पितृसत्तेचा न्याय? Print

altप्रा. देवेंद्र इंगळे , शनिवार , १९ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सामाजिक पातळीवर किंवा जातबिरादरीमध्ये बेअब्रू होऊ नये म्हणून जेव्हा ‘ऑनर किलिंग’चे कृत्य घडते तेव्हा त्या हिंसक कृत्यात प्रत्यक्ष जे सहभागी असतात त्यांच्या बरोबरीनेच तितकीच क्रियाशील भूमिका बजावणारे काही बाह्य़ घटकही सहभागी असतात. ते बाह्य़ घटक म्हणजे समाज, जातबिरादरी व जातीव्यवस्था.  म्हणूनच मनीषाच्या हत्येत जितका सहभाग तिच्या कुटुंबीयांचा आहे तितकाच सहभाग सभोवतालचा समाज, जातबिरादरी आणि जातीव्यवस्थेचाही आहे. ऑनर किलिंगच्या नावाखाली अशा किती तरुणी बळी जाणार आहेत?
आणि किती काळ? धनगर जातीत जन्माला आलेली १९ वर्षांची मनीषा धनगर. १२ शिकलेली आणि पुढे शिकायची इच्छा बाळगून असलेली; पण तिची ही इच्छा आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. कारण तिचं अस्तित्वच संपवून टाकण्यात आलंय. तिची हत्या करण्यात आलीय. रेल्वे ट्रॅकवर टाकण्यात आलेला तिचा मृतदेह पोलिसांना सापडला खरा; पण कोणीच त्यावर दावा केला नाही. बेवारस स्थितीत तिचं दफन करण्यात आलं. महिन्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे सांगणारं पत्र पोलिसांना मिळालं. तिचा मृतदेह उकरून काढण्यात आला. पोलीस चौकशी झाली आणि एक धक्कादायक सत्य बाहेर पडलं. तिची हत्या तिच्याच वडिलांनी, काकांनी आणि आजीने केली होती. कारण होतं आपल्यापेक्षा वेगळ्या जातीतल्या, कुणबी मराठय़ाच्या मुलाशी लग्न करण्याच्या तिच्या निर्णयाचं..
जळगावपासून अवघ्या काही मैलांवर असणारं पाथरी गाव या एका घटनेने पार थरारून गेलं. गावातील एका कुटुंबातले लोक आपल्याच मुलींच्या जिवावर उठतात आणि त्याला नाव दिलं जातं ऑनर किलिंगचं. आपल्या जातीच्या प्रतिष्ठेपायी केल्या गेलेल्या एका हत्येचं समर्थन करणारं हे कुटुंब आता पोलीस कोठडीत आहे आणि प्रकरण न्यायालयाधीन.
या घटनेनंतर आम्ही काही कार्यकर्ते प्रत्यक्ष गावात काय परिस्थिती आहे ते पाहण्यासाठी पाथरीत पोहोचलो. गावात अनेकांसोबत चर्चा केली. त्यातून बरीच माहिती तर मिळालीच पण त्यातून लक्षात आली ती समाजाची मानसिकता. प्रसारमाध्यमातून मनीषाच्या हत्येस ‘ऑनर किलिंग’ म्हणून संबोधले जातेय ते गावात कुणालाच रुचले नव्हते. या प्रकरणी माध्यमात होत असलेल्या चर्चेविषयी गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. वस्तुस्थितीला धरून नाही असे त्यांचे मत होते. पण हेच गावकरी जेव्हा या ना त्या पद्धतीने मनीषाच्या हत्येचे समर्थन करू लागतात आणि धनगर कुटुंबीयांविषयी सहानुभूती बाळगून असतात तेव्हा मात्र या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच गडद बनते. पाथरीच्या सरपंचाने स्पष्टपणे सांगितलेच, ‘आमचं गाव धनगर कुटुंबीयांच्या पाठीशी आहे.’ पाथरी गावात ही स्थिती आहे तर दुसरीकडे जिल्ह्य़ाचे ठिकाण असणाऱ्या जळगाव शहरात या घटनेशी कुणालाच काही देणे घेणे नाही. सामाजिक संघटना, स्त्रियांच्या चळवळी आणि येथील प्रसारमाध्यमंही गप्प आहेत.  
खरे तर आजकाल, स्त्रियांवरील अत्याचार ही आपल्याकडे नित्याचीच बाब होऊन बसली आहे. इतकी की वाटावं आपली सामाजिक जाणीवच पार बोथट होऊन गेलीय की काय? स्त्री अत्याचाराच्या दररोजच्या या मालिकेतील आणखी एक बातमी असा दृष्टिकोन स्वीकारून मनीषाच्या हत्येकडेही पाहिलं जाणार का, हा खरा सवाल आहे. मनीषाची हत्या आणि पाथरी हे गाव निमित्त असले तरी ‘ऑनर किलिंग’ची समस्या आज एकूण देशाची समस्या बनली आहे. त्या समस्येच्या मुळाशी आहे जातीचा प्रश्न, जो आता अधिकच उग्र आणि जटिल बनत चाललेला दिसतो आहे. जातिव्यवस्थेने एकूणच इथली सामाजिक नीतिमत्ता, लोकशाही, आधुनिकता, सभ्यता व संस्कृतीस संशयास्पद बनविले आहे. अशा स्थितीत ‘ऑनर किलिंग’च्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचाराचा सुटय़ा पद्धतीने विचार करता येत नाही. ‘ऑनर किलिंग’ला संस्थात्मक आधार प्राप्त करून देण्याचे काम जातिव्यवस्था व पितृसत्ता करते. ही वस्तुस्थिती पुरेशा गांभीर्याने समजून घेण्याची आवश्यकता आहे. स्त्री अत्याचारांच्या केसेससंदर्भात नेहमीच असे अनुभवास येते की, स्वत:वर अत्याचार ओढवून घेण्यास स्वत: ती स्त्रीच कशी कारणीभूत ठरली ते येनकेनप्रकारेण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. तशा स्वरूपाच्या अनेक मिथ्यकथा प्रसृत केल्या जातात, रचल्या जातात. या मिथ्यकथा म्हणजे अस्सल पुरुषी दृष्टीचा प्रातिनिधिक स्वर असतो. मनीषाचे प्रकरणसुद्धा यास अपवाद नाही. मनीषावर स्वत:च्याच हत्येचे दोषारोपण करणाऱ्या अशा अनेक मनघडन कथा चर्चेत आहेत. आम्हालाही पाथरी भेटीदरम्यान ऐकावयास मिळालेल्या या अशाच काही मिथ्यकथा.
*          ‘मुलगी आपले ऐकत नाही’ या कारणाने वैयक्तिक अहंकार दुखावला गेल्याने पित्याने हत्या केली.
*     मनीषा संदीपवर पैसा खर्च करायची. त्यामुळे आर्थिक ओढग्रस्ततेपायी धनगर कुटुंबीयांनी मनीषाची हत्या केली.
*     मुलीचे मुलावर आणि मुलाचे मुलीवर खरोखरच प्रेम असते तर दोघांनी खंबीर निर्णय घेतला असता आणि हत्येची वेळच आली नसती.
*     मनीषा-संदीप यांच्यातील प्रेमाचे संबंध उघडकीस आल्याने मनीषाच्या नियोजित वराकडून नकार मिळाला व त्या वैफल्यापोटी युवराज धनगरने मुलीचा बळी घेतला.
*     मनीषाने आंतरजातीय विवाह केल्यास मोठय़ा मुलीचा संसार धोक्यात येईल या भीतीपोटी विचलित झालेल्या पिता युवराज धनगरने मनीषाची हत्या केली.
*     मनीषाचे चारित्र्यच तिच्या हत्येस कारणीभूत ठरले.
*     मुलीचे प्रेमप्रकरण कोणत्या बापाला आवडेल? मुलीचे अनैतिक संबंध कोणता बाप मान्य करील? असे उलट प्रश्न विचारून मनीषाने प्रेम करणे हाच तिचा गुन्हा होय, असे भासविण्याचा प्रयत्न केला गेला.
*     मनीषाची हत्या म्हणजे ‘ऑनर किलिंग’ नसून हा त्यांचा वैयक्तिक आणि कौटुंबिक मामला आहे. गावाचा किंवा समाजाचा या घटनेशी काहीही संबंध नाही.
पारंपरिक मानसिकतेतून प्रसवलेल्या या संकल्पना काय सुचवू पाहतात? त्यातून कोणते ‘राजकारण’ साधले जाते? एका सुशिक्षित आणि वयाने सज्ञान असणाऱ्या मुलीस ती ‘अवज्ञा’ करते आहे या दोषारोपाखाली देहदंडाची शिक्षा फर्मावली जाते हा कुठला कायदा आहे? कुठला न्याय आहे? एखाद्या मुलीने प्रियकरावर खर्च करणे हा देहदंडाची शिक्षा देण्याइतपत गंभीर गुन्हा असू शकतो काय? आर्थिक उधळपट्टी हाच जर मुद्दा असेल तर मुलीच्या हातात अनाठायी खर्च करण्याइतपत पैसा पडणार नाही याची दक्षता कुटुंबप्रमुख / पिता या नात्याने घेता येणे शक्य होते. अशा प्रकरणात जेव्हा प्रेमाच्या खरेपणाविषयीच शंका उपस्थित केली जाते तेव्हा दोघांचे नाते निव्वळ शारीरिक आकर्षणापुरते होते, असे भासविण्याचा प्रयत्न होतो किंवा नीती-अनीतीच्या चौकटीत बंदिस्त करून त्याकडे पाहिले जाते. हत्येचे छुपे समर्थन करण्यासाठी ‘प्रेमा’ला ‘अनैतिक’ ठरविण्याची चाल खेळली जाते. प्रेम करणे, स्वत:चा जोडीदार स्वत: निवडणे हा मुद्दा व्यक्तिस्वातंत्र्याचा आणि प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा असतो. मनीषा तितपत सज्ञान होती. लहान मुलीने आंतरजातीय विवाह केला तर मोठय़ा मुलीचा संसार धोक्यात येऊ शकतो हे कारण पुढे करून जर लहान मुलीची हत्या वैध ठरविली जाणार असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की, आजही आपल्याकडे आधुनिक सभ्य नागरी कायद्याचे नव्हे तर जातपंचायतीच्या - पारंपरिक दंडसंहितेच्या कायद्यानुसार चालणारे राज्य आहे. प्रेमाला अनैतिक आणि अस्वीकार्ह ठरवून स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचे राजकारण हा जातीव्यवस्थापक पितृसत्तेच्या संस्थात्मक शोषण शासनाच्या यंत्रणेचा एक भाग असतो. परिणामत: जातीबाह्य़ विवाहाचे धाडस हा देहदंड सुनावण्याइतपत गंभीर गुन्हा ठरतो. स्त्री अत्याचारांच्या बाबतीत नेहमीच अनुभवास येणारी बाब म्हणजे, अत्याचारित स्त्री किंवा तिच्या समीपच्या स्त्रियांच्या चारित्र्याभोवती संशयाचे धुके निर्माण केले जाते. अत्याचारित स्त्रीचे वर्तनच हिंसक रूप धारण करण्यास कारणीभूत ठरते, असे भासविण्याचा प्रयत्न केला जातो. अस्सल पुरुषी मानसिकतेचे द्योतक असणारे हे तंत्र अत्याचारित स्त्रीला गुन्ह्य़ाचे मूळ कारण ठरवून खऱ्या अत्याचाऱ्यांना निर्दोष ठरविते.
युवराज धनगरची ओळख सर्वतोमुखी अतिशय सालस, कष्टाळू, मनमिळाऊ व भला माणूस अशी असते तेव्हा त्याचा अर्थच हा असतो की, तो निर्दोष असून मुलगीच दोषी आहे. मनीषाची हत्या ‘ऑनर किलिंग’ नसल्याचे सांगून ती घटना खासगी किंवा कुटुंबापुरती सीमित बाब होय, असे दर्शविण्याचा प्रयत्न होतो. नियोजनबद्धरीत्या सार्वजनिक / सामाजिक सहभाग धूसर बनवून प्रकरणाचे गांभीर्य कमी करण्याचे राजकारण खेळले जाते. याच नव्हे तर अन्यही स्त्री अत्याचारांचा सुटय़ा सुटय़ा पद्धतीने विचार करून जातिव्यवस्था व पितृसत्तेचा बचाव करण्याचे राजकारण खेळले जाते. जोवर जातिव्यवस्था आणि पितृसत्ता आहे तोवर तिच्या अस्तित्वास आव्हान देणाऱ्या मनीषांचे बळी असेच क्रमाक्रमाने चढविले जाणार. जातिव्यवस्थेचे हे अंगभूत क्रौर्य कोणत्या सभ्य-सुसंस्कृत मानवी समाजास मान्य असू शकते? ‘ऑनर किलिंग’ म्हणजे समाजमान्य अशी संस्थात्मक हिंसा नव्हे काय?
मनीषा-संदीप यांचे प्रेम जुळून यायला अनुकूल पाश्र्वभूमी उपलब्ध होऊ शकली याचे कारण आहे संमिश्र वस्तीतला  दैनंदिन सहवास आणि शिक्षणाच्या निमित्ताने मिळालेली किमान मोकळीक. याचा अर्थ जातीव्यवस्थेच्या लक्षणांपैकी जातवार वस्त्यांचे पुसट होत चाललेले अस्तित्व आणि स्त्रियांवरील ज्ञानबंदी शिथिल होणे यात जातीव्यवस्थेच्या समर्थकांना आता फारसा धोका वाटत नाही. तथापि बेटीबंदीची अट अजूनही आत्यंतिक कठोरतेने पाळली जाते हेच मनीषाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले. पाथरी प्रकरणात दृष्टोत्पत्तीस येणारी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘ऑनर किलिंग’ला संस्थात्मक आधार प्राप्त करून देण्यात जातीव्यवस्थाक व पितृसत्तेची कळीची भूमिका असते, या वस्तुस्थितीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न सर्व बाजूंनी होतो आहे.
मनीषाची हत्या होण्याचे मुख्य कारण आहे तिने आंतरजातीय विवाहाच्या दिशेने पाऊल उचलणे. अशा प्रकारचा जातीबाह्य़ विवाह पारंपरिक धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार महापातक ठरतो आणि त्याकरिता एकच शिक्षा असते ती म्हणजे मृत्युदंड. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, ‘गटांतर्गत विवाहा’चा (ील्लॠिंे८) नियम हा जातीव्यवस्थेचा आत्मा असून, त्यावरच जातीव्यवस्थेची इमारत उभी आहे. गटांतर्गत विवाहाचा नियम जर तोडला तर जातीव्यवस्थेचे अस्तित्वच धोक्यात येते. तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून स्त्रियांवर अनेक प्रकारचे र्निबध लादण्यात आले. पितृसत्ताक कुटुंबव्यवस्थेने स्त्रियांच्या वाटय़ास दुय्यमत्व आणि पुरुषांच्या वाटय़ास वर्चस्वशाली भूमिका दिली. स्त्रियांच्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्याचा र्सवकष अधिकार पुरुषाच्या हाती केंद्रित करण्यात आला. जातीशुद्धी आणि योनिशुचितेच्या खुळचट कल्पनांनी स्त्रियांचे व्यक्तित्व इतके आकुंचित करून टाकले की, त्या निव्वळ ‘मादी’ बनून राहतील. प्रजोत्पत्तीद्वारा कुटुंबाचा वंशविस्तार आणि जातीव्यवस्थेचे पुनरुत्पादन ही कामे त्यांनी विनातक्रार पार पाडावीत त्यासाठी स्त्रियांवर अनेक प्रकारचे र्निबध लादण्यात आले. ज्ञानबंदी लादण्यात आली तसेच मालमत्तेचा वारसाहक्क नाकारण्यात आला. वारसाहक्कांचे वहन कायमस्वरूपी पैतृकपरंपरेने सुरळीत व्हावे म्हणून स्त्रियांना पुरुषांच्या मालकीची ‘वस्तू ’ बनविण्यात आले. अशा प्रकारे जातिव्यवस्था स्त्रियांना कमालीचे अमानुष वागणूक देते. हा आहे जातीव्यवस्था, स्त्रीदास्य आणि पितृसत्ता यांच्यातील अन्योन्य संबंध. जात आणि पितृसत्तेची ही इमारत स्त्रीदास्याच्या पायावरच टिकून आहे. जातीचे नियमन आणि दंडन करण्याचे काम पूर्वापार जातपंचायतींच्या मार्फत चालविले जाते. म्हणूनच, मनीषाने गटांतर्गत विवाहाचा नियम तोडून आंतरजातीय विवाहाच्या दिशेने जे पाऊल टाकले तर तो तिच्यासाठी जीवघेणा ‘अपराध’ ठरतो. या अपराधाची शिक्षा म्हणून तिला जातपितृसत्तेच्या दंडसंहितेनुसार देहदंड सुनावण्यात आला. जातपितृसत्तेचा कायदा स्त्रियांना धर्मशास्त्रांनी आखून दिलेल्या ‘स्त्रीधर्मा’च्या चौकटीत बंदिस्त करतो. जोपर्यंत ‘बाई’ निमूटपणे पायरी सांभाळून वागते आहे तोपर्यंत तिचे ‘आदर्शीकरण’ करण्यात येते, पण जेव्हा कुणी मनीषा ‘स्त्रीधर्मा’ची चौकट ओलांडते किंवा ‘पायरी’ सोडून वागते तेव्हा तिच्याकरिता देहदंडाची योजना करण्यात येते. जातीव्यवस्था गावगाडय़ाचे असेच असते. जोवर जातीव्यवस्थेचे नियम निमूटपणे मान खाली घालून पाळले जातात, जो तो आपापल्या ‘पायरी’ने वागतो तोवर परिस्थिती ‘आलबेल’ असते. सगळे ‘गुण्यागोविंदाने’ नांदतात. ‘सामंजस्य’ आणि ‘सौहार्दा’चे वातावरण असते, पण जेव्हा जातीव्यवस्थेचे नियम तोडण्याची बंडखोर कृती किंवा तशी भाषा बोलली जाते तेव्हा मात्र गावाच्या अन् जातीव्यवस्थेच्या दृष्टीने ‘धर्मसंकट’ उद्भवल्याजोगी परिस्थिती निर्माण होते. जातीव्यवस्था गावगाडय़ात बाह्य़त: दृष्टोत्पत्तीस येणारे ‘शांततामय’, ‘सौहार्दपूर्ण’, ‘सामंजस्या’चे आणि ‘गुण्यागोविंदा’चे जे वातावरण असते ते असे बेगडी असते. जेव्हा जातीव्यवस्थाक उच्चनीचतेस खालून आव्हान दिले जाते तेव्हा मात्र जातीव्यवस्था आपला हिंसक चेहरा समोर आणते जो तिचा खरा चेहरा असतो.
सामाजिक पातळीवर किंवा जातबिरादरीमध्ये बेअब्रू होऊ नये म्हणून जेव्हा ‘ऑनर किलिंग’चे कृत्य घडते तेव्हा त्या हिंसक कृत्यात प्रत्यक्ष जे सहभागी असतात. त्यांच्या बरोबरीनेच तितकीच क्रियाशील भूमिका बजावणारे काही बाह्य़घटकही सहभागी असतात. ते बाह्य़ घटक म्हणजे ‘समाज’, ‘जातबिरादरी’ व ‘जातिव्यवस्था’. या बाह्य़ घटकांकडून होणारी संभाव्य बेअब्रू किंवा अप्रतिष्ठाच त्या हत्येचे निमित्त असते. प्रत्यक्ष हिंसेत सहभागी असणारे जितके दोषी असतात तितकाच दोष हिंसेस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चिथावणी देणाऱ्या घटकांच्याही माथी असतो. म्हणूनच मनीषाच्या हत्येत जितका सहभाग तिच्या कुटुंबीयांचा आहे तितकाच सहभाग सभोवतालचा समाज, जातबिरादरी, आणि जातीव्यवस्थेचाही आहे. आजूबाजूच्या समाजाची निश्चलता आणि सामुदायिक मौन म्हणजे एका अर्थी सामूहिक संमतीच नव्हे काय? असला हा सामाजिक  गारठा यापुढेही अनेक मनीषांच्या हत्येस मुक्त परवाना दिल्याप्रमाणे कारणीभूत ठरणार नाही का? आधुनिक नागरी समाजाच्या दृष्टीने मनीषाची हत्या जितकी लांच्छनास्पद आहे तितकीच ही सामाजिक ‘तटस्थता’ लज्जास्पद आहे.
ऑनर किलिंग, सती, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी यांसारखे हिंसक क्रौर्यदेखील जातीव्यवस्थेचा अंगभूत भाग असते. भारतात जातीसमाज आहे म्हणूनच जातीबाह्य़ विवाहाच्या कारणावरून ‘ऑनर किलिंग’च्या घटना घडताहेत. जातीसमाज नष्ट होईल तेव्हाच ‘ऑनर किलिंग’च्या घटना थांबतील. जातपितृसत्ता अस्तित्वात आहे तोवर नीती-अनीती, चारित्र्य-चारित्र्यहीनता, योग्य-अयोग्य, समाजमान्य-अमान्य, धर्मसंमत- असंमत, चांगले-वाईट काय आहे ते जातीपितृसत्तेच्या मोजपट्टीनेच ठरविले जाणार आणि असे जोपर्यंत सुरू राहणार तोपर्यंत जातीव्यवस्थाक पितृसत्तेच्या संस्थात्मक क्रौर्याने मनीषासारखे आणखी कित्येक बळी घेतलेले असतील.
योनिशुचिता व जातीशुद्धीच्या भ्रामक कल्पनेतून आलेल्या आणि परिणामत: जातीदृढीकरणास साहाय्यक ठरणाऱ्या हिंसेस ‘ऑनर किलिंग’ संबोधणे म्हणजे हिंसेचे उफराटे उदात्तीकरण होय. जातीची ओळख हे कुणाच्या प्रतिष्ठेचे किंवा अप्रतिष्ठेचे कारण कसे काय असू शकते? जातीची ओळख मिरवणे म्हणजे स्वत:च्या गुलामगिरीच्या बेडय़ांनाच अलंकार आभूषणे म्हणून गौरविण्याचा प्रकार होय.
पाथरी प्रकरणी दिसून येणारे वैशिष्टय़ असे की, गावातील राजपूत कुटुंबात अपवादात्मक अशा आंतरजातीय प्रेमविवाहाचे उदाहरण समोर असतानाही धनगर जातीत ‘ऑनर किलिंग’ ची घटना घडली. वर्णजातव्यवस्थेच्या उतरंडीत राजपूत ही जात ‘क्षत्रिय’ मानली जाते तर धनगर आणि कुणबी या जाती ‘शूद्र’ (आजच्या शासकीय परिभाषेत ओ. बी. सीं.चा प्रवर्ग) वर्णव्यवस्थेनुसार तळातले स्थान आणि जन्मजात ‘शूद्र’त्वाचा कलंक असूनही ज्या जातींना त्यांचे जन्मजात ‘शूद्र’त्व अप्रतिष्ठेचे वाटत नाही त्या जाती कोणत्या भ्रामक प्रतिष्ठेसाठी ‘ऑनर किलिंग’ करताहेत? वर्णजातव्यवस्थेच्या उतरंडीत अगदी निम्नतम जातींनाही स्वजातगौरवाची भ्रांत जाणीव दिली जाते. परिणामत: निम्नजातींतसुद्धा उच्च जातींचे अंधानुकरण म्हणून जातीव्यवस्थेचे नियम अधिकाधिक काटेकोरपणे पाळले जातात, ज्यामुळे एकीकडे जात्योन्नती साधली जाते तर दुसरीकडे त्याच वेळी जातीचे आणि जातीव्यवस्थेचे दृढीकरणही होते. ‘जात’ जगण्याची सामाजिक पातळीवरची ही विवेकहीनता आणि तर्कदुष्टता तशीच टिकून राहील जोवर जात्यधिष्ठित शोषणशासनाच्या यंत्रणेविषयीचे ‘सामुदायिक अज्ञान’ दूर होत नाही.
मागील काही वर्षांत देशभरात ‘ऑनर किलिंग’च्या घटनांत संख्यात्मक वृद्धी लक्षात घेता येथे काही प्रश्न उपस्थित करावेसे वाटतात. जातीव्यवस्थेच्या अस्तित्वासह आपण स्वत:ला एक लोकशाही देश म्हणवून घेण्यास खरेच पात्र आहोत काय? स्वत:ला आधुनिक राष्ट्र म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार आपणास आहे काय? अवतीभोवती ‘ऑनर किलिंग’चे प्रकार घडत असताना आपण मख्खच असतो, याचा अर्थ आपली सामाजिक नीतिमत्ता कमालीची ढासळलीय, असा होत नाही काय? खोटय़ा प्रतिष्ठेखातर सुरू असलेले हे स्त्रीहत्यासत्र म्हणजे मानवी सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रगतीच्या कोणत्या टप्प्यावरचे लक्षण मानावे?
‘ऑनर किलिंग’च्या नावाखाली करण्यात येत असलेल्या हिंसेत प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत शिक्षा मिळू शकेल, पण हिंसेला संस्थात्मक आधार पुरविणाऱ्या जातीव्यवस्थेचे काय?  
(मनीषा धनगरप्रकरणी पाथरी येथे गेलेल्या पाहणी पथकात माझ्यासह वासंती दिघे, मंगला नगरकर, मंजुळा मुंदडा, अद्वैत दंडवते, शुभांगी पाटील, स्मीता वेद यांचा सहभाग होता.)