लिंगबदल एक सामाजिक प्रश्न Print

altसंदीप आचार्य , शनिवार, २६ मे २०१२
लिंगबदल शस्त्रक्रियेला शास्त्रीय बैठक आहे. मूल जन्माला येताना काही व्यंग राहू शकतात आणि मग त्यांना मुलगा की मुलगी, कोण म्हणून वाढवावं हा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर उभा राहतो. म्हणूनच ज्या व्यक्तीला जसं जगायचं आहे तसं जगता आलं पाहिजे, अन्यथा त्या मुलांचा कोंडमारा होतो. काही वेळा ते आत्महत्याही करतात. म्हणूनच हा सामाजिक प्रश्न म्हणून हाताळला गेला पाहिजे. लहानपणापासून त्याचा कोंडमारा सुरू होता.. त्याला मुलींमध्येच खेळण्यात रस होता. भोंडल्यापासून मुलींचे सारे खेळ तो प्रेमाने खेळायचा.. मुलांबरोबर खेळणे त्याला नकोसं वाटे. हे असं का, हे त्याला तसंच त्याच्या आई-वडिलांनाही समजत नव्हतं. भारतीय संस्कृतीत मुलाचं महत्त्व अतोनात असल्याने त्याच्यावर सातत्याने मुलांमध्ये खेळण्यासाठी जबरदस्ती केली जात होती. जसजसा सतीश मोठा होत गेला तसा त्याचा कोंडमारा वाढतच गेला.. वाढत्या वयामुळे बरोबरच्या मुलीही त्याच्यापासून फटकून वागू लागल्या तर मुले त्याला बायल्या म्हणून चिडवू लागली. त्याच्यात असलेल्या ‘ती’मुळे होणारा कोंडमारा कोणीच समजू शकत नव्हता. अखेर एकदिवस त्याने आत्महत्या केली..
आसामच्या बिधान बरुआ या तरुणाने मात्र आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जो लढा दिला तो कौतुकास्पद म्हणावा लागेल. भारतीय संस्कृतीचा एवढा जबरदस्त पगडा आजही आपल्या समाजावर आहे ज्यामुळे एखाद्या तरुणाने आपल्याला तरुणी म्हणून जगायचे आहे असे जाहीर करताच घरातूनही त्याला विरोध झाला. कायद्यानुसार कोणीही सज्ञान व्यक्ती जर तो खरोखच लिंग बदलण्यास पात्र असेल तर त्याला कोणालाही रोखता येणार नाही. प्राचीन काळातील अनेक कथांमध्ये ऋषी-मुनींनी शाप दिल्यामुळे पुरुषाची स्त्री झाल्याचे दाखले आहेत. पुराणांपासून महाभारतकालीन कथांचा आढावा घेतला तर त्या काळातही जैवविज्ञान तंत्र प्रगल्भ असावं असं वाटतं. अनेक संतांच्या कथांमध्येही त्यांनी फळ खायला देऊन पुत्रप्राप्ती घडवून आणल्याची उदाहरणे आहेत. महाभारतातील कुंतीच्या कर्णासह सर्वच मुलांच्या जन्माची कथा सर्वश्रुत आहे. असे म्हणतात की, जेथे आधुनिक विज्ञान संपेल तेथून भारतीय विज्ञानाची सुरुवात होते. यातील वास्तव-अवास्तवचा भाग सोडला तरी आधुनिक वैद्यक शास्त्राने अद््भुत शोध लावण्यास सुरुवात केली आहे. क्लोनिंग, कृत्रिम हृदय, स्टेमसेल तंत्रज्ञान अशी टप्प्याटप्प्याने आधुनिक वैद्यक व जैवतंत्रज्ञानाने झेप घेण्यास सुरुवात केली आहे. टेस्टटय़ूब बेबी, सरोगेट मदर हाही त्यातलाच एक प्रकार म्हणावा लागेल. त्याचप्रमाणे पुरुष  लिंगाएवजी स्त्रीलिंग वा स्त्रीलिंगाऐवजी पुरुषलिंगाचे रोपण आता सहज शक्य होत आहे.
तांत्रिकदृष्टय़ा बाईचा ‘पुरुष’ करणं ही शस्त्रक्रिया आव्हान म्हणावी लागेल. अमेरिकेत १९२१ साली रुडॉल्फ याने सर्वप्रथम आपला लिंगबदल व्हावा यासाठी पुढाकार घेतला. प्रत्यक्षात त्याच्यावरील शस्त्रक्रिया १९३०मध्ये झाली. प्रथम लिंग काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सहा महिन्यांनी कृत्रिम योनी बसविण्याची शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेपाठोपाठ बर्लिनमध्ये १९३०-३१ साली लिली एल्बीवरही अशाच प्रकारे शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र गर्भाशय बसविण्याची शस्त्रक्रिया करताना तिचे निधन झाले. अलीकडच्या काळात एका अमेरिकन मॉडेलनेही अशीच शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्यानंतर रॅम्पवर चालण्यास ‘ती’ पूर्वाश्रमीचा ‘तो’ असल्याचे कारण देऊन नकार देण्यात आला होता. या विरोधात तिने न्यायालयीन लढाई करून विजय मिळवला आणि मॉडेल म्हणून रॅम्पवर चालण्याचा  आपला अधिकार बजावला.
भारतातही साधारणपणे १९८६ पासून लिंगबदलाच्या शस्त्रक्रिया होऊ लागल्या. मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयातील प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉक्टर मुकुंद जगन्नाथन यांनी आजपर्यंत लिंगबदलाच्या सहा शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्याचप्रमाणे स्तनरोपणाच्याही अनेक शस्त्रक्रिया केल्या. या शस्त्रक्रियेबाबत ते म्हणतात, ‘‘ज्या व्यक्तीला लिंग बदलायचे असेल त्यांना हार्मोन्स बदलण्याचे उपचार केले जातात. स्त्री बनण्यासाठी प्रथम लिंग काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते. चरबी वाढवणे, दाढी-मिशा काढून टाकणे तसेच प्लास्टिक सर्जरीद्वारे स्तनरोपणही केले जाते. त्याचप्रमाणे योनीमार्ग तयार केला जातो. यात लक्षात ठेवण्यासाठी एक प्रमुख गोष्ट म्हणजे जे पुरुष स्त्री बनतात त्यांना गर्भाशय तसेच स्त्रियांना जन्मताच असलेले काही अवयव नसल्यामुळे ते बाळाला जन्म देऊ शकत नाहीत. अर्थात आमच्याकडे शस्त्रक्रिया करण्यापूर्वी खरोखरच त्या व्यक्तीला लिंगबदल करणे गरजेचे आहे का याची मानोसोपचारतज्ज्ञांकडून कसून तपासणी केली जाते. यासाठी किमान सहा महिने ते     एक वर्ष संबंधित व्यक्तीला मनसोपचारतज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवलं जातं. त्यांनंतर काही तपासण्या करूनच शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जातो, असेही डॉ. जगन्नाथन यांनी सांगितलं. एखाद्या स्त्रीला पुरुष बनायचे असल्यास कृत्रिम लिंगरोपणाची शस्त्रक्रिया केली जाते. आता लिंग तयार करणे ही फारशी कठीण गोष्ट राहिलेले नाही. त्याचप्रमाणे ही व्यक्ती सेक्सचा आनंदही घेऊ शकते. लिंगबदल शस्त्रक्रियेमध्ये अनेक प्रकार असून या शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या किती प्रमाणात यशस्वी होतात हे संबंधित व्यक्तीच्या इच्छाशक्तीवरही अवलंबून असतं. केईएमचे अधिष्ठाता व प्रसिद्ध बालशल्यविशारद डॉ. संजय ओक हे लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेकडे एका वेगळ्याच सामाजिक जाणिवेतून बघताना दिसतात. ते सांगतात, ‘‘आपल्या समाजात मुलगा असण्याकडे सामान्यपणे सर्वाचा कल असतो. मात्र जन्माला आलेल्या मुलाच्या मनात जर स्त्री दडलेली असेल आणि त्याला तशा प्रकारे जगण्याची योग्य संधी दिली गेली नाही तर अशा व्यक्ती अनेकदा आत्महत्या करतात. मुळात लिंगबदल शस्त्रक्रियेला शास्त्रीय बैठक आहे. आपल्याकडे भ्रामक सामाजिक कल्पनांची झुल लावण्यात येत असल्यामुळे लिंगबदल शस्त्रक्रियेकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. पुरुषांमध्ये एक्सवाय हे गुणसूत्र असते तर स्त्रीमध्ये एक्सएक्स गुणसूत्र असते. अनेकदा जन्माला येणाऱ्या बाळात एक्सएक्सवाय, एक्सओ अशी वेगळीच गुणसूत्रं आढळून येतात. ‘अर्धनारी’ असा जो प्रकार आहे त्याच श्रेणीत काही बाळांचा जन्म होतो. जन्माला आलेलं बाळ हे मुलगा आहे की मुलगी ते ठरवणं शक्य होत नाही. काही बाळांची लिंगाची जागाच सपाट असल्यानंतर अशा बाळांचे काय करायचं? त्याच्या आई-वडिलांनी मुलाला काय म्हणून वाढवायचं? समाजात ते मूल काय म्हणून वाढणार? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. यातून बाळाची तपासणी केल्यानंतर त्यात स्त्री बनण्याचा नैसर्गिक कल असल्यास तशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते. एखाद्या पुरुषाला स्त्री केले तरी अंडाशय, गर्भाशय असल्याशिवाय गर्भधारणा होऊ शकत नाही. मात्र मला विश्वास आहे की विज्ञान आगामी दोन दशकांत प्रगती करून हे अशक्य शक्य करून दाखवेल.’’ असं सांगत आपले सेल घेऊन जेनेटिक मोडय़ुल तयार करून गर्भधारणा होऊ शकेल असा विश्वासही डॉ. ओक यांनी व्यक्त केला.
त्यांनी सांगितलं,  ‘‘काही बाळ जन्माने पुरुष असतात पण त्यांना पुरुषलिंग नसतं. यातल्या काहींना स्त्रीप्रमाणे वाढवलं जातं. अशा पालकांची फार पंचाईत होते. ‘अफेलिया’ या प्रकारात मोठय़ा आतडय़ाचा भाग काढून व्हजायना  अर्थात योनी तयार केली जाते. यातील काही शस्त्रक्रिया या टप्याटप्प्याने करव्या लागतात. एका केसमध्ये एकाने बारा वर्षे पाठपुरवा केला आणि वयाच्या बाराव्या वर्षी स्ननरोपणाची शस्त्रक्रिया केली  आणि  वयात आल्यानंतर योनीरोपणाची शस्त्रक्रिया केली. खरं तर लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेकडे एका सामाजिक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. ज्या मुलांमध्ये मुलगी दडलेली असते अथवा त्याच्या उलट असते अशा प्रकरणात ज्याप्रमाणे बायपास शस्त्रक्रियेकडे आपण पाहतो तशाच प्रकारे म्हणजे अत्यावश्यक उपचार म्हणून पाहणं गरजेचं आहे, अन्यथा अशी मुलं अथवा मुली आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात,’’ असंही डॉ. ओक यांनी कळकळीने सांगितलं. दुर्दैवाने वैद्यकीय क्षेत्राचे आज धंद्यात रूपांतर झालं आहे. अमेरिकत लिंगबदलाच्या शस्त्रक्रियांना धंदेवाईक स्वरूप प्राप्त झालं आहे. त्यातही एखादी सोशलवर्कर जिने स्वत: लिंगबदल केला असेल तर ती संबंधित व्यक्तीला लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी जास्त प्रवृत्त करताना दिसते. भारतात अशा शस्त्रक्रियांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. यात धंदेवाईक प्रवृत्ती शिरू नये म्हणून सरकारने तज्ज्ञांची समिती नेमून त्यांच्याच माध्यमातून शस्त्रक्रियांना परवानगी देणं गरजेचं असल्याचंही डॉ. संजय ओक आवर्जून सांगतात.
पुरुष दिसत असूनही त्याच्यात स्त्रीच्या भावना असणं किंवा त्या उलट असणं हे झालंच तर जैविक, शारीरिक बदल वा बिघाडामुळे होतो, हे आता मान्य झालं आहे, असं असताना केवळ सामाजिक रूढी कल्पनांमुळे एखाद्या व्यक्तीला मनासारखं जगण्याचा अधिकार आपण नाकारणार का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. कुटुंबीय म्हणून, समाज म्हणून आपण अशा व्यक्तींचा सहज मनाने स्वीकार करणार का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवा...