अभ्यासाशी मैत्री - आई - बाबा तुमच्यासाठी : पेरावे तसे उगवते Print

डॉ. नियती चितलिया ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मुलांवर चिडणं, वैतागून बोलणं हे खूप सोपं आहे; पण त्यांना समजेल असं आणि संयतपणे बोलण्यासाठी मनावर ताबा मिळविणे आवश्यक आहे. तुम्ही मुलांना जन्म दिलाय, मग त्यांची चांगल्या रीतीने मशागत करण्याची जबाबदारी तुमची, कारण जे पेराल तेच उगवेल हा निसर्गनियम आहे.
‘कसं बोलावं की मुलं ऐकतील, कसं ऐकावं की मुलं बोलतील.’ ‘पालकत्व’ या विषयावर एका रुग्णाचं समुपदेशन करीत होते. मुलांना कसं समजावून सांगायचं ते त्या पालकांना समजावीत होते. रुग्ण गेले आणि दवाखान्यात शिकायला येणारी विद्यार्थिनी म्हणाली, ‘‘मॅडम, तुम्ही किती छान सांगितलंत त्या पालकांना मुलांशी कसं बोलायचं ते. आत्ताच माझं आईशी याच विषयावर भांडण झालं.’’ मी जरा जास्तच खोदून विचारल्यावर म्हणाली, ‘‘आई माझ्यावर जोरजोरात ओरडत होती, ‘बघ तू किती बेफिकीर आहेस. तुझे कपडे सगळे बेडवर अस्ताव्यस्त पडलेत. नेहमीच असेच पडलेले असतात. ऊठ पहिल्यांदा त्यांच्या घडय़ा कर, जरा शीक, थोडा आळस सोड आणि जाग्यावर ठेव कपडे!’’’ मी म्हटलं, ‘‘मग?’’ तर ती म्हणाली, ‘‘मॅडम, आईचे कपडेसुद्धा बेडवर अस्ताव्यस्त स्थितीत पडले होते. मीपण मग तिला  सांगितलं, तुझे कपडेपण असेच पडलेत की! त्याच्यावर मग तिचं नेहमीचं, मी ऑफिसला जाते, काम करते, तुला घरातलं एवढं करायला होत नाही. मग मीपण तिला सांगितलं, माझा अभ्यास आहे, मी नाही आवरणार! मॅडम, तिने मला प्रेमाने सांगितलं असतं ना, ‘बाळा, हे बघ, कपडे सगळे पडलेत असेच. जरा मला मदत कर. आपण मिळून सगळे आवरू.’ तर मी तिला सांगितलं असतं, ‘तू तुझं दुसरं काम कर. मी हा सगळा पसारा आवरते!’’’
खरंच वाचकहो, किती सोपं असतं चिडून बोलणं, पण किती कठीण असतं मनावर ताबा ठेवून प्लीज म्हणणं, पण जे कठीण आहे तेच साध्य करणं म्हणजे जीवन. घरात आपण जसं मोठय़ा माणसांशी मानाने बोलतो तसंच लहान मुलांशी बोलावे. त्यांनासुद्धा त्यांची मतं विचारावीत. मुख्य गोष्ट म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवावा. मुलांशी बोलताना असं बोला की, ती लक्ष देऊन ऐकतील. सारखं सारखं टोचून टोचून बोललात किंवा अमुक कर, अमुक करू नको, असं सारखं सारखं सांगत राहिलात तर तुमच्याकडे दुर्लक्ष करायला शिकतील मुलं. त्याचप्रमाणे टोमणे मारून बोललात तर त्यांना तुमचा तिटकारा येईल.
आता उदा. : तुम्हाला हवंय की मुलं अभ्यासाला बसावीत. फर्मान सोडण्यापेक्षा, त्या दिवशी शाळेत काय काय झाले, अभ्यास जास्त झालाय का, दमलायस का, असे प्रश्न सुरुवातीला विचारावेत. मग कुठला अभ्यास करायला आवडेल? एकटा/ एकटी बसून करण्याचा की आईशेजारी बसून करण्याचा? मुलांना अभ्यासाचा कंटाळा आलेला असतानासुद्धा त्यांना त्याच्याबद्दल टोचून बोलू नये. अभ्यास तर करून घ्यायचाच आहे, पण तो मुलांनी मनापासून करावा. तुम्ही म्हणता म्हणून नाही. त्याचं आणखी एक उदाहरण देते. माझ्याकडे एक रुग्ण यायचा. त्यांचा मोठा मुलगा दहावीत होता. अजिबात अभ्यास करायचा नाही, म्हणजे आई मागे लागली तर थोडा बसायचा. त्या माझ्याकडे पंचकर्म चिकित्सेसाठी रोज पंधरा दिवस यायच्या. त्याच दरम्यान त्याची सहामाही परीक्षा चालू होती. त्यांची तक्रार अशी होती की, तो परीक्षेवरून आला की टाइमपास जास्त करीत बसतो. दुसऱ्या दिवशीच्या पेपरची तयारी नाही, काही नाही. मी त्यांना सांगितलं की, मी जे सांगते ते तंतोतंत करायचं, विश्वासाने. करणार असाल तरच सांगते. त्या तयार झाल्या. म्हटलं, उद्या तो पेपरवरून आला की, विचारायचं कसा गेला पेपर आणि म्हणाला, बरा गेला किंवा वाईट गेला तर काहीही बोलायचं नाही. म्हणजे चिडायचंसुद्धा नाही. त्याला सल्ला वगैरे काहीही द्यायचा नाही. नुसतं ऐकून घ्यायचं. मग तो जास्त काही बोलायला लागला तर त्याला जवळ घ्या आणि म्हणा, ‘अरे, ही अजून पहिली परीक्षा आहे ना? होईल सगळं बरोबर पुढे!’ त्या दचकल्याच. म्हणाल्या, ‘‘अहो, मी एवढं बोलून अभ्यास करीत नाही, तर नाही बोलले तर मोकाटच सुटेल. अभ्यास करणंच सोडून देईल.’’ मी म्हटलं, करून बघा. उद्या संध्याकाळी यालच ना? तेव्हा सांगा.
आणि दुसऱ्या दिवशी मुलगा पेपरवरून घरी आला. पेपर वाईट गेला होता. आई काहीच बोलली नाही. तो चाटच पडला. पटापट जेवला. पुढच्या पेपरच्या अभ्यासाला बसला. आईपण चाट पडली. धाकटा मुलगा आईजवळ आला आणि म्हणाला, ‘‘आई, मी शिकवणीला गेल्यावर तू त्याला ओरडणार आहेस का?’’ आईला मात्र आतून खरंच हसायला येत होतं. त्या बाईंचे पती घरी आले आणि हा सगळा प्रकार कळल्यावर त्यांनीसुद्धा बायकोला विचारलं, ‘‘तुला काही झालंय का? ठीक आहेस ना तू?’’ दुसऱ्या दिवशी त्या बाई दवाखान्यात हसत हसतच आल्या, एवढय़ा खूष होत्या. मुलगा स्वत:हून दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा अभ्यासाला बसला होता. मुलांना आपण मागे लागत बसलो तर त्यांना त्या गोष्टीचा तिटकारा येतो. त्यांना त्यांचं स्वत:ला समजू दे, उमगू दे! एखाद्या वर्षी जरा कमी मार्क मिळाले तर काहीही हरकत नाही.
जबाबदारी पेलायला शिकविण्यातच खरं पालकत्व आहे. त्यात चुकायला संधी असावी, तरच चूक उमगेल. आपण नेहमीच बरोबर असू शकत नाही. मुलांशी बोलताना पालकांनी स्वत:वर ताबा ठेवायला हवा. सबुरीने काम घ्यायला हवं. मुलं विचार करण्यात जरा हळू असतात. पालकांना त्यांच्या दिनक्रमात नसतो वेळ म्हणूनच मुख्यत: अशी घासाघीस चालू होते. ही समस्या सोडविण्यासाठी पालकांनी आपल्या प्राथमिकता ठरवायच्यात. नोकरी पहिली की मुलं पहिली? माझा सल्ला विचारलात तर मुलं पहिली. त्याची दोन कारणं आहेत :
१) मुलांनी तुम्हाला- आम्हाला जन्माला घाला सांगितलं नाहीए. तुम्हाला मुलं हवी होती म्हणून तुम्ही त्यांना जन्माला घातलंय.
२) मुलांचं बालपण परत येणार नाही. एखादी नोकरी गेली तरी दुसरी मिळेल. कमी पगाराची असली तरी मुलांचं बालपण एन्जॉय केल्यामुळे जे आत्यंतिक मानसिक समाधान आहे त्याचं मोलच मुळी करता येत नाही.
माणसाला रडायला, तक्रारी करायला काही तरी कारण हवंच असतं. मुलं नाही नीट झाली तरी रडणार, त्यांच्यासाठी नोकरी सोडायला लागली तरी रडणार, पण तुम्ही खरंच मुलांवर प्रेम करीत असाल- खरं प्रेम- अपेक्षांशिवायचं असतं, तुमच्या स्वत:च्या व्याख्येप्रमाणे नाही, तर मुलांची वाढ चांगली आणि सर्वागीण व्हावी यासाठी तुम्हाला जे काही बलिदान द्यायला लागलं तरी ते हसत हसत देण्याच्या तयारीलाच खरं प्रेम म्हणतात.
मग नाही तरी मुलांसाठी नोकरी सोडलीच आहे ना? मग ‘व्हाय नॉट एन्जॉय?’ त्यांना संध्याकाळी फिरायला, बाहेर खेळायला घेऊन जा. त्यांना घरीच तुम्ही स्वत:च शिकवा, गोष्टी सांगा, चित्रकला शिकवा, रंगवायची पुस्तकं आणा, वाचनाचा छंद लावा. शिकवणीला घालण्याऐवजी एखादा खेळ शिकवा, बॅडमिंटन, टेबल-टेनिस, पोहणे, टेनिस, क्रिकेट, त्यांची मानसिक आणि शारीरिक वाढ चांगली होऊ दे.
मे महिन्याच्या माझ्या लेखावर पुष्कळ पालकांनी असा प्रश्न विचारला होता की, स्वत:च्या धकाधकीच्या जीवनात मुलांच्या खाण्यापिण्याकडे एवढं लक्ष कसं द्यायचं? खरं म्हणजे, ही गोष्ट फार कठीण नाही. जर तुम्ही रविवारी सगळ्या आठवडय़ाचा मेनू नक्की केलात, त्याचप्रमाणे नाष्टा काय करायचा याची एक तालिका किंवा चार्ट बनवून ठेवला तर त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी सहज शक्य होतात.
माझ्या निदर्शनास येणाऱ्या जवळजवळ ५० टक्के बायका नुसत्या रेटून रेटून नोकरी करीत असतात. घरात आजी-आजोबा असतील तरी अनेक बायका मुलांना पाळणाघरात ठेवतात. आजी-आजोबांनी मुलांना वाढवलेलं आवडत नाही, असंही अनेक पालक बोलून दाखवतात. मी पालकांना एकच गोष्ट  सांगते, मुलं तुमची आहेत. त्यांना स्वत: वाढवा आणि जर वेळ नसेल तर मुलं होऊनच देऊ नका! पण येतो तो दिवस रेटत रेटत जाऊन वाढविण्यात काही अर्थ नाही! तुमचं मुलांशी घट्ट नातं नाही, अपेक्षा मात्र आहेत! तुम्हाला त्यांच्यासाठी वेळ देता येत नाही याचा प्रश्नच नाही, मुलांनी मात्र सुस्वभावी, हुशार, गुणी असायलाच हवं.
एक साधं लॉजिक बघा हा, तुम्ही जसं बी पेराल, त्याला जसं खतपाणी घालाल, जमीन जशी कसाल तसंच पीक उगेल ना? जर तुम्ही चांगलं बी पेरलंच नाही, मेहनतच घेतली नाही, तर पीक चांगले येईल याची अपेक्षा ठेवणं चूक की बरोबर?
मुलांशी संवाद असावा.त्यांच्याशी बोलण्यासाठी तुमच्याकडे खूप वेळ असायला हवा. मी नेहमी लोकांना सांगते, क्वालिटी टाइम नाही, क्वॉन्टिटी टाइम हवा. करियर, नोकरी सगळं होऊ शकतं, मिळू  शकतं. खूप चांगल्या पद्धतीचं आयुष्य नंतरसुद्धा मिळतं. मला स्वत:ला याचा अनुभव आहे. माझ्या मुलाला नीट वाढविण्यासाठी मी करियरला मागे टाकलं, मुलाचं बालपण खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं आणि आज यशाच्या शिखरावरही पोहोचले आहे. मुलाशी इतकं छान नातं आहे की, त्याच्या चेहऱ्याच्या हावभावांवरून त्याच्या मनात काय चाललंय हे बरोबर ओळखते. त्याच्या सगळ्या कामांत त्याला १०० टक्के सपोर्ट, त्याच्या पद्धतीने, माझ्या पद्धतीने नाही! मी काही सुपरवुमन नाही! मग मला साध्य होत असेल तर वाचकहो, तुम्हाला का होणार नाही? फक्त केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे!!!