चित्रगीत : कृष्णार्पण Print

अनिरुद्ध भातखंडे - रविवार, १९ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सामथ्र्य, विद्वत्ता, ऐश्वर्य, दातृत्व आदी असंख्य गुण ज्याच्या ठायी होते त्या भगवान श्रीकृष्णाला पूर्णावतार मानले जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमी नुकतीच साजरी करण्यात आली. अशा उत्सवांत राजकारणाची पोळी भाजून घेणारे राजकारणी आणि जनतेचे अज्ञान यामुळे या सणांचेही व्यापारीकरण झाले आहे. दरवर्षी जन्माष्टमीला त्याच त्या लाखो रुपयांच्या हंडय़ा पाहाण्यास मिळतात आणि तीच ती गाणी कानी पडतात. या पाश्र्वभूमीवर ‘रेड रिबन’ या कंपनीची निर्मिती असलेली ‘कृष्णार्पण’ ही नवी सीडी वेगळी ठरते.
यात आठ सुश्राव्य गीते असून भजनसम्राट अनुप जलोटा यांनी ती स्वरबद्ध केली आहेत. या सीडीची सुरुवात ‘चलो मन वृंदावन की ओर’ या तोडी रागातील गाण्याने होते. सर्व गाण्यांत हेच गाणं अधिक जमून आलं आहे. याशिवाय ‘पुरी द्वारका मथुरा देखी, कहाँ जाके छिपा चितचोर, राधा के मनमीत साँवरे आणि मुरलीवाले हमको’ ही गाणी जलोटा यांनी गायली आहेत. लालित्य मुन्शॉय या उभरत्या व गोड गळ्याच्या गायिकेने ‘श्याम श्याम रटती मीरा, बन्सी नही दुंगी आणि नंदकिशोर बन्सी बजैय्या’ ही गाणी गायली आहेत. पारंपरिक संगीत आणि त्यास साजेसा वाद्यवृंद यामुळे ही सर्वच गाणी भक्तीरसपूर्ण वातावरणनिर्मिती करण्यात यशस्वी ठरली आहेत, यात शंका नाही. याचे सारे श्रेय जलोटा यांच्यातील संगीतकाराला. मात्र ‘मुरलीवाले हमको चरणोंसे लगा लेना, हम दास है तुम्हारे हमको न भूला देना’ या अखेरच्या गाण्याची चाल ‘ए दिल मुझे बता दे’ या गीता दत्तच्या (चित्रपट- भाई भाई) या गाण्यावरून जशीच्या तशी उचलली आहे! जलोटा यांच्या आवाजात वयही डोकावू लागलं आहे, हे त्यांची गाणी ऐकताना जाणवतं. तरीही एकंदरीत ही सीडी कृष्णभक्तांना आनंदच देते.

मेरा भारत महान
अनेक संगीतकारांनी एकत्र येऊन एखादा अल्बम करण्याची कल्पना आता रूढ होत आहे. ‘रेड रिबन’ या कंपनीच्या ‘मेरा भारत महान’ या सीडीसाठी समीर रावळ, लक्ष्मी वसंत आणि आशिष झा-प्रवीण जैन हे संगीतकार एकत्र आले आहेत. यातील १०पैकी सर्वाधिक म्हणजे आठ गाणी समीर रावळ याने संगीतबद्ध केली आहेत तर अन्य संगीतकारांनी प्रत्येकी एकेक गाणं केलं आहे. या सीडीचं वैशिष्टय़ म्हणजे दिवंगत गजलसम्राट जगजीत सिंह यांच्या आवाजातील ‘रोए धरती रोए अंबर’ हे गीत. या सीडीत त्यांचं हे एकमेव गाणं आहे मात्र तेच गाणं हटके ठरलं आहे. आपल्या देशातील सद्यस्थितीचं वर्णन यात करण्यात आलं असून (गीतकार- लक्ष्मी नारायण व नारायण) जगजीत यांचा खर्जातील गंभीर स्वर हा आशय श्रोत्यांच्या काळजापर्यंत भिडतो. लक्ष्मी वसंत यांनी ते स्वरबद्ध केलं आहे.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या प्रतिभावान लेखणीतून उतरलेलं आणि समस्त स्वातंत्र्यसैनिकांसाठी स्फर्तीदायी ठरलेलं वंदे मातरम हे गीत यात चार भागांत सादर करण्यात आलं असून त्यास नवा स्वरसाज चढवण्याचं धाडस समीर रावळ आणि आशिष झा-प्रवीण जैन यांनी केलं आहे. हम होंगे कामयाब, सारे जहाँसे अच्छा ही गाणीही नव्या चालीत ऐकण्यास मिळतात. ही गाणी सुप्रिया जोशी, रावी त्रिपाठी, नीरज पारिख, संजय दळवी, सोनल रावळ, तेिजदरसिंग होरा, संजय ओझा, राजश्री सीमंत या तरुण गायकांनी यथोचित गायली आहेत. देशभक्ती ही मध्यवर्ती कल्पना घेऊन अल्बमची निर्मिती करण्याचे धाडस ‘रेड रिबन’ने दाखवलं आहे. सध्याच्या काळात ही गोष्ट अपवादात्मकच ठरावी!

सुपरस्टार
हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला (?) सुपरस्टार राजेश खन्ना याचे निधन होऊन कालच एक महिना झाला. ‘आराधना’ नंतरचे दिवस त्याच्यासाठी स्वप्नवतच होते. नजरेत भरण्यासारखे व्यक्तिमत्त्व नसूनही व मर्यादित अभिनय असताना चित्रपटसृष्टीवर त्याने ज्या प्रकारे अधिराज्य गाजवले ते विस्मयचकित करणारेच होते. अमिताभ बच्चनचे युग येईपर्यंत त्याचीच चलती होती. राजेश खन्नाच्या यशात राहुलदेव बर्मन आणि किशोरकुमार यांचा सिंहाचा वाटा होता, मात्र पडद्यामागील कलाकारांना आवश्यक ते श्रेय देण्याची प्रथा आपले रसिक मानत नाहीत, त्यामुळे सुपरस्टार म्हणून त्याचाच बोलबाला झाला. त्याच्या चित्रपटांचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे त्यातील गाणी. यामुळेच त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘सारेगामा इंडिया लि.’ने ‘सुपरस्टार’ हा दोन सीडींचा संच कानसेनांपुढे सादर केला आहे.  
‘जिंदगी कैसी ये पहेली हाए’ अशी टॅगलाइन असणाऱ्या या अल्बमच्या प्रत्येक सीडीत १५ गाण्यांचा समावेश आहे. ‘दाग’मधील ‘मै तो कूछ भी नही दोस्तों’ या राजेशच्या आवाजातील संवादांनी या सीडीची सुरुवात होते. (काकाचं बोलणं मात्र मिठास होतं!) यानंतर ‘जिंदगी कैसी ये पहेली, मेरे नसीबमें, मेरे नयना सावन भादो, वो शाम कूछ अजीब थी, मेरे दिवानेपन की, हजार राहें, जिंदगी के सफरमें’ अशी एकापेक्षा एक सरस गाणी ऐकण्यास मिळतात. दुसऱ्या सीडीमध्येही ‘जिंदगी एक सफर है सुहाना, आपके अनुरोधपे, चिंगारी कोई भडके, एक अजनबी हसिनासे, कजरा लगाके, दिये जलते है’ अशी सदाबहार गाणी आहेत. ही सर्व गाणी त्यातील वाद्यमेळांसकट रसिकांना तोंडपाठ आहेत, वर्षोनुवर्षे ती ऐकली गेली आहेत, तरीही यानिमित्ताने ती पुन्हा ऐकण्यास हरकत नाही. या गाण्यांमधील खुमारी दिवसेंदिवस वाढतच आहे. दुसऱ्या सीडीच्या शेवटीही ‘दाग’मधील संवाद ऐकण्यास मिळतात. साहिरची ही शायरी पहा, ‘आप, आप क्या जाने मुझको समझते है क्या, मै तो कूछ भी नही हू दोस्तों..’ (या दीर्घ संवादात साहिरने पुढे लिहिलंय) ‘मुझको इतनी मोहब्बत मिली आपसे, ये मेरा हक नही मेरी तकदीर है..’ काकाचं सुपरस्टारपद म्हणजे आणखी वेगळं काय होतं?
(समीक्षणासाठी सीडी-डीव्हीडी आमच्या नरिमन पॉईंट अथवा महापे कार्यालयात पाठवाव्यात.)

‘चला खेळूया मंगळागौर’ राज्यस्तरीय स्पर्धेची मंगळवारी महाअंतिम फेरी
प्रतिनिधी
‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीच्या पुढाकाराने आणि ‘लोकसत्ता’च्या पाठिंब्याने आयोजित करण्यात आलेल्या ‘चला खेळूया मंगळागौर’ या राज्यस्तरीय स्पर्धेची महाअंतिम फेरी माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिर येथे मंगळवार, २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.०० वाजता सुरू होणार आहे. या महाअंतिम फेरीचे प्रक्षेपण २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता केले जाणार आहे.
राज्यभरातील विविध ठिकाणी प्राथमिक फे ऱ्या आयोजित करून त्यातून महाअंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या मंगळागौरीच्या गटांमध्ये राज्यभरातील विविध ठिकाणच्या दहा गटांची निवड करण्यात आली आहे. मुंबईतील फेरीतून चंडिका माता महिला मंडळ, पुण्यातून गार्गी ग्रुप, सोलापुरातून सखी ग्रुप, औरंगाबादेतून जागर ग्रुप, अहमदनगर येथून मैत्रेयी ग्रुप, नाशिक रोडमधून नूपुर महिला मंडळ, सांगलीत झालेल्या फेरीतून सखी ग्रुप कराड, डोंबिवलीतील नाच गं घुमा, महडमध्ये झालेल्या फेरीतून मंथन ग्रुप, रत्नागिरीत झालेल्या मंगळागौर स्पर्धेच्या फेरीतून जागर ग्रुप अशा दहा गटांमध्ये मंगळागौर स्पर्धेची महाअंतिम फेरीतील लढत होणार आहे. मंगळागौर स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी विनामूल्य प्रवेश दिला जाणार असून सोहळ्याचे पुन:प्रक्षेपण २५ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता केले जाणार आहे.