हॅप्पी बर्थडे : किंग खान Print

alt

मुंबई, २ नोव्हेंबर २०१२
आज बॉलीवुडचा बादशाह शाहरूख खान याचा सत्तेचाळीसावा वाढदिवस आहे. दरवर्षी शाहरूख खान आपला वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतो, मात्र यावेळी यश चोपड़ा यांचे निधन झाल्यामुळे शाहरुखने वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.  
टीव्हीपासून आपल्या करिअरला सुरूवात करणा-या शाहरूखचा पहिला चित्रपट (दिवाना) १९९२ साली आला होता. ज्यामध्ये रूषी कपूर आणि दिव्या भारती यांनी काम केले होते. हा चित्रपट जबरदस्त हिट झाला होता आणि शाहरूखचे काम सर्वांना आवडले होते. त्यानंतर 'बाजीगर' आणि 'डर' या चित्रपटांनी शाहरूखची प्रतिमा बदलली आणि तो रातोरात स्टार झाला. आपल्या कारकीर्दीत शाहरूखने आजवर आठ वेळा फ़िल्मफ़ेयर सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला आहे.
१९९५ साली आलेल्या 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाने यशाची अनेक शिखरे गाठली आणि आजही हा चित्रपट गेली १६ वर्षे मुंबईतील मराठी मंदिर चित्रपटगृहात सुरू आहे. दिल तो पागल है, परदेश , मोहब्बते, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, दिल से, देवदास, वीर जारा, कल हो ना हो, या चित्रपटांनी कुठलीही चित्रपट पार्श्वभूमी नसलेल्या खानला बॉलीवुडचा बादशाह खान बनवले. रोमांन्सचा बादशाह असे यश चोप्रांना संबोधले जात असताना त्यातला रोमॅन्टीक हिरो म्हणजे शाहरूख खान अशी त्याची प्रतिमा तयार झाली आहे. त्याचा आणि यश चोप्रांचा एकत्रित शेवटचा सिनेमा 'जब तक है जान..' याच महिन्यात १३ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.