मित्रसखा पाऊस Print

पुष्पा चिं. जोशी ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आपल्या आयुष्यातल्या अनेक उन्हाळ्यांमध्ये ‘कुणीतरी’ मित्रसखा पाऊस होऊन आलेलं असतं. अचानक उमटलेल्या इंद्रधनूच्या प्रकाशात मार्ग सापडलेला असतो. मनाचा गाभारा श्रावणाच्या  सोनेरी प्रकाशाने उजळून जातो. जीवनचक्र उत्साहाने मार्गक्रमण करतं. आता सरणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण उन्हाळा सोसणाऱ्या दुसऱ्या अनेकांसाठी सावली देणारं झाड व्हायचं असतं. श्रावण होऊन सोनेरी प्रकाशाची वाट दाखवायची असते.
बारामधून चार वजा केले तर बाकी शून्य राहील,’ असे उत्तर चतुर बिरबलाने दरबारामध्ये एका विद्वानाच्या प्रश्नाला दिले आणि बादशहाची शाबासकी मिळविली. वर्षांच्या बारा महिन्यांतून पावसाचे चार महिने काढून टाकले तर साऱ्या जीवसृष्टीचा आधारच नाहीसा होईल, अशी वस्तुस्थिती बिरबलाने कथन केली. या जीवनदायी, सृजनशील पर्जन्यराजाच्या वाटेकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असतात.
‘आभाळ भरून आलंय, आता पाऊस पडेल’ असं वर पाहात म्हणावं, तो ते रिकामे काळे ढग वाकुल्या दाखवीत पळून जातात. कधी पावसाचे टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली म्हणून छत्री उघडावी तर प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडावा, एवढाच पाऊस पडतो आणि छत्री मिटावी लागते. तर कधी तो ‘किती बाई या पावसानं लावियली रिमझिम,’ असं म्हणायला लावतो. खूप वाट पाहिल्यानंतर मात्र तो द्रुत लयीतील संगीतासारखा बरसत राहतो. ढगांच्या नादावर, विजेच्या तालावर तनमनाला सुखविणाऱ्या पर्जन्यकलिका नाचत बागडत भूमीवर अवतरतात.
पाऊस आपला बालपणापासूनचा सखा-सोबती! पावसाळ्यात घरातल्यांची नजर चुकवून छत्री न घेताच शाळेत जायचं, खेळायला पळायचं, मैत्रिणींबरोबर पावसात भिजायचं, रस्त्यावरील खड्डय़ांत आणि कडेला साचलेल्या पाण्यात दगड टाकून त्यात उठलेल्या तरंगलहरी पाहायच्या. कागदाच्या होडय़ा सोडून शर्यती लावायच्या. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पेट्रोलचे थेंब पडून नाना रंगांचे तवंग तयार होत तेसुद्धा कौतुकाने पाहात बसायचे. गॅलरीच्या कठडय़ाच्या खालच्या बाजूला पावसाच्या थेंबांच्या माळा लटकायच्या. ते थेंब मोती म्हणून हातात गोळा करायचा खेळ खेळायचा. कधी रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दिव्यांचा उजेड त्या थेंबांवर पडायचा. वाऱ्याच्या झुळकीबरोबर रंगीबेरंगी लोलकासारखे ते थेंब डुलायचे.
आयुष्यातले पावसाळे हळूहळू वाढू लागतात. पावसाळ्यातले ढग मनाला अनामिक हुरहुर लावतात. इंदिरा संत, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, शांताबाई शेळके यांच्या कविता आपल्याच भावानुभवांना शब्दरूप देत आहेत असे वाटत या दिवास्वप्नांचे धुकं मनाला वेढून बसतं. पावसाळ्यांची संख्या वाढत जाते आणि स्वप्नातून सत्यात यावे लागते. घर, संसार, नोकरी यांच्या पसाऱ्यात हरवून जाताना मनातल्या कवितेची संगत सुटत जाते. तरीही बाल्कनीतून दिसणारा, कोसळणारा पाऊस पाहात, हातात कॉफीचा मग आणि वाचायला छान पुस्तक ही मनातली कल्पना कधीतरी अट्टहासाने अमलात आणली जाते.
पाऊस आणि छत्री यांचं नातं अतूट असतं. आचार्य अत्रे यांच्या ‘छत्री गे मानितो तुला मी माझी खरी माऊली, कृपेची करीशी बरी साऊली’ या कवितेत रस्त्यातून जाताना नको असलेल्या माणसांना टाळण्यासाठी, रस्त्यावरील गाई, म्हशी, कुत्रे यांच्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी, घेणेकऱ्यांची नजर चुकविण्यासाठी असे छत्रीचे अनेक मजेशीर उपयोग सांगितले आहेत. लेडीज छत्री डोक्यावर घेणे म्हणजे केवळ ‘लोक काय म्हणतील?’ म्हणून डोक्यावर घेतलेले मानसिक समाधान असते. बरसणाऱ्या पावसापासून संरक्षण तर होत नाहीच, शिवाय शेजारून चालणाऱ्याच्या छत्रीवरून ओघळणाऱ्या धारांनी, उरला-सुरला कोरडा भागही भिजतो. अर्थात आपली छत्रीही हे काम इमानेइतबारे करीत असते.
पूर्वीच्या छत्र्या म्हणजे एकजात हरिण छाप छत्र्यांचा हलता-डुलता काळा कळप. वाढत्या वयात चालताना आधारासाठी त्या छत्र्या उपयोगी पडायच्या तशाच दुसऱ्यांच्या फुलझाडांच्या फांद्या ओढून देवपूजेसाठी फुले गोळा करायलाही त्या उपयोगी पडायच्या. हल्लींच्या छत्र्या प्रसन्न रंगांच्या आणि सुंदर डिझाइनच्या असतात. शाळा सुटल्यावरचे लहान मुलांचे रंगीबेरंगी रेनकोट आणि त्यांच्या आयांच्या हातातल्या नाना रंग डिझाइनच्या छत्र्या पाहिल्या म्हणजे भोवतालच्या हिरव्या झाडांच्या बगीच्यात विविध रंगी फुलेच फुलली आहेत असे वाटते.
कोसळणाऱ्या पावसाबरोबर, पावसाळ्यातल्या अनेक आठवणींनी मन चिंब भिजून जातं. लग्न झाल्यावर आम्ही आगाशीला म्हणजे पश्चिम रेल्वेच्या शेवटच्या विरार या स्टेशनच्या पुढे तीन किलोमीटरवर राहात होतो. एका पावसाळ्यात ऑफिस सुटल्यावर चर्चगेटला गाडी पकडली, तेव्हा चांगलाच पाऊस सुरू झाला होता. वसईपर्यंत बऱ्याचजणी उतरून गेल्या होत्या. पावसाचा जोर वाढलेलाच होता. गाडीच्या दरवाजा-खिडकीतून पाऊस आत घुसत होता. बाहेर नुसता काळोखाचा समुद्र पसरलेला होता. कसेबसे विरार स्टेशन आले. छत्र्या, साडय़ा सावरत, कोसळणाऱ्या पावसातून एस. टी.मध्ये जाऊन बसलो. तीसुद्धा सगळीकडून गळत होती. जेमतेम पाच मिनिटं जाऊन एस. टी. गपकन् थांबली. खाली उतरून पाहिलं तर एक भला मोठा वृक्ष रस्त्याच्या या कडेपासून दुसऱ्या कडेपर्यंत आडवा उन्मळून पडला होता. एस. टी. पुढे जाणं शक्यच नव्हतं. त्यावेळी साधे काळे फोनही फार थोडय़ा घरी होते. सेलफोनचा तर प्रश्नच नव्हता. झाडाच्या फांद्यांमधून मार्ग काढीत पलीकडे झालो आणि सर्वाबरोबर पदयात्रा सुरू झाली. थंडीने अंग कुडकुडत होते. भिजल्यामुळे नीट चालता येत नव्हते. अखेरीस कसेतरी घरी पोहोचलो. घरोघरी लोक ओटीवरच्या कंदिलाच्या उजेडात ‘आपल्या माणसांची’ वाट पाहात होते.
दुसऱ्या दिवशी शनिवार होता. म्हणजे ऑफिस अर्धा दिवस होतं. पाय दुखत होते. न जाऊन चाललं असतं. पण आम्हाला तर जायचंच होतं. त्याचं कारण मात्र मजेशीर होतं. त्या काळी खूप गाजलेला ‘संगम’ हा सिनेमा प्लाझाला लागला होता. राज कपूर-राजेंद्रकुमार आणि वैजयंतीमाला यांच्या भूमिका असलेला. यांनी दीड तास लाईनीत उभं राहून ही शनिवारची तिकिटं काढली होती. मग काय? निघालो पुन्हा दुसऱ्या दिवशी. पण आज नशीब चांगलं होतं. एस. टी. त्या झाडापर्यंत गेली. झाड तोडण्याचं काम चालू होतं. त्यातून चालत जाऊन पुन्हा दुसरी एस. टी. मिळाली. अर्धा दिवस ऑफिस आणि सिनेमा दोन्ही साध्य झालं.
साधारण पंधरा-वीस वर्षांपूर्वी आम्ही चारधाम यात्रेला म्हणजे बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री इथे गेलो होतो. यमुनोत्रीसाठी गढवाल निगमच्या बसने हनुमान चट्टीपर्यंत गेलो. तिथून जानकी चट्टीपर्यंतचा खूप चढावाचा जंगलातील रस्ता चढायचा होता. (आता बसेस जानकी चट्टीपर्यंत जातात.) दुपारी दोन-अडीच वाजता आम्ही चढायला सुरुवात केली. तेव्हा आकाश निरभ्र होते. चार वाजता अकस्मात सारे बदलून गेले. हां हां म्हणता चारी बाजूंनी काळे ढग चाल करून आले. गारांचा पाऊस आणि सोसाटय़ाचा वारा सुरू झाला. थंडीने अंग काकडू लागले. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा दाट काळोख, वारा आणि पाऊस होता. डावीकडील दरीतून अंधार चिरत येणारा रोरावणाऱ्या यमुनेचा आवाज जिवाचा थरकाप करीत होता. बरोबरच्या ग्रुपमधील कोण कुठे होते याचा पत्ता नव्हता. सारेच विलक्षण वाटत होते. एका पहाडी माणसाने आम्हाला खूप मदत केली. ‘आस्ते चलो, प्रेमसे चलो, विश्वाससे चलो’ असे सांगून धीर दिला. रस्ता दाखविला. सोबत केली, वाटेत कुणी त्याचा गाववाला भेटला की दोघं एकमेकांना ‘जय जमुनामय्या’ असे अभिवादन करीत. सर्वजण कसेबसे थकून-भागून, संपूर्ण भिजून गढवाल निगमच्या जानकी चट्टीच्या निवासस्थानी पोहोचलो. कोणी कुणाशी बोलण्याच्या मन:स्थितीमध्ये नव्हते. तिथल्या माणसाने जी खिचडी वगैरे दिली ती खाऊन ओल्या कपडय़ातच कशीबशी उरलेली रात्र काढली. पहाटे लवकर उजाडले. सूर्याच्या सोनेरी किरणांनी पर्वतांच्या माथ्यावरचे बर्फ सोन्यासारखे चमकू लागले. इतके सगळे शांत आणि स्वच्छ होते की, कालचे वादळ ‘तो मी नव्हेच’! म्हणत होते. फक्त आजूबाजूला कोसळलेल्या वृक्षांवरून कालच्या वादळाची कल्पना येत होती. पुढचा बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्रीचा प्रवास आनंददायी होता. पण अजूनही यमुनोत्रीची ती अद्भुत पावसाळी रात्र आठवतेच!
अनेक अनुभव घेत पावसाळे सरतात. अमुकइतके पावसाळे पाहिले असं म्हणण्यापेक्षा इतक्या पावसाळ्यांनी आपल्याला काय आणि किती शिकवलं हे महत्त्वाचे असते. आपल्या आयुष्यातल्या अनेक उन्हाळ्यांमध्ये ‘कुणीतरी’ मित्रसखा पाऊस होऊन आलेलं असतं. अचानक उमटलेल्या इंद्रधनूच्या प्रकाशात मार्ग सापडलेला असतो. मनाचा गाभारा सोनेरी श्रावणाच्या प्रकाशाने उजळून जातो. जीवनचक्र उत्साहाने मार्गक्रमण करत. आता सरणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण उन्हाळा सोसणाऱ्या दुसऱ्या अनेकांसाठी सावली देणारं झाड व्हायचं असतं. श्रावण होऊन सोनेरी प्रकाशाची वाट दाखवायची असते.