कायद्याशी मैत्री Print

पूर्वी कमानी , शनिवार , २ जून २०१२
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
माझे वय ५८ असून मी एका निमसरकारी कार्यालयात नोकरी करते. माझा नवरा एका राष्ट्रीयीकृत बँकेत असून दारूचे व्यसन, बाहेरख्यालीपणा या वाईट सवयींमुळे तो गेली चार वर्षे कामाला जात नाही. वास्तविक आमचा प्रेमविवाह, मात्र आता विसंवाद निर्माण झाला आहे. दरम्यान आम्ही दोघांनी मिळून पुण्यात एक घर विकत घेतले. या घरासाठी बँकेतून कर्ज काढून तसेच दागिने गहाण टाकून मी पैसे उभे केले आहेत, कर्जाचे अनेक हप्तेही मी भरले आहेत. मात्र तो सुमारे २२ वर्षांपूर्वीचा काळ असल्याने हे घर आम्हा दोघांच्या नावावर घ्यावे हे मला सुचले नाही. हे घर केवळ नवऱ्याच्या नावावर असल्याने तसेच आता आमच्यात विसंवाद निर्माण झाल्याने हे घर तो संयुक्त मालकीचे करू इच्छित नाही. या घराचे वारसदार म्हणून माझ्या किंवा आमच्या मुलांऐवजी त्याने आपल्या बहिणीला नेमले आहे. ही समस्या कशी सुटू शकेल?
- पी. एस. पाटील वाशी, नवी मुंबई

उत्तर- हे घर आपल्याही नावे व्हावे, अशी तुमची इच्छा आहे मात्र एकंदर परिस्थिती तुमच्यासाठी खूपच दुर्दैवी दिसत आहे. तरीही सर्वप्रथम तुम्ही एक काम करा व ते म्हणजे तुम्ही आतापर्यंत भरलेले हप्ते, बँक खाते पुस्तिका, कर्ज खाते, धनादेश आदीचे तपशील गोळा करा. पुणे येथील हा फ्लॅट रिकामा आहे की नाही, याचा उल्लेख तुम्ही केलेला नाही. मात्र तो रिकामा असेल तर त्याचा त्वरित ताबा घेणे इष्ट ठरेल. यानंतर नवऱ्याने तुमच्या नावे या फ्लॅटची संयुक्त मालकी घोषित करावी, या मागणीसाठी त्याच्याविरोधात खटला दाखल करा. हा निर्णय तुमच्यासाठी कदाचित कठीण ठरेल मात्र तुमच्या आणि मुलांच्या भवितव्यासाठी ते आवश्यक आहे. या फ्लॅटची वारसदार म्हणून त्याने त्याच्या बहिणीला नेमले आहे परंतु त्याने काही फरक पडत नाही, वारसदार हा केवळ विश्वस्त असतो, हे ध्यानात ठेवा. मृत्युपत्र केल्याशिवाय त्याचे काही बरेवाईट झाल्यास त्याचे कायदेशीर वारस या नात्याने तुमचा आणि तुमच्या मुलांचाच अधिकार राहील, मात्र मृत्युपत्रात त्याने त्याच्या बहिणीला वारसदार म्हणून नेमल्यास तुम्ही आणखी अडचणीत याल. त्यामुळे हे टाळण्यासाठी वर सुचवलेले उपाय तातडीने करा.  
’ आमच्या हौसिंग सोसायटीमध्ये एका सभासदाच्या पत्नीने स्वत:च्या सदनिकेत सोसायटीच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांची शिकवणी सुरू केली आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आमच्या कमिटीने त्यास लेखी जाब विचारल्यानंतर त्याने आम्हाला धुडकावून लावले. ‘कोणत्या नियमाखाली तुम्ही आक्षेप घेत आहात ते कळवा, यानंतर आम्ही वकिलांचा सल्ला घेऊन तुमच्या शंकांचे निरसन करू. आम्ही आमच्या घरात काही करू शकतो. या विद्यार्थ्यांना आम्ही पावती देत नसल्याने आम्ही या जागेचा वापर वाणिज्य कारणासाठी करत आहोत, असा आरोप तुम्ही करू शकत नाही,’ असे उत्तर या महाशयांनी दिले.

या महाशयांना कशा प्रकारे आळा घालता येईल, त्यांच्यावर काय कारवाई करता येईल?
- व्ही. डी. कुमार वडाळा, मुंबई
उत्तर - या महाशयांना आळा घालण्यासाठी तुम्ही दोन गोष्टी करू शकता. सर्वप्रथम आपल्या सदनिकेचा वाणिज्य वापर करू नये, अशा आशयाची नोटीस तुम्ही या सभासदाला द्या. तुमच्या सोसायटीच्या उपविधींच्या आधारे अशी नोटीस तुम्ही देऊ शकाल. प्रत्येक सोसायटीसाठी असे उपविधी असतातच. यानंतरही हे क्लास सुरू राहिले तर तुम्ही तुमच्या प्रभागातील पालिका कार्यालयात त्याविरोधात तक्रार करा. तुमची इमारत ही निवासी कारणासाठी बांधण्यात आली असल्याने तसेच त्याच आधारे इमारतीचे नकाशे मंजूर झाले असतील, असे गृहीत धरले तर त्याने क्लास सुरू करून पालिकेच्या नियमांचा भंग केला आहे, हे उघड होईल. पालिकेने याउपरही काही कारवाई केली नाही तर सोसायटीची सर्वसाधारण सभा बोलावून त्यात तुम्ही या सभासदाविरोधात कारवाईचा निर्णय घेऊ शकता. अशा सभासदाची हकालपट्टी करण्याचा अधिकारही सोसायटीला आहे.

तुमचे  कायदेविषयक  प्रश्न थोडक्यात पाठवा या पत्त्यावर - ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा.