प्रौढत्वे निज तारुण्यास जपणे.. Print

altडॉ. शुभा थत्ते ,     शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आज तरुण असणारे उद्या वृद्ध होणारच आहेत. काय आहे त्यासाठीचं नियोजन? सक्षम असलेल्या या वृद्धांनी आत्मसन्मानाने जगायला हवं.. त्यासाठी आपल्यातल्या कलागुणांचा त्यांनी वापर करायला हवा. नुकत्याच झालेल्या कुटुंब दिनानिमित्त खास लेख..
सं ख्याशास्त्राच्या आडाख्यांनुसार २०१५ च्या सुमारास भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ९ टक्के लोकसंख्या साठीच्या पुढच्या वृद्धांची असेल व ती दर दशकात वाढत जाईल. १९७० च्या उत्तरार्धात वैद्यकशास्त्रात एक नवी शाखा Geriatrics ही गरजेनुसार सुरू झाली व वयपरत्वे येणाऱ्या बऱ्याच वेगवेगळ्या रोगांचा अभ्यास सुरू झाला. पण समाजशास्त्र व मानसशास्त्र यामध्ये Gerontology या विषयाचा अंतर्भाव बऱ्याच नंतर झाला. वाढलेली आयुमर्यादा पाहता नवी वर्गवारी ६० ते ७० नववृद्ध, ७० ते ८० वृद्ध व त्यापुढील वृद्ध- वृद्ध. एक काळ असा होता की साठी शांत (षष्टय़ब्दीपूर्ती) होणे हीही मोठी दुरापास्त बाब होती. या वाढलेल्या वयोमर्यादेनुसार मिळालेल्या ‘बोनस’ आयुष्याची प्रतही चांगली ठेवणे आवश्यक आहे. या संदर्भात परवाचीच गोष्ट आठवली..
स्मिताचा फोन आला होता. तिच्या नवऱ्याची सिंगापूरला बदली झाल्यापासून ती सिंगापूरमध्ये होती त्यामुळे गेले वर्षभर आम्ही फक्त मेलवरच भेटत होतो. बोलण्याचे पहिले भरते ओसरल्यावर स्मिता सिंगापूरबद्दल सांगू लागली. ‘‘अगं शुभा, तिथे वृद्धांसाठी असलेल्या दोन-तीन प्रदर्शनाला मी भेट दिली आणि थक्कच झाले. तिथे ज्येष्ठ नागरिकांना ‘मॅच्युअर सिटिझन’ म्हणतात आणि गेली तीन/चार वर्षे त्यांना परत नोकऱ्यांची संधी देण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. मुलांनी वृद्धापकाळी आई-वडिलांचा सांभाळ करण्याचा प्रघात नाही व अतिशय महागाईमुळे ते शक्यही नाही. त्यामुळे त्यांचा आधीचा अनुभव, वय व प्रकृती या तिन्हींची सांगड घालून त्यांच्याजोगी नोकरी शोधली जाते. तिथे लागणाऱ्या जास्तीच्या कौशल्याचे शिक्षण दिले जाते. तरुण बॉस व हाताखालचे मॅच्युअर नागरिक यात तणाव निर्माण होऊ नये यासाठी खास वर्ग घेतले जातात. अशा प्रदर्शनांमध्ये कितीतरी वृद्ध मंडळी वॉकर, व्हीलचेअरवरून आली होती व त्यांना अतिशय सन्मानाची वागणूक दिली जात होती. तेथील निवृत्तीचे वयही ६०/६५ चे आहे, पण त्यानंतरही १०-१५ वर्षांचे धडधाकट आयुष्य असू शकते अशा वेळी जर पुढाकार घेऊन सरकार त्यांच्या ‘पुनर्वसनाचे’ प्रयत्न करत असेल तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे, हो ना!’’
मी ऐकतच राहिले व माझ्या डोळ्यांसमोर आमच्या कॉम्प्लेक्समधील देवळात बसणाऱ्या काकूमावशा आल्या. वैद्यबाई प्रवासी कंपनीच्या ऑफिसमध्ये बसून कॉम्प्युटरवर काम करताना दिसल्या व कामतकाका आपल्या नातीच्या शाळेत मुलांना बागकाम शिकवताना दिसते. स्मिता सांगतच होती, ‘‘अगं, सगळ्या नवीन तंत्रज्ञानाची त्यांना खूप सोप्या भाषेत ओळख करून दिली जाते.’’
मी मध्येच नाक खुपसले, ‘‘आमच्या गोवऱ्या गेल्या मसणात, आता हे शिकून काय करायचे? असं तिथे कसं म्हणतात ग?’’ मला थांबवत स्मिता म्हणाली, ‘‘अगं, सर्व मंडळी इतक्या खुशीत ते शिकत होती व त्यांना होमवर्कही देत होते.’’ मला तर हे सर्व लंकेत सोन्याच्या विटांसारखं वाटत होतं, पण त्यानंतर मलाही जाणवलं की, इथेही सरकारचा मदतीचा हात नसला तरी काही वयस्कर मंडळी नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊन आपला वृद्धापकाळ इतरांच्या मदतीसाठी चांगल्या रीतीने वापरतात. सुनीताचे सासरे इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून निवृत्त झाले व एक वर्षांतच त्यांनी गतिमंद मुलांच्या एका गटाला विद्युत उपकरणे दुरुस्त करायला शिकविणे सुरू केले. त्यांच्या प्रयत्नातून आज त्या मुलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. परवाच पुण्याच्या एका भगिनीचा फोन आला होता. त्या पन्नाशीच्याच आहेत, पण वृद्धांसंबंधातील कामाबद्दल विशेष जिव्हाळा असल्याने व ती पती-पत्नी घरात दोघेच असल्याने त्यांनी आपल्या घरी एका सत्तरीच्या जोडप्याला आधार दिला आहे व आपल्या घरात वृद्ध व्यक्ती ठेवून घेण्यास तयार असलेल्या लोकांची त्यांच्याकडे यादीही तयार होत आहे. खर्च सर्वानी वाटून घेतला की स्वार्थ व परमार्थ दोन्ही साध्य!
मी लिहीत असलेल्या एका कॉलमसाठी मला येणारी पत्रं आठवू लागली. बहुतेक पत्रातून हाच सूर होता, ‘‘मुलगा- सून विचारत नाहीत. आम्हाला काही मान नाही किंवा मुलं परदेशी आहेत, इथे या वयात आम्हाला मायेनं विचारणारं कोऽऽऽणी नाही.’’  एका बाजूला हे चित्र तर दुसऱ्या बाजूला साठे काका दिसत होते. ८१ वर्षांचे वय, मूलबाळ नाही. बायको पाच वर्षांपूर्वी जेमतेम आठवडय़ाच्या आजारात गेली. काका मात्र त्यांचे सकाळचे मित्रांबरोबर फिरणे, मग हास्यक्लब, घरी आल्यावर बाई पोळ्या करतात, पण रोज न कंटाळता भाजी, आमटी, कोशिंबीर असे साग्रसंगीत जेवण स्वत: बनवितात. फोनवर मित्रांशी, जुन्या सहकाऱ्यांशी गप्पा मारतात, संध्याकाळी फिरणे, कधी नाटक, सिनेमा तर कधी कोपऱ्यावर वडापाव खातानाही दिसतात. विचारल्यावर म्हणतात, ‘‘अगं, स्वयंपाक स्वत:च करतो म्हणजे वेळ चांगला जातो. घरात स्वच्छतेसाठी आपला हात फिरला तर चांगले असते. फार काय तर पूर्वीपेक्षा करायला वेळ लागतो, पण इथे कोणाला गडबड-घाई आहे? माझे हास्यक्लबमधील मित्र विचारतात, काका, तुम्ही एकटे आहात का? मी म्हणतो, अरे तुम्ही इतके सर्वजण आहात ना! आणि जाताना तर प्रत्येक जण एकटाच असतो.’’ त्यांचं तत्त्वज्ञान ऐकून मी थक्क झाले. कुठे हे काका आणि कुठे माणसात असून एकटी असणारी मला पत्र लिहिणारी मंडळी!
या वाढत्या आयुर्मानानुसार येणाऱ्या समस्या आहेत की, हे सर्व जगभरच्या वृद्धांची समस्या आहे, की ही प्रत्येकाची मानसिकता आहे? मी स्टॉकहोमच्या उपनगरातील एका वृद्धाश्रमात काही वर्षांपूर्वी गेले होते. तेथे एक ८२ वर्षांची वृद्धा तिच्या खोलीत बिछान्यावर होती. खोलीतील फ्रिज खाद्यपदार्थानी भरलेला होता, कारण सोशल वर्कर दर आठवडय़ाला येऊन तो भरत असे. पलंगाशेजारी व्हीलचेअर होती. मी तिच्याजवळ गेले. एकमेकींची भाषा येत नसल्याने आम्ही खाणाखुणांच्या भाषेत संभाषण सुरू केले. मी तिचा हात हातात घेतला. गालावरून हात फिरवला. तिचा मुलगा कॅनडात होता व मुलगी जर्मनीमध्ये. गेल्या दोन वर्षांत तिला कोणी भेटले नव्हते. दर वर्षी नाताळात फुले व कार्ड नियमित येत होते. तिच्या गालावरून अश्रू ओघळत होते व ती स्वीडिश भाषेत काही तरी सांगत होती. मी बरोबरच्या सोशल वर्करला विचारले. ती म्हणाली, ‘‘ती म्हणतेय की, दोन महिन्यांनंतर आज कोणीतरी तिला स्पर्श करत आहे!’’ साध्या स्पर्शासाठी भुकेल्या त्या आजीकडे पाहून मला माझ्या आजीची आठवण झाली. मांडीवर एक नातवंड खेळतंय, सून आलं घातलेला गरम चहाचा कप मायेनं पुढे करतेय. कॉलेजमध्ये असताना पारसी कॉलनीतील रस्त्यांवरून फिरताना बागेबाहेरील बाकावर एकमेकांचा हात हातात घेतलेली जख्ख म्हातारी पारशी वृद्ध माणसं दिसत व मनात विचार येई, यांना कोणी नाही का? आज ५० वर्षांनंतर ही इच्छा आहे की गरज आहे, हा प्रश्न मला प्रश्नांची उत्तरे लिहितानाही पडतो. आपण गरज आहे म्हटलं तर ती पुरी न करणाऱ्या माणसांबद्दल मनात अतीव राग येतो पण ‘असेल तर मला आवडेल’ असे म्हटले तर नसण्यासाठी कोणाला जबाबदार धरणार नाही, ‘त्यापासून माझे नेमके काय अडते आहे’ हे पाहिले तर पर्याय शोधू, मायेच्या माणसांची व्याख्या परत तपासून पाहू. पण तसे असण्याचाच अट्टहास धरला तर बदलणाऱ्या परिस्थितीला, जगाला निकोपपणे सामोरे कसे जाता येईल?
माझ्याकडे समुपदेशनासाठी येणाऱ्या अनेकांमध्ये आताशी एक नवीन वर्ग दिसू लागला आहे व ती आहेत ५०/५५ च्या पुढील जोडपी. आयुष्यभर इतरांचे अग्रक्रम जपणाऱ्या या बायका, ३०-३५ वर्षांचा संसार झालेला, मुले मार्गी लागलेली आणि आता एकमेकांचे तोंड बघू नये इतका एकमेकांबद्दल वाटणारा तिटकारा! ‘‘या माणसाने माझ्यावर आयुष्यभर अन्याय केला, मला गृहीत धरले, आता माझ्याजवळ सर्व काही आहे, कपाटभर साडय़ा आहेत, दाराशी गाडी (मुलाने उभी केलेली) आहे पण त्या वेळच्या माझ्या सर्व इच्छा-आकांक्षा, त्याचं काय?’’ भूतकाळातील भुते न गाडल्यामुळे वर्तमानकाळाचा विचका झालेला दिसतो. आज हातात असलेला आनंद दिसतच नाही, पण पूर्वी झालेला अन्याय मात्र ढळढळीतपणे डोळ्यासमोर असतो. आणि या सर्व उत्खननामळे हतबुद्ध झालेला नवरा सोबत आलेला असतो. बायकोने सांगितलेल्या घटना सर्व खऱ्या असतात, पण त्या वेळी त्या अन्याय या स्वरूपात दिसलेल्या नसतात (बायकोला तेव्हा दिसलेल्या असल्या तरी मुलांसाठी संसार मोडायचा नाही म्हणून मुकाटय़ाने सहन केलेल्या असतात). आज नवऱ्याने प्रेमाने केलेली गोष्टही पूर्वीच्या तपशिलाच्या तुलनेमुळे नाटकी, खोटी वाटते. त्या बाईचं दु:ख समजून येते, पण आजही स्वत:ला छळण्याचा अट्टहास समजत नाही.
वरील तक्रार करणाऱ्या वृद्धांप्रमाणे अकाली वृद्ध झालेली माणसेही भोवती दिसतात. ‘खूप वर्ष कष्ट केले आता नोकरी नको’ म्हणून लवकर स्वेच्छानिवृत्ती घेतलेली पण त्याबद्दल काही योजना नसलेली मंडळी असतात. आयुष्यभर नोकरीतील ताणतणाव, राजकारण, बढती याशिवाय दुसरा विचार न केल्याने स्वेच्छानिवृत्तीनंतर दोन-तीन वर्षे बरी जातात. कारण पर्यटन कंपन्यांसह पूर्वी राहिलेल्या सहली असतात, पण त्यानंतर काय? कुठलीच आवड वा छंद नसल्याने, टी.व्ही.पुढे लोळणे, तोंडात टाकायला कुपथ्य (जंक) खाणे, त्याचा प्रकृतीवर परिणाम व इतरांवर चिडचिड त्यामुळे घरात इतरांना त्यांचा सहवास नकोसा वाटू लागतो. मग ‘मी आता कमवत नाही म्हणून मला किंमत नाही’ हा अजून एक गंड व त्याच्या प्रतिक्रिया! न संपणारे दुष्टचक्र. त्यामुळे एका वयानंतर इतरांना त्रास न देता आपला आनंद आपण शोधणे हेच महत्त्वाचे ठरते. आपला वृद्धापकाळ स्वत:ला व इतरांनाही सुखकर व्हावा यासाठी खबरदारी घ्यायला हवी म्हणजे म्हातारी माणसे घरात नको असे इतरांना वाटणार नाही. काळाप्रमाणे होणारे बदल समजून त्याच्याशी जुळवून घ्यायला हवे. याचसाठी प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवर उत्तर शोधायला हवे, पण आम्हीही काही प्रयत्न हाती घेतले आहेत. ठाण्याची आमची आय.पी.एच. ही संस्था नवनवीन उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहेच. जून महिन्यात आम्ही नवा उपक्रम चालू करत आहोत. तो आहे आजच्या मांडलेल्या समस्येबाबत! या प्रकल्पाचे नाव आहे SAGE (Successful Aging) यशस्वी (समाधानी वृद्धापकाळ). साठ वर्षांच्या पुढील वृद्ध मंडळींच्या पाहणीचा अभ्यास. समाधानी वृद्ध कोणाला म्हणता येईल ज्यांची विचारशक्ती शाबूत आहे, बदलत्या जगाशी व परिस्थितीशी जमून घेत आहेत. सामाजिकता व संपर्क टिकवून आहेत व घालवलेल्या जीवनाबद्दल खंत नाही. अशा वृद्धत्वामागील घटक शोधून काढण्यासाठी ही पाहणी आहे. हा प्रकल्प पूर्णपणे नि:शुल्क आहे. ही सर्व माहिती गोळा करण्यासाठी एक विस्तृत फॉर्म बनवलेला आहे व प्रशिक्षित स्वयंसेवक घरोघरी जोडीने जाऊन हा फॉर्म मुलाखतीद्वारे भरून घेणार आहेत. सध्या हा प्रकल्प ठाण्यात सुरू करणार आहोत, पण महाराष्ट्रातील इतर शहरातील माहिती घेतल्याशिवाय त्याचे फलित शास्त्रीय होणार नाही. त्यामुळे ठाण्याबाहेरील इतर शहरांमधील ४० ते ५५ वयाच्या व्यक्तींना या प्रकल्पात स्वयंसेवक म्हणून काम करायचे असल्यास खालील ई-मेलवर माझ्याशी संपर्क साधू शकता.
प्रशिक्षणासाठी (हे विनामूल्य आहे) दोन दिवस ठाण्याला यावे लागेल व नंतर पुढील काम तुमच्या व भाग घेणाऱ्या व्यक्तींच्या सोयीने तुमच्या गावीच करायचे आहे. या प्रकल्पाची सविस्तर माहिती मी व माझे आय.पी.एच.मधील सहकारी वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये जाऊन भाषणाच्या स्वरूपात देत आहोत व भाग घेण्यास (फॉर्म भरण्याची संमती देणाऱ्या) इच्छुकांचे पत्ते व फोन नंबर गोळा करून स्वयंसेवकांना देणार. वरील मांडलेल्या अनेक समस्यांना मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला या प्रकल्पाचे फलित म्हणून मिळतील.
नुकताच जागतिक कुटुंब दिन (१५ मे) झाला, पण एक दिवस साजरा करून उपयोग नाही. आपल्यातल्या वृद्धांचा त्यांच्यातल्या कुशलतेचा वापर कसा करून घेता येईल आणि त्या वृद्धांनाही आत्मसन्मानाने जगता येईल, हे पाहणे म्हणजेच कुटुंब दिन साजरं करणं सार्थ होईल.