निर्णयाची झळ Print

altशनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘‘मसाबा शाळेत असतानाही, तिला खवचटपणे विचारणारे कमी नव्हते. तुझ्या आईचे केस सरळ तुझे केस असे का? अशासारख्या प्रश्नांकडे  आणि सगळ्याच कुचेष्टांकडे तिने दुर्लक्ष केलं, पण मला, आईच्या हृदयाला ते कायमच जाणवलं. तिचं मन सतत दुखरं व्हायचं. त्या अजाण वयात काय-काय टक्केटोणपे सहन केले असतील हे जाणवून मी आजही खूप दु:खी होते.. माझ्या निर्णयाची झळ तिने सहन केलीय..’’ सांगतेय नीना गुप्ता.
माझं पालनपोषण तसं भारतीय पारंपरिक पद्धतीने झालं, पण शिक्षणासाठी मला माझ्या बाबुजींनी सनावर येथील लॉरेंस स्कूलमध्ये पाठवलं. तिथल्या श्रीमंत-गर्भश्रीमंत मुलांमुळे हळूहळू माझी विचारसरणीही थोडीशी आधुनिक म्हणावी अशी होत गेली. मला बऱ्याचदा असं वाटतं, आपल्या बालपणी जे संस्कार, जी मूल्यं आपल्यावर घडवली जातात त्यानेच आपण घडत जातो. माझ्या दुर्दैवाने माझी आई लवकर गेली, पण वडिलांनी मात्र शिक्षण आणि संस्कार देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण अनेकदा आयुष्य तुम्हाला हवं तसंच मिळतं असं नाही. करिअर घडविण्याच्या नादात म्हणा किंवा योग्य जोडीदार न मिळाल्याने म्हणा पण माझं योग्य वेळी लग्न झालं नाही. ही वस्तुस्थिती आहे ज्याचा मला आज खेद वाटतो. कारण, माझा हा महत्त्वाचा निर्णय चुकल्याने माझी लाडकी लेक मसाबा हिला मी आई-वडिलांचे असं प्रेमळ- ऊबदार घरटं देऊ शकले नाही. मुलांच्या जडणघडणीत मूलभूत गरज असते ती त्यांच्या आई आणि वडिलांच्या संरक्षक प्रेमाची, त्यांच्या आश्वासक हातांची, संस्कारांची. माझ्या वेळेवर लग्न न करण्याच्या चुकीच्या निर्णयाची झळ माझ्या मुलीला बसली.
आयुष्याच्या एका वळणावर माझी भेट क्रिकेटपटू व्हिव्हिअन रिचर्डस याच्याशी झाली. आमच्या प्रेमातून मसाबाचा जन्म झाला. तिला जन्म देण्याचा माझा निर्णय प्रचंड वादळी, धाडसी होता कारण माझं व्हिव्हिअनशी लग्न झालं नव्हतं,  तो विवाहित होता, मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याने घ्यावी असंही काही ठरलं नव्हतं. किंबहुना प्राप्त परिस्थितीत मी अपत्याला जन्म देणं अतिशय धोक्याचं होतं. यामुळे माझं पुढचं जीवन होरपळून टाकणारं ठरेल, याची कल्पना मला नव्हती अशातलाही काही भाग नव्हता, पण तरीही मी पुढे पाऊल टाकलं, मातृत्व स्वीकारलं.. त्याचा उजळ माथ्याने स्वीकार केला.
मसाबा जशी मोठी होत गेली, तिला शाळेत जेव्हा मी दाखल केलं, तेव्हा तिच्या पित्याचं नाव काय असं विचारण्यात आलं तेव्हा माझे धाबे दणाणले. तो पर्यंत तरी तशी अडचण आली नव्हती. तिच्या पित्याचं नाव मी शाळेत सांगितलं पुढे तिनेही मला अनेकदा विचारलं, माझे वडील कुठे असतात, ते आपल्यासोबत का राहत नाहीत, तिच्या बालसुलभ प्रश्नांना तेव्हा उत्तरं देता-देता माझी पुरेवाट होत होती, पण तसेच दिवस जात होते.
मला एकूणच भावनिक- कौटुंबिक- मानसिक स्थैर्य दिलं ते माझ्या वडिलांनी. आज माझे बाबुजी ८५ वर्षांचे आहेत. तरीही मसाबाचा आणि माझा भरभक्कम आधारस्तंभ आहेत. त्यांच्याशी सल्लामसलत केल्याखेरीज आम्हा दोघींचं पान हलत नाही. जेव्हा मी लग्न न करता मातृत्व स्वीकारतेय हे त्यांना कळलं तेव्हाही ते शांत राहिले. पण त्यांनी मला पूर्ण विचाराअंती निर्णय मात्र घे, असं आवर्जून सांगितलं. मसाबाच्या जन्मानंतर मात्र मी स्वत: करिअरमधून बॅक सीट घेतली. तिच्यावर लक्ष दिलं, पण मुंबईत जेव्हा शूटिंग असेल तेव्हा तिची पूर्ण जबाबदारी माझ्या वृद्ध वडिलांनी घेतली. मसाबाचे ते आजोबा-नाना-दादू- दादी एकाच रूपात आहेत. मसाबाला त्यांनी सांभाळलं नसतं तर मला काम करणं शक्यच नव्हतं. आर्थिक बाजू बेतास बात होती. त्याचा तेवढा प्रश्न नव्हता कधी, पण जगातल्या प्रत्येक मुलाला त्यांच्या सुरुवातीच्या वयात आई-वडील दोघांची नितांत आवश्यकता असते हे मी नाकारून चालणार नव्हतं.
मी सिंगल पेरेण्ट असल्यामुळे खरोखरीच आयुष्यात मला अनेकदा विस्कटायलाही झालं. विशेषत: मसाबाच्या करिअरचा जेव्हा घोळ चाललेला होता. चांगल्या गुणांनी ती एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण झाली, आता पुढे काय? तिच्या करिअरची विशिष्ट दिशा तिला उमजत नव्हती. तेव्हा मला वाटायचं, तिचे वडील जर तिच्यासोबत असते तर त्यांनी तिला नक्की मार्गदर्शन केलं असतं. मसाबा उत्कृष्ट टेबल टेनिस खेळायची, तिने मला विचारलं, टेनिसमध्ये मी करिअर करावं का? त्यातही मी तिला फारसं सुयोग्य मार्गदर्शन करू शकले नाही. कदाचित तो माझा प्रांत नाही, म्हणूनही असेल. नंतर तिने म्युझिकमध्ये खूप इंटरेस्ट दाखवला. तिच्या इच्छेखातर मी तिला लंडनला ट्रिनिटी स्कूलमध्येही पाठवलं, पण का कोण जाणे अवघ्या तीन महिन्यांत मसाबा भयानक कंटाळली. भारतात तडकाफडकी परत येण्याचा तिने निर्णय घेतला, तेव्हा तिच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. त्या काळातल्या त्या कटू आठवणी आजही अंगावर शहारे आणतात.
मसाबा भारतात परतल्यानंतर तर अतिशय वैफल्यग्रस्त झाली. मी काय करू गं? म्हणत रडत राहायची. ती शाळेत असतानाही, तिला खवचटपणे विचारणारे कमी नव्हते. तुझ्या आईचे केस सरळ तुझे केस असे का? अशासारखे प्रश्न विचारुन तू कुणी तरी वेगळी आहेस हे दाखविण्याचा नेहमीच प्रयत्न झाला पण तिने सगळ्याच कुचेष्टांकडे दुर्लक्ष केलं, पण मला आईच्या हृदयाला ते कायमचं जाणवलं. तिचं मन सतत दुखरं व्हायचं. त्या अजाण वयात काय-काय टक्केटोणपे सहन केले असतील हे जाणवून मी आजही खूप दु:खी होते..
एक दिवस मसाबा तिच्या मैत्रिणींबरोबर एसएनडीटी कॉलेजमध्ये गेली आणि तिनेही स्वत:साठी फॅशन डिझायनिंग विषय निवडला. तशी रंगांची, कपडय़ांची जाणकार होती, पण तिला फॅशन डिझायनिंग करिअर म्हणून कधी करता येईल, असा विचार माझ्या मनातही कधी आला नव्हता. आज मसाबाने फॅशन डिझायनिंगमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लोकांमध्ये तिचं नाव आहे. अनेक ठिकाणी तिचे फॅशन शोज झालेत. तिला अनेक पुरस्कार मिळालेत. मात्र आज तिच्या फॅशन शोजना तिचा पिता व्हिव्हिअन रिचर्डस् येतो, तेव्हा तिला त्याचा खूप आनंद होतो.
गेल्या काही वर्षांपूर्वी मी दिल्लीचे उद्योगपती विवेक मेहरा यांच्याशी विवाहबद्ध झाले. मसाबाने विवेकचा पिता म्हणून स्वीकार केलाय आणि विवेकचं संयुक्त कुटुंबदेखील तिला आवडायला लागलंय. (कौटुंबिक आयुष्य ज्याला ती बालपणी पारखी झाली होती..) मी लग्नानंतर मुंबई-दिल्ली येऊन-जाऊन असते, तिला वेळ मिळतो तेव्हा ती दिल्लीत येते. एकूणच आयुष्याच्या या वळणावर मला आणि मसाबाला मानसिक स्थैर्य मिळालंय. जेव्हा समाजातल्या बरोबरीच्यांचा संसार, कुटुंब असतं तेव्हा जीवनाच्या एका टप्प्यावर साथीदाराची गरज आहे हे प्रकर्षांने जाणवतं.
माझ्या बाबतीत ‘देर आए दुरुस्त आए,’ असं म्हणेन मी, पण उशिरा लग्न केल्याने त्याची झळ मात्र माझ्या लेकीला बसली हे सत्य नाकारता येणार नाही. मसाबाने करिअरमध्ये स्थैर्य मिळाल्यावर योग्य साथीदार मिळताच लग्न करावं, असं मला मात्र प्रकर्षांनं वाटू लागलंय...