पालकत्वाचे प्रयोग : शिवाजी जन्मावा जिजाऊ पोटी .. Print

altआई - बाबा तुमच्यासाठी
उषा गिंडे , शनिवार , १९ मे २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मराठी माध्यमातील मुले मागे राहतात हा समज खोटा आहे. कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे बाळकडू मुलांना द्यायला हवे. पाच वर्षांपर्यंत मुलांचे लाड, पुढे १० वर्षे जरूर पडल्यास मुलांना मारायलाही हरकत नाही. मात्र १६ वर्षे होताच मुलांशी मित्रांप्रमाणे वागावे. जेवण, खाणं, कपडेलत्ते यात लाड जरूर करावेत, पण अभ्यासात लाड करून कसे चालेल?  मात्र, आपली मुले आदर्श व्हावी असं वाटत असेल तर आपणही आदर्श होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शि वाजी जन्मावा लागतो, पण तो जिजाबाईच्या पोटी जन्म घेतो. जिने रामायण- महाभारत सांगून रामासारखे आदर्श राज्य करण्याचे नि कृष्णासारखे चतुर- मुत्सद्दी होण्याचे बाळकडू पाजले. सुजाण पालक होण्यासाठी सदैव दक्ष असण्याची गरज असते. आपली मुले आदर्श व्हावी असं वाटत असेल तर आपणही आदर्श होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मुले नेहमी मोठय़ांचं अनुकरण करतात.
वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षांपासून १५-१६ वर्षांपर्यंत मुलांची आकलनशक्ती चांगली असते. त्यांचे पाठांतर लवकर होते. माझ्या दोन्ही मुलांना खेळून आल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता रामरक्षा, श्लोक, सुभाषिते नि पाढे म्हणायला मी बसवत असे. ७ वर्षांची आरती नि ४ वर्षांचा ज्ञानेश दिवे लागणीला श्लोक म्हणायला बसत. आरती- पाढे म्हणायची तेव्हा ज्ञानेश स्कूटरवरून फेऱ्या मारीत असे. बालवर्गात असलेल्या ज्ञानेशला पाढे म्हणायची सक्ती नव्हती. एके दिवशी ज्ञानेश पाढे म्हणू लागला. आरतीला गप्प बसण्यासाठी मी खूण केली. ज्ञानेशने पाढे म्हटले. वर्गात शंभर पर्यंत अंक शिकवले नसताना सतरा दाहे सत्तरासेपर्यंत.
मला लिहिता वाचता येण्यापूर्वी रामरक्षा, गीतेचे अध्याय पाठ झाल्याचे स्मरते. भाऊसाहेब साठेंकडे सरदारगृहातील आम्ही मुली जात असू. आम्हा सर्वाचे श्लोक त्याकाळी पाठ झाले ते आजपर्यंत आम्हाला आठवतात. आमच्याबरोबर त्यावेळी भाऊसाहेब असत म्हणून मीसुद्धा हाच प्रयोग सुजाण पालक या नात्याने केला. तसेच नातवंडांबरोबर बिल्डिंगमधल्या मुलांना जमवूनही श्लोक शिकविले. संस्कृत पाठांतर स्पर्धेत मुलांनी बक्षिसंही पटकावली. सांगण्याचं कारण एवढंच की लहान मुलांची बुद्धी तीक्ष्ण असते. त्यांच्या कानावर वारंवार जे पडते ते त्यांच्या स्मरणात राहते म्हणून उत्तमोत्तम सुभाषिते, श्लोक, रामरक्षा, भगवद्गीता, कविता, पाढे त्यांच्यापाशी मोठय़ाने  म्हणायला हवेत किंवा मुलांच्या कानांवर पडेल याची व्यवस्था करायला हवी.
मी माझ्या दोन्ही मुलांना इंडियन एज्युकेशन मराठी माध्यमामध्ये घातलं. शाळा सकाळी ११ ते ५, जाता-येता स्कूल बस. आरतीचे तिसरीत माध्यम बदलूनसुद्धा अजिबात कठीण गेलं नाही. उलट घरात, शाळेत तीच भाषा म्हणून दोन्ही मुलं सुखावली. बाराखडय़ा, जोडाक्षरं येताच मुलांनी वाचनाचा सपाटा लावला. समजून-उमजून वाचत असल्याने वाचनाची गोडी वाढली. क्लिनिकल ट्रायल क्षेत्रात पायोनियर असलेला, त्या क्षेत्रात टॉपला असलेला माझा मुलगा ज्ञानेश ऊर्फ वासुदेव मला म्हणाला, ‘आई, तू मला मराठी माध्यमातून शिकवलेस हे फार चांगले झाले. ‘परीक्षेसाठी घोका नि पेपरात ओका’ ही सवय न लागता समजून अभ्यास करण्याची चांगली सवय मला लागली.  हे अर्थात डॉ. गिंडे उत्तमोत्तम वाचनीय पुस्तकं आणत नि वाचून मुलं फडशा पाडीत. आरतीने तर महाभारत नि शिवचरित्राची   कतीतरी पारायणं केली असतील. वाचनाचा, ज्ञानाचा आनंद मोठा असतो. मुलांना गोडी लागण्यासाठी सुजाण पालकांनी प्रयत्न करायला हवेत. मराठी माध्यमात शिकून आरती, ज्ञानेश कुठेही मागे पडले नाहीत. कामाच्या निमित्ताने किती तरी परदेशी फेऱ्या होतात. त्यांच्या क्षेत्रात वरिष्ट पदावर असल्यामुळे परदेशातील कंपन्या तुम्ही आम्हाला या क्षेत्रातील ज्ञान शिकवा म्हणून मानाने विमानाचे बिझनेस फेअर देऊन बोलावतात. मराठी माध्यमातील मुले मागे राहतात हा समज खोटा आहे. मात्र त्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे बाळकडू मुलांना द्यायला हवे.
विहीणबाई अमेरिकेला गेल्याने नातींच्या सोबतीला जाणं गरजेचं होतं. आई येईपर्यंत ५/६ वर्षांच्या वल्लरीला रिझविण्याची जबाबदारी माझी. तिला रोज कृष्णाच्या कथा रंगवून सांगत असे. तीसुद्धा भान हरपून ऐकत असे. आरती रात्री ९ वाजता आली. मला म्हणाली, ‘थांब आई, टी. व्ही. न पाहता कथा सांगण्यात दंग असलेली तू नि कथा ऐकण्यात रंगलेली वल्लरी तुमचा फोटोच काढते.’ मुलांना कथा ऐकायला खूप आवडतात. आपणच कमी पडतो आहोत. या कथांच्या माध्यमातून संस्कारही होत असतात.
एकदा  वल्लरीला शिरा आवडतो म्हणून घेऊन गेले, तर डबाच घेऊन खायला बसली. मी म्हटले ‘अगं, एकटय़ाने खाऊ नये, पल्लू ताईला हवं का विचार. बशी घे, हवा तेवढा खा. चिमुरडय़ा नातीला आला राग. ‘काय होतं एकटीने खाल्लं तर?’ ‘सुदाम्याला दारिद्र्य आलं तसं तुला आलं तर चालेल? कृष्णाला चणे न देता एकटय़ानेच सुदाम्याने खाल्ले आठवतं ना?’ ‘नंतर त्याला मिळालं की सगळं.’ ‘नंतर म्हणजे कधी? कृष्ण भेटल्यावर. कृष्ण सुदाम्याला भेटला. तुला भेटणार का?’ ‘आजी, मला रोज कृष्ण भेटतो.’ आजी चकीत होऊन म्हणाली, ‘कधी भेटतो गं.’ ‘स्वप्नात.’ निरुत्तर होण्याची पाळी माझ्यावर, पण तिला मी म्हणाले, ‘सुदाम्याला सत्यात कृष्ण भेटला नि अपार धन दिले. तुला स्वप्नात कृष्णाने धन दिले तर ते सत्यात कसे येणार?’ तेव्हा कुठे पटले नातीला. ध्यानी-मनी ते स्वप्नी. भान हरपून कथा ऐकण्याचा तो परिणाम होता. आरती वल्लरीला म्हणाली, ‘मला तरी दाखव कृष्ण.’ निरागस वल्लरी म्हणाली, ‘आज माझ्या स्वप्नात आला की त्याला सांगेन आईच्या स्वप्नात जा.
५०-६० वर्षांपूर्वी गाणं होतं ‘बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून, आज सकाळपासून’ पण आजच्या बहुतेक माता म्हणतात, बाळ जातो दूर देशा, गेले मन सुखावून, व्हिसा मिळाल्यापासून. आईचंही तेच ध्येय मुलगा परदेशी जातो कधी नि मला परदेशाची सहल घडते कधी? याचा परिणाम हिंदू कॉलनी दादर, पारशी कॉलनी दादर, पुण्यातील बऱ्याच सोसायटय़ांमधून वृद्ध एकाकी राहू लागले. ‘संध्याछाया भिवविती हृदया’ याचा अनुभव घेऊ लागले. ‘लागले नेत्र पैलतीरी, नाही मुले-मुली, कुणी नाही घरी’ अशी बऱ्याच वृद्धांची स्थिती आहे. ‘पैसा हेच सर्वकाही’ या बाळकडूचे हे दुष्परिणाम तर नव्हेत? आरती, ज्ञानेशला बऱ्याच अमेरिकन कंपन्यांनी मुह माँगा दाम देण्याची तयारी दर्शवून अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी अनेक प्रलोभने दाखवली गेली, पण त्यांना परदेशाची क्रेझ नसल्यामुळे दोघांनीही नकार दिला. आरती तर मला म्हणाली की, ‘अर्धा तास मला मस्का मारूनही मी नकार दिल्यामुळे त्यांना ही बाई वेडी असावी असेच वाटले असेल.’
सुजाण पालकांनी चंगळवादालाही आळा घालायला हवा. अन्यथा मुलांना पैशाची किंमत कळवी कशी? वसिष्ठ ऋषींबरोबर राम अनवाणी चालत गेला. कृष्णाने गुरूची सर्व प्रकारे सेवा केली. याला संस्कार म्हणतात.