मन चिंती ते.. Print

altअलकनंदा पाध्ये , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपला एखादा दात ठणकत नाही तोपर्यंत त्याचे अस्तित्व आपल्याला कळत नाही. तसेच या बांगडय़ांचे झाले होते. कायम हातात असणाऱ्या बांगडय़ांपैकी एक गायब झाल्यावर हाताकडेच सारखे लक्ष जाऊ लागले. पण डोक्यात प्रश्नकल्लोळ चालूच. अशी कशी हातातील बांगडी जाईल?
सिंकमध्ये भांडी धुताना उजव्या हाताकडे माझे लक्ष गेले आणि एकदम दचकले. हातात चार ऐवजी तीनच सोन्याच्या बांगडय़ा दिसल्या. चौथी बांगडी गेली तरी कुठे? वाहत्या नळाखाली हात ठेवून विचारात गढले. भानावर आल्यावर भांडी धुतली आणि एकदम आठवले चार दिवसांपूर्वी एका साखरपुडय़ाला जाताना मोत्याचा सेट घातला होता. आल्यावर तो सेट काढून नेहमीचे सोन्याचे दागिने हाता-गळ्यात अडकवले. बहुधा चौथी बांगडी त्या सेटच्या डब्यात राहिली असेल म्हणून उत्सुकतेने कपाटातून तो डबा काढला. पार तळापर्यंत हात घातला, पण बांगडी काही सापडली नाही. डोळ्यासमोर आजचा सोन्याचा भाव चमकला. २८०० गुणिले १५ ग्रॅमचा हिशेब माझ्या गणिती डोक्याने पटकन केला. आता एक बांगडी गेली म्हणजे केवढे नुकसान? गेल्याच दिवाळीत आधीच्या बांगडय़ांत भर घालून ६० ग्रॅमच्या घसघशीत बांगडय़ा बनवल्या होत्या. इतक्या नुकसानाच्या कल्पनेने घशाला कोरड पडली. आपला एखादा दात ठणकत नाही तोपर्यंत त्याचे अस्तित्व आपल्याला कळत नाही. तसेच या बांगडय़ांचे झाले होते. कायम हातात असणाऱ्या बांगडय़ांपैकी एक गायब झाल्यावर हाताकडेच सारखे लक्ष जाऊ लागले. पण डोक्यात प्रश्नकल्लोळ चालूच. अशी कशी हातातील बांगडी जाईल? गळ्यातीन चेन किंवा कानातील डूल फासा सुटला किंवा फिरकी पडली म्हणून हरवू शकते. पण अख्खी बांगडी हातातून गळून पडायला माझी तब्येत खालावलेली खासच नव्हती. मग डोके शांत ठेवून मी गेल्या ४-५ दिवसांतील माझ्या दिनचर्येची सुसंगत जुळवाजुळव केली.
साखरपुडय़ाला गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेले होते. ऑफिसमधून निघाले.. अचानक मला एक दुवा सापडला. ऑफिस सुटल्यावर मी मैत्रिणीबरोबर स्टेशनकडे निघाले. ती बाहेरगावी जाणार म्हणून वाटेत काहीबाही खरेदी करीत होती. मीही त्यात तिला मदत करीत होते. लेटेस्ट फॅशनच्या रंगीबेरंगी, नकली बांगडय़ा विकणाऱ्या बहुधा एका वाघरी बाईकडे मैत्रीण बांगडय़ा घेत होती. मीही सहजच एक नाजूक बांगडय़ांचा सेट हातात घालून पाहू लागले. साइज मोठी वाटली. ते बघून विक्रेतीने त्यातलाच लहान साइजचा सेट मला घालायला दिला. मी त्या हातात अडकवल्या. उगीचंच हात हलवून वगैरे पाहिला. पण खास वाटल्या नाहीत म्हणून खेचूनच त्या हातातून काढल्या आणि तिच्या टोपलीत ठेवल्या. तोपर्यंत मैत्रिणीची खरेदी पूर्ण झाली होती. हा प्रसंग आता माझ्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उभा राहिला आणि माझी खात्री पटली की, त्या नकली बांगडय़ांबरोबर मी स्वत:चीही एक सोन्याची बांगडी त्या विक्रेतीला स्वत:च्या हाताने काढून दिली होती!
मला बांगडी कुठे व कशी गहाळ झाली याचा फक्त तपास लागला. पण त्याहून पुढचे प्रश्नचिन्ह मोठे होते. आता ‘त्या’ वाघरी बाईला कुठे व कसे शोधायचे? अक्षरश: फुटपाथवर छोटय़ा टोपलीत वस्तू विकायला बसणारी. हातावर पोट असणारी ती गरीब बाई होती. ती नेहमी तिथेच बसते का? तिचे नाव-गाव काय? कुठे राहते? मला तर तिचा चेहराही धड आठवत नव्हता. फक्त तिच्या हनुवटीवरचे आणि कपाळावरचे खूप सारे गोंदण तेव्हढे आठवत होते. घडय़ाळाकडे लक्ष जाताच ही शोधमोहीम उद्याच करावी लागणार याची जाणीव झाली. झोपावे म्हटले तर बांगडी प्रकरण झोपू देईना. त्याच विचारात असताना आणखी एक प्रश्नाचा किडा डोके पोखरू लागला. बांगडी ‘त्या’ बाईकडे गेली हे नक्की! आपण तिला गाठायचे हेही नक्की! पण इतका वेळ मी विचारच केला नाही की ‘ती’ बाई माझे म्हणणे मान्य करील का? ठासून सांगायला आपल्याकडे पुरावा काय? आज रस्त्यावर फुटकळ धंदा करणाऱ्या बाईला ४० हजारांचा ऐवज म्हणजे घबाडच मिळाले. तिचे कित्येक प्रश्न यातून सुटतील. कदाचित आपल्याला टाळण्यासाठी ती आता या अस्ताव्यस्त मुंबईत दुसरीकडे धंदा सुरू करील.
दिवसभर ऑफिसात काम करताना बांगडींचे विचार डोक्यात पिंगा घालत होते. ‘ती’ आजही तिथे बसेल का? आपल्याला ओळख दाखवील का? बऱ्याबोलाने कबूल झाली नाही तर काय करावं? पोलिसांना सांगावं का? आपण कधी पोलीस स्टेशनात पाऊलही टाकलेले नाही. ऑफिसातील कुणाला पोलिसांकडे येण्यासाठी विचारावे का? दिवसभराच्या विचारांनी डोके ठणकू लागले. ती मैत्रीणही चार दिवसांनी येणार होती. अखेर संध्याकाळी ऑफिसातून निघताना लेडीज रूममध्ये थंड पाण्याचे हबके तोंडावर मारले. शांतपणे मनाला समजावले. आपण नेहमी म्हणतो की, जगात बुडवणाऱ्यांपेक्षा वाचवणाऱ्यांची संख्या जास्त आहे म्हणून जगाचे रहाटगाडगे सुरळीत चालू आहे. आज त्या विधानाची सत्यता पडताळून पाहू. मान्य आहे ‘ती’ बाई गरीब आहे. पण म्हणून ‘ती’ लगेच मोहाला बळी पडणारी, अप्रामाणिकच असेल कशावरून? या न्यायाने जगातील सर्व श्रीमंत प्रामाणिक आणि गरीब अप्रामाणिक अशी व्याख्या होऊ शकेल का? कित्येकदा तर श्रीमंतच खोटेनाटे धंदे जास्त करतात हे आपण बघतोच की! शिवाय विचार करताना वाटलं गरिबीची व्याख्या काय? महिन्याला काही हजार कमावणारी मीसुद्धा धनाढय़ाच्या नजरेत गरीबच की! मग माझ्यावरसुद्धा हा अप्रामाणिकपणाचा शिक्का बसेल का? ठरले, कुठलेही धाकदपटशाचे आडमार्ग न पकडता तिच्याकडे जावे!
निघाले खरी, पण रस्ताभर ‘ती’ बांगडी परत देणार की नाही? या प्रश्नाचा भुंगा डोके पोखरत होता. माझी नजर लांबवर पोचली आणि होय! त्याच फुटपाथवर, त्याच जागेवर पुढय़ात टोपली घेऊन ‘तीच’ बसली होती. चला! निदान तिने तिथून गाशा तरी गुंडाळला नव्हता. अक्षरश: पळत मी तिच्यापर्यंत पोचले. एका गिऱ्हाईकाशी ती पैशाचा हिशेब करीत होती. मी तिच्यासमोर उगीचच पर्स सावरत घुटमळले. काही बांगडय़ा बघायचे निमित्त करून तिचे लक्ष्य वेधून घेतले. तिचीही नजर माझ्याकडे गेली आणि ‘ती’ माझ्याकडे रोखून, निरखून बघतेय असा निदान मला भास झाला. शब्दांची जुळवाजुळव करून तिला कोंडीत पकडून बांगडीची थेट मागणी करायची या विचारात मी असतानाच मला ‘सूं बेन? सूं जोइये?’ असा प्रश्न तिनेच केला. ‘मी गेल्या आठवडय़ात तुझ्याकडे आले होते- काही आठवतंय का?’ असे मी विचारल्यावर तिच्या चेहऱ्यावर ओळखीचे हसू आलेसे वाटले. ‘त्या उंच बॉबकटवाल्या बेनबरोबर तुम्हीच आला होता नं?’ असे विचारून तिनेच माझी विकेट घेतली. माझा उजवा हात हाती घेऊन हातातल्या तीन बांगडय़ांकडे पाहात माझ्या डोळ्यात रोखून म्हणाली, ‘‘तुम्हाला नक्की काय हवंय?’’ मी हतबुद्ध! बोलता बोलता तिने कमरेच्या बटव्यातून ‘ती’ चौथी बांगडी काढली व इतर बांगडय़ांना मॅच करून पाहिली, नव्हे स्वत:हून माझ्या हातात चढवली आणि हसत विचारले, ‘हीच हवी होती नं?’ तिची पुढची कहाणी ऐकताना मी फुटपाथवर चक्क कशी बसले कळलेच नाही. त्या दिवशी आम्ही दोघी तिच्यापुढून गेल्यावर काही वेळाने तिला ‘ही’ बांगडी दिसली. पण आम्ही दिसेनाशा झालो होतो. त्याच रात्री काविळीने आजारी असलेल्या तिच्या नवऱ्याला राजावाडी रुग्णालयात भरती केले. पण दुसऱ्याची ‘जोखीम’ ज्याची त्याला परत करण्यासाठी चार दिवस संध्याकाळच्या याच वेळात दोन-तीन तास इथे येऊन बसायची. होईल तो धंदा आणि एकीकडे माझा शोध घेत होती. कारण मी तिला शोधत येईन याची तिला खात्री होती. मला बघितल्यावर आज तिच्या डोक्यावरचा बोजा उतरणार म्हणून तिला मनापासून झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता आणि माझ्या चेहऱ्यावरचे सर्व रंग मात्र अपराधीपणाच्या जाणिवेने झाकोळून गेले असावेत. माझ्या घशातून शब्दांऐवजी फक्त हुंदकाच फुटतोय, नाकपुडय़ा अचानक सुरुसुरु करताहेत आणि तिचा चेहरा माझ्या डोळ्यातील अश्रूंमुळे खूप धुरकट दिसतोय. डोळे पुसून चष्मा चढवला. पर्स उघडून हाताला लागलेली नोट तिच्या मांडीवरच्या मुलीच्या हातात कोंबली आणि ‘तिच्या’ राठ हातावर काही न बोलता नुसतेच थोपटल्यासारखे करून, घशातून दुसरा हुंदका बाहेर पडायच्या आत मी तिरीमिरीने स्टेशनच्या दिशेने निघाले. माणसाच्या प्रामाणिकपणावर मी ठेवलेला विश्वास सार्थ ठरला होता आणि त्यातून मला खऱ्याखुऱ्या श्रीमंतीचे दर्शनही मिळाले होते.