रपटगृहात गेले तर त्यांचा मात्र विरस होण्याचीच शक्यता आहे.
टायगर ऊर्फ मनीष चंद्र ऊर्फ अविनाश राठोड अर्थात सलमान खान हा रॉ या गुप्तहेर संस्थेचा एजंट आहे आणि तब्बल एक तप सुट्टी न घेता काम करणारा देशप्रेमी अविवाहित नागरिक दाखविला आहे. आता तुम्ही म्हणाल बारा वर्षे सुट्टी न घेता माणूस काम कसे करू शकतो, तर असे प्रश्न सलमान ब्रॅण्डच्या चित्रपटाबाबत न विचारलेलेच बरे. तर टायगर एकामागून एक
मोहिमा फत्ते करणारा असल्यामुळे रॉचे प्रमुख शेणॉय (गिरीश कर्नाड) यांच्यासाठी टायगर महत्त्वाचा असतो. सांगू त्या देशात जाऊन सांगेल ती कामे फत्ते करणाऱ्या टायगरला आयर्लण्ड येथील ट्रिनिटी महाविद्यालयात शिकविणाऱ्या किडवाई (रोशन सेठ) नामक प्राध्यापकाच्या मागावर पाठविले जाते. किडवाई हा एक शास्त्रज्ञ कम प्राध्यापक असतो. भारतीय वंशाचा असूनही तो संशोधनातील काही माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला देतो आणि त्यायोगे देशाशी गद्दारी करीत असतो. म्हणून त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी टायगरची रवानगी केली जाते. आता प्राध्यापक भेटण्यास नकार देतो, त्याच्यावर नजर ठेवायची तर प्राध्यापकाच्या जवळची एखादी व्यक्ती आहे का, याचा तपास टायगर करतो. तर प्राध्यापकाच्या घराची देखभाल करणारी प्राध्यापकच्याच कॉलेजमधील झोया ऊर्फ झी अर्थात कतरिना हिला टायगर भेटतो आणि पुढे काम चालू करतो. पुढे अचानक त्याला समजते की, झोया ही पाकिस्तानच्या आयएसआयची एजंट आहे; परंतु दरम्यानच्या काळात टायगर झोयाच्या प्रेमात पडतो. मग सुरू होते टायगर-झोयाची प्रेमकथा आणि दुसऱ्या ट्रॅकवर त्यांचा पाठलाग करणाऱ्या समस्त गुप्तहेर एजन्सींच्या माणसांच्या हातावर तुरी देऊन पळण्याची पकडापकडी.
कतरिनाच्या तोंडी असलेले ‘प्यार में दीवानगी ना हो तो प्यार कैसा’ किंवा गिरीश कर्नाडच्या तोंडी असलेला रॉसारख्या एजन्सीचे काम करताना ‘दिल से नही हमेशा दिमाग से ही काम करना चाहिए’ अशा संवादांवरून प्रेक्षकाला पुढे काय होणार याची सूचना मिळत जाते. परंतु सलमानची मारामारी, गाडय़ांचा पाठलाग, उंच उंच इमारतींवरून शिताफीने उडय़ा मारून टायगर-झोया कसे गुप्तहेर संस्थांच्या माणसांना तुरी देऊन निसटत राहतात ही अॅक्शन पाहण्यात प्रेक्षक गुंगून जातो की बाकीचे तर्कसंगत प्रश्न मनात येण्यास दिग्दर्शक आणि खासकरून छायालेखक त्याला संधीच देत नाहीत. जेम्स बॉण्डच्या चित्रपटातील अॅक्शन सलमान करणार म्हटल्यावर प्रेक्षकाला निखळ अॅक्शन पाहायची आयती संधीच चित्रपट देतो.
कतरिना कैफला संवादफेक येत नसली तरी तिने अॅक्शन स्टण्ट्स करून ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले आहे. अभिनयाचा आणि तिचा मुळातच फारसा संबंध नसला तरी नुसती गोड बाहुली म्हणून पडद्यावर नायिकेच्या भूमिकेत वावरण्यापेक्षा स्टण्ट्सद्वारे तिने आपली चुणूक दाखवून दिली आहे.
चित्रपटगृहात बसल्या बसल्या आयर्लण्ड, इराक, तुर्कस्तान, क्यूबा इत्यादी देश, तेथील सुंदर लोकेशन्स यांचे नेत्रसुखद चित्रण हे या चित्रपटाचे बलस्थान म्हणता येईल. पटकथेत फारशी जान नसली तरी ‘ट्विस्ट’ देण्याचे कसब पटकथा लेखकद्वयींना जमले आहे. हॉलीवूड स्टाइलची अॅक्शन पाहणीय आहेच; परंतु त्यापलीकडे चित्रपट नेऊ शकत नसल्यामुळे सलमानच्या ‘बॉडीगार्ड’पेक्षा अधिक रंजन होऊ शकत नाही. अर्थात सलमानचे असंख्य चाहते आणि अॅक्शनपटप्रेमींना नक्कीच आवडेल, असा मसाला यामध्ये आहे.
यशराज फिल्म्स प्रस्तुत
‘एक था टायगर’
निर्माता- आदित्य चोप्रा
दिग्दर्शक- कबीर खान
पटकथा- कबीर खान, नीलेश मिश्रा
कथा- आदित्य चोप्रा
छायालेखन- असीम मिश्रा
संकलन- रामेश्वर भगत
संगीत- सोहेल खान, साजिद-वाजिद
पाश्र्वसंगीत- ज्युलियस पॅकियम
कलावंत- सलमान खान, कतरिना कैफ, गिरीश कर्नाड, रणवीर शौरी, गेवी चहल