ईमेल प्रतिसाद : ‘आत्मकेंद्री नव्हे व्यवहारी तरुणी’ Print

altशनिवार, २६ मे २०१२
२८ एप्रिलच्या अंकातील कन्या सासुरासी जाए मागे परतोनी ‘न’ पाहे या उज्ज्वला रानडे यांच्या लेखाच्या निमित्ताने वाचकांनी भरभरून दिलेला प्रतिसादच या विषयाची पसंती दर्शवणारा होता. अनेक आयांनी थेट दूरध्वनीवरून ‘आमच्या मनातील विचार मांडलेत’ अशी पावती दिली तर काही कन्यकांनी ऑनलाइन आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. वाचकांच्या पत्रातून असा सूर प्रकर्षांने जाणवला की मुली आत्मकेंद्रीत, हिशेबी होण्यापेक्षा व्यवहारी झाल्या आहेत. आणि हा बदल काळानुरूप होत असल्याने स्वाभाविक आहे.

आजच्या मुली लग्नावेळी सजग, आर्थिकदृष्टय़ा सक्षम व विचारांनी ठाम असतात. त्यामुळे लग्न हा सोहळा त्यांच्यासाठी भावविवश होण्याचं निमित्त नसून भरभरून अनुभवण्याचा क्षण असतो.आजच्या मुली निरोपावेळी आसवं गाळत नसल्याचं चित्र सार्वत्रिक नसल्याचं मत २० टक्के वाचकांनी नोंदवलं. पण म्हणून त्यांना कोरडय़ा व मतलबी म्हणण्याचं कारण नसावं, असं वाचकांनी ठामपणे सांगितलं. मुळात परतोनी ‘न’ पाहे मध्ये त्यांची आत्मकेंद्री वृत्ती अधोरेखित करण्यापेक्षाही आजच्या मुलींची मानसिकता,त्यांची भावनिक गुंतवणूक यांचा धांडोळा घेण्याचा उद्देश होता. त्यासाठी लग्नाचे उदाहरण निवडलेले होते. मात्र जवळपास सर्वच वाचकांनी त्या एकाच मुद्दय़ाला केंद्रस्थानी ठेवून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आजच्या मुलींची व्यावहारिक वृत्ती अनेकींनी वाखाणली व तिच्या माहेरच्या ओढीबद्दल यत्किंचित ही शंका नसल्याचं प्रामाणिकपणे सांगितलं.अनेकींनी आजच्या मुलींबाबत आलेले कटू अनुभव निसंकोचपणे मांडले. पण मुलींच्या कृतीतला हा बदल अपरिहार्य आहेच पण तो भावनाशून्यतेचं प्रतीक कदापि समजला जाऊ  नये असे वाचकांनी नमूद केले. सारांश, सगळ्याच मुली पालकांना ‘धिंडका’ वाटत नसल्या तरी त्यांची बदललेली प्रतिमा पालकांना व समाजाला आत्मपरिक्षणाची संधी असल्याचेही अनेकांनी सुचवले. विशेष म्हणजे पुरूष वाचकांनी लेखाला दिलेला प्रतिसाद उल्लेखनीय होता.
संकलन : भारती भावसार

अश्रू ही फुटपट्टी नव्हे
डोळ्यांतले अश्रू हे मुलीचे आईवडिलांवरचे प्रेम, माया मोजणारी एकमेव फुटपट्टी न समजता माहेरच्या कुठच्याही अडीअडचणीला मदत करणारी, आईवडिलांच्या आजारपणाला धावून येणारी म्हणून आजही तिची तीच प्रतिमा कायम आहे. आईबाबांना प्रत्यक्ष भेटणं शक्य नसलं तरी ती मोबाईल, व्हिडीओ चॅट यांच्या मदतीने त्यांच्याशी वेळात वेळ काढून संवाद साधत असते. तिला माहेराबद्दल वाटणारा जिव्हाळा, प्रेम, आपुलकी या भावना ती मनापासून आणि कर्तव्यातून सतत व्यक्त करीत असते. मग भले त्या व्यक्त करण्याची प्रत्येकीची पद्धत वेगवेगळी असे का ना! म्हणून काळ बदलला तरी, सासरी जाताना येणारं हळवेपण, हुरहुर, ओढ या सगळ्या भावनांची आद्र्रता नक्कीच कमी झालेली नाही. फक्त त्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीत कालानुसार फरक होतोय हे मात्र जाणवतं.
- स्वाती लोंढे, प्रभादेवी

काळानुरूप बदल होणारच!
‘कन्या सासुराशी’.. हा लेख एकांगी वाटला. खरंतर मुली लग्न ठरण्यापासूनच हळव्या होतात. येता-जाता आईच्या, बाबांच्या गळ्यात पडतात. उगीचच घर आवरतात. प्रत्येक वस्तू नीटनेटकी ठेवतात. लग्नापूर्वी आईशी, भावंडाशी वाद झाला, भांडणे झाली तरी लग्न झाल्यावर आईविषयी ओढ, माया जास्त वाढते, वडिलांची काळजी जास्त वाटते. लग्नापूर्वी वेळ न देणारी मुलगी आईसाठी आवर्जूनवेळ देते. हिची छोटी-मोठी कामे पटकन करते. हिला आवडणारा पदार्थ (विकत का होईना) आणून देते. प्रसंगी बाबांनाही ओरडते. काही गोष्टी काळानुरूप बदलत जाणारच. सुटी मिळाल्यावर माहेरी न जाता फिरायला जाणे स्वाभाविक आहे. त्यात माहेरची आठवण न येणे नसून पतीबरोबर वेळ घालवणे, त्याचा सहवास मिळवणे हे आहे.
- रागिणी किणीकर, नाशिक

कुटुंबाची ओढच खुंटतेय
हा लेख म्हणजे सद्यपरिस्थितीवर टाकलेला प्रकाशझोत आहे. उज्ज्वला रानडे यांनी चौफेर दृष्टिकोनातून उत्तम मांडणी केलेली आहे. माझाही अनुभव रानडेंच्या मताशी पूर्णपणे सहमत होतो.
माझी शेजारीण हेमांगी. शालेय जीवनात वडिलांचं छत्र हरपलं. आईने स्वत:ची नोकरी सांभाळून मुलांना वाढवलं. हेमांगी लाडात वाढलेली, करिअरसाठी शहरात गेली. तिथलं  वातावरण तिला अधिक जवळचं वाटू लागलं. आईलाही गाव सोडून जाणं शक्य नाही. पण हेमा आता एकलकोंडी होतेय. हेमा लॅपटॉप, मोबाइल, टीव्ही या छानछौकीपणात कुटुंबापासून दूर जातेय. आणखी दोन वर्षांनी हीच हेमा आईच्या ओरडीने बोहल्यावर चढेल तेव्हा कुठून येणार तिच्या डोळ्यात पाणी? कुटुंबाची ओढच जिथे खुंटलीय तिथे सासरी जाताना मागे वळून ती पाहिलच कशी? कोणासाठी? त्यामुळे आजच्या तरुणी या व्यवहारी जगात स्त्रीसुलभ लाज, हळवेपणा, कार्यतत्परता, शारीरिक नाजूकता, मृदू बोल वगैरे सर्व भावनांना विसरून स्त्री-पुरुष समानता मानण्यात धन्यता मानत आहे हे निश्चित.
-गीता परुळेकर, बोरिवली

उरावा फक्त व्यवहार?
लेखाच्या यानिमित्ताने एक आठवण ताजी झाली. नात्यातल्या मुलीचे लग्न होते. लग्नघटिका समीप आल्यावर मुलीची आई आतल्या खोलीत हमसून-हमसून रडत होती. वधू मात्र स्टेजवर मित्र-मैत्रिणींच्या गराडय़ात हास्य-विनोदात रंगली होती. मंगलाष्टके संपल्यावरही वधूच्या डोळ्यात पाण्याचा टिपूसही नव्हता. कोठून आला हा कोरडेपणा? वाढलेल्या वयातून की गलेलठ्ठ पगारातून? आई-वडिलांचे बालपणीचे घर सोडून जाताना जन्मदात्यांना कायमचे दुरावताना हृदयात जराही कालवाकालव होऊ नये? उरावा फक्त व्यवहार? सासरच्या मंडळींविषयी तरी या मुलीच्या मनात ओलावा, जिव्हाळा कोठून येणार? खरंच मुलींना वाढवताना आपण कोठे चुकत तर नाही ना? स्त्री समानतेच्या लाटेत काही स्त्रीसुलभ भावना आपण गमावून बसलो आहोत?
- अनामिका

स्त्रियांनीच आत्मपरीक्षण करावे
शासनाने दिलेल्या सवलती आणि कायदे यामुळे आत्ताच्या मुली जास्त शेफारल्या आहेत. आपल्या वडिलांच्या मिळकतीत आपला वाटा आहे व तो कायद्याने आपणास मिळणार आहे ही जाणीव त्यांना झालेली आहे. त्यामुळे आई-वडिलांप्रति त्यांचे असणारे कर्तव्य विसरून त्यांच्या संपत्तीत आपणास वाटा कसा मिळेल याचाच अधिक विचार करतात. स्वाभाविक संबंध दुरावत जातात. स्त्रियांच्या प्रगतीसाठी दिलेल्या सर्व सवलतींच्या विपरीत रीतीने उपयोग केला जाईल व कौटुंबिक संबंध अधिकच बिघडत जाताना दिसतात. हे असे घडू नये म्हणून स्त्रियांनीच आत्मपरीक्षण केले पाहिजे.
- कालिंदी हिंगे, मालेगाव

विदारक अनुभव
माझी मुलगी अपंग म्हणून लग्न न करता तशीच आहे. माझा मुलगा तिच्या पाठचा, दिसायला चांगला, एमबीए, हुशार, नेहमी पहिल्या वर्गात. लग्नाबद्दल पत्रिका येऊ लागल्या. पण वधूमाय  घाबरायच्या, कारण आपल्या मुलीला तिची जबाबदारी घ्यावी लागेल म्हणून व मुली तर आधीच सांगायच्या की नोकरी सोडणार नाहीत, असे तीस-चाळीस वाईट अनुभव मला आले. अशा या भावी सुना म्हणजे आपल्या भारतीय नारी, माता!!
- जयमाला देसाई, गोरेगाव

स्त्री-पुरुष समानतेचे फलित
आज स्त्रीमध्ये जे बदल झालेत ते केवळ शिक्षणामुळेच नव्हे, तर पुरुषप्रधान संस्कृतीचा जो प्रचंड पगडा आपल्या हिंदू संस्कृतीवर होता तो कमी झालाय व त्याची जागा घेतलीय, स्त्री-पुरुष समानतेने. पुरुषांच्या बरोबरीने स्त्री सर्व क्षेत्रांत कार्यरत झालेली आहे. त्यामुळे ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ हा मंत्र मागे पडलाय. तिला तिच्या मनाविरुद्ध काही नकोय. खाली मान घालून बोहल्यावर चढणारी ‘सुशीला’ आता राहिली नाही. जगाचा अनुभव घेणाऱ्या माझ्या सख्यांच्या डोळ्यात आसवं येतीलच कशी, पण याचा अर्थ त्या कोरडय़ा, आत्मकेंद्रित आहेत, असा मात्र अजिबात होत नाही.
- स्मिता भोसले, बोरिवली

व्यर्थ कांगावा कशाला?
‘आजच्या मुली बदलल्या’ हा कांगावा न करता, त्या ज्या प्रकारे सर्वाचा विचार करून आयुष्य जगतात, आपल्या आर्थिक स्वायत्ततेने आपल्या माहेरलाही जपतात, याचा आपण गोडवा गायला पाहिजे.‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ ही उक्ती तिला आज नको असून आपल्या आईला अजून सुख देण्याची तिची धडपड आहे, पण भावनिक न होता अजून ठामपणे, आत्मविश्वासाने!
- अर्चना सागवेकर, अंबरनाथ

असाही अनुभव
माझ्या दोन्ही मुलींची (वय वर्षे २५ आणि २६) दोन वर्षांपूर्वी लागोपाठ लग्ने झाली, तेव्हाची गोष्ट. दोघीही नोकरी करणाऱ्या. लग्न ठरल्यापासून संध्याकाळी त्या घरी आल्या की त्यांना चार गोष्टी समजावून सांगाव्यात- असं मी रोज ठरवत होते. पण ते राहून जायचं. अखेर लग्नसोहळा दोन दिवसांवर आला. रात्री सामसूम झाल्यावर बॅग आवरताना त्या दोघीही हळव्या झाल्या होत्या. गळ्यात पडून कितीतरी वेळ बोलत होत्या. ‘आईऽ हे बघ, यापुढे तू तुझी स्वत:ची नीट काळजी घेशील.’ डोळ्यातलं पाणी लपवत एक म्हणाली, ‘रोज फिरायला जायचं ठरव. करमत नसलं तरी चिडचिड होऊ देऊ नको. आणि आई गं! प्लीज- बाबा काही बोलले, रागावले तरी त्यांना समजावयाला जाऊ नकोस- त्यांना सगळं समजतं. त्यांचं ऐकून घेतलंस तर काही बिघडत नाही.’ मी ऐकतच राहिले. नवरा-बायकोच्या नातेसंबंधाबाबत जे इतके दिवस मला सांगावंसं वाटत होतं ते तर त्यांना माहीतच होतं की! मी आवंढा गिळला. नि:शब्द झाले होते.
- रजनी अपसिंगेकर, पुणे

आर्थिक स्थितीत फरक
लेख फारच भावला. मात्र आणखी एका मुद्दय़ाचा विचार लेखात व्हायला हवा होता, तो म्हणजे आजच्या मुलींच्या पालकांच्या परिस्थितीचा. माझी या वयातील परिस्थिती आणि माझ्या आई-वडिलांची परिस्थिती यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. आमच्या पिढीतील स्त्रिया बहुसंख्येने अर्थार्जन करू लागल्या व मुलांची संख्या एक किंवा दोनवर आल्यामुळे आमची आर्थिक स्थिती उत्तम आहे. पण आमच्या पालकांना महिन्याकाठी एखादा सिनेमा, वर्षांकाठी छोटी ट्रिप यासाठीसुद्धा विचार करावा लागत होता. त्यामुळे काळजी, चिंता, सहानुभूती कणवही या माझ्या आई-वडिलांबद्दल मला होती. अशा भावना माझ्या मुलीच्या माझ्याबद्दल असणं शक्यच नाही. शिवाय व्यक्तिस्वातंत्र्याचे वारे आपल्याकडे जोराने वाहत असल्याने त्याची थोडीफार हवा आपल्याला लागलेली आहेच. तरीसुद्धा आजूबाजूला बघताना असं दिसतं की आई-वडिलांना ज्या प्रकारची गरज लागते ती भागवण्याचा प्रयत्न आजच्या मुली नक्कीच मनापासून करतात.
- शैला चित्रे, मुलुंड

भिस्त संस्कारांवरच!
आज मुली मुलांप्रमाणेच शिक्षण घेऊन अर्थार्जन करतात व स्वयंपूर्ण होतात ही गोष्ट स्तुत्य आहे. शिक्षण-नोकरीमुळे मुलींचे लग्नाचे वय २७-२८ वर्षांपर्यंत जाते यात वावगे काय? शिकलेल्या मुली पैसा हाती आल्यावर आई-वडिलांशी फटकून वागतात, स्वार्थी होतात असे म्हणणे चुकीचे आहे. याबाबतीत आई-वडिलांनी प्रथम आत्मपरीक्षण करावे. समस्त मातापित्यांनो, तुमचे मुलांवरचे संस्कार पक्के असतील, आपले त्यागमय, कष्टाचे पण सुसंस्कृत जीवन त्यांच्यापुढे आदर्श असेल तर आजच्या मायाबाजारातही मुली आपल्याला दुरावणार नाहीत.
- विभा भोसले, मुलुंड

वास्तववादी लेख
कन्या सासुराशी.. हा लेख अप्रतिम व वास्तवतेला धरून वाटला. हल्ली मुली वयाने मोठय़ा, मनाने परिपक्व, स्वावलंबी व उच्चशिक्षित असतात. लग्नाआधीही त्या शिक्षणाच्या वा नोकरीच्या निमित्ताने घरापासून दूर राहिलेल्या असतात. त्यामुळे लग्नात, आपल्या नव्या संसारात पदार्पण करताना त्यांना वाईट वाटण्याचे वा भावनाविवश होण्यासारखे वेगळे काहीच वाटत नाही. आपल्या नव्या संसाराची स्वप्ने रंगविण्यात त्या मश्गूल असतात आणि हे नैसर्गिक आहे. त्यांच्या परिपक्व मनाची मानसिकता तशीच घडणे हे स्वाभाविक आहे आणि प्रवाहही हा नेहमी पुढे वाहत असतो. पिढीपिढींतला हा बदल अनिवार्य असतो.
- शुभदा कुळकर्णी, कुर्ला

स्वागतार्ह बदल
कन्या सासुरासी जाये.. या लेखात तरुण मुलींच्या सद्यपरिस्थितीबाबत छान विचार मांडले आहेत. आज मुली उच्चविद्याविभूषित असून आर्थिकदृष्टय़ा सक्षम आहेत. त्यांची विचारप्रणाली, कोणत्याही भावपाशात न गुंतता, व्यवहारीपणाकडे झुकणारी आहे. काळाची ती गरज आहे. आपली मात्र मुलींकडून आजही तीच अपेक्षा आहे. लाजरी-बुजरी, आई-वडिलांच्या नाहीतर नवऱ्याच्या कोषात वाढणारी, जगणारी.. आज मुलींना माहेर सोडताना दु:ख अथवा हुरहुर नाही. कारण समर्थपणे सांसारिक जीवनास सामोरं जाण्यास त्या सिद्ध आहेत. हा एक स्तुत्य बदल आहे. आता पालकांनी बदलणं आवश्यक आहे. पालकांनीही त्यांना स्वतंत्र जगू द्यावं. आजची मुलगी ही नववधू नसून नवसिद्धा आहे. तिच्यातील शक्ती आपण ओळखायला हवी.
- अपेक्षा खंडागळे, मुंबई

नवीन नात्याचा आनंद
आजच्या मुली बदलत आहेत, त्या अधिक व्यावहारिक होत आहे, पण सकारात्मकतेने. आता एकूणच पंचविशीत मुलींची लग्न होतात. त्यामुळे त्यांची मानसिक तयारी झालेली असते. घरात करणारेही पूर्वीसारखे नातेवाईक नसल्यामुळे त्यांचं त्यांनाच करावं लागतं. त्यामुळे एक प्रकारे व्यावहारिकता त्यांच्यात येते आणि ती स्वाभाविकच आहे. नुसतंच हळवं असून उपयोग नाही. आईवडिलांपासून दूर जाण्याचं दु:ख प्रत्येक मुलीला होतंच, तसंच माझ्याही मुलीलाही झालं. ती रडली, पण त्या रडण्यात नुसतंच आईवडिलांपासून दुराव्याचं दु:ख नसून नवीन घराची जबाबदारी घेण्याचा व एका नवीन नात्यात जुळवून घेण्याचा आनंदही होता.
- साधना आपटे, कोल्हापूर.

रडण्याची गरज नाही
आताच्या मुली बापाने दिल्या घरी मुकाटपणे जाण्याऐवजी तिला पटेल, रुचेल, चालेल अशा घरी ती पुष्कळशी स्वत:च्या मर्जीने जाते. आई म्हणून मुलांच्या खस्ता खाण्यात झिजलेली आणि नवरा कसाही असला तरी साथ निभावणारी परावलंबी गृहिणी जाऊन आत्मविश्वास असलेली, आपले घरातले व बाहेरचे स्थान स्थिर करू, राखू इच्छिणारी स्त्री आज दिसते.
तरीही पूर्वीच्या चित्राकडे परत जाण्यात अर्थ राहिलेला नाही. म्हणून कन्या रडल्या नाहीत तरी चालतील, पण त्यांनी उत्तमपणे परंपरागत स्त्रीचे काम गृहिणी/आई इ. निभावले व कर्तबगारीने समाजातही आपले स्थान घडविले तर ते योग्य होय.
- शशिकला दीक्षित, पुणे

सासरचाही अभिमान
‘हल्लीच्या मुली कोरडय़ा आहेत का?’ या प्रश्नाचे आश्चर्य वाटते. मायलेकीचे नाते कदापि कोरडे असणे शक्य नाही. सासरी जाताना मुलींच्या डोळ्यात पाणी येत नाही याचा अर्थ त्यांना वाईट वाटत नाही असा होत नाही. त्यांना आपल्या भावनांचे प्रदर्शन करणे आवडत नाही. त्या भावनांवर ताबा ठेवू शकतात याचे मला कौतुकच वाटते. आताच्या मुलींना घरातल्या (सासरच्या) गोष्टी माहेरी सांगायला आवडत नाहीत. त्यांच्या दृष्टीने त्या किरकोळ गोष्टी असतात. त्यांना सासरच्या माणसांचा अभिमान असतो. त्यांच्या घरातल्या गोष्टींबाबत चौकस दृष्टिकोन दाखविलेला त्यांना आवडत नाही. आईला वाटते, मुलीने माहेरी यावे. यात गैर काही नाही. पण ती येत नाही याचा अर्थ तिला माहेरची ओढ नाही असा निष्कर्ष काढू नये.
- मृदुला पेंढारकर, ठाणे

आजच्या मुली प्रगल्भ
पूर्वीसारखे लग्न करणे हेच एकमेव ध्येय ठेवणे आजच्या मुलींना पटत नाही. त्यामुळे लग्न झाले की जीवनाचे सार्थक झाले असे त्या समजू शकत नाहीत. प्रगल्भ व अष्टपैलू व स्वावलंबी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांची मते ठाम असतात, परंतु म्हणून त्यांचा पालकांशी संघर्ष होईलच असे गृहीत ठरणे योग्य नव्हे. पालकांनी काळाच्या ओघात मुलींच्या व्यक्तिमत्त्वातील बदल समजून घेतल्यास असे प्रश्न येणार नाहीत. आर्थिक, बौद्धिक, सामाजिक स्तरावर मुलींनी मुलांसह बरोबरी (समान पातळी) गाठल्याने घरातही त्यांना बरोबरी अपेक्षित असते. त्यात काहीही गैर नाही.
- अनामिका

मुलींनी ‘रडूबाई’ का असावे?
माझ्या मते लेखिकेने उल्लेख केलेल्या कोरडय़ा, हिशेबी, आत्मकेंद्री मुली फार तर ७-८ टक्के असतील. मुलींना समानतेची वागणूक देताना उत्तम शिक्षण व पुढे उत्तम करिअर करण्यास पूर्ण प्रोत्साहन पालक देतात. सक्षम मुली उच्च शिक्षण घेऊन उच्चपदस्थ होतात. अनेक विषयांतली जगातील खूप सारी माहिती मिळवून प्रगल्भ होतात. मग त्यांनी ‘रडूबाई’ असावे अशी अपेक्षा कशाला? माझी मुलगी उच्चविद्याविभूषित असूनही पाय जमिनीवर असणारी आहे. तिच्या सासरी ती पूर्णपणे रमलेली असली तरी माहेरच्या माणसांसाठी सणावाराला सामील होतेच, पण वेळप्रसंगी तत्परतेने धावून येते.
- शुभांगी मावळणकर, डोंबिवली

असाही अनुभव
नुकतेच एका लग्नाला जाऊन आलो होतो त्याची लेखाच्या निमित्ताने आठवण झाली. विवाहानंतरचे होम इ. विधी आटोपून वरातीची वेळ झाली होती. वास्तविक ते लग्न सर्व पाहून-सवरून सर्वसंमतीने झाले होते. पण वधूच्या आईने मुलीला निरोप देण्याआधी जो काही हंबरडा फोडला होता विचारू नका. साऱ्यांनी समजावूनही तिचा आक्रोश सुरूच होता. अखेर ती नववधू आईच्या शेजारी येऊन बसली आणि तिला म्हणाली, ‘‘आई, शांत हो बघू आधी. काय हे वेडय़ासारखं! अगं, सगळंच तर पाहून-पारखून घेतलंय आपण. नको जाऊ का मी सासरी? तू माझे डोळे पुसायचे तर मलाच तुझी समजूत काढावी लागतेय. तुझी अशी अवस्था पाहून माझं मन तरी सासरी कसं रमेल बरं? तेव्हा रडणं आवर आणि मला निरोप दे बघू.’ एवढं बोलून ती उठली. लेकीऐवजी आईलाच धीर द्यावा लागत होता. जमाना बदल गया है, हेच खरं!
- भारती रायबागकर

मुलींवर टीका कशाला?
हल्ली लग्नाच्या बाबतीत मुलांपेक्षा मुली जास्त चोखंदळ व जास्त अपेक्षा ठेवतात असे चित्र दिसून येते. आणि हे चित्र फक्त महाराष्ट्रीय कुटुंबात आहे असे नव्हे तर इतरत्रही तेच आहे. परवाच मला माझी एक गुजराती मैत्रीण भेटली होती. तिची मुलगी ३०-३५ वर्षांची आहे. एखाद्या मुलापेक्षा जास्त ती आपल्या आईवडिलांची काळजी घेते, पण आता ती लग्न करायलाच तयार नाही. कारण ती म्हणते लग्न करून दुसऱ्या कोणाच्या (म्हणजे नवऱ्याच्या) आईवडिलांची काळजी घेण्यापेक्षा मी माझ्याच आईवडिलांची काळजी घेतली तर काय बिघडले? मला हे ऐकून धक्काच बसला. गेले कित्येक वर्षे बायका आपले निर्णय आपणच घेण्याच्या हक्कासाठी लढल्या, आता तो हक्क त्या बजावत आहेत तर आपण त्यांच्यावर टीका कसे करू शकतो?
- लता रेळे

दिखाऊ पैलू अधोरेखित
उज्ज्वला रानडे यांनी एक व्यापक सामाजिक परिवर्तनातील एका छोटय़ाशा दिखाऊ पैलूवर नेमके बोट ठेवले आहे. नाहीतरी ‘धो, धो रडणे’ एकंदरीत अतिरेकीच असायचे. आता ते फक्त ‘मालिका’तून दिसेल. प्रत्यक्षात गायब हे अगदी छान झाले. एका कोरकू प्रेमगीताचा अनुवाद खाली देते आहे. ‘सासरी जाणारी मुलगी बापाला म्हणते, आभाळातून आलेले पावसाचे छोटे थेंब जमिनीवर पोचायच्या आधीच सुकून जातात. त्याप्रमाणेच माझ्या डोळ्यातले पाणी माहेरच्या आठवणीने आले तरी प्रियकराकडे जाण्याच्या आनंदाने गालापर्यंत येतानाच सुकते.’ भावनांचा हा तरल आविष्कार अधिक निरोगी आहे.
-आशा मुंडले, पुणे

मुलींची माया रोखठोक
उज्ज्वला रानडे यांचा हा लेख आवडला व माझ्या जिवलग मित्राच्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नाची आठवण झाली.  हल्ली मुलींचे निर्णय ठाम असतात. तिने पहिल्या भेटीतच मुलाला विशेषकरून मुलाच्या आईवडिलांना स्पष्ट सांगितले की, मी एकुलती असल्यामुळे तुमच्यासारखीच माझ्या आईवडिलांची पण जबाबदारी आमच्या दोघांवर राहील आणि कधी कधी आम्ही दोघं माझ्या आईवडिलांकडे पण राहू. हल्ली मुलींची माहेरची माया हळवी, भावुक राहिली नसून रोखठोक झाली आहे. हा कौटुंबिक, सामाजिक बदल ज्येष्ठ नागरिकांना पेलवणारा नाही, अपरिहार्य आहे.
- श्रीनिवास डोंगरे, दादर

व्यवहाराचे महत्त्व वाढले
हा लेख वाचताना आमच्या पिढीतल्या महिला (वय सुमारे ५५ च्या वर) मनातून गलबलतील. आता काळ बदललाय. दु:ख करायलासुद्धा वेळ नसतो. सर्व कामाचं वेळापत्रक ठरलेलं असतं. भावनांचं कौतुक करायला वेळ नसतो. त्यामुळे भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व आले आहे. विरहाचे दु:ख दूर सारून हल्ली मुली नाजूक प्रकृतीच्या मातापित्यांचा निरोप घेताना विनोदबुद्धी वापरून हसत हसत निरोप घेतात. मनातून ८० टक्के मुलींना वाईट वाटत असते हे नक्की!
- स्मिता पाटील, बोरिवली

प्रेमाची बाजू बोथट  
आताच्या मुली इतक्या बिनधास्त झाल्यात की, जर माझे पटले नाही तर मी घटस्फोट घेईन, असे म्हणायलाही त्या कमी करत नाहीत. आपले निर्णय आपण घेण्यास त्या सक्षम झाल्या आहेत व याच आर्थिक बाजूचा विचार करून आई-वडीलही धोरणे शिथिल करतात. त्यामुळे लग्नाचे प्रश्न आता यक्षप्रश्न म्हणून उभे राहिले आहेत. आईवडिलांचे न जुमानता त्या जगत असतात. अटींच्या डोंगराने त्यांचे विवाहसुद्धा लवकर होत नाहीत. त्यामुळे आईवडिलांनाही त्या कधी एकदा संसार थाटतायत असे झाले असते आणि अशा या परिस्थितीत प्रेमाचा लवलेशही उरलेला नसतो. उरतो तो फक्त व्यवहार आणि प्रेमाची बाजू बोथट होते तेव्हा मायेची ओढ ती काय राहणार?
मीना अभ्यंकर, कल्याण

‘कन्या सासुरसी जाये’च्या निमित्ताने मला माझ्या मुलीविषयी लिहावेसे वाटले. लग्नात आम्ही दोघीही फार आनंदात होतो. दोघींमध्ये उत्तम टय़ुनिंग असूनही आम्ही ढसाढसा रडलो नाही. पण तिच्या चेहऱ्यावर ‘ आय मिस यू’ हे स्पष्ट दिसत होतं. आजकाल मोबाइल, चॅटिंगमुळे जवळजवळ रोजच मुलं आईशी / सासूशी बोलत असतात. त्यांच्यावर जबाबदारी टाकली तर त्या छान सांभाळतात. हं आजच्या मुली नोकरी करतात त्यामुळे थोड्या सवलतीही त्यांना हव्या असतात. (उदा. सुट्टीच्या दिवशी छान झोप काढणे, बाहेर जेवायला जाणे.) आज ज्या वेगाने जग बदलतं आहे त्यात मागच्या पिढीने हे बदल आत्मसात करायला हवा. अशा वेळी मुलगी िधडका वाटत नाही.
-वर्षां पांडे

२२ नोव्हेंबर २०११ रोजी माझ्या मुलाचे लग्न झाले. रात्रीचे साड-े अकरा वाजून गेले. वरात घरी जाण्यास निघाली . माझी सून आईच्या गळ्यात मिठी मारून रडत होती.पण माझे मनसुद्धा रडत होते. आजपासून मी माझा मुलगा एका मुलीच्या ताब्यात देणार आहे. माझ्या भावना कधीच बोलू शकणार नाही. अशा कित्येक मुलांच्या आईचे होत असते.त्या पण मन घट्ट करतात. मुलीच्या आईपेक्षा मुलाच्या आईच्या भावना हळव्या होत आहेत.
-शुभांगी गायकवाड

‘कन्या सासुरसी ..’ हा लेख फारच संकुचित आणि पूर्वग्रहदूषित वाटतो. लेखिकेने दिलेली उदाहरणे खरी असूही शकतात. मात्र आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी फक्त एकाच प्रकारची उदाहरणे देऊन लेखिकेने आपले परसेप्शन निगेटिव्ह आणि सिलेक्टिव्ह आहे हे दाखवून दिले आहे. जर या उदाहरणांमधील मुली उर्मट असतील, तर तो त्यांच्या संस्कारांचा दोष आहे, हल्लीच्या पिढीचा नव्हे. फक्त ढसाढसा रडून प्रेम व्यक्त होते. ही एकता कपूरच्या मालिकांमधली मानसिकता आहे. गर्दीच्या वेळी ट्रेनमध्ये आईला बसायला देऊन स्वत उभ्या राहणाऱ्या, आपला पहिला पगार आईला देणाऱ्या, आई-बाबांचे वाढदिवस साजरे करणाऱ्या, लग्नानंतर अनेक वष्रे उलटूनही दिवसातून दोन वेळा फोन करून आई-बाबांची चौकशी करणाऱ्या, बाहेरची कामे सांभाळून घरातल्यांची आजारपणे काढणाऱ्या मुली लेखिकेने कधी पाहिल्याच नाहीत का? माहेरी येऊन अंग रगडून घेतले म्हणजे खरेखुरे प्रेम व्यक्त केले असे म्हणणे हास्यास्पद आहे. आपण मोठ्या झाल्यावर आपल्या आई-वडिलांकडून आपली ’सेवा’ करून घेऊ नये एवढी संवेदनशीलता हल्लीच्या मुलींमध्ये आहे आणि सगळा दोषारोप मुलींवरच का? लेखिकेने मुलांच्या वागण्याकडे कधी लक्ष दिले आहे का?
-अश्विनी आडिवरेकर

उज्ज्वला रानडेंनी लिहिलेल्या गोष्टी जरी बऱ्याच प्रमाणात खऱ्या असल्या तरी त्या खूपच रूक्षपणे मांडल्या गेल्या आहेत असे वाटले. म्हणजे जणू काही मुलींनाही काही वाटत नाही आणि घरच्यांना पण त्यांचा कंटाळा आलेला असावा!!! माझे स्वतचे लग्न वयाच्या २६ व्या वर्षी झाले आणि मी आणि माझी आई ठरवून रडलो नव्हतो- कारण एकच - माझे लग्न ही एक आनंदाची गोष्ट आहे! त्यामुळे तो क्षण एन्जॉय करायचा! वाईट मलाही वाटले होते आणि माझ्या आईलाही! मी जेव्हा माझ्या सासरच्यांबरोबर गाडीतून निघून गेले तेव्हा माझेही डोळे भरून आले.
-प्राची केळकर-भिडे

२८ एप्रिलच्या चतुरंग पुरवणीत उज्ज्वला रानडे यांनी मांडलेल्या मतांशी मी सहमत आहे. ‘बळी द्यायला नेत असलेली बकरी कशी दिसत असेल ते सासरी निघालेल्या नव-या मुलीकडे पाहून कळते ’ हा एक शेरा मी काही वर्षांपूर्वी ऐकला होता, कारण रडून रडून त्या मुलीने चेह-याचे जे काही करून घेतलेले असे त्याचे एकंदर स्वरूप तसेच असायचे. आता नवऱ्यामुली हसतमुख असतात, खुश असतात, स्वत:च्या लग्नानिमित्त होत असलेल्या समारंभाचा अगदी मनापासून आनंद घेत असतात. खरं सांगायचं तर ते पाहून बरं वाटतं आíथक स्वातंत्र्यामुळे मुली मोकळ्या होत आहेत हे खरे आहे आणि पूर्वानुभव पाहता बरेही आहे.
-राधा मराठे

लेखातील ‘मुली भावनाप्रधान नाहीत’ हे सांगण्यासाठी दिलेली उदाहरणे पटणारी नाहीत. आजचा मुली पॅ्रक्टिकल असतील, पण त्या भावनाशून्य अजिबात नाहीत. उलट त्या नोकरी करणाऱ्या असल्यामुळे मल्टीटास्किंग त्यांना सहज जमते आणि त्या सासर -माहेर दोन्ही व्यवस्थित सांभाळू शकतात. माहेरासी पुन्हा पुन्हा परतुनी पाहणाऱ्या मुली तरी कुठे मान्य असतात? त्यापेक्षा याचे नेमके संतुलन साधलेले बरे नाही का?
-सखी जोशी

हा लेख एकसुरी आहे. मला नवल वाटते की लेखिकेने एकाच प्रकारच्या मुलींची अनेक उदाहरणे दिली आहेत. मी माझ्या आसपास अशी अनेक उदाहरणे बघितली आहेत जिथे मुलं असूनही मुली लग्न झाल्यानंतरही आई-बाबांची काळजी घेतात. माझ्या एका मैत्रिणीचे आई-बाबा शेजारच्या इमारतीत राहतात. ही औषधं-डॉक्टर , भाजीपासून सर्व बघते (स्वतचे घर सांभाळून), कधी कधी आईशी वादही होतात, पण ते नैसर्गिक नाही का?  पूर्वी मुली रडून सासरी जायच्या .. आजच्या मुली आई- बाबांची जबाबदारी घेताना मागे सरत नाहीत, मग त्यांना माया असत नाही असा निष्कर्ष कसा काय काढता येऊ शकतो?
-सुचिता गुजराथी

२०-२३ व्या वर्षी आई-वडिलाच्या पशांनी लग्न करायचे, नंतर माहेरपण एन्जॉय करायचे असे फक्त पन्नास टक्के मुलींच्याबाबत घडत असेल तर तेच योग्य आहे. मात्र बाकी ५० टक्के स्ट्रगल करून, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून लग्न करतात.  मग त्या चूक कशा ? २८-३२ च्या वयात अविवाहित असणे हा दोष कसा? स्वत: उच्चशिक्षित मुलीला केवळ ती अविवाहित आहे म्हणून आईने " िधडका " म्हणणे योग्य आहे का ? इथे आईची काहीच चूक नाही ? अशा खंबीर , मिळवत्या मुलीची मदत आजारपणात, किंवा पशाच्या स्वरूपात घेताना तिचे अविवाहितपण फायद्याचे असते . तेव्हा तिचा विचार कुणी करत नाही. उलट आजच्या समजूतदार मुलींचे आणि त्याच्या निर्णयाचे आपण कौतुक केले पाहिजे.  
-प्रज्ञा जोशी

उज्ज्वला रानडे यांनी बदलत्या आणि झपाट्याने बदलणाऱ्या कौटुंबिक जीवनपद्धतीचे मार्मिक चित्रण लेखातून केले आहे. मुली कमी संवेदनशील झाल्या आहेत किंवा अधिक उर्मट आणि वरिष्टांचा अनादर करू लागल्या आहेत असा अर्थ वाचकांनी काढू नये. अनेक वष्रे एकाच कुटुंबात राहिल्याने ते आता कायमचे सोडून जाताना दुख होणे स्वाभाविक आणि स्त्रीसुलभ आहे. परिस्थिती बदलल्यामुळे थोडासा फरक झाला असला तरी भावनिक गुंता शून्य झाला आहे असे म्हणणे स्त्री मनाचा अवमान केल्यासारखे होईल.
प्रा. सुहास पटवर्धन

यांचाही प्रतिसाद उल्लेखनीय होता-
गौरी बागलफोटे (मिरज), मंगला राजपूत (धुळे), सुहासिनी पांडे (नाशिक), रामचंद्र राशिनकर (अहमदनगर), सूर्यकांत भोसले (मुलुंड), वंदना देशपांडे (नागपूर), सुधा कुलकर्णी (मुलुंड), सीमा रिझवूज (रायगड), कल्पना राहिंज (अहमदनगर), श्रद्धा कातरकर (वर्धा), शेषाद्री डांगे ( उस्मानाबाद, शरयू कुलकर्णी (सातारा), वर्षां कुमठेकर (कराड), सुहासिनी पांडे (नांदेड), जयमाला देसाई (गोरेगाव), शीला जोशी (वाशिंद), माधुरी वरुडकर (नाशिक), ऋता दामले (अंधेरी), अनघा नार्वेकर (जोगेश्वरी), शीतल वैद्य (कळवा), भारती चाफेकर, ऊर्मिला खाडिलकर (बडोदा). ईमेल प्रतिसाद-प्राची कुलकर्णी, वंदना दामले (ठाणे), प्रणिता गजने (मुंबई), स्वप्नाली ताम्हणे (नागपूर), मेधा साने, पुर्णिमा नार्वेकर (मुंबई), रुपाली (सांगली), गौतमी सावे, वैष्णवी कदम, स्नेहा.