चित्ररंग : रणबीरच्या अभिनयाची मिठास ‘बर्फी’ Print

सुनील नांदगावकर - रविवार, १६ सप्टेंबर २०१२

दार्जिलिंगचा विलोभनीय निसर्ग, बर्फीच्या गमतीजमती आणि सर्वत्र आनंदाचा झरा निर्माण करण्याची त्याची हातोटी, मूळच्या खोडकर स्वभावामुळे बर्फीच्या वागण्यातून निर्माण होणाऱ्या गमतीजमती, पडद्यावर दिसणाऱ्या निसर्गाने डोळ्याचे पारणे फिटण्याबरोबरच श्रवणीय गाणी आणि तितकेच उत्तम पाश्र्वसंगीत, त्याला अभिनयाची उत्कृष्ट जोड यामुळे प्रेक्षक बर्फीवर फिदा न झाला तरच नवल. फॉम्र्युलेबाज बॉलीवूडपटांपेक्षा संपूर्णपणे निराळा असलेला हा चित्रपट, त्याची प्रत्येक चौकट, उत्कृष्ट दिग्दर्शन, अफलातून छायालेखन आणि पटकथेची अप्रतिम गुंफण, यामुळे चित्रपट अविस्मरणीय ठरतो.
बर्फी (रणबीर कपूर) म्हणजे खरे तर मर्फी. मर्फी जॉन्सन परंतु, सगळेजण त्याला बर्फी म्हणूनच पुकारतात मग तेच त्याचे नाव पडते. आता मूकबधिर नायक म्हटल्यावर मूकबधिर असल्याची सहानुभूती वगैरे त्याला मिळणारच असे ठोकताळे आपण बांधले तर त्याला चित्रपट पूर्ण छेद देतो आणि हा बर्फी आपल्याला आयुष्य आनंदाने जगायचे कसे ते शिकवीत सहजपणे पुढे जात राहतो. हिंदी चित्रपट ओ सॉरी; बॉलीवूडपटाच्या ठरीव चौकटी आणि फॉम्र्युला याला संपूर्ण छेद देत दिग्दर्शकाने चित्रपट बनविला आहे. बर्फी आणि त्याचे आयुष्य मजेत चालले आहे. बर्फी हा ‘हॅपी गो लकी’ तरुण आहे. त्याच्यात एक ‘चॅप्लिन’ दडलाय. तो मधूनमधून डोके वर काढतो आणि बर्फी जाईल तिथे धमाल करतो. चार्ली चॅप्लिनने आपल्या मूकपटांतून हसविता हसविता मांडलेले दु:ख, कारुण्य याची झालरही चित्रपटात दिग्दर्शकाने खुबीने आणली आहे. दार्जिलिंग भेटीवर आलेल्या श्रुती (इलेना डिक्रूझ) हिला पाहूनच बर्फी तिच्या प्रेमात पडतो. श्रुतीला जेव्हा बर्फी मूकबधिर आहे हे समजते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरच्या भाव, आपले लग्न यापूर्वीच ठरल्याचे ती बर्फीला सांगते तरीसुद्धा बर्फी तिच्याशी मैत्री करतो. तो मूकबधिर आहे, इतरांपेक्षा वेगळा आहे यातच कारूण्य आहे. त्याची दुसरी एक मैत्रीण आहे ती म्हणजे झिलमिल चटर्जी (प्रियांका चोप्रा). दार्जिलिंगच्या उच्चभ्रू, प्रतिष्ठित घरातील असली तरी ती ‘ऑटिझम’ विकाराने ग्रासलेली असल्यामुळे तिची आईच तिला स्वीकारत नाही. लोकांसमोर आपले हसे होईल म्हणून तिला ‘मुस्कान’ या संस्थेत ठेवते. परंतु, तिच्या आजोबांनी सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर केली आहे आणि आजोबा आता अखेरचे क्षण मोजत आहेत म्हणून आजोबांना भेटायला तिला घरी आणले जाते. ती ‘ऑटिस्टिक’ असल्यामुळे तिला कोणी मित्रमैत्रिणी नाहीत. पण बर्फी तिच्याशीसुद्धा मैत्री करतो. दोघांची निष्पाप, निष्कपट मैत्री आहे. काही कारणाने झिलमिलचे बर्फी अपहरण करतो. नंतर पुन्हा सुखरूप घरी पोहोचवितो. पण सहवासामुळे निर्माण झालेले त्यांच्यातील प्रेम पुन्हा त्यांना एकत्र आणते. त्यांच्यातील अनवट नाते पडद्यावर अतिशय तरल पद्धतीने दिग्दर्शकाने दाखविले आहे. श्रुती व बर्फी यांचे नाते आणि बर्फी व झिलमिल यांच्यातील नाते असे दोन स्तर आहेत. या दोन स्तरांवर चित्रपट उलगडत जातो. झिलमिल-बर्फी सुखाने नांदू लागतात का वगैरे असले प्रश्न या चित्रपटात गैरलागू ठरतात. नायक-नायिका, खलनायका असे पैलू चित्रपटाला नाहीत. नायक मात्र आहे बर्फी. छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून आनंद मिळविता येतो, मिळतो असे एक साधेसोपे बर्फीचे तत्त्वज्ञान आहे, तो पटकथेतील मुख्य धागा आहे, हे लक्षात घेऊन दिग्दर्शकाने चित्रपट तयार केला आहे. मैत्री, घट्ट मैत्री, त्यातील खरेपणा तपासून पाहण्याची बर्फीची अनोखी सवय आहे, एक तंत्र आहे. त्या तंत्राच्या कसोटीवर जो तरतो तो त्याला आपला खरा मित्र वाटतो. या तंत्राचा वापर दिग्दर्शकाने अतिशय चपखलपणाने केला आहे. दार्जिलिंगचे निसर्गसौंदर्य, कोलकात्यातील शहरी जीवन, लग्नाची बंगाली संस्कृती याचे दर्शनही दिग्दर्शक-छायालेखकाने पटकथेला धक्का न लावता समपर्करीत्या घडविले आहे.
प्रियांका चोप्राची प्रेक्षकांसमोरची प्रतिमा, ‘फॅशन’मधील ‘लार्जर दॅन लाइफ’ भूमिकेच्या एकदम विरोधी भूमिका साकारून तिने बदलली आहे. तिने सादर केलेली झिलमिल लाजवाब म्हणता येईल. इलेना डिक्रूझने सर्वसामान्य व्यावहारिक विचारांच्या चौकटीत अडकलेली, साधी सरळ श्रुतीही उत्तम साकारली आहे. चित्रपट दुहेरी ‘फ्लॅशबॅक’मध्ये दाखविल्यामुळे प्रेक्षकाचा थोडासा गोंधळ उडू शकतो. परंतु, रणबीर कपूरने सफाईदारपणे साकारलेला बर्फी, ‘हॅपी गो लकी’ मूकबधिर बर्फी आणि त्याचा पडद्यावरचा ‘चॅप्लिन स्टाइल’ सहज वावर यामुळे प्रेक्षक भारावून जाईल हे नक्की.
बर्फी
निर्माते - रॉनी स्क्रूवाला, सिद्धार्थ रॉय कपूर, लेखक-दिग्दर्शक - अनुराग बासू , संगीत - प्रीतम, छायालेखन - रवी वर्मन, कलावंत - रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा, इलेना डिक्रूझ, रूपा गांगुली, सुमोना चक्रवर्ती, राहुल गर्ग, जिशू सेनगुप्ता, सौरभ शुक्ला व अन्य.