सचिन पिळगावकर आणि उमा भेंडे यंदाचे‘चित्रभूषण’ Print

- अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे पुरस्कार जाहीर
- १३ तंत्रज्ञांचा रंगकर्मी पुरस्काराने करणार गौरव
प्रतिनिधी
मराठी चित्रपट कलावंतांच्या मेहेनतीला आणि यशाला कौतुकाची पावती देण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे ११ ऑगस्ट रोजी पुण्यात ‘मानाचा मुजरा पुरस्कार सोहळा’ आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात देण्यात येणाऱ्या ‘चित्रभूषण’ आणि ‘चित्रकर्मी’ या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी केली. यंदा ‘चित्रभूषण’ हा मानाचा पुरस्कार अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री व निर्माती उमा भेंडे यांना जाहीर झाला आहे. त्याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञ म्हणून नेहमी पडद्यामागे वावरणाऱ्या १३ तंत्रज्ञ कलाकारांना ‘रंगकर्मी’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटापासून गेली ५० वर्षे चित्रपटसृष्टीचाच मार्ग चोखाळणाऱ्या सचिन पिळगावकर यांनी अभिनय, दिग्दर्शन, चित्रपटनिर्मिती, गायक अशी चौफेर कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना या पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला खूपच आनंद होत आहे, असे सुर्वे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आपल्या आईकडून अभिनायाचा वारसा घेणाऱ्या व कोल्हापूरला नाटकांतून आणि सिनेमांतून भरीव कामगिरी करणाऱ्या उमा भेंडे यांचाही गौरव महामंडळातर्फे करण्यात येईल.
पडद्यावरील कलाकारांप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीला पडद्यामागील कलाकारांनीही प्रचंड योगदान दिले आहे. त्यापैकी १३ तंत्रज्ञ कलावंतांना यंदाचा ‘रंगकर्मी पुरस्कार’ घोषित झाला आहे. यात कोल्हापूर विभागातील कॅमेरामन कोया यमकर, कामगारापासून सहाय्यक दिग्दर्शकापर्यंत वाटचाल करणारे केरबा लाड, बाबू पोर्लेकर, सेटिंग कलावंत सदाशिव वडगावकर, पुणे विभागातील ज्योती चांदेकर, चित्रपटांची जाहिरात पोस्टर रंगवणारे नावडकर पेंटर, मुंबई विभागातील प्रसिद्धीकार नंदकिशोर कलगुटकर, संकलक भाई तेलंग, छायालेखक राम आलम, समीक्षक व सिनेपत्रकार दिलीप ठाकूर, ज्येष्ठ समीक्षक राजा कारळे, नाशिक विभागातून दिग्दर्शक, लेखक, कलादिग्दर्शक सुनील चुंबळे आणि मराठवाडा विभागातून नागेश दरक यांचा समावेश आहे.
त्याशिवाय महामंडळातर्फे यंदापासून ‘यशश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वर्षभरात तिकीटबारीवर सर्वोत्तम कामगिरी करणारा मराठी चित्रपट या पुरस्काराचा मानकरी असेल. त्यानुसार यंदा ‘काकस्पर्श’ या चित्रपटाची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार, ११ ऑगस्ट रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्र येथे होणार आहे.

जबाबदारी वाढलेय
घरच्या लोकांनी पाठीवर कौतुकाची थाप मारली की, एक वेगळाच हुरूप येतो. लहानपणापासून माझ्या पाठीवर अशा कौतुकाच्या अनेक थापा पडल्या आहेत. सगळ्यांनीच माझे खूप कौतुक केले आहे. पण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या या पुरस्कारामुळे माझ्या कुटुंबाने माझ्या कामाची पावती दिली आहे, अशी भावना आहे. त्याचप्रमाणे आता जबाबदारी वाढली आहे, ही जाणीवही खूप आहे. - सचिन पिळगावकर (अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता)