शनयाच्या रुपाने कलाकाराच्या आयुष्याचे‘राझ’मला उलगडले - बिपाशा बासू Print

प्रतिनिधी, मुंबई
दहा वर्षांपूर्वीची गोष्ट होती ती. ‘राझ’ चित्रपटाच्या सेटवर मी होते कारण त्यावेळी दिनो मोरिआ आणि मी एकत्र होतो. मॉडेलिंग करुन कंटाळा आला म्हणून ‘अजनबी’ नावाचा चित्रपट केला होता. ‘राझ’च्या सेटवर उगाचच फिरत असताना मुकेशजींनी बेटा, तुला मालिनीची भूमिका करायची आहे, असे सांगितले. माझ्यासाठी तो आश्चर्याचा धक्का होता. मी का करायचा हा चित्रपट?, हा माझा प्रश्न होता. तरीही हा चित्रपट मी केला. ‘राझ’ चित्रपट केल्यानंतर अभिनेत्री म्हणून कारकिर्द घडवायची आहे, हा विश्वास दिग्दर्शक विक्रम भट्टनेच मला दिला होता. आज दहा वर्षांनंतर शनयासारखी नकारी व्यक्तिमत्त्व असलेल्या अभिनेत्रीची भूमिका माझ्या त्याच दिग्दर्शकाने माझ्यासमोर ‘राझ ३’ च्या रुपाने आणून ठेवली होती. ‘राझ’ ते ‘राझ ३’ म्हणजे एक नवोदित अभिनेत्री ते प्रसिध्द बॉलिवुड अभिनेत्री बिपाशा बासू हा प्रवास तिने अगदी मनमोकळेपणे सांगून टाकला.
इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘राझ ३’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव, या चित्रपटाच्या निमित्ताने कलाकारापेक्षाही एक माणूस म्हणून आपल्याला जाणवलेल्या गोष्टी या सगळयाविषयी बिपाशा बासूने ‘स्क्रीन’च्या चॅटरुममध्ये दिलखुलास गप्पा मारल्या. ‘राझ ३’ मध्ये बिपाशाने हट्टी, आत्मकेंद्रित त्याहीपेक्षा दुसऱ्याच्या पुढे जाण्याने स्वतला असुरक्षित मानणारी अशी अभिनेत्री साकारली आहे. एक चित्रपट दिग्दर्शक आणि दोन अभिनेत्री यांच्यातले प्रेम, तिरस्कार या गुंतागुंतीच्या मानवीय संबंधाभोवती ‘राझ ३’चे कथानक गुंफण्यात आले आहे. यात बिपाशाने अत्यंत नकारी आणि आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी अगदी काळया जादूचा वापर करणाऱ्या शनया या अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेबद्दल बोलताना, आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतील ही अतिशय आव्हानात्मक आणि मानसिकदृष्टय़ा थकवणारी अशी ही भूमिका होती, असे बिपाशाने सांगितले.
शनयाची भूमिका करताना एकीकडे मनाच्या पातळीवर घालमेल सुरु असायची आणि तरीही त्याकडे दुर्लक्ष करत चित्रिकरण करणे हा काय अनुभव होता याचा किस्साही यावेळी बिपाशाने सांगितला. मला तो प्रसंग आत्ताही जसाच्या तसा आठवतो आहे. सीन सुरुच होता..मनातल्या मनात मी विक्रम कट कधी म्हणेल, याचा विचार करत होते. एका क्षणी ते शनयाची भूमिका साकारणे मला इतकेअस'ा झाले की मी खाली कार्पेटवर कोसळले आणि रडायला लागले. माझी नेहमीची खंबीर प्रतिमा त्यादिवशी पहिल्यांदा गळून पडली, बिपाशा सांगत होती. मी नेहमीच माझी खंबीर प्रतिमा लोकांसमोर ठेवली आहे. माझे आईवडिल सतत म्हणायचे की, बिपाशा खरोखरच धीट आणि खंबीर मुलगी आहे. माझा तो मुखवटा त्यादिवशी गळून पडला. पहिल्यांदा मला वाटले की आपण मनाने कमजोर आहोत, हे आपण आधीच स्वतशी कबूल करायला हवे होते, बिपाशा सांगत होती.