छुपके से आजा रें अखियन् में.. Print

संकेत सातोपे ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आपल्या रोजच्या धावपळीच्या जगण्याची दुसरी बाजू म्हणजे शांत झोप. ही झोप जेवढी सहज आणि शांत तेवढं तुमचं आरोग्य चांगलं. मेंदूला तरतरीत बनवणारी, शरीराच्या वाढीला मदत करणारी ‘आदर्श झोप’ घेतली नाही तर तुम्ही निद्राविकार टाळूच शकत नाही, तर काही वेळा मृत्यूही टाळू शकत नाही. आरोग्यदायी राहायचं असेल तर शांत झोपेला पर्याय नाही..

‘सॅ प इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रंजन दास! अतिशय उमदं व्यक्तिमत्त्व! वयाच्या चाळिशीतही पंचविशीचा उत्साह बाळगणारी व्यक्ती! आरोग्याच्या बाबतीत दास यांनी कधीही हयगय केली नाही़  उत्तम आरोग्यासाठी आवश्यक सर्व तो आहार, आवश्यक तो व्यायाम अशा गोष्टी त्यांनी आयुष्यभर कसोशीने पाळल्या होत्या़  अगदी चेन्नई मॅरेथॉन धावण्याइतपत त्यांची प्रकृती दणकट होती़, पण २००९ सालच्या ऑक्टोबर महिन्यातलीच गोष्ट! नेहमीप्रमाणे व्यायाम करून दास घरी परतले आणि कुणाला काही कळायच्या आत धाडकन कोसळले तेच गतप्राण झाले. आरोग्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी अचूक आणि न चुकता करत असूनही असं झालंच कसं? हा प्रश्न अवघ्या कॉर्पोरेट जगताला भेडसावत होता आणि शेवटी या प्रश्नाच्या धक्कादायक उत्तराने तर कॉर्पोरेट विश्व हादरूनच गेल़े आरोग्याचा र्सवकष विचार करणाऱ्या दास यांनी आरोग्याच्या ‘झोप’ या अत्यंत महत्त्वाच्या अंगाकडे प्रचंड दुर्लक्ष केलं होतं.  ते वर्षांनुवष्रे अवघ्या चार तासांची झोप घेत होत़े
झोप हा विषय आपल्याकडे प्राचीन काळापासून अभ्यासला गेला आहे, परंतु सध्याच्या आधुनिक काळात त्याकडे म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही़  माणसाचे श्रम कमी व्हावेत, त्याला उसंत मिळावी, ही यंत्रनिर्मितीमागील मूळ संकल्पना! मात्र यंत्रांमुळे माणसाला विश्रांती मिळण्याऐवजी त्याची कामे वाढली आहेत़  पूर्वी सूर्य मावळताच डोकं टेकणारा माणूस चंद्र मावळण्याची वेळ झाली तरीही संगणकासमोर बसून असतो़, कारण यंत्र थकत नाही, यंत्राला रात्रीची झोप लागत नाही, म्हणून माणूसही अहोरात्र कामाला जुंपून घेतो़  अर्थात निसर्ग-संलग्न शरीराला तो यंत्रपूरक झालेल्या बुद्धीच्या बळाने निसर्गद्रोही बनवितो आणि मग या विपरीत जीवनशैलीचे प्रकृतीवरील परिणामही भोगतो़  विपरीत जीवनशैलीचा सर्वाधिक फटका ‘झोप’ आणि ‘भूक’ या माणसाच्या सर्वात मूलभूत गरजांचा बसतो़  त्यातही दोनपाचदा डॉक्टरकडे चकरा मारायला लागल्या की, माणसं भूक या विषयाकडे थोडं लक्ष पुरवायला लागतात आणि काम करता- करता का होईना पोट भरलेलं राहील, याची काळजी घेतात़, पण झोपेच्या बाबतीत डॉक्टरही फार आग्रही नसतात आणि लोक तर त्याहूनही नसतात़  साधं उदाहरण घ्यायचं झालं तर, तापाने फणफणणारी व्यक्ती जेव्हा डॉक्टरकडे जाते, तेव्हा डॉक्टरकडे तिचा आग्रह हाच असतो की, कमीत कमी झोप येणारी औषधं द्या़  आम्हाला कार्यालयातही जायचंय.  वास्तविक झोप हेही आजारपणातील शरीराची झीज भरून काढणारं औषधच आहे, पण ते सध्याच्या जीवनशैलीमुळे आपल्याला मान्यच नसतं. व्यवस्थित झोप घेणाऱ्या माणसाला आपण झोपाळू किंवा आळशी म्हणतो आणि कमीत कमी झोपणाऱ्याला कष्टाळू!  रात्रीचा दिवस करुन कष्ट केले, हे आपल्याकडे कौतुकाने सांगितलं जातं.  त्याचं कारण रात्री केलेले कष्टच अधिक नजरेत भरतात. १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांनी तर दिवसभर अभ्यास करो न करो, रात्री जागरण केलंच पाहिजे, अशी पालकांचीही इच्छा असत़े  एकंदरीतच, कोणत्याही प्रकारचे श्रम- कष्ट यांचा कमी झोपेशी थेट संबंध लावण्याचा प्रघातच आपल्याकडे पडला आह़े  अगदी आपल्या प्रेयसीवरचं प्रेम व्यक्त करतानाही प्रत्येक रोमँटिक प्रियकराच्या तोंडून हमखास निघाणारे शब्द असतात ते म्हणजे, ‘‘मला तुझ्या आठवणीने रात्र- रात्र झोप येत नाही,’’ म्हणजे उत्कट किंवा आत्यंतिक प्रेमाचंही परिमाण कमी झोपेतच का? रात्रीच्या जागरणाविना जणू प्रेमाला परिपूर्तताच येत नाही़
हीच मानसिकता आणि व्यग्र जीवनशैली यांचा एकत्रित परिणाम म्हणून झोपेकडे दुर्लक्ष करण्याची आपल्याला सवयच लागत़े  निद्रा हा विषय आधुनिक भारतीय स्त्रीच्या बाबतीत तर कमालीचा दुर्लक्षिला जातो़  घरातील मुख्य स्त्री सामान्यत: सर्व जण झोपल्यावर सगळी कामे उरकून झोपते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्वात आधी उठत़े  उठल्यानंतर पुन्हा घरातली नि बाहेरची कामे आहेतच़  त्यातून ती जर गृहिणी असेल, तर कदाचित तिला दुपारी झोपायला वेळ मिळत असेल; परंतु नोकरी करणाऱ्या स्त्रीचे मात्र या अपुऱ्या झोपेमुळे खूपच हाल होतात. शिवाय मनुष्य हा निसर्गत:च दिनचर आह़े  त्यामुळे रात्री न मिळणाऱ्या झोपेची पूर्तता अगदी दिवसभर झोपूनही होऊ शकत नाही, असे निद्राविज्ञान तज्ज्ञांचे मत आह़े रात्रपाळीला काम करणाऱ्या बहुतेकांना याचा अनुभव येतो़
‘निद्राविज्ञान’ या विषयात संशोधन करणाऱ्या मुंबईतील मुलुंडस्थित आंतरराष्ट्रीय निद्राविज्ञान संस्थेचे तांत्रिक संचालक डॉ़  प्रसाद कर्णिक यांच्या म्हणण्यानुसार, योग्य झोपेकडे महिनोन् महिने दुर्लक्ष केल्याचे अनेक दूरगामी परिणाम माणसाला भोगावे लागतात़  कर्करोगाशी लढा देणाऱ्या पेशींची निर्मिती झोपेत होत असत़े  त्यामुळे सातत्याने कमी झोप घेणाऱ्या महिलावर्गाला कर्करोगाचा धोका अधिक असल्याचे परदेशात परिचारिकांवर झालेल्या एका संशोधनात दिसून आले आह़े . तसेच मधुमेह, चिंता, ह्रदयविकार, तणाव, आम्लपित्त, अर्धागवायू, उच्च रक्तदाब, स्मृतिभ्रंश अशा एक ना अनेक शारीरिक- मानसिक व्याधींना कमी झोप किंवा निद्राविकार थेट आमंत्रण देत असतात़
खरे पाहता माणसाला ६ ते ८ तासांच्या सलग झोपेची आवश्यकता असत़े  मात्र त्यातही व्यक्तिसापेक्षता असत़े  काहींना ६ तासांचीच झोप खूप वाटते, तर काहींना ८-१० तासांची झोपसुद्धा अपुरी वाटत़े  त्यामुळे ज्या सलग झोपेनंतर माणसाला उरलेले सर्व तास काम करण्याचा उत्साह राहतो आणि डोळ्यांवर झापड येत नाही़  तितकी झोप त्या माणसासाठी ‘आदर्श झोप’ आहे, असे म्हणता येईल, पण ही झोप सलगच असावी लागत़े  लहान मुलांना अधिक झोप लागत़े  मात्र त्यांची झोप सलग नसत़े  ती टप्प्याटप्प्यांमध्ये विभागलेली असत़े  इतर प्राणिमात्रांचेही असेच असत़े  सामान्य माणसाचे मात्र असे नाही़
मानवी निद्रेचे काही टप्पे आहेत़  या प्रत्येक टप्प्याची काही वैशिष्टय़े आणि महत्त्व आहेत़  ८-१० तासांच्या सलग झोपेत हे टप्पे नियमित क्रमाने येतात आणि त्यांची सतत आवर्तने होत असतात़      झोपेचे प्रमुख दोन भाग आहेत़
१) रॅपिड आय मोशन (आरईएम)- झोपेचा हा सुरुवातीचा टप्पा आह़े  यात स्नायू पूर्णपणे शिथिल असतात़  मात्र मेंदू दीडपट अधिक कार्यरत असतो़  या झोपेचे प्रमाण सामान्यत: एकूण झोपेच्या २५ टक्के असत़े
२) नॉन-आरईएम- हा झोपेचा दुसरा टप्पा थकवा पूर्ण भरून काढणारा असतो़  यालाच आपण गाढ झोप असे म्हणतो़  या वेळी मेंदूही शांत असतो आणि त्यातील झोपेचा भाग पूर्णपणे कार्यरत झालेला असतो़  याचे प्रमाण ७५ टक्के असत़े
नॉन-आरईएमचे एन-१, एन-२, एन-३ असे तीन टप्पे आहेत़  यापैकी तिसरा आणि शेवटचा टप्पा अतिशय महत्त्वाचा असतो़  त्याला सौंदर्यनिद्रा किंवा आपण साखरझोप असेही म्हणतो़  यात वाढीची संप्रेरके स्रवतात़
कमी झोप घेणे किंवा झोपेकडे दुर्लक्ष करणे, हा सध्याच्या जीवनशैलीचा दोष आह़े  मात्र काहींना योग्य झोप घेण्याची इच्छा असूनही झोप येत नाही़  तिथे निद्राविकार असण्याची शक्यता असत़े  झोप व्यवस्थित न येणे हा विकार नसून निद्राविकाराचे एक लक्षण आह़े  वास्तविक झोपेचे विकार हे निद्रानाशापुरतेच मर्यादित नाहीत, तर झोपेचे तब्बल ८२ विकार असल्याचे डॉ़  कर्णिक सांगतात़  त्याचे प्रमुख तीन भागांत विभाजन करता येईल़  १) कमी झोप, २) अतिझोप, ३) झोपेदरम्यानचे विकाऱ  
१) कमी झोप- या भागात निद्रानाशाचा प्रामुख्याने समावेश होतो़  ताणतणाव, झोपेच्या अनियमित वेळा, अतिश्रम आदी अनेक कारणांमुळे कमी झोपेचे विकार जडू शकतात़
२) अतिझोप- जागेपणी काम करणारे आणि झोपविण्यासाठी काम करणारे अशी दोन केंद्रे मानवी मेंदूत असतात़  यापैकी झोपविण्याचे काम करणारे केंद्र जर सतत किंवा अधिक कार्यरत असेल, तर सतत झोप येणे किंवा डुलकी घ्यावीशी वाटणे, असे त्रास संभवतात़  यालाच ‘नार्कोलेप्सी’ असे वैज्ञानिक नाव आह़े  रात्री व्यवस्थित झोप होऊनही अशा व्यक्तींना दिवसभर पेंग आल्यासारखे वाटत़े  यातही पुन्हा अनेक उपप्रकार आहेत़  काहींना ठराविक वेळेच्या अंतराने पेंग येते आणि काही मिनिटे झोप काढल्यानंतर पुन्हा तरतरी येते,  तर काहींना डुलकी काढूनही तरतरी येत नाही़  डोके जड होत़े
३) झोपेदरम्यानचे विकार - झोपेच्या विकारांतील सर्वाधिक विकार हे झोपेदरम्यानचे आहेत़  झोपेत पाय हलविणे, चालणे, बोलणे, दात चावणे, इतकेच काय घोरणे हाही निद्राविकारच आह़े  या सर्व गोष्टी चांगल्या किंवा शांत झोपेवर परिणाम करतात़  घोरणे हे श्वसनाला अवरोध होत असल्याचे लक्षण आहे, असे निद्राविज्ञान मानत़े
निद्राविज्ञान संस्थेत आलेल्या काही रुग्णांचे डॉ़  कर्णिक यांनी उदाहरण सांगितल़े  एक मध्यमवयीन रुग्ण दिवसभरात फारफार तर सलग अर्धा तास जागा राहू शकायचा़  त्यानंतर त्याला अचानक झोप यायची आणि ती त्याच्या आटोक्याबाहेरची असायची़  इतकी की, ही व्यक्ती चालता- चालताही मध्येच धाडकन कोसळून रस्त्यातच झोपायची़  एखाद्या बैठकीतही अचानक घोरायला लागायची़  मुंबईतीलच एका विद्यार्थ्यांचीही अशीच अवस्था होती़  वर्गात अभ्यास करताना किंवा पेपर लिहिताना त्याचा सतत डोळा लागायचा़  घरच्यांनी त्याला फार चोपलं, दटावलं, पण उपयोग शून्य! शेवटी हाही आजार असल्याचे लक्षात आलं़  आज योग्य उपचारांनंतर दोघेही चांगले जीवन जगत आहेत़
डॉ़  कर्णिक सांगतात, झोपेच्या या सर्वच विकारांवर उपचारही उपलब्ध आहेत़  काही औषधे, योग- स्वयंसूचना यांसारख्या समांतर उपचार पद्धती, योग्य व्यायाम आणि आहार, प्रकाश उपचार, झोप चाळवू न देण्यासाठी वापरण्यात येणारी काही यंत्रे, असे अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत़
अमेरिकेतील ‘अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन’ येथे झोप आणि झोपेशी संबंधित विकारांवर मोठय़ा प्रमाणात संशोधन सुरू आह़े  ही संस्था केवळ निद्राविज्ञान या विषयाला वाहिलेली आह़े  अमेरिकेत स्लीप मेडिसिन या विषयात एम़ डी़  झालेल्या डॉ़  अभिजित देशपांडे आणि त्यांच्या याच विषयात एमडी झालेल्या पत्नी डॉ़  प्राजक्ता देशपांडे, तसेच डॉ़  प्रसाद कर्णिक यांनी अशाच प्रकारची संस्था मुंबईत मुलुंडमध्ये सप्टेंबर २०१० साली स्थापन केली आह़े  निद्राविज्ञानाचे भारतीयीकरण हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आह़े  संस्थेत भारतीय समाजाच्या अनुषंगाने निद्रा, निद्राविकार आणि उपचार यावर संशोधन चालत़े  तसेच संस्थेत निद्राविकारांवर उपचारही केले जातात़
सध्या संस्थेत, कमी झोपेचे बौद्धिक कार्यक्षमतेवर होणारे परिणाम, निद्रानाश वा कमी झोपेचा गुणसूत्रांवरील परिणाम आणि  वैद्यकेतर उपचार पद्धतीचा झोप सुधारण्यासाठी आणि निद्राविकार बरे करण्यासाठी होणारा उपयोग या तीन विषयांवर संशोधन सुरू आह़े  मुंबई विद्यापीठाच्या जीवशास्त्र विभागाच्या ४ पीएचडीच्या विद्यार्थिनींनीसुद्धा या संशोधनात भाग घेतला आह़े  गतिमंद मुलांमध्ये निद्राविकाराचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर नाशिक येथील गतिमंद शाळेतील मुलांची तपासणी करून २२ मुलांवर संस्थेकडून विनामूल्य उपचार करण्यात आल़े  निद्राविकारावरील उपचारानंतर गतिमंद मुलांच्या वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडून आल्याचे संस्थेचे निरीक्षण आह़े  एकंदरीतच मानवी जीवनात निद्रेला अनन्यसाधारण महत्त्व आह़े  हे महत्त्व ओळखून त्याकडे योग्य लक्ष पुरविण्याची गरज संस्थेचे कार्य अधोरेखित करत़े.
कमी झोप घेणारे अनेक जण अल्पायुषी ठरलेले आहेत. म्हणूनच योग्य व्यायाम, आहार याचबरोबर योग्य झोप ही आजच्या लाइफ स्टाइलची, चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली म्हणता येईल.

पॉवर नॅप किंवा वामकुक्षी-
दुपारच्या जेवणानंतर एखादी डुलकी काढण्याला आपण वामकुक्षी असे म्हणतो़  सध्या तर कॉर्पोरेट क्षेत्रात या पॉवर नॅपिंगचे फॅडच आलं आह़े  काही पाश्चात्त्य डॉक्टरांच्या मते तर, दिवसभरात तीन ते चारदा वामकुक्षी घेतली, तर माणसाला झोपेची मुळी गरजच नाही़  मात्र डॉ़  कर्णिक यांच्या मते, हा अतिशय चुकीचा समज आह़े  पॉवर नॅप हा सलग झोपेला पर्याय होऊ शकत नाही़  जेवणानंतरच्या बडीशेप किंवा केशर विडय़ा इतकंच रात्रीच्या झोपेनंतर पॉवर नॅपला महत्त्व आह़े  ती फार फार तर १५ ते २० मिनिटांची असावी.