कायद्याशी मैत्री Print

altपूर्वी कमानी , शनिवार , १९ मे २०१२
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ

’ आम्ही आंतरजातीय रजिस्टर लग्न केले. लग्नानंतर मी नोकरी करत होते आणि एक वर्षांनंतर त्याला सरकारी नोकरी लागली. मुले मोठी झाल्यावर मी माझे करियर करावे असे दोघांच्या मते ठरले. मात्र आता मला उमगते आहे, मी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला. स्वत:चे सेव्हिंग केले नाही. तो मला सध्या वरखर्चालाही पैसे देत नाही. करियर करायलाही मानसिक त्रास देतो. वरचेवर मारहाण करतो. ज्या पुरुषाशी बोलेन त्याच्याशी माझे नाव जोडतो व मला बदनाम करतो. मलाही विभक्त व्हायचे आहे, असे म्हणतो. मात्र कृती करत नाही. मला संशोधन क्षेत्रात करियर करायचे असून त्यासाठी मन शांत हवे. अशा माणसाबरोबर राहून ते कसे साध्य होणार? तो म्हणतो, मी मानसिकदृष्टय़ा असंतुलित आहे. तो स्त्री-मुक्ती संघटना वगैरे संस्थांनी जोडलेला आहे, पण त्याचा सार्वजनिक चेहरा व कुटुंबातला चेहरा यात खूप फरक आहे. घरी तो हुकूमशहासारखा वागतो. तो बोलण्यात इतका चतुर आहे की, लोक त्याच्या बोलण्यावर भुलतात. मी खूप त्रस्त आहे. कृपया मला मार्गदर्शन करा.
-विद्या शिंदे,(नाव बदलून)
उत्तर- तुमच्या पत्रावरून हे स्पष्ट होते की, तुम्ही लग्नाच्या नातेसंबंधाचे ओझे वाहताय, पण त्याबरोबरच हिंसाचाराच्या बळीही ठरलेल्या आहात. त्यामुळे तुम्ही घटस्फोटासाठी अर्ज दाखल करा. तुम्ही कुठे काम करताय व किती मुले आहेत हे लिहिलेले नाही. मात्र मुले १८ वर्षांपेक्षा लहान असतील तर त्यांच्या देखभालीसाठी महिन्याला ठरावीक रकमेची मागणी तुम्ही नवऱ्याकडे करू शकता. म्हणूनच आधी तुम्ही कुटुंब न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांचा सल्ला घ्या व पुढे पाऊल टाका.

’ मी एका नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेत फ्लॅट घेतला. तो माझ्या व पत्नीच्या संयुक्त नावे घेतला. मात्र महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण सहकारी संस्था कायदा, १९६१ नुसार,
या व्यवहारात माझी दोन्ही मुले (प्रत्येकी ५० टक्के) नॉमिनी आहेत. ती दोन्ही मुले सज्ञान असून चांगल्या पगारावर कार्यरत आहेत. म्हणून माझा प्रश्न आहे, मी गेल्यावर फ्लॅटचा ताबा माझ्या पत्नीला मिळेल की मुलांना? फ्लॅटचा ताबा माझ्यानंतर माझ्या पत्नीकडे व त्यानंतर मुलांकडे जावा, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी कोणत्या बाबींची पूर्तता करण्याची गरज आहे?
-शंकरराव जाधव
उत्तर - जर तुमच्या पश्चात तुमच्या घराचा ताबा पत्नीकडे व त्यानंतर मुलांकडे जावा अशी इच्छा असेल तर ते स्पष्ट करणारे मृत्युपत्र तुम्ही तयार करा. तुमची पत्नी सेकंड होल्डर असल्याने तुमच्यानंतर घराच्या मालकी हक्काबाबत तिला नक्कीच काही अधिकार आहेत. मात्र घर विकत घेण्याच्या व्यवहारात तुमच्या पत्नीचा काहीही आर्थिक सहभाग नसेल व तुम्ही मृत्युपत्रही केले नसले तर गंभीर अडचणी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणूनच लवकरात लवकर तुम्ही मृत्युपत्र बनवून घ्या, त्याची नोंदणी करा. अर्थात मृत्युपत्र करणे हे बंधनकारक नाही, पण तुमच्या माघारी सर्व बाबी सुरळीत पार पाडाव्यात म्हणून ही खबरदारी घ्या.
तुमचे  कायदेविषयक  प्रश्न थोडक्यात पाठवा या पत्त्यावर - ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा.  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it