नाट्यरंग : रेशीमगाठी’ नाटय़संगीतासाठी ‘नाटक’ Print

रवींद्र पाथरे - रविवार, ८ जुलै २०१२

आधी कपडे शिवायचे आणि मग त्यात एखाद्या माणसाला कोंबायचं असं सहसा घडत नाही. परंतु क्वचित कधी कुणाला तसं करावंसं वाटलंच, तर ती त्याची मजबुरी असू शकते. किंवा मग असं करण्यामागे लाभाची काही गणितं असू शकतात. किंवा ते ‘अस्संच’ करावंसं त्याला वाटलेलं असू शकतं. ‘रंगशारदा प्रतिष्ठान’ निर्मित, आनंद म्हसवेकर लिखित आणि विजय गोखले दिग्दर्शित ‘संगीत रेशीमगाठी’ (आधीचं नाव- ‘संगीत अॅक्शन रिप्ले’) या नाटकाच्या बाबतीत यापैकी एक बाब निश्चितच संभवते. हे जरी रूढार्थानं संगीत नाटक असलं तरी यातली गाणी मात्र नवी नसून, जुन्याच गाजलेल्या संगीत नाटकांतून ‘रेडिमेड’ उचललेली आहेत. आणि ती सर्वच्या सर्व अत्यंत रसाळ व सुश्राव्य असल्यानं आपण नाटय़संगीताची एखादी रंगतदार मैफल ऐकतो आहोत की काय, असं ‘रेशीमगाठी’ पाहताना वाटतं. किंबहुना नाटय़संगीताच्या या मेजवानीला काहीएक निमित्त असावं म्हणूनच नाटकाला जुजबी कथानक दिलं गेलंय. (भले मग त्यात मल्टिमीडिया, ध्वनिमुद्रित संवाद आदी आधुनिक तंत्रं वापरलेली असोत!) पूर्वी संगीत नाटकांतून ज्या प्रकारे आशयास पूरक अथवा तो पुढे नेण्यासाठी ओघाओघात पदं येत असत, तशा प्रकारे ‘रेशीमगाठी’तलं कुठलंही गाणं कथानकाच्या ओघात न येता त्यांची फर्माईश करून ती कलावंतांना गायला लावली आहेत. त्यामुळे नाटय़संगीतप्रेमींसाठी ‘रेशीमगाठी’ पर्वणी ठरावी.
या नाटकाचं संक्षेपात कथानक असं : प्रसाद लेले हे खटपटे गृहस्थ अमेरिकेत ‘संगीत नाटय़संमेलन’ भरविण्याचा संकल्प सोडून कामाला लागतात. मोहनराव अभ्यंकर आणि निशिगंधाबाई या संगीत रंगभूमीवरील (आणि नंतर प्रत्यक्षातही!) एकेकाळच्या लोकप्रिय कलावंत जोडीची नाटय़संगीताची मैफल त्यांच्या गुरूंच्या स्मृत्यर्थ या संमेलनात करण्याचं ते ठरवतात. परंतु यात मोठी अडचण अशी असते, की काही वर्षांपूर्वीच त्या दोघांचा घटस्फोट झालेला आहे. आणि आज ते एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत. तरीही या मैफलीसाठी काहीही करून या दोघांना एकत्र आणायचंच, असा निर्धार करून लेले दोघांची भेट घेतात आणि त्यांना या कार्यक्रमात एकत्रित गायची विनंती करतात. अर्थात अपेक्षेप्रमाणेच दोघंही त्यास स्पष्टपणे नकार देतात. परंतु हार मानतील तर ते लेले कसले? तुम्हा दोघांच्या गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच ही मैफल आयोजित केलेली आहे, असं भावनिक आवाहन करून ते त्यांना अखेरीस राजी करतात. तथापि मोहनराव त्याआधी काही अटी घालतात. त्या दोघांनी परस्परांच्या व्यक्तिगत बाबींसंबंधात एकमेकांना काही विचारायचं नाही किंवा त्यांत ढवळाढवळसुद्धा करायची नाही. तसं लेखी करारपत्रच ते तयार करतात.
..आणि गाण्यांच्या तालमीच्या निमित्तानं मोहनराव आणि निशिगंधाबाई एकत्र येतात. दोघांनी कितीही नाकारलं तरी जुन्या भावबंधांना पुनश्च उजळा मिळतोच. विशेषत: मोहनरावांना आपण आपली बायको व मुलगी गमावल्याची बोच अधिकच तीव्र होते. निशिगंधाबाईंनाही झाल्या गोष्टी उचित नव्हत्या, हे उमजू लागतं. पण उभयतांचा कमालीचा अहम्, अपराधगंड आणि झाली चूक मान्य न करण्याची हट्टी वृत्ती यामुळे त्यांच्यापैकी कुणीच माघार घेऊ इच्छित नाही. दुसरीकडे काळ आपली जादू दाखवत असतोच. परस्परांच्या निकट सहवासामुळे त्यांच्यातले कडवट गिलेशिकवे काहीसे मवाळ होऊ लागतात. सोबत वाढत्या वयाचा आणि आयुष्यात खाल्लेल्या टक्क्य़ाटोणप्यांचाही काहीएक असर माणसावर होतच असतो ना!
मग प्रश्न उभा ठाकतो तो शर्मिष्ठाचा.. त्यांच्या मुलीचा! तिला मोहनरावांचा अत्यंत तिटकारा वाटत असतो. त्यांनी आपल्यावर आणि आपल्या आईवर प्रचंड अन्याय केलाय, या रोषापायी ती निशिगंधाबाईंना मोहनरावांसमवेत अमेरिकेत एकत्र कार्यक्रम करायलाही तीव्र विरोध करते. शेवटी ती निर्वाणीचं अस्त्रच बाहेर काढते. आईनं एकतर मोहनरावांशी संबंध तोडावेत; अन्यथा ती आपल्याला कायमची मुकेल! मधल्या दोघांनाही विकल करणाऱ्या प्रदीर्घ दुराव्यानंतर आत्ता आत्ता कुठं जुळू पाहणारं मोहनराव-निशिगंधाबाई यांच्यातलं नातं पुन्हा एकदा कडय़ाच्या टोकावर येऊन उभं ठाकतं..
लेखक आनंद म्हसवेकर यांनी हे नाटक रचलंय की एखादी वर्णनात्मक कथा, असा प्रश्न नाटक पाहताना पडतो. नाटकातला संघर्ष प्रत्यक्ष रंगमंचावर घटना-प्रसंगांतून न आकारता तो सतत पाश्र्वभागीच राहिलेला आहे. याचं कारण मोहनरावांची आताची मैत्रीण (की प्रेयसी?) केतकी हे पात्र केवळ फोनवर बोलतं. त्रिकोणाचा हा तिसरा कोन कधीच झडझडून समोर येत नाही. मोहनरावांच्या निशिगंधाबाईंकडे पुनश्च ओढ घेण्याला केतकी टोकाचा विरोधही करत नाही. परिणामा त्यांच्यातल्या भावनिक संघर्षांनं नाटकाला कुठलीही मिती प्राप्त होत नाही. तेच शर्मिष्ठाच्या बाबतीतही! तिची वडिलांबद्दलची घृणा, तिरस्कार समजू शकत असला तरीही मोहनराव तिच्या भेटीला जातात तेव्हा त्यांच्यात नेमकं काय घडतं, हे नाटकात कुठंच येत नसल्यानं, किंवा त्यासबंधांत सूचनही होत नसल्यानं नाटकाच्या अखेरीस जेव्हा अकस्मात निशिगंधाबाई लेकीचा निर्वाणीचा इशारा मोहनरावांना कथन करतात तेव्हा त्यातलं ‘नाटय़’ अधोरेखित होण्याऐवजी त्यातला मेलोड्रामाच अधिक बोचतो. नाटक तीनच पात्रांमध्ये खेळवण्याच्या अट्टहासापायी त्यातील मनोविश्लेषणाच्या शक्यता नीट हाताळल्याच गेलेल्या नाहीत. तीच बाब मल्टिमीडियाच्या वापराची! त्याद्वारे जुन्या आठवणींना उजाळा (फ्लॅशबॅक) दिला जात असला तरीही त्याची प्रत्यक्ष रंगमंचीय घटितांशी ज्या तऱ्हेनं सांगड घालायला हवी होती, तशी ती घातली न गेल्यानं कथानकातली सलगता खंडित होते. आणि त्यामुळे रसभंग होतो तो वेगळाच. केतकी व शर्मिष्ठा ही पात्रं प्रत्यक्ष रंगमंचावर अवतरली असती तर नाटकाला एक वेगळं परिमाण व उंची लाभली असती. यातले गतरम्यतेचे प्रसंगही नीटपणे हाताळलेले नाहीत. त्यामुळे त्यांतील अपेक्षित परिणाम साध्य होत नाही. शर्मिष्ठाचा विरोध हा मुद्दाही नाटकाच्या शेवटी शेवटी आणि सस्पेन्स स्वरूपात आणण्याचं प्रयोजन समजत नाही. कुठल्याही नॉर्मल मुलीची आपल्याला अनाथ करणाऱ्या वडलांबद्दलची हीच भावना असू शकते. त्यात दडवण्याजोगं काय होतं? मोहनराव आणि निशिगंधा यांच्यातले भावबंधही निखळपणे फुलताना दिसत नाहीत. विशेषत: निशिगंधाबाईंचं विरघळत जाणं नीटसं व्यक्त होत नाही. या सगळ्यामुळे ‘लोकप्रिय गाण्यांसाठी हे नाटक बेतलंय’ ही प्रेक्षकाची समजूत अधिकच दृढ होत जाते.
दिग्दर्शक विजय गोखले यांनी संहितेबरहुकूम नाटक बसवलं आहे. त्यांना ‘हे नाटक आहे की नाटय़संगीताची मैफल?’ हा प्रश्न पडलेला नाही. किंवा कदाचित त्यांनाही हे असंच अपेक्षित असावं. नाटय़ांतर्गत संघर्षांच्या पायऱ्या चढत्या भाजणीनं उंचावत पुढं त्याची निरगाठ उकलायला हवी, हा सिद्धान्त त्यांना मंजूर नसावा. नाटकातील पात्रांचं परस्परांतलं गुंतणं, त्यांच्या नातेसंबंधांतले तिढे, त्यापायी होणारी त्यांची फरफट या गोष्टी स्वाभाविकपणे नाटकात यायला हव्यात, याचं पुरेसं भान नाटकात आढळत नाही. मल्टिमीडियाच्या वापरातही सफाई हवी होती. नेपथ्यकार प्रसाद वालावलकर यांनी गायक कलावंताचं उभारलेलं घर त्याच्या अभिरुचीला व आर्थिक स्तराला साजेसं नाही. लक्ष्मण पाटील यांच्या पाश्र्वसंगीतातला ‘फिल्मी’पणा अंगावर काटा आणतो. अद्वैत दादरकर यांच्या प्रकाशयोजनेतून फॅन्टसी आणि वास्तवाचं पुरेसं विलगीकरण होत नाही. मुळात ‘रेशीमगाठी’च्या संहितेतच गोंधळ असल्यानं कलाकारांच्या अभिव्यक्तीवरही मर्यादा आल्या आहेत. अमोल बावडेकर हे एक चांगले गायक नट आहेत. परंतु त्यांनी साकारलेल्या मोहनरावांच्या व्यक्तिरेखेचा आलेख व्यवस्थित रेखाटला न गेल्यानं त्यांचं वागणं-बोलणं, वावरणं यांत सहजतेचा अभाव दिसतो. तथापि त्यांनी यातली जुनी गाणी छान रंगविली आहेत. ‘सुरत पिया की..’ या गाण्यातला काहीसा आक्रमक भाव त्यांनी आपल्या पद्धतीनं मधाळ अन् मवाळ करून घेतला आहे. त्याचप्रमाणे ‘काटा रुते कुणाला’तली वेदनाही त्यांनी धारदार केली आहे. ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ या द्वंद्वगीतात त्यांनी गौरी पाटील (निशिगंधाबाई) यांना सुरेख साथ दिलीय.
गौरी पाटील यांनी निशिगंधाबाईंचं कडवट, रूक्ष रूप ठसठशीतपणे वठवलंय. संहितेचं पाठबळ नसल्यानं निशिगंधाबाईंच्या मनातल्या भाव-आंदोलनांना योग्य ती वाट सापडत नाही. दिग्दर्शकानंही ती धुंडाळण्यात त्यांना मदत केलेली दिसत नाही. अन्यथा दोन अहंकारी जिवांच्या होरपळीची शोकात्म कहाणी या नाटकात पाहायला मिळाली असती. ‘कशी केलीस माझी दैना’, ‘हे स्वरांनो, चंद्र व्हा’ ही गाणी त्यातल्या भावाभिव्यक्तीसह गौरी पाटील यांनी सुंदर गायलीत. तो ‘भाव’ त्यांना अभिनयात सापडता तर..? विजय गोखले यांनी प्रसाद लेलेचं उनाडटप्पू, बेफिकीर रूप त्यांच्या नित्याच्या स्टाईलमध्ये साकारलंय. परंतु त्यामुळे नाटकातलं गांभीर्य मात्र उणावलंय. त्यांच्या संवादोच्चारामध्ये भावनिकतेची जोड जाणवत नाही. तात्पर्य : जुन्या संगीत नाटकांतल्या अप्रतिम गाण्यांची मैफल जर तुम्हाला ऐकायची असेल तरच हे नाटक पाहा.