एक तपश्चर्या स्वच्छतेसाठी Print

altमेघा वैद्य , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्वच्छतेसाठी लढणाऱ्या नलिनीताई स्वच्छता ही कलाच असल्याचं मानतात. जगात कोणतीही गोष्ट टाकाऊ नसल्याच्या ठाम विश्वासावर त्यांची निर्मल ग्राम संस्था  गेल्या ३७ वर्षांपासून कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी झटते आहे. सफाईसाठीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचं मोलाचं कामही नलिनीताई निष्ठेने करत आहेत. सफाईचे संस्कार रुजवण्यासाठी क्षणोक्षणी झटतायत. जगातले प्रगत देश आणि भारत यांच्यातल्या मोठय़ा फरकांवर चर्चा करायची झाली तर सर्वांत आधी ‘भारतातील अस्वच्छतेचा’ मुद्दा येतो. खास करून विदेशी लोक आणि परदेश वाऱ्या करणाऱ्या भारतीयांमध्ये यावर जोरदार चर्चा होताना दिसते. जगभरात भारताची वेगवेगळ्या कारणांमुळे जी प्रतिमा बनताना दिसते. यात अस्वच्छतेमुळे बनलेली ‘डर्टी’ इमेज आजही कायम आहे. मात्र हीच प्रतिमा बदलण्यासाठी नाशिकच्या नलिनी नावरेकर ‘निर्मल ग्राम निर्माण केंद्र’च्या माध्यमातून काम करत आहेत.
नलिनीताई मूळच्या नाशिकच्या. वडील स्व. भाऊ नावरेकर यांनी १९८५ मध्ये निर्मल ग्राम निर्माण केंद्राची स्थापना केली. ‘सफाई म्हणजे सर्व टाकाऊ वस्तूंचे वैज्ञानिक व्यवस्थापन’ ही संकल्पना सर्वत्र रुजविणे हे ध्येय घेऊन केंद्राचं कामकाज सुरू झालं. लहानपणापासून वडिलांची देशभक्ती आणि सफाईचे संस्कार नलिनीताईंवरही झाले. त्यामुळे जीवनात वडिलांचं सफाईचं व्रत पुढे नेण्याचं त्यांनी ठरवून टाकलं. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी चित्रकलेच्या जी. डी. आर्टचं शिक्षण घेतलं. मात्र कलेच्या क्षेत्रात पुढे जाताना त्यांनी मार्ग निवडला तो स्वच्छतेचा. त्यामुळेच स्वच्छता हीसुद्धा एक कला असल्याचं त्या सांगतात आणि निर्मल ग्रामला भेट दिल्यानंतर त्याच्या कामातून याची प्रचीतीसुद्धा अगदी सहज येते. कचरा म्हणून टाकलेल्या कागदापासून वस्तू बनवणं, कापडापासून टिकाऊ वस्तू करणं, सोबतच स्वच्छतेसाठीच्या प्रकल्पांमध्ये त्यांनी कलेची सांगड स्वच्छतेशी घातलेली आहे.
स्वच्छतेविषयी बोलताना नलिनीताई सांगतात की, स्वच्छता म्हटली की माझं घर स्वच्छ झालं म्हणजे सफाई झाली असं आपण म्हणतो. घरातला कचरा असो किंवा गावाचा कचरा हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ढकलला जातो. मात्र कचऱ्याचा पुन:वापर केला जात नाही, उलट कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळणं, पाण्यात टाकणं असे मार्ग अवलंबिले जातात. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. यापेक्षा कचऱ्याचं व्यवस्थापन केलं तर चांगला उपयोग शक्य आहे. म्हणजेच कचरा टाकून न देता त्यापासून संपत्ती निर्माण होऊ शकते. कचरा कांचन बनतो असं त्या सांगतात, सोबतच कुठेच घाण राहत नाही, संपूर्ण स्वच्छता सहजरीत्या करता येते, म्हणूनच कचऱ्याकडे संपत्ती म्हणून पाहायला हवं असं त्यांना वाटतं.
‘सफाई’चं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी ‘५ प्र’ची मदत घेतली आहे. अर्थात प्रशिक्षण, प्रयोग, प्रचार, प्रसार आणि प्रकल्प यांच्या माध्यमातून नलिनीताईंचं काम सुरू आहे. यात निर्मल ग्राम केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार सफाई प्रशिक्षण दिलं जातं. सफाईच्या विविध पैलूंवर शास्त्रशुद्ध व तंत्रशुद्ध प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, प्रदूषण मुक्त व खत देणारी शौचालये, घन कचऱ्यापासून खत बनविण्याच्या पद्धती, सांडपाण्याच्या पुन:उपयोगाच्या पद्धती आदीच्या उभारणीसाठीचं मार्गदर्शन केलं जातं. स्वच्छतेसाठी सरकारच्या माध्यमातून काम करणारा अधिकारी वर्ग, ग्रामसेवक, स्वच्छता अधिकारी, बीडीओ, संडास बांधणारे गवंडी, अंगणवाडी शिक्षक, लहान मुलं, इंजिनीअर्स असे सर्व स्तरांतल्या लोकांना सफाईसाठी प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यासाठी निवासी शिबिरं घेतली जातात. सोबत केंद्रात सफाईसाठीचे वेगवेगळे प्रयोग केले जातात. यात गरजेनुसार संडास बांधणी, सांडपाणी कचरा व्यवस्थापन आदी विषयांवर प्रयोग असतात. तर प्रचार आणि प्रसारासाठी केंद्रावर शौचालय, मुतारी, शोषखड्डा, बायोगॅस प्लॉटस्, कंपोस्ट खड्डे इत्यादी सर्व सफाई सुविधांचे पूर्णाकृती मॉडेल्स उभारण्यात आले आहेत. कचरा व्यवस्थापनाच्या आदर्श पद्धतीचा प्रात्यक्षिक विभाग आहे. सांडपाणी व्यवस्थापनाच्या विविध पद्धतीचे मॉडल्स टाकाऊ वाटणाऱ्या, कागद, कापड आणि तत्सम वस्तूंपासून बनविलेल्या आकर्षक वस्तू इथे मांडून ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रचारासाठी साहित्यनिर्मितीसुद्धा करण्यात आली आहे.
या अंतर्गत पाच पुस्तक प्रकाशित करण्यात आली आहेत. ‘सफाई माहिती संच’ यात सामान्य नागरिक सफाईतंत्र स्वत: सोप्या पद्धतीने करू शकतो याची माहिती सात वेगवेगळ्या संचातून दिलेली आहे. कमी पैशांमध्ये टिकाऊ संडास व निरनिराळ्या पद्धतीने बांधता येऊ शकतो. यासाठी ‘सोपा संडास असा बांध’ हे पुस्तक आहे. तर बच्चेकंपनीमध्ये सफाईविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘सफाई गीते’ आणि ‘सफाई सापशिडी’ अशी दोन पुस्तके आहेत. ‘सेवारत’ नावाचे स्व. भाऊ नावरेकर यांचे चरित्रसुद्धा आहे. प्रकल्पांतर्गत केंद्राकडून वेगवेगळ्या स्वरूपाचे ग्रामीण आणि शहरी भागासाठी प्रकल्प राबविले जातात. हे प्रकल्प अनेकदा गरज लक्षात घेऊन हाती घेतले जातात. सफाईसाठी मागणीनुसार मार्गदर्शन केले जाते. शाळा, आश्रमशाळा आदी ठिकाणी विशेष प्रकल्प असतात. निर्माल्य संकलन प्रकल्प, सफाई संस्कार प्रकल्प, युनेस्को आणि सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण आणि प्रकल्प अहवाल केले जातात. सोबत हागणदारीमुक्त गाव या योजनेच्या अंमलबजावणीतही केंद्राचा मोठा सहभाग आहे.
सफाईचं महत्त्व लोकांना पटून देताना आलेल्या अनुभवांविषयी बोलताना ताई सांगतात की, मला अनेकदा लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकदा ठाणे महानगरपालिकेचे अभियंते तीन दिवसांच्या शिबिरासाठी आले होते. दुसऱ्या altदिवशी सकाळी तीन दिवसांच्या शिबिरासाठी आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून या प्रशिक्षणार्थीनी खराटे मागितले आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला. तसंच यापुढे स्वच्छतेचा हाच मंत्र आम्ही महापालिकेतसुद्धा अमलात आणू असं स्वत: सांगितलं. यावेळी खरंच प्रशिक्षण यशस्वी झाल्याचा आनंद मला झाला, असं नलिनीताई सांगतात. त्यावेळी बच्चे कंपनीचा ग्रामीण भागात सफाई संस्कार प्रकल्प सुरू होता. त्यांना चराचे संडास बांधून त्याचा वापर करायला सांगितला होता. पाहणीसाठी गेल्यानंतर त्या मुलांनी सूचनेप्रमाणे वापर सुरू केला होता. त्यावेळी बच्चेकंपनीचं कौतुक वाटलं, असं त्या समाधानाने सांगतात. असाच एक अनुभव हागणदारीमुक्त गावाची पाहणी करताना आला. त्या आदिवासी वस्तीमध्ये शौचालय अगदी शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेले होते. ते पाहून ताईंनी विचारलं की, कुठे शिकलात हे बांधकाम, तेव्हा आपल्याच प्रशिक्षण वर्गात मी हे शिकल्याच त्या गवंडीने सांगितलं. त्यावेळी माझं काम लोकांपर्यंत पोहोचत आहे असं पाहून आनंद झाला.
दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेल्या प्लास्टिक कचऱ्याविषयी बोलतांना नलिनीताई म्हणतात की, अनेकदा याबाबत दुकानदारांसोबत चर्चा झाली. दुकानदार जर प्लास्टिकची पिशवी देणार नसेल तर ग्राहक परत जातानासुद्धा आम्ही  पाहिलंय. रस्त्यातून जाताना, कॉलनीतून ये-जा करताना प्लास्टिकच्या पिशव्या पाहून अनेकांना परिसर अस्वच्छ असल्याच दु:ख होतं. मात्र दुकानदाराकडून वस्तू विकत घेतांना कॅरी बॅग मागताना जोपर्यंत लोकांना लाज वाटणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही, असं त्या सांगतात.
सफाईच्या बाबतीत भारतीयांच्या उदासीनतेमागे त्यांची मानसिकता आहे. लोकांना सामाजिक जाण नाही. कृती करण्याची वेळ आली की लोक मागे हटतात, हे चुकीचं आहे. स्वच्छतेमुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक फायदासुद्धा होतो. हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे, असं त्यांना वाटतं. भारतात स्वच्छतेचं राज्य निर्माण करण्यासाठी लोकांच्या मानसिकतेवर काम करणे आवश्यक आहे. सफाईचे संस्कार दिले पाहिजेत. विदेशात स्वच्छता आहे, कारण लोक स्वच्छता पाळतात हे लक्षात घेणं गरजेचे आहे, असं त्यांना वाटतं. सोबतच देशात सफाई स्वच्छतेसाठी कडक नियम असले पाहिजेत. नियम मोडल्यावर दंडसुद्धा हवा, त्याशिवाय लोकांची मानसिकता बदलणार नाही, असं त्याचं मत आहे.
केंद्राच सफाई जनजागृती काम करताना नलिनीताईंना कुटुंबीयांकडून मोलाची मदत होती. सारं कुटुंबं ताईंना मदत करतंय. त्यामुळे निर्मल ग्राम निर्माण केंद्र स्वबळावर उभं आहे. कुठलीही सरकारी मदत किंवा विदेशी अनुदानावर केंद्र चालत नाही, तर सफाई संस्कार भारतीयांना देण्याच्या ध्यास घेऊन केंद्राची वाटचाल सुरू आहे.
थोडक्यात स्वत:च्या घराच्या स्वच्छतेसाठी सफाईसाठी प्रत्येकजण खपत असतो. प्रत्येक गृहिणी घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देते, पण समाजात सफाईचा, स्वच्छतेचा मंत्र रुजावा यासाठी काम करणाऱ्या निर्मल ग्रामच्या नलिनीताईचा आदर्श सर्वांनी ठेवला तर हा देशही आदर्श व्हायला वेळ लागणार नाही!