‘सविता भाभी’ आता टीव्हीवरही Print
  • झी टीव्हीवरील ‘हिटलर दीदी’मध्ये नवीन पात्र
  • महिला स्वयंसेवी संस्थांचा विरोध होण्याची शक्यता

alt

प्रतिनिधी
हिंदी मालिका अत्यंत बोल्ड होत चालल्याची टीका होत असतानाच आता थेट एका पॉर्न कॉमिकमधील पात्राशी साधम्र्य असलेले पात्र आपल्या मालिकेत आणण्याचा बोल्ड निर्णय झी टीव्ही या हिंदी वाहिनीने घेतला आहे. या वाहिनीवरील ‘हिटलर दीदी’ या मालिकेत आता ‘सविता भाभी’ नावाचे एक पात्र शिरकाव करणार आहे. या पात्राची भूमिकाही ‘म्हातारा नवरा आणि त्यामुळे बाहेर सुख शोधणारी बाई’ अशाच प्रकारची आहे. या पात्राला आणि परिणामी मालिकेला स्त्री संघटनांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
काही वर्षांपूर्वी इंटरनेटवर ‘सविता भाभी’ या पॉर्न कॉमिकने प्रचंड वादळ निर्माण केले होते. या वादळाचे पडसाद काही प्रमाणात महाराष्ट्राच्या सर्वोच्च राजकीय केंद्रातही उमटले होते. त्यानंतर त्या संकेतस्थळावर बंदीही आणण्यात आली. मात्र आता या कॉमिकमधील ‘सविता भाभी’शी साधम्र्य असलेली सविता भाभी ‘हिटलर दीदी’ या मालिकेत दिसणार आहे. ही भूमिका जसवीर कौर करणार आहे.
हे पात्र दिल्लीतील चांदनी चौक या भागात नव्यानेच राहायला येते. या महिलेचा पती हा वृद्ध असल्याने ती त्याच्याबरोबर सुखी नाही. त्यामुळे ती ते सुख बाहेर शोधत आहे. हिटलर दीदी अर्थात इंदिराचा भाऊ मुन्ना याची भेट सविता भाभीशी होते आणि त्यापुढे जाऊन त्यांच्यात प्रेम निर्माण होते. विशेष म्हणजे मुन्नाचे लग्न आधीच झालेले आहे. या अशा कथानकामुळे ही मालिका आणि झी टीव्ही वादाच्या भोवऱ्यात फसण्याची शक्यता आहे.
आपण मालिकांमधून नेमके कोणते संस्कार आणि कोणती मूल्ये लोकांपर्यंत पोहोचवतो, याचे भान वाहिन्यांनी बाळगणे आवश्यक आहे. अशा प्रकारे सवंग प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते दाखवण्याचा अट्टाहास वाहिन्यांनी सोडायला हवा. आजकाल स्त्रीला एक उपभोग्य वस्तू म्हणूनच सगळीकडे दाखवले जात आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारची कामे करताना महिलांनाही लाज वाटत नाही. मात्र ही मालिका प्रसारित झाल्यास महिला संघटनांना एकत्रित करून त्याविरोधात पावले उचलावी लागतील, असे महिला हक्कांसाठी लढणाऱ्या अॅड. वर्षां देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.