अय्ययो! Print

सुनील नांदगावकर, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मॅड कॉमेडी प्रकारातले चित्रपट अलीकडे मोठय़ा प्रमाणात बॉलीवूडमध्ये येतात. म्हटले तर निव्वळ बाष्कळ विनोदी, थोडेसे अ‍ॅक्शनपट या स्वरूपाचे चित्रपट कधी रोमॅण्टिक कॉमेडीची सरमिसळ करत पडद्यावर येतात. मॅड कॉमेडीचा प्रेक्षकवर्ग तयार होताना दिसतोय. परंतु, त्याच्या नावाखाली काहीही खपविण्याचे प्रकार जास्त आहेत. अशा चित्रपटांमध्ये प्रमुख अभिनेता-अभिनेत्रींचे नाव किती वजनदार आहे त्यावर अनेकदा अशा चित्रपटांचे यश अवलंबून असते. परंतु, दिग्दर्शक नामांकित आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट करणारा अशी ख्याती असलेला असेल तर रोमॅण्टिक कॉमेडी, मॅड कॉमेडी कोणत्याही प्रकारातला चित्रपट असला तरी अपेक्षा असतात. हमखास वेगळ्या धाटणीचे, वेगळे विषय मांडणाऱ्या दिग्दर्शकाचा ‘अय्या’ चित्रपट मात्र अपेक्षाभंग करतो. त्यामुळे ‘अय्ययो’ म्हणण्याची वेळ प्रेक्षकावर येते.
मीनाक्षी देशपांडे (राणी मुखर्जी) ही पुण्यात राहणारी मध्यमवर्गीय पण बिनधास्त तरुणी. सर्वसामान्य पद्धतीने विचार करणारी असली तरी अतिशय स्वप्नाळू असलेली मीनाक्षी तिच्या घरातील अन्य मंडळींसारखी विक्षिप्त आणि विचित्र नाही. तिचे आई-बाबा, भाऊ आणि आजी यांचा विचित्रपणा तिला आवडत नाही. त्यातून तिला सुटका हवी आहे आणि मस्तपैकी  स्वप्नांच्या जगात तिला वावरायचे आहे. सर्वसामान्य मुलींसारखे कांदेपोहे कार्यक्रम करून तिला लग्न करायचे नाही तर प्रेमात पडूनच लग्न करायचे ही तिची इच्छा आहे. सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय असल्यामुळे एखादी नोकरी करायची, थोडे पैसे साठवायचे आणि स्वत:चे छोटेसे घर घेऊन राहायचे, प्रेमात पडायचे आणि लग्न करायचे एवढीच मीनाक्षीची इवलीशी स्वप्नं आहेत. परंतु, मुलीचे लग्न झाले की जीव भांडय़ात पडेल असा एकच विचार करणारी मीनाक्षीची आई (निर्मिती सावंत) वृत्तपत्रात मीनाक्षीसाठी वरसंशोधनाची छोटी जाहिरात देते आणि सकाळ-संध्याकाळ घरी येणाऱ्या अनेक वर आणि वरपक्षाच्या मंडळींचा सामना मीनाक्षीला करावा लागतो.
वास्तवातल्या रोजच्या कटकटी आणि घरातील विक्षिप्त माणसं, घरासमोरच असलेली कचराकुंडी, त्याची दरुगधी याने कातावलेली मीनाक्षी स्वप्नांच्या राज्यात फिरते तेव्हा अतिशय खुलते. तिला एक तरुण आवडतो, खरे म्हणजे त्याच्या जवळून जाता-येताना येणारा सुवास यामुळेच तिला तो आवडतो. याच भोवती चित्रपट गुंफलेला आहे.  मीनाक्षीला सुखावणारा गंध हा चित्रपटाचा मुख्य धागा आहे. परंतु, तिची आई (निर्मिती सावंत), एकावेळी चार सिगारेट एकदम ओढणारे आणि सदान्कदा शेकडो दूरध्वनी संच घेऊन बसलेले वडील (सतीश आळेकर), कुत्र्यांवर प्रेम करणारा तिचा भाऊ नाना (अमेय वाघ), चित्रविचित्र व भडक पोषाख परिधान करणारी आणि विनाकारण हसणारी मैना (अनिता दाते) या सगळ्या विक्षिप्त व्यक्तिरेखा मुख्य व्यक्तिरेखेभोवती फिरत राहतात. त्यातून काय सांगायचे आहे ते कळत नाही. एकावेळी चार सिगारेट एकत्र ओढणारे मीनाक्षीचे बाबा या व्यक्तिरेखेतून त्यांना आलेले नैराश्य दाखवायचे असावे कदाचित. परंतु, ती व्यक्तिरेखा संबंध कथानकात ठाशीवपणे काही सांगत नाही. वैचित्र्य दाखविताना त्याची संगीत पटकथा-संवादातून लागत नाही. त्यामुळे प्रेक्षक गोंधळतो. रिकामटेकडा नाना सतत कुत्र्यांशी खेळताना दाखविला आहे. त्याला म्हणे कुत्र्यांची सेवा करणारी कॉपरेरेट कंपनी काढायची आहे. तो रस्त्यावरच्या कुत्र्यांसोबत सतत खेळतो, त्यांची काळजी घेतो यातून येणारी दरुगधी, त्याचा मीनाक्षीला असलेला तिटकारा एवढाच संबंध समजतो. तिला सुखावणारा गंध असलेला तरुण सूर्या (पृथ्वीराज) मीनाक्षीला कॉलेजच्या लायब्ररीत नोकरी मिळते तेव्हा भेटतो. पण मीनाक्षी रोज त्याच्या जवळून जाते तेव्हा तिला सुखावणारा गंध येतो आणि म्हणून तिला त्याचे आकर्षण वाटते. परंतु, ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तरी तो प्रतिसाद देत नाही. एखादी तरुणी तिला आवडणाऱ्या तरुणाशी स्वत:हून बोलण्याचा प्रयत्न करते तरी तो तरुण प्रतिसाद देत नाही हे पटणारे नाही. वैचित्र्य दाखविण्याच्या नादात मूळ विषय पोहोचू शकत नाही.  राणी मुखर्जीने साकारलेली मराठी तरुणी मात्र मस्त साकारली आहे. बाकी सगळ्या वैचित्र्यपूर्ण व्यक्तिरेखांचे कलावंत चांगले असले तरी त्या व्यक्तिरेखा सिनेमात का आहेत, हेच समजत नसल्यामुळे प्रेक्षक गोंधळतो. स्वप्नाळू मीनाक्षी दाखविण्यासाठी माधुरी, जुही, श्रीदेवी या रूपेरी पडद्यावरच्या तिला आवडलेल्या अभिनेत्रींचा अवतार धारण करते. गाणी म्हणते, नृत्य करते. सगळी गाणी भडक रंगात, भडक पद्धतीने चित्रित केल्यामुळे अश्लीलतेकडे झुकणारी वाटतात. दिग्दर्शकाने ‘खास दाक्षिणात्य’ चित्रपटांतील गाण्यांची चित्रीकरण पद्धत वापरली आहे. सूर्या ही व्यक्तिरेखा दाक्षिणात्य आहे हे दाखविण्यासाठी भडकपणा वेशभूषा, केशभूषा, सेट्स यामध्ये आणला का ते मात्र माहीत नाही. एकप्रकारे भडक दाक्षिणात्य पद्धतीच्या चित्रपटांबाबत दिग्दर्शकाला टीका करायची आहे किंवा काय तेही समजत नाही. हा भडकपणा, बटबटीतपणा अंगावर येतो. पडद्यावर काय चालले आहे हेच समजत नाही म्हणून प्रेक्षक कंटाळतो हे मात्र खरे.

अय्या
निर्माते - अनुराग कश्यप,
व्हायकॉम १८
लेखक-दिग्दर्शक - सचिन कुंडलकर
छायालेखन - अमलेन्दू चौधरी
संकलन - अभिजित देशपांडे
संगीत - अमित त्रिवेदी
कलावंत - राणी मुखर्जी, सुबोध भावे, अमेय वाघ, सतीश आळेकर, अनिता दाते, पृथ्वीराज, निर्मिती सावंत, ज्योती सुभाष, पकाडा पांडी व अन्य.