हरवलेलं बालपण शोधताना.. Print

कल्पना संचेती - शनिवार, २१ एप्रिल  २०१२  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
altशाळेच्या सुट्टय़ा सुरू झाल्या की या मुलांना कसं गुंतवून ठेवायचं असा प्रश्न पालकांना पडतो, पण याच संधीचा फायदा पालक-मुलं यांच्यातील नातं घट्ट करण्यासाठी केला तर? काही पालकांनी केलेले हे प्रयोग..
आ म्ही सगळे शिक्षक एकत्र जमलो होतो. त्यावेळी एका शिक्षिकेनी एक ताजा अनुभव सांगितला. त्यांचा एक मोठा क्लब आहे. त्या क्लबच्या सभासद मुलांना ते दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. या वर्षी एका फार्म हाऊसवर नेलं होतं. मुलं ५वी ते ९वी या वयोगटातली होती. हिरवे डोंगर, वाहणारा झरा, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फुलं, पक्षी सर्व काही होतं. मोकळी जागा होती. तिथे मुलांचा फेरफटका, खाणं, पिणं झालं. टी शर्ट, जीन्सची पँट, डोळ्यावर गॉगल व पायात स्पोर्ट्स शूज घातलेली ही मुलं फार वेळ निसर्गात एकरूप होऊ शकली नाहीत. जागोजागी मित्रमैत्रिणींचे घोळके बसले आणि प्रत्येकाच्या हातातले व्हिडिओ गेम सुरू झाले. हेडफोनवर गाणी वाजू लागली. या आधुनिक जामानिम्यात मुलाचं ‘मूलपण’ कुठेच दिसत नव्हतं!
नुकतीच वाचनात आलेली ताजी बातमी.. दिघीतल्या शुभम् शिर्के या दहावीत असलेल्या मुलाचे त्याच्या मित्रांनी खंडणीसाठी अपहरण करून खून केला. यात दोन अल्पवयीन मुलं सामील आहेत. टीव्हीवरील मालिका बघून हे दु:साहस केल्याचं ते सांगताहेत. दरवेळी सिनेमा, टी व्ही मालिका यांच्यावर दोषारोप केला जातो. त्यांना गुन्हेगार, दोषी ठरवलं जातं. परंतु आपल्याला घरातलं, शाळेतलं, आजूबाजूच्या परिसरातलं, समाजाचं बदलणारं चित्रही लक्षात घ्यावं लागेल. मुलांचं ‘बालपण’ हरवतंय. मोकळेपणा, ताणरहित साधं जगणं कुठेच दिसत नाही. एकीकडे छानछोकी तर दुसरीकडे भीषण गरिबी या चक्रात समाज अडकलाय, त्यातूनही या गुन्हेगारी वृत्तीला खतपाणी मिळतंय.
खेडय़ातून रोज हजारो तरुण काम मिळवण्यासाठी शहराकडे येत आहेत. काही शिक्षणासाठी     घर सोडत आहेत. घरापासून दुरावलेली ही जनता बाहेर मिळणारं तेलकट व मसालेदार निकृष्ट जेवण जेवताहेत. दुसरीकडे शहरातला श्रीमंत वर्ग फॅशन म्हणून व जिभेचे चोचले पुरविण्यासाठी वरचेवर घराबाहेर खात आहेत.    यातून घडणारी मनोवृत्ती अस्थिरतेकडे, चंचलतेकडे नेत आहे.
‘इप्सॉस पब्लिक अफेअर्स’ ही सर्वेक्षण करणारी एक संशोधन संस्था आहे. जगभरातील ग्राहक आणि नागरिकांच्या वेगवेगळ्या गरजा, प्रतिक्रिया जमा करून त्यांचे विश्लेषण करून अंदाज वर्तविण्याचे काम करते. त्यांनी २०११ च्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये सहा आठवडय़ांचे एक सर्वेक्षण केले. १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं असलेल्या २० देशांमधल्या ७००० पेक्षाही जास्त पालकांनी यात भाग घेतला. ऑनलाइन आणि व्यक्तिगत मुलाखतींच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. फेब्रुवारी २०१२ मध्ये या अभ्यासाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले.
या अभ्यासातून असे निदर्शनास आले की, आजची मुलं त्यांच्या आधीच्या पिढीमधल्या मुलांपेक्षा अधिक वेगाने मोठी होत आहेत. बहुतांश पालक असं म्हणतात की रोजच्या ताणतणावामुळे बालपणीचा आनंद देणारा हा कालावधी मुलांच्या आयुष्यातून कमी होत चाललाय. मुलांनी मुलांसारखं वागणं, राहणं, त्या त्या वयाचे सहज सुलभ आनंद घेणं यावर बंधन पडताहेत. हीच गोष्ट मोठय़ांच्या बाबतीतही घडते आहे. जगातील बहुतांश पालक आपल्या लहानपणीच्या हलक्या फुलक्या आनंदी दिवसांची आठवण काढून हळहळताना दिसतात. ५४ टक्के पालक म्हणतात, त्यांनी स्वत:च्या लहानपणी जी मजा, जो आनंद अनुभवला होता तसा आज त्यांना कोठेही दिसत नाही.
आपल्या सर्वामध्ये, सर्वाच्या आत एक ‘मूल’ दडलेलं असतं असं म्हणतात. आपल्यात दडलेल्या या बालकाला अवसर मिळतो जेव्हा आपण छान खेळतो, हसतो, मनाला आवडतील अशा गोष्टी करतो. ८० टक्के भारतीय पालक म्हणतात, आता असं काही करायला वेळंच मिळत नाही. दिवसेंदिवस मुलांसाठी वेळ काढणं, मुलांसोबत वेळ घालवणं अवघड बनत चाललंय. या सर्व पालकांना मुलांसोबत वेळ घालवण्याचं महत्त्व पटलेलं असूनही ही गोष्ट ते प्रत्यक्षात करू शकत नाहीत याची खंत ते मनात बाळगून आहेत. जेव्हा केव्हा सगळे कुटुंबीय एकत्र येतात तेव्हाही जमलेल्या मंडळींबरोबर हवा तसा संवाद घडत नाही. इथेही आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर अडथळे निर्माण करतोय. नवनवीन तंत्रज्ञानामुळे आणि सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर वाढल्यामुळे सगळं जग जवळ आलं तर दुसरीकडे या साधनांच्या अतिरेकी वापरामुळे कुटुंबातल्या माणसांमध्ये मात्र दुरावा निर्माण होतोय. पालक म्हणतात, मुलांशी समोरासमोर बोलण्यापेक्षा तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच ते अधिक वेळा बोलतात. मुलांतल्या ऊर्मीना आणि पालकांच्यात लपलेल्या मुलाला निर्भेळ आनंद अनुभवण्याचा अवसरच कमी मिळतोय.
मोठय़ा माणसांची भाषा बोलणारी, मात्र तेवढी समज विकसित न झालेली मुलं आपल्यालाही अनुभवायला मिळताहेत हे खरोखरी चिंतेचीच बाब आहे. या जागतिक सर्वेक्षणांनी ही गोष्ट पुन्हा एकदा आपल्यासमोर प्रकर्षांने मांडली आहे. एखाद्या मुलांत काही विशेष गुण दिसले की आपण लगेच त्यांचं प्रदर्शन मांडतो. सतत स्पर्धाना पाठवतो. त्यातूनही मूलपणं कोमेजताना दिसतंय! जगण्याच्या वाढलेल्या गतीने वेळेचा अभाव आणि जागांचा संकोच झालाय. मुलांबरोबर वेळ घालवण्याची इच्छा असूनही आपण वेळ देऊ शकत नाही ही पालकांची अडचण आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठीची ‘जादूची कांडी’ कोणाकडेच नाही. तरीही हे असंच असणार म्हणून सोडूनही देता येत नाही.
अशाही परिस्थितीत समोर असलेल्या पर्यायांचा विचार करून कल्पकतेने आणि जाणीवपूर्वक मुलांचं बालपण जपणारे पालकही आहेत. मुलांचं बालपण जपताना ‘स्वत:तलं मूल’ जागं ठेवत त्याला अवसर देत आनंदाने पलाकत्वाची वाट चालणारे पालक दिसतात. याच गतिमान जगात नोकरी उद्योग सांभाळूून मुलांसाठी त्यांनी काय वेगळा विचार केला हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल! आतातर उन्हाळी सुट्टय़ांचा काळ समोर आहे. तेव्हा आपल्या मुलांसाठी जेवढं जमेल ते करण्यासाठीची ही उत्तम वेळ आहे.
सुनीताच्या आईबाबांचं मोठं दुकान आहे. किराणामालाचं! त्यामुळे काहीही लागलं की तेथूनच घ्यायची सवय आहे. तिची आई सांगत होती. बऱ्याच वर्षांपासून आम्ही एक पद्धत पाडली आहे. घराला दरवर्षी लागणारा दोन पोती गहू (२०० किलो) आम्ही घरीच स्वच्छ करतो. घरातले सगळेजण मिळून मे महिन्यातल्या संध्याकाळी एकत्र बसून मस्तपैकी गहू निवडतो. निवडता निवडता खूप विषयांवर गप्पा होतात. कधी गाण्यांच्या भेंडय़ा खेळतो तर कधी इतर काही. विशेष म्हणजे मुलांचे बाबाही आमच्यात सामील होतात.
निखिलच्या घरी सुट्टीत काहीतरी नवीन काम एकत्र करायचं ठरवलं जातं. म्हणजे त्यांच्या घरी सर्वाच्या हातात वेगवेगळ्या कला आहेत. एका वर्षी त्यांनी घराच्या फ्रीजवर पेंटिंग केलं तर एका वर्षी दारावर केलं. या वर्षी ते राहिलेल्या पानांच्या वह्य़ा, डायऱ्या तयार करून डेकोरेट करणार आहेत. वह्य़ापुस्तकांना लागणारी कव्हर्स ते दरवर्षी सगळे मिळून डिझाइन करतात. दरवर्षीची कव्हर्स त्यामुळे एकदम खास होतात.
तनिष्काच्या घरी त्यांनी कागदाच्या लगद्यापासून छोटी छोटी चित्र बनवायचं ठरवलंय. गेल्या वर्षी त्यांनी स्वत:च कॅलेंडर बनवलं होतं. हाताने केलेल्या वस्तूंचं मोल वेगळंच असतं.
सेजल आणि पार्थच्या आईबाबांकडे खूप वेगळ्या प्रकारच्या सिनेमांचं संकलन आहे. ते दरवर्षी २-३ दिवसांचे गेटटुगेदर करतात आणि एखाद्या विषयावरच्या किंवा एखाद्या दिग्दर्शकाच्या किंवा विशिष्ट अभिनेत्याच्या फिल्म्स निवडून त्यांची माहिती देतात आणि सिनेमा बघतात. सिनेमा कसा बघायचा ते सांगतात. सिनेमा बघून झाल्यानंतर कधी कधी त्यावर आम्ही चर्चाही करतो.
निकिता म्हणते, आम्हाला सुट्टीत एकत्र मिळून ‘कुकिंग’ करायला आवडतं. मग आम्ही वेगवेगळ्या पदार्थाची यादी करतो. खरेदी करतो. सोसायटीतल्या एकेका घरी आम्ही एकेक पदार्थ तयार करतो. खूप मजा येते. खरेदी करणं, निवडणं, अंदाज बांधणं, चव बघणं, सर्वाना खायला देणं, हिशेब जुळवणं, असं सगळं त्या निमित्ताने आम्ही करतो. छोटी-मोठी माणसं एकत्र येतो. गेली चारपाच वर्षे म्हणजे मी सहावीत गेल्यापासून हा उपक्रम दरवर्षी करतो तो अजूनही सुरू आहे.
सानिका आणि निहार सांगत होते, या वर्षी आम्ही वेगळंच ठरवलंय. आमच्या ओळखीच्या काकांचं स्टेशनरीचं दुकान आहे. या दुकानात आम्ही एक महिना संध्याकाळच्या वेळात कामाला जाणार आहोत. काऊंटरवर थांबून ग्राहक मागतील त्या वस्तू देणं, पैशांचा हिशेब करणं, काकांना लागेल ती मदत करणं, हे सगळं करायला आम्हाला खूप आवडणार आहे. जर आम्ही चांगलं काम केलं तर काका आम्हाला शंभर रुपये देणार आहेत. गेल्या वर्षी आम्ही असेच आमच्या कॉलनीत असणाऱ्या किराणा दुकानात कामाला गेलो होतो. वजन करणं, पॅकिंग करणं, याद्या बघून माल भरणं अशी कितीतरी कामं आम्ही केली. हिशोब करताना खूप फजिती व्हायची. काका मात्र पटापट तोंडी हिशोब करायचे. हे बघून आश्चर्यही वाटलं. काम संपल्यानंतर घरी जाताना ते आम्हाला बक्षीस म्हणून चॉकलेट किंवा थोडीशी साखर द्यायचे.
मनाली म्हणाली, ‘‘मला सुट्टीतल्या वेगवेगळ्या शिबिरांना जायला खूप आवडतं. दर वर्षी कुठे, कुठल्या प्रकारची शिबिरं आहेत याची माहिती आई बाबा आणतात. त्यावरून कुठल्या शिबिरांना जायचं ते आम्ही ठरवतो. शिबिरांना गेल्यामुळे दर वर्षी काहीतरी नवीन शिकता येतं. यावर्षी मी मातीकाम आणि टेरीकोटाच्या वस्तू बनवायला शिकणार आहे.’’ मिहीर म्हणतो, ‘‘मी घरी आजोबांच्या, आईच्या मदतीने आमच्या गच्चीत केलेल्या वाफ्यात वर्षभर वेगवेगळ्या भाज्यांच्या बिया पेरतोय. नियमित पाणी घालतो, त्यांचं  निरीक्षण करतो. मग आजोबा व मी ताजी ताजी भाजी खुडतो आणि मस्त भाजी बनवतो. घरचा ओला व सुका कचरा वेगळा करतो. ओला कचरा गच्चीवरच्या वाफ्यात जिरवतो. यावर्षी मी सायकल चालवायला शिकणार आहे. आणि आईबरोबर पोहायला जाणार आहे.
वेद आणि मैत्रे यांनी तर वेगळीच कल्पना मांडली. त्यांच्या आईनं सांगितलं, यावर्षी ते मुलांच्या बाबांच्या लहानपणच्या गावी जाणार आहेत. त्या गावी बाबा लहानपणचे चारपाच वर्षच राहिले. या गावच्या खूप मजेशीर आठवणी बाबा आम्हाला सांगतात. म्हणून आम्हाला ते गाव बघायचंय. बाबा सांगतात ती ठिकाणं अजून तशीच आहेत का? ते  शोधायचंय. तेथे काय काय बदललं ते बघायचंय.. बाबा ज्या शाळेत शिकले ती शाळा बघायचीय आणि मग बाबांबरोबर बसून पुन्हा त्या गमती ऐकायच्या आहेत आणि तिथेच बसून त्या गावचा इतिहास आजोबांच्या तोंडून ऐकणार आहोत. शिवाय आमच्या घरचा वंशवृक्ष (फॅमिली ट्री) तयार करणार आहोत.
‘शंतनू उत्स्फूर्तपणे गोष्टी सांगतो. स्वत: रचतो, आम्हीही त्याला खूप गोष्टी सांगतो. शंतनूची आई म्हणाली, त्यांनी सांगितलं, आजकाल शंतनूच्या गोष्टींमध्ये खूप विविधता असते त्यामुळे मी किंवा त्याचे बाबा तो गोष्टी सांगत असताना गोष्टी लिहून काढतो. शंतनूचा भाऊ वेद सुंदर चित्र काढतो. त्यामुळे दोघांची मिळून वेगवेगळ्या गोष्टींची चित्रं असलेली छोटी छोटी पुस्तकं तयार होत आहेत.’
आर्यचे बाबा आर्यबरोबर संगणकावरचे वेगवेगळे ‘इन्टरॅक्टिव्ह प्रोग्राम’ खेळतात. आर्यची भाषेवर चांगली पकड आहे. संगणकावरच्या एका प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या भाषेतली सोपी सोपी गाणी आहेत. मी मुद्दाम वेळ काढून आर्यसाठी त्यातली वेगवेगळ्या भाषेतली गाणी त्याला ऐकवतो. एकत्र मिळून चित्र काढतो. रंगवतो, वेगवेगळी माहिती शोधून काढतो.
बंगळुरूजवळच्या गावात राहणाऱ्या एका मैत्रिणीने घराची रचना करताना मुख्यत: मुलांचाच विचार केला. घरात जास्तीत जास्त मोकळी जागा ठेवली. त्यामुळे मुलांना खेळायला, पळायला जागा राहिली. मुलांना सारख्या लागणाऱ्या गोष्टी त्यांना सहज घेता येतील  अशा पद्धतीने ठेवल्या. पुस्तकं, खेळणी, लागणारे कपडे, त्यामुळे मुलं स्वत:च घेऊ शकतात. लाकडी ठोकळे मुद्दाम वेगवेगळ्या आकारात बनवून घेतले. घरात कुत्रा, मांजर असे प्राणी पाळले आहेतच. शिवाय मुलांसाठी बाल्कनीमध्ये एक कोपरा माती,  चिखल, वाळू यांचा केला आहे. तिथे पाण्याची सोय केली. छोटी मोरी करून स्वच्छतेची सोय करून घेतली आहे. ती म्हणते लहानपणी माती, पाणी, वाळू यांच्याशी मुलांचं जवळचं नातं असतं. ते खेळणं भावनिक, मानसिक आणि शारीरिक वाढीच्या दृष्टीने खूप आवश्यकही असतं. तीच गोष्ट पाण्याची. पाणी फार वाया न घालवताही मुलांना पाण्याच्या छोटय़ा टबात खेळता येईल अशी सोय केली आहे. याशिवाय घरात एका भिंतीला काळा रंग देऊन फळा केलाय. तर घरातल्या काही भिंती मुलांना चित्रासाठी राखीव ठेवल्यात. आम्हीही रविवारी किंवा एरवी सुट्टीच्या दिवशी मुलांबरोबर या गोष्टींमध्ये रममाण होतो आणि मनसोक्त खेळता येतं म्हणून आमच्या मुलांचं मित्रमंडळही आमच्या घरी यायला सदैव तयार असतं.
मुक्ता आता दहा वर्षांची आहे. ती म्हणते आमच्याकडे जेव्हा आम्ही सगळी भावंडं जमतो तेव्हा आई, बाबा, काका, मावशी आणि आम्ही सगळे मिळून उशांची झेलाझेली खेळतो. खेळताना मागे संगीत चालू असते. संगीत थांबलं की ज्याच्या हातात उशी असेल त्याला खाऊच्या पुडय़ातील एक चिठ्ठी उघडावी लागते. त्या चिठ्ठीत जे लिहिलेलं असेल ते मग त्याला करून दाखवावे लागते. उदा. अमिताभवर चित्रित केलेलं एखादं गाणं किंवा ज्याच्या अंगावर लाल रंगाचं काही दिसेल त्याला पाच प्रश्न विचार.. असं काहीही. हा खेळ चांगला दोन-तीन तास रंगतो. अशा वेळी घडणाऱ्या गमतीजमतीतून सगळेजण खूप हसतो. मुक्ताचे  बाबा म्हणाले, सगळा ताण हलका होतो. असे खेळ खेळताना टी. व्ही., मोबाइल, कॉम्प्युटर कशाचीही आठवणही होत नाही. नकळतपणे एकमेकांच्यातले गुणही कळतात.
चिन्मयच्या घरी सुट्टी लागली रे लागली की एखाद्या गडावर जाण्याचे वेध लागतात. त्यांच्या घरात सर्वाना इतिहासाचं विशेष प्रेम आहे. गड, टेकडय़ा, जुनी देवळं, लेणी अशा सर्व ठिकाणी ते भटकायला जातात. प्रवासाला जाण्याआधी त्या जागेची माहिती मिळवतात, इतिहास वाचतात, नकाशा बघतात, आजोबा तिथे घडलेल्या महत्त्वाच्या प्रसंगांची गोष्ट सांगतात. चिन्मयची चुलत भावंडं नाटकवेडी आहेत. गडावर पोहोचून फेरफटका मारल्यानंतर, खाऊनपिऊन निवांत झाल्यानंतर जमलेल्या मंडळींना घेऊन कधीकधी नाटकही करतात. तेव्हा एकेकाचा अभिनय बघून हसून हसून पुरेवाट होते. आतापर्यंत महाराष्ट्रातले तीसेक किल्ले आम्ही बघितलेत.
प्रत्येकाचा वाढदिवस आम्ही सायकल यात्रा काढून साजरा करतो. सगळे मित्र मिळून पहाटे तीन-चार तास सायकलिंग करून येतो. बरोबर काहींचे आईबाबाही येतात. त्यानिमित्ताने त्यांचाही स्टॅमिना समजतो. अशा सगळ्या गोष्टी करताना लहान-मोठय़ांमधल्या सीमारेषा धूसर होऊन एक मैत्रीचं नातं तयार होतं. चिन्मयचा मित्र राहुलने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. या सुट्टीत त्यांनी पाच दिवसांच्या सायकल यात्रेचं आयोजन केलं आहे. वेगवेगळ्या वयाची बरीच मंडळी त्यांच्याबरोबर सायकलिंग करणार आहेत. या यात्रेत नदीत आंघोळ करणं, चुलीवर स्वयंपाक करणं, तंबूत राहणं अशी सगळीच मजा ते करणार आहेत.
विजयाताई एका सामाजिक संस्थेबरोबर काम करतात. त्या मूळच्या मराठवाडय़ातल्या. त्यांच्या घरची मोठी शेती आहे. कामाच्या निमित्ताने बहुतेक मंडळी वर्षभर शहरात राहतात. सुट्टी लागली की सगळी भाचे कंपनी त्यांच्या गावी जमतात. झाडांवर चढणं, कैऱ्या पाडणं, भरपूर आंबे खाणं, चिंचा खाणं अशी मजा लुटतात. दरवर्षी मोठी भावंड लहान भावंडांना पोहायला शिकवतात. झाडावर चढायला शिकवतात. आजीआजोबांबरोबर शेतातली कामही करतात.
आमची एक मैत्रीण डॉक्टर आहे. मुलं झाल्यानंतर तिनं काही वर्षांसाठी डॉक्टरी पेशाचं पूर्ण वेळाचं काम नाही केलं. लहान मुलांच्या गरजांकडे दुर्लक्ष करून किंवा कोणावर तरी त्यांची जबाबदारी सोपवून काम करणं तिला आवडणारं नव्हतं. त्यामुळे मुलांचे बाबा संध्याकाळी घरी आल्यानंतर मग ती संध्याकाळी दवाखाना उघडते. तिनं मुलांसाठी वेळ द्यायचं ठरवलंय. घरात टीव्ही घेतलाच नाही. मुलांना ग्राऊंडवर खेळायला नेणं, वेगवेगळ्या शिबिरांना नेणं, छान छान पुस्तक  वाचून दाखवणं, वाचनालयात नेणं, घरांतल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टी करू देणं, खेळणं हे करत असताना मुलांचं वाढणं बघण्यातली गंमत ती अनुभवते आहे. लोक म्हणतात, तुझ्या करिअरचं काय? ती म्हणते, माझ्या मुलाचं बालपण परत येणार नाही तेव्हा आता मी माझं आईपण एन्जॉय करते आहे! मुलांचे बाबाही सर्व गोष्टींमध्ये सहकार्य करतात. डॉक्टर असल्यामुळे मुलांच्या समतोल आहाराचं महत्त्व मला कळतं. बाजारातली कितीही महाग वस्तू घरी केलेल्या वस्तूूंची बरोबरी नाही करू शकत. माझा मुलगा सौरभ पाच वर्षांचा आहे. मी स्वयंपाक करते तेव्हा त्यालाही खूप गोष्टी माझ्याबरोबर करायच्या असतात. तो भाजी निवडतो, चिरतो, छोटय़ा छोटय़ा पोळ्या लाटतो. बाजारात खरेदीला माझ्याबरोबर येतो. तो माझ्याबरोबर छान चालतो. खूप प्रश्न विचारतो. सुट्टीच्या दिवशी खूप वेळ बाथरूममध्ये घालवतो. छोटे छोटे कपडे धुवायचा प्रयत्न करतो. हे सगळं करताना तोही खूप शिकतो आणि हे बघताना मलाही खूप मजा येते. आम्हा समवयस्क मुलांच्या पालकांचा एक गटही तयार झाला आहे. त्यामुळे एकमेकांच्या मुलांसाठीही खूप गोष्टी करता येतात. सर्वच पालकांना सर्व वेळी आपल्या मुलांना वेळ देता येत नाही. त्यामुळे त्यांनी ठरवलंय की आठवडय़ा-पंधरा दिवसांत दोन-तीन पालक आठ-दहा मुलांना एकत्र एखाद्या नाटकाला घेऊन जातील किंवा बागेत घेऊन जातील किंवा अजून काहीतरी एकत्र येऊन करतील. त्यामुळे उरलेल्या इतर पालकांनाही एखादा वार एकत्र कुठे जाता येतं. घरातली साठलेली कामं करणं सोपं जातं. एखाद्या कार्यक्रमालाही जाता येतं.
बघितलं ना! काही पालक तरी या गतिमान जीवनातही वेगवेगळे पर्याय शोधताहेत. मुलं आणि ते मिळून काही अर्थपूर्ण गोष्टी करण्यासाठी एकत्र बसताहेत आणि त्यातून मजाही अनुभवताहेत. मुलांसाठी हा ‘बालपणीचा काळ सुखाचा’ होईल असं बघतायत आणि पालकांसाठीही ते ‘प्रौढत्ये निज शैशवास जपणे’.. करू पाहतायत.
आपणही आपला गट, परिसर, मित्र-मैत्रिणी यांच्याशी बोलून या बदललेल्या जीवनशैलीत काय काय करता येईल याची चर्चा करूयात. तशा योजना बनवूयात. कमी वेळातही सहज करता येण्यासारख्या गोष्टी आहेत त्या आपल्या मुलांबरोबर करूयात! इतरांनाही सांगूयात! तुम्ही करणार असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आम्हालाही जरूर कळवा.
कवीवर्य मंगेश पाडगांवकर म्हणतात-
हासती मुले जिथे देश तो महान,
नाचती मुले जिथे देश तो महान