रानी मुखर्जी आता ‘डर्टी’ लूकमध्ये Print

alt

अय्या’च्या गाण्यात दाक्षिणात्य पेहेरावात दिसणार रानी
प्रतिनिधी, मुंबई
‘बॉलिवूडची क्वीन’ म्हणून मिरवत आलेली रानी मुखर्जी तिच्या आगामी ‘अय्या’ या चित्रपटात चक्क ‘डर्टी’ लूकमध्ये दिसणार आहे. एका मराठी मुलीची भूमिका साकारणाऱ्या रानीने या चित्रपटात थेट डर्टी पिक्चरमधील विद्या बालनच्या धाटणीच्या पेहेरावात एक गाणे चित्रित केले आहे. या गाण्याचे शब्दही ‘ड्रिमम् वेकपम्, क्रिटिकल कण्डीशनम्’ असे ढिंच्यॅक आहेत. मात्र याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांना विचारले असता त्यांनी, हा लूक डर्टी नसून तो दाक्षिणात्य चित्रपटांमधील बटबटीतपणा अधोरेखित करणारा आहे, असे स्पष्ट केले.
या चित्रपटात मराठी मुलीची भूमिका करणाऱ्या रानीला एक दक्षिण भारतीय मुलगा आवडत असतो. ही मुलगी चित्रपट, गाणी आणि चंदेरी दुनिया यांच्या स्वप्नातच रमणारी असते. त्यामुळे तिच्या स्वप्नात येणारा तो दक्षिण भारतीय मुलगाही दाक्षिणात्य चित्रपटांच्या बटबटीतपणासह येतो. या धर्तीवर असलेल्या ‘ड्रिमम् वेकपम्, क्रिटिकल कण्डीशनम्’ या गाण्यात रानी मुखर्जी थेट डर्टी पिक्चरमधील विद्या बालनचे कपडे घालून वावरल्यासारखी वाटते. या अतिशय ढिंच्यॅक गाण्यासाठी रानीने केलेले नृत्यही तसेच विद्याच्या ‘उ लालाऽऽ उ लालाऽऽ’ची आठवण करून देणारे आहे. रानीला अशा कपडय़ांमध्ये पाहण्याची सवय नसलेल्या तिच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्का असू शकतो. मात्र रानी अशा प्रकारच्या कपडय़ांमध्ये प्रचंड सहजपणे वावरली आहे.
रानीचा हा नवीन लूक डर्टी पिक्चरमधील विद्या बालनच्या लूकशी साधम्र्य साधतो का, असे विचारले असता दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी मात्र नकारात्मक उत्तर दिले. रानीची या चित्रपटातील भूमिका आणि विद्या बालनची भूमिका यांत जमीन अस्मानाचा फरक आहे. हे गाणे अतिशय मजेदार असून ते त्या मुलीच्या भावविश्वाचा भाग आहे, असे कुंडलकर यांनी सांगितले. तसेच या गाण्यात आम्हाला दाक्षिणात्य चित्रपटांतील बटबटीतपणावर विनोदी टिप्पण्णी करायची होती, त्यामुळे आपण रानीला असा पोशाख दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच रानीलाही ही गोष्ट पटल्याने तिने अत्यंत सहजपणे अशा पोशाखात नृत्य करण्यास तयारी दर्शवल्याचे ते म्हणाले.