नाट्यरंग : ‘वाऱ्यावरची वरात’गतरम्यत: Print

रविंद्र पाथरे - रविवार, १ जुलै २०१२

‘पु. ल.’ नावाचं गारूड अद्याप मराठी मनावरून उतरलेलं नाही. त्यांचा हस्तस्पर्श (कौतुकाची थाप!) वा लेखनस्पर्श ज्यांना झाला, त्या सर्वाचं सोनं झालं. अशी करिष्मा असलेली व्यक्तिमत्त्वं कालौघात फार विरळा निर्माण होतात. आज त्यांच्या कलाकृतींकडे पाहताना आणि त्यांचा आस्वाद घेताना त्यांच्या काळाच्या संदर्भातच त्यांचं मूल्यमापन करणं उचित ठरेल. त्यांच्या कलाकृती काळाच्या मर्यादा ओलांडणाऱ्या आहेत की नाहीत, हा विषय आपण जाणकार समीक्षकांसाठी सोडून देऊ. त्यांच्या ‘बटाटय़ाची चाळ’ आणि ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटय़कृती मात्र नि:संशय तात्कालिक होत्या आणि आहेतही. त्यांतून एका विशिष्ट कालखंडाचं आणि त्यातल्या मानवी जगण्याचं प्रसन्न, हवंहवंसं दर्शन त्यांनी घडवलं आहे. वर्तमानात वाटचाल करत असताना आपण नेमक्या कोणत्या सामाजिक पायावर उभे आहोत, याचं गंमतीशीर चित्र या नाटय़कृती आपल्यासमोर ठेवतात.
‘नाटय़संपदा’ निर्मित ‘वाऱ्यावरची वरात’ (तिसऱ्यांदा पुनरुज्जीवित झालेलं!) पाहताना या साऱ्या पाश्र्वभूमीवरच तिचा आस्वाद घेणं योग्य ठरेल. ‘वरात’मधली माणसं, त्यांची व्यक्त होण्याची चित्रविचित्र तऱ्हा, त्यांचं इरसालपण, भाबडेपण हे सारं ‘पुल’निर्मित आहे. मनोरंजनाच्या हेतूनं केलेलं त्या काळाचं हे अतिशयोक्त चित्रण आहे. त्यात तथ्यांश नाही असंही नाही. काही अंशी तत्कालीन समाजाला त्यांच्याच जगण्याचा मजेदार आरसा दाखविण्याच्या उद्देशानंही पुलंमधल्या खेळियानं ही रेव्ह्य़ू प्रकारातली नाटय़कृती रचली आहे. मात्र, आज अर्धशतकानंतर ‘वरात’ आस्वादताना गतरम्यतेच्या दृष्टीनंच तिच्याकडे पाहायला हवं. वर्तमान कालाच्या कसोटीवर कदाचित ती डावी ठरेलही; परंतु होतं ते असं होतं, यादृष्टीनं पाहू जाता ‘वरात’ आजही  प्रेक्षकांचं रंजन करते यात शंका नाही. आणि गतरम्यता हा कुठल्याही काळाचा चिरंतन गुण आहेच.
‘वरात’च्या पूर्वार्धात खापरगा सांस्कृतिक नवनिर्माण मंडळ आयोजित एका कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पुल गेले असता तिथं घडलेला धम्माल विनोदी किस्सा, तसंच खेडय़ातलं साधंसुधं जीवन अनुभवण्याच्या अपेक्षेनं ‘पुल’ एका गावात गेले असता तिथल्या गावकरी तरुणांचं त्यांना घडलेलं धक्कादायक प्रथमदर्शन आणि ‘साक्षी’ची सुपारी वाजवून घेणाऱ्या इरसाल म्हादबाची न्यायालयातली साक्ष अशा तीन प्रसंगांचा समावेश आहे. तर ‘वरात’च्या दुसऱ्या अंकात तत्कालीन मध्यमवर्गीय घरांतली रविवारची सकाळ आणि त्यात रसिकमनाच्या माणसांची होणारी कौटुंबिक, सामाजिक कुचंबणा पुलंनी ठाय लयीत दाखविली आहे.
पहिल्या अंकातील तीन वेगवेगळ्या प्रसंगांतून माणसांचे इरसाल, पहुंचे हुए, तसंच अर्कचित्रात्मक ‘नग’ पेश करण्यावर पुलंनी भर दिला आहे. त्यांच्या सादरीकरणात रंजनाचा ‘पुल मसाला’ त्यांनी ठासून भरला आहे. आजच्या काळातही यातलं दर्जेदार रंजनमूल्य चकित करतं. कलाकारांच्या हुन्नरास मुक्त वाव देणारा हा ‘वरात’चा अंक. सुनील बर्वेच्या ‘हर्बेरियम’नं लोकप्रिय कलाकारांना घेऊन जुनी नाटकं सादर करण्याची जी नवी लाट आणली आहे, त्या लाटेवर स्वार होत ही पुनरुज्जीवित ‘वरात’ रंगमचावर आली असल्यानं वरातीतले एकापेक्षा एक मुरलेले विनोदी कलावंत आपापली इनिंग त्यात दणक्यात साजरी करतात. अमोल बावडेकर, अपर्णा अपराजित, विघ्नेश जोशी हे गायक कलावंतही या ‘वराती’तली गायनाची बाजू चोख सांभाळवतात.  
सुरुवातीलाच ‘लग्नात मुंज उरकून घ्यावी’ तसं पुलंना कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला आलेले तपकीर एजंट त्यांच्या चालू कार्यक्रमात आगाऊपणे घुसून गरूडछाप तपकिरीची जाता जाता फुक्कट जाहिरात करून घेतात. हा फर्मास प्रसंग प्रदीप पटवर्धन (एजंट) आणि आनंद इंगळे (पुल) यांनी मस्त रंगवला आहे. पुढे तपकीरवाल्यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार खा. सां. न. नि. मंडळाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गेल्यावर पुलंचं स्वागत करताना संयोजकांचं घोर अज्ञान आणि त्यांच्या बनचुकेपणाने ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ अशी पुलंची अवस्था होते. हा सारा अनवस्था प्रसंग ‘वरात’मध्ये भयंकर निरागसपणे पुलंनी रेखाटला आहे. रमेश वाणी (सूत्रसंचालक स्काऊट मास्तर), शिवराळ बोटार्के गुर्जी (श्रीकांत मोघे) आणि पुलंना एकच हार पुन: पुन्हा घालणाऱ्या एकापेक्षा एक ‘नग’ हारतुरेवाल्यांनी हा सावळा‘गोंधळ’ रंगवत उत्कर्षबिंदूप्रत नेला आहे.
खेडय़ातलं साधं-सरळ, निरागस जीवन अनुभवण्यासाठी गेलेल्या पुलंची गाठ शिरप्या (समीर चौघुले) आणि त्याच्या सोबत्याशी (प्रणव रावराणे) पडते. हे दोघं शिनुमाचे प्रचंड शौकिन निघतात. टुरिंग टॉकीजमधील हलत्या स्वप्नांनी संमोहित झालेले हे दोघं पुलंना ग्रामीण तरुणाईचं जे ‘विश्वदर्शन’ घडवतात, त्यानं पुल गारच होतात. ‘अस्सल लावणी बघायचीय? मग बाम्बेच गाठायला हवी!’ असा मोलाचा सल्लाही ते पुलंना देतात. सिनेमाच्या गाण्यांच्या चालींत वारकरी पदं चपखल बसवून ते पुलंची पार बोलतीच बंद करतात. या दोघांनी गावात शिरता शिरताच पुलंना दाखवलेला गावरान हिसका प्रेक्षकांची मात्र धूमधमाल करमणूक करतो. जाता जाता आपल्या गावात ‘साक्षीदार म्हादबा’ नावाचं एक बेणं आहे, त्याची साक्ष बघायला चला, म्हणून पुलंना ते म्हादबाच्या साक्षीसाठी कोर्टात घेऊन जातात. म्हादबाची (आनंद इंगळे) गोलमगोल, मूळ मुद्दय़ाचा पत्त्याच नसलेली ‘दळण’दार साक्ष ऐकून पुलंची पक्की खात्रीच पटते, की गावातली माणसं आपल्याला वाटतात तशी साधी-सरळ, पापभीरू वगैरे अजिबातच नसतात! म्हादबाचं गोल गोल पाल्हाळीक बोलणं, वकिलाला आपल्या बोलण्यानं घोळात घेणं, आपल्या चोख ‘परफॉर्मन्स’वर आणि बिनतोड युक्तिवादावर असलेला त्याचा दांडगा विश्वास.. हे सगळं आनंद इंगळे यांनी फर्मास सादर केलंय. यापूर्वी अरुण नलावडे यांनी ‘वरात’मध्ये सादर केलेल्या म्हादबापेक्षा आनंद इंगळे यांनी या पात्राचा वेगळ्याच पद्धतीनं विचार केल्याचं जाणवतं. वकिलाच्या भूमिकेत विघ्नेश जोशी यांनी मात्र काहीसं मरगळल्यासारखंच काम केलं आहे.  
‘वरात’मधली ‘रविवार सकाळ’ हा एक अत्यंत श्रवणीय, बघणीय असा आनंदानुभव! यातल्या बापूसाहेबांना रविवारी सुट्टीच्या दिवशी स्वान्त सुखाय पेटीवर नाटय़संगीताचा आनंद घ्यायला आवडतं. पण बायकोपासून धोब्यापर्यंत कुणालाच त्यांचं हे ‘सुख’ बघवत नाही. सततच्या फोनपासून बायकोच्या मैत्रिणींपर्यंत अनेक अडथळे त्यांच्या या सुखाआड येतात. कडवेकर, देसाई, कामत मामा हे त्यांचे चाळकरी मित्र त्यांच्या या स्वान्त सुखात मन:पूर्वक सामील होऊ चाहतात. पण त्यांच्या बायका त्यांना हे सुख लाभू देतील तर ना? ‘रविवार सकाळ’चा प्रसन्न मूड विघ्नेश जोशी (बापूसाहेब) यांच्या मधाळ पेटीवादनातून निर्माण होत असला तरी त्यांच्या बोलण्या-वावरण्यात मात्र अजिबातच ‘जान’ नव्हती. परिणामी ‘सकाळ’ रंगविण्याची जबाबदारी कडवेकर (समीर चौघुले), कामत मामा (प्रदीप पटवर्धन), देसाई (अमोल बावडेकर), कडवेकर मामी (अतिशा नाईक), रामा गडी (प्रणव रावराणे) यांच्यावर येऊन पडली आहे. समीर चौघुले यांनी कडवेकरांचा बायकोपरोक्षचा आवेश आणि तिच्या बोलभांड झंझावातापुढे बापुडवाणं होणं या भावावस्था अप्रतिम व्यक्त केल्या आहेत.

अमोल बावडेकरांनी देसाई मास्तरांच्या भूमिकेत गाण्याची बाजू जोरकसपणे लावून धरली आहे. अतिशा नाईक यांची कडवेकर मामी आपल्या एन्ट्रीनंच समस्त पुरुषवर्गाला नॉन प्लस करून टाकते. बोलताना त्यांचे गरागरा फिरणारे डोळे कडवेकरांचं पार भिजलेलं मांजर करून सोडतात. प्रदीप पटवर्धन आपले हमखास फंडे वापरून कामतमामा यशस्वी करतात. प्रणव रावराणेंचा रामा गडी अर्कचित्रात्मक अभिनयाचा शंभर नंबरी वस्तुपाठ आहे. श्रद्धा केतकर यांनी टिप्पिकल गृहस्वामिनी मालूताई चोख वठवलीय. सुप्रिया पाठारेंनी मालूची सो-कॉल्ड मॉड मैत्रीण मिसेस गर्दे तिच्या पोकळपण वागण्या-बोलण्यातून छान साकारलीय. सुहास चितळेंचं ढोलकी व तबलावादन रिझवणारं आहे. अमित जांभेकर, नयना आपटे, अपर्णा अपराजित यांनी आपापली भूमिका निभावली आहे. एकुणात ‘वरात’चा पहिला अंक कसलेल्या कलावंतांनी आपल्या वैयक्तिक कामगिरीनं संस्मरणीय केला आहे. पण दुसरा अंक मात्र कलाकारांच्या उंचसखल अभिनयामुळे म्हणावा तितका रंगत नाही.