चित्रगीत : महागणपती Print

अनिरुद्ध भातखंडे - रविवार, १६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मोरगाव येथील मोरेश्वराच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर एका साधुपुरुषाचे देहभान हरपले. महाराष्ट्राच्या निद्रिस्त समाजपुरुषाच्या अंगी क्षात्रतेज यावे, यासाठी बलोपासनेच्या प्रसाराचा वसा घेतलेल्या त्या साधूने गणेशाचे ते रूप पाहून तत्क्षणी एक सुंदर शब्दकळा असलेली आरती रचली.. विठ्ठलभक्तीत आकंठ बुडालेल्या एका संतानेही याच सुमारास गणेशतत्त्वाचे सार्थ वर्णन करणारी एक रचना केली. यातील पहिल्या घटनेतील साधुपुरुष म्हणजे समर्थ रामदास स्वामी व त्यांनी रचलेली आरती म्हणजे ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’, दुसऱ्या घटनेतील विभूती म्हणजे संत तुकाराम आणि त्यांची रचना म्हणजे ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे!’ या दोन्ही रचना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक विश्वाचे अविभाज्य भाग ठरल्या आहेत. गणेशगीतांची ही परंपरा आजही अव्याहतपणे सुरू आहे. सारेगामा इंडिया लि. अर्थात पूर्वाश्रमीच्या एचएमव्ही कंपनीने अनेक कलाकारांकडून उत्तमोत्तम गणेशगीतांची निर्मिती करून घेतली. या गाजलेल्या गणेशगीतांचे संकलन असणारा दोन सीडींचा ‘महागणपती’ हा अल्बम सारेगामाने गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर कानसेनांपुढे ठेवला आहे. यातील पहिल्या सीडीत १८ तर दुसऱ्या सीडीत १५ गणेशगीतांचा सुरेल प्रसाद असून त्यामुळे गणेशोत्सवाची वातावरणनिर्मिती होते.

शुभविनायक
‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’, ‘गणराज रंगी नाचतो’, ‘गजानना श्री गणराया’, ‘तुज मागतो मी आता’, ‘उठा उठा हो सकळीक’ (लता मंगेशकर), ‘तू सुखकर्ता’, ‘प्रथम तुला वंदितो’ (वसंतराव देशपांडे), ‘तुझ्या कांतीसम रक्तपताका’ (सुमन कल्याणपूर), ‘झुळझुळ वाहे’, ‘रचिल्या ॠषिमुनींनी’ (उषा मंगेशकर), ‘महाराज गौरीनंदना’, ‘नमिला गणपती’ (सुरेश वाडकर), ‘हे शिवशंकर’ (रामदास कामत), ‘बाप्पा मोरया रे’, ‘गणपती गालात हसतोय रे’ (प्रल्हाद शिंदे) आदी अनेक गायकांच्या आवाजातील या रचना कमालीच्या लोकप्रिय ठरल्याने प्रत्येक गणेशोत्सवात आवर्जून ऐकल्या जातात. या सर्व रचना या अल्बमच्या निमित्ताने एकत्रित ऐकण्यास मिळतात, हे वैशिष्टय़. महाराष्ट्रातील विविध लोकसंगीताचा बाज असलेलं, गीतकार जगदीश खेबुडकर यांनी एका रात्रीत रचलेलं ‘अष्टविनायक’ या चित्रपटातील ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ या अविस्मरणीय मॅरेथॉन गीताने या अल्बमची सांगता होते. या अल्बममध्ये प्रत्येक गीताचे गीतकार, संगीतकार व गायक यांची माहिती देण्यात आली आहे. मात्र  ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ या आरतीच्या तपशीलात समर्थ रामदास स्वामी यांच्या नावाचा उल्लेखच नाही, याचे आश्चर्य वाटते. ‘सारेगामा’ने भविष्यात ही त्रुटी दूर करावी.
भजनसम्राट अनुप जलोटा आणि दूरदर्शन-आकाशवाणी ‘फेम’ गायिका तापसी नागराज यांच्या आवाजातील ‘शुभविनायक’ हा आणखी एक अल्बम ‘सारेगामा’ने प्रस्तुत केला आहे. या अल्बमचे वैशिष्टय़ म्हणजे हनुमानचालीसाप्रमाणे यात सिद्धिविनायक चालीसा ऐकण्यास मिळते. गोविंद देव नागराज यांनी ही चालीसा रचली असून कल्याण सेन यांनी ती स्वरबद्ध केली आहे. बासरी, तबला, गिटार आदी वाद्यांनी ती खुलविण्यात आली आहे. जलोटा यांचे भक्तिगीत गायनावरील प्रभुत्व सर्वज्ञात आहे. यातही त्यांनी पूर्वलौकिक राखला आहे, तरीही त्यांच्या आवाजात अलीकडे वय डोकावू लागलं आहे हे काही ठिकाणी जाणवतं. तापसी नागराज यांचा आवाज चांगला लागला आहे. त्यांचं गाणं ऐकताना कविता कृष्णमूर्तीच्या आवाजाचा भास होता. सिद्धिविनायक चालीसा लांबलचक असल्याने या अल्बममध्ये त्याव्यतिरिक्त केवळ सिद्धिविनायक आरती ऐकण्यास मिळते. ही आरतीही जमून आली आहे.

महानायक
गणेशगीतांचा आगळावेगळा बाज असलेला ‘महानायक’ हा अल्बम श्रेयस आणि आभास या जोशीबंधूंनी संगीतबद्ध केला असून गायनाची बाजूही त्यांनीच सांभाळली आहे. या बंधूंनी शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर शिक्षण घेतलं आहे. पाश्चात्त्य संगीताचंही त्यांना ज्ञान आहे. त्यातूनच हे अनोखं फ्यूजन झालं असावं. मध्य प्रदेशात काही ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या निमादी या भाषेतील ‘पयल मनाऊ म्हारा गणपती देवा’ या श्रवणीय गीताने या अल्बमची सुरुवात होते. ‘मोरया मोरया’ (गीतकार रवींद्र जोशी) या गीताची स्वररचना पारंपरिक आहे, मात्र त्यासाठी रचण्यात आलेला वाद्यमेळ स्पॅनिश पद्धतीचा आहे! ‘आला रे आला’ (गीतकार सुरेश चौधरी), ‘जय महानायका’, ही गीतेही पठडीतील गणेश गीतांपेक्षा वेगळी आहेत.
‘देवा लंबोदर’ हे गाणं संदीपा पारे, तृप्ती बिल्लोरे, स्वाती सराफ, आभा जोशी या नवख्या गायिकांकडून चांगल्याप्रकारे गाऊन घेण्यात आलं आहे. ‘सारेगामा’चीच निर्मिती असणाऱ्या या अल्बमची सांगता ‘शेंदूर लाल चढायो’ आणि ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ या आरत्यांनी झाली आहे. या आरत्यांना मात्र नव्या चाली लावण्याचे धाडस संगीतकारांनी केलेलं नाही. ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती म्हणताना आजकाल घराघरात जी चूक केली जाते तीच चूक यात झाली आहे, ती म्हणजे ‘संकटी पावावे निर्वाणी रक्षावे’ या ओळीत संकटीऐवजी संकष्टी असा उच्चार करण्यात आला आहे. कालाय तस्मै नम:!

आरतीयाँ
रेड रिबन या कंपनीतर्फे ‘आरतीयाँ’ हा पारंपरिक चालीतील हिंदी आरत्यांचा अल्बम दाखल झाला आहे. सुरेश वाडकर यांच्यासह लालित्य मुन्शॉ या गायिकेने या आरत्या गायल्या आहेत. यात ‘जय गणेश देवा’, ‘जय लक्ष्मी माता’, ‘आरती कुंजबिहारी की’, ‘जय संतोषीमाता’, ‘ओम जय जगदीश हरे’, ‘श्री रामचंद्र’, ‘आरती हनुमान लल्लकी’, ‘जय पार्वतीमाता’, ‘जय शिव ओंकारा’, ‘जय अंबे गौरी’ या आरत्या ऐकण्यास मिळतात. वाडकर यांच्यासारख्या कसलेल्या गायकाने त्या सहजतेने गायल्या असून लालित्य यांनीही त्यांना चांगली साथ दिली आहे. हा अल्बम भाविकांना आध्यात्मिक आनंद देतो, यात शंका नाही.

(समीक्षणासाठी सीडी-डीव्हीडी आमच्या नरिमन पॉईंट अथवा महापे कार्यालयात पाठवाव्यात.)