‘बेबो’चे की ‘माही’चे सरप्राईज! Print

alt

प्रतिनिधी
बॉलीवूडमध्ये कलावंत एकमेकांना ‘सरप्राईज’ देण्यात पटाईत असतात. आता येऊ घातलेल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडचे पीआर वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविताना याचा फायदा निश्चितच घेतात. ‘हिरोईन’ या आगामी चित्रपटाच्या बाबतीत मात्र एक योगायोग झाला खरा. मधुर भांडारकरचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘हिरोईन’च्या चित्रीकरणाची सुरूवात झाली २६ नोव्हेंबरला. चित्रीकरणाचा हा पहिलाच दिवस होता आणि त्याच दिवशी अर्जुन रामपालचा वाढदिवस होता. आता परवाच्या रविवारी म्हणजे २६ ऑगस्टला (पुन्हा २६ तारीखच) दिग्दर्शक मधुरचाच वाढदिवस होता आणि चित्रपट प्रदर्शित होणार त्या दिवशी म्हणजे २१ सप्टेंबर रोजी ‘हिरोईन’ची नायिका करिना कपूरचा वाढदिवस आहे. आता मुख्य मुद्दा हा आहे की प्रमुख भूमिकांमधील कलावंत आणि दिग्दर्शक यांचे वाढदिवस चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवून देण्यात ‘लकी’ ठरतील की फक्त समीक्षकांकडून चित्रपटाचा गौरव केला जाईल हे पाहायचे.
परवाच्या रविवारी २६ ऑगस्टला मधुरच्या वाढदिवशी ‘बेबो’ने ‘सरप्राईज व्हिजिट’ करून मधुरचा वाढदिवस अचानक साजरा केला म्हणे. चित्रपटाच्या प्रमोशनला दिल्लीला जाण्यापूर्वी आलेला हा वाढदिवस होता. एरवी म्हणे मधुर हा खूप लोकांमध्ये ‘मिक्स अप’ न होणारा आणि स्वत:चे वाढदिवस फक्त कुटूंबासोबत सेलिब्रेट करतो म्हणे. परंतु, चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त असल्याने तो यावेळी घरीच होता. मग ‘बेबो’ने काय केले चित्रपटाच्या टीमला सोबत घेऊन आणि केक घेऊन ती मधुरच्या घरी पोहोचली आणि मग सर्वानी मधुरला शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केला. ‘ऐसी छोटी छोटी बाते बॉलीवूड में होती रहती है’ असेच म्हणायला हवे. बेबो ऊर्फ करिना ऊर्फ ‘माही’? हो. चित्रपटातील व्यक्तिरेखेचे नाव ‘माही अरोरा’ असे आहे म्हणून ‘माही’ म्हटले. चित्रपटाचे सध्या प्रमोशन सुरू आहे ना मग!!