सावळ्या दर्शन दे रे। Print

शैलजा भा. शेवडे ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

दर्शनासाठीची रांग पुढे सरकत राहते आणि एका सुंदर क्षणी त्या सावळ्या परब्रह्माचं साजिरं रूप आपल्याला दिसतं. मन अक्षरश: आनंदविभोर होऊन जातं. हृदय आनंदानं उडय़ा मारू लागतं. डोळ्यांत पाणी येतं. हात-पाय थरथरू लागतात. अहाहा..! किती सुंदर ते रूप..! शरीराला सहस्र डोळे फुटतात, ते रूप साठवून घेण्यासाठी. हा क्षण संपूच नये..
पंढरपूरच्या त्या सावळ्या विठ्ठलाचं गारूड ज्या मराठी मनावर नाही, ते मन शोधून सापडणार नाही.  विटेवर उभा असलेला पांडुरंग, कटीवर हात ठेवलेला पांडुरंग किती विविध रुपं.. तो चंद्रभागेतीरी जमलेला भक्तांचा मेळा, त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे अतीव आनंदाचे कारंजे.. छे! आज ना उद्या आपण आषाढी एकादशीला पंढरपूरला जायलाच पाहिजे. असा विचार परत परत डोकं वर काढू लागतो. एक तळमळ मनात निर्माण होते आणि ओळी स्फुरतात,
टेकावे जरासे, देवळाच्या दारी,
शिणला हा भारी, जीव वाटे।
शब्द बापुडे हे, काथ्याकूट किती,
काळ दावी भीती, कोठे जावे।
हिणवती सारी, म्हणती अडाणी,
वाळवंटी पाणी, कोण देई।
फिटले फिटले, भ्रम सारे सारे,
जोशातले नारे, आता नाही।
विटले हे मन, पुरे वणवण,
दावी रे चरण, पांडुरंगा।
ते समचरण बघायचंच. त्याच्यावर डोकं ठेवायचं. त्या पंढरपूरला, भूलोकीच्या वैकुंठाला जायचेच. पंढरपूरला ‘नादब्रह्म असलेलं क्षेत्रही म्हणलं जातं. किती सुंदर कल्पना- विठ्ठलभक्त अखंड नामसंकीर्तनात रंगलेला असतो. नादातून कीर्तन आणि कीर्तनातून भक्तिभाव प्रकट होतो. भगवंताच्या नावात आणि भगवंतात कोणतेही अंतर नाही. हरिनाम हा दिव्य ध्वनी असतो आणि पंढरपुरात तर सर्वत्र विठ्ठलनामाचा गजर चालू असतो. जेव्हा दिंडी येते तेव्हा लाखो वारकरी एकाच चालीवर, एकाच टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर ताल धरून श्री विठ्ठलाचे गोडवे गातात. हे नादब्रह्म म्हणजे पंढरीस सदैव चालू असलेले ‘श्रवणम, कीर्तनम, संकीर्तनम’ आहे. इथली प्रधानता नामाची आहे. वाळवंटात असो, गल्लीत सर्वत्र कीर्तन, गीत, नृत्य आणि नामाचा जयघोष सुरू असतो.
आणि जिथं भक्तीने भगवंताचं नाव घेतलं जातं, तिथं भगवंत असतोच.
छे! हा अनुभव ‘याचि देही याचि डोळा’ घेतलाच पाहिजे. आपल्या घरात राहून परमेश्वराचे चिंतन करतोच आपण. पण लाखो भक्तांच्या सान्निध्यात जेव्हा तेच परमेश्वराचे नाव त्यांच्या सुरात सूर मिसळून घेतो, तेव्हा तो अनुभव अवर्णनीय असतो.

नको नको मज, मोक्ष मुक्ती काही,
सावळ्याच्या ठायी, चित्त राहो।
भागली भागली, हौस संसाराची,
ओढ सावळ्याची, लागी मना।
आहे असे वाटे, देह माझा येथे,
मन मात्र तेथे, पंढरीला।
भक्तीचा कल्लोळ, वैष्णवांची दाटी,
चंद्रभागेकाठी, धावे मन।
विटेवरी उभा, कटीवर कर
नितांत सुंदर रूप त्याचे।
बोलावून घे रे, रुक्मिणीच्या राया,
आयुष्य हे वाया, जाते वाटे।
जोपर्यंत तो सावळा बोलवत नाही, तोपर्यंत ही तगमग तगमग होतच राहते. मग एकदाचा योग येतो. पंढरपूरला जाण्याचा. मन भक्तिभावानं भरून जातं. हे लाखो वारकरी.. भक्तीची पालखी घेऊन जात आहेत.

भक्तिभाव लेऊनी, चालली ही पालखी,
राहू दे मला असे, अनोळखी, अनोळखी।
कशास सांगू नाव गाव, विरक्त युक्त देहभाव,
शोधीते मी मूळ आज, जन्म जन्म ओळखी।
वाटतो गवसला, सूर तो मनातला,
ताल देई हृदय ते, नकोत आज ढोलकी।
गंध येतसे नवा, कस्तुरी अबीर का,
हासती निनादती, असुनी पानं वाळकी।
लाखो वारकऱ्यांत आपली ओळख हवी कशाला सांगायला? किती ओढीने, गळ्यात माळ घालून विठ्ठलनामाचा अखंड गजर करीत पंढरीला येतात. चालत चालत- ऊन-पाऊस कशाची तमा करत नाहीत. सर्व भक्त एकमेकांना ‘माऊली’ म्हणतात. एकमेकांच्या पाया पडतात. मी श्रेष्ठ, मी मोठा हा भाव तिथं नाही. सगळे फक्त विठ्ठलभक्त.
दर्शनासाठी ही मोठी रांग..! खूप जण कळसाचंच दर्शन घेतात. तरी हट्टी मन म्हणतं, पंढरपूरला आलोय, तर विठ्ठलाचं दर्शन घेतल्याशिवाय जायचं कसं? कितीही वेळ लागो, दर्शन घ्यायचंय. रांगेत उभं राहिल्यावर तिथल्या वातावरणानं विठ्ठलमय झालेलोच असतो. शीण वाटत नाही. पण भात शिजेपर्यंत वेळ असतो. भात निवेपर्यंत नाही. तसंच. मग दर्शनाची व्याकुळता वाढत जाते.

सावळ्या, दर्शन दे रे, सावळ्या, दर्शन दे रे।
व्याकुळला जीव हा रे, सावळ्या दर्शन दे रे।
तिष्ठले मी दारापाशी, जाणुनी घे, हे हृषीकेशी,
आर्त हाक ऐक ना रे, सावळ्या दर्शन दे रे।
कोलाहल हा माणसांचा, घाबरा रे जीव माझा,
ओळखीचा फक्त तू रे, सावळ्या दर्शन दे रे।
विसरून गेले, मी घरदारा, सोडुनी आले सर्व पसारा,
नातीगोती, सगेसोयरे, सावळ्या दर्शन दे रे।
क्षण क्षण आता, युग युग वाटे, डोळ्यामध्ये पाणी दाटे,
प्राण आले कंठाशी रे, सावळ्या दर्शन दे रे।
रांग पुढे सरकत राहते आणि एका सुंदर क्षणी त्या सावळ्या परब्रह्माचं साजिरं रूप आपल्याला दिसतं. मन अक्षरश: आनंदविभोर होऊन जातं. हृदय आनंदानं उडय़ा मारू लागतं. डोळ्यांत पाणी येतं. हात-पाय थरथरू लागतात. अहाहा..! किती सुंदर ते रूप..! शरीराला सहस्र डोळे फुटतात, ते रूप साठवून घेण्यासाठी. हा क्षण संपूच नये..
छे! हा आनंद शब्दात काय वर्णावा? याचा अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी पंढरपूरला आषाढी एकादशीला जायलाचं हवं.

दुमदुमली ती असेल पंढरी,
हरीच्या जयजयकाराने
भिजून गेली असेल भीमा,
भोळ्या भक्तिभावाने।
कुठे कीर्तने, सुखसोहळे ते भजन विठ्ठलनामाचे,
शरीरे ती अनेक असतील,
एक हृदय ते भक्तांचे।
ते सावळे रूप पाहण्या आतुर आर्त अंत:करणे,
विठ्ठल तहान, विठ्ठल भूक,
विठ्ठल ठावे भागविले
अष्टसात्त्विक भाव जागवती,
रूप सावळे मनोहर,
शब्दच थिजती वर्णन करण्या,
अनुभव येई खरोखर।