सुभी Print

स्मिता नाईक ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘आदमी न पाप करता है न पुण्य। आदमी वही करता है जो उसे करना पडता है।’ भगवतीचरण वर्माच्या कादंबरीतील हे वाक्य सुभीला चपखल बसणारे. आज उतारवयात तिची प्रकर्षांने आठवण येते आहे. कुठे असेल सुभी?
घरातली रोकड, दागदागिने चोरून पळून जाणाऱ्या किंवा मालकाचाच खून करून पळून गेल्याच्या बातम्या आपण रोजच पेपरात वाचतो, पण त्या दिवशी अशाच प्रकारची एक बातमी वाचून मला ‘सुभी’ची- माझ्या मोलकरणीची आठवण झाली.
तिचे नाव होते सुभद्रा, पण सगळेच तिला सुभी म्हणत. मला घरातले सगळेच काम करणारी एखादी मोलकरीण हवी होती. शाळेतल्याच किचनमध्ये काम करणाऱ्या एका बेअराबरोबर सुभी माझ्याकडे आली होती. बुटक्यात जमा होईल एवढीच उंची, किरकोळ अंगकाठी, केसांचा भला मोठा अंबाडा नि ठसठशीत लालभडक कुंकू लावलेली सुभी हात जोडून ‘नमस्ते बाई’ म्हणाली. मला बरे वाटले. थोडी फार जुजबी चौकशी करून मी सुभद्राला कामावर ठेवून घेतले.
मी शाळेत जाण्यापूर्वी तिला कामाला येणे शक्य नव्हते. मुले लहान होती तिची. मला तर कामवालीची निकड होतीच. मनात थोडी धाकधूक होत असतानाच घराची एक किल्ली मी सुभीच्या स्वाधीन केली. ती दहा वाजेपर्यंत यायची. कपबशा, पोळपाट-लाटणे धुण्यापासून घर नीट आवरून ठेवण्यापर्यंत सगळी कामे करायची. काम मात्र अगदी नीटनेटके व स्वच्छ! मला तक्रार करायचे कधी कारणच पडले नाही. शनिवार, रविवारी मला सुटी असे. त्या दिवशी काही जादा काम सांगितले तर सुभी आनंदाने करायची.
सहा-सात महिने अगदी व्यवस्थित गेले. मी सुभीवर सगळी जबाबदारी टाकून निर्धास्तपणे नोकरीत रमले होते. सुभीचा नवरा शिवरामही अधूनमधून घरी येऊन यांची बाहेरची काही किरकोळ कामे करायचा, पण एक दिवस मला जाणवले की, साबणाच्या पावडरच्या डब्यातली बरीच पावडर कमी झाली आहे. जाऊ दे, बाईने कशासाठी तरी वापरली असेल असे समजून मी दुर्लक्ष केले. दोन-तीन आठवडय़ांनी साखरेच्या डब्यातली साखर कमी झालेली माझ्या लक्षात आले. मी विचारात पडले, पण सुभीचा संशय मात्र आला नाही. दोन-तीन आठवडे गेले. एक दिवस कसली तरी अचानकच सुटी मिळाल्यामुळे दुपारी साडेबारा वाजताच घरी आले. स्वयंपाकघराला वळसा घालून मुख्य दाराकडे यावे लागे. स्वयंपाकघराला मोठी खिडकी होती- तीमधून आतले सगळे दिसत असे. मी सहज पडद्याच्या कोपऱ्यातून आत डोकावले. सुभद्रा तांदळाच्या डब्यातून तांदूळ काढून लुगडय़ाच्या ओच्यात घेताना मी बघितले. सुभीचे माझ्याकडे लक्षच नव्हते. मी थोडी खाकरले आणि बघितले तरीही न बघितल्यासारखे करून ‘‘सुभे, झाले का गं सगळे काम- आवरलं का सगळं?’’ असं विचारतच घरात शिरले. सुभी थोडी चपापली- मी बघितल्याचे तिच्या लक्षात आले आहे असे वाटले, पण ‘‘व्हय बाई, समदं झालं, जाते आता. लई येळ झाला वो बाई!’’ म्हणत सुभी घाईघाईने निघून गेली. घरातल्या वस्तूंना कसे पाय फुटत होते हे मला समजले, पण सुभीचा असा अनुभव कधीच आला नव्हता. खूपदा यांच्या खिशातले सुटे पैसे टीपॉयवरच राहून जात. माझे बदललेले सोन्याचे कानातले टॉप्स, रिंग्जस् इकडेतिकडे कुठेही मी ठेवत असे, पण एकही वस्तू कधीही इकडची तिकडे झाल्याचा वा हरवल्याचा अनुभव नव्हता. मग सुभद्राच्या बाबतीत आजच असे का घडले असेल? घरी काही अडचण तर नसेल? शिवरामही बरेच दिवसांत घराकडे फिरकला नव्हता. मनात अनेक बरे-वाईट विचार येत होते. ‘‘आपल्याला नोकरमाणसांची गरज आहे. एकदम सुभीला कामावरून काढून टाकू नकोस. थोडे दिवस जाऊ देत. बघू आपण काय काय होते ते!’’- माझ्या नवऱ्यानेही समंजसपणाची भूमिका घेतली.
महिना संपला. एक तारखेला नेहमीप्रमाणे सुभीला पगार दिला. पैसे नेहमीप्रमाणे पटकन हातात न घेता ती खाली वाकली. माझे पाय पकडून हमसाहमशी रडू लागली. ‘‘सुभे,  काय झालं? रडतेस का?’’ - मी.
‘‘बाई, मला पगार नको. माज्या हातनं लई मोठ्ठी चूक झालिया. दोन म्हैनं झालं. माज्या नवऱ्याला काम न्हाई. पोरांची बऱ्याच येळा उपासमार झाली वं? माज्या लहानूला भात लई आवडतो. घरात आजाबात तांदूळ नव्हतं म्हणून मी डब्यातलं चार मुठी तांदूळ घेतलं वो! बाई, पण तुम्ही बघून सुदीक मला काय बी बोलला न्हाई! मला खरंच लई शरम वाटतीया. मला वाटत हुतं तुम्ही मला कामावरनंच काढून टाकाल. बाई, पुन्यांदा असं कंदी करनार न्हायी, पन मला कामावरून काढून टाकू नगासा. माजी पोरं उपाशी राहतील. सायबांनी मला ५० रुपै दिलं व्हतं त्ये बी हवं तर पगारातून कापून घ्या, पन मला कामावर येऊ द्या!’’  सुभीचे रडणे थांबेचना.
मी तिला समजावत म्हणाले, ‘‘सुभे, अगं, इतकी नड होती तर मला बोलली का नाहीस? मी तुला मदत केली नसती का? तुला गरज आहे तशी मलाही तुझी गरज आहे ना? झालं गेलं विसरून जा. पहिल्यासारखंच आनंदानं काम करत राहा.’’ मी तिला पगारापेक्षा थोडे जास्तीचे पैसे दिले. मुलांसाठी थोडा खाऊ बांधून दिला. पश्चात्ताप झालेली सुभी त्या दिवशी डोळे पुसतपुसतच घरी गेली.
काही दिवसांनी यांनीही शिवरामसाठी एक चांगली नोकरी बघितली. सुभी व शिवराम आमच्या कुटुंबातलेच सदस्य झाले. त्यानंतर त्या दोघांनीही आमच्या आजारपणात, सर्वच सुखदु:खाच्या प्रसंगांत आमची सर्वतोपरी मदत केली. सुभीच्या मुलीचे- स्वातीचे- लग्नही सुभी आमच्याकडे कामाला असतानाच झाले. निवृत्तीनंतर त्यांचा निरोप घ्यावा लागला. तेव्हाही आपल्या हातून पाप घडूनही या लोकांनी आपल्याला दयाबुद्धीनेच वागवले अशी कृतज्ञतेची भावनाच त्या दोघांच्या बोलण्यातून दिसून आली. सुभीचा जड अंत:करणानेच निरोप घेतला.
आता बरीच वर्षे झाली. पुण्यात आल्यावर नोकरांच्या उद्धटपणाचे बरेच अनुभव घेतले. चोरी, मग ती ५ रु.ची असो किंवा ५ कोटींची असो- पापच ते! य. गो. जोशींची एक कथा आठवते ‘अन्न आणि अन्न’- अपंग मुलासाठी अन्नाची चोरी करणारी स्वयंपाकीण! पोटाची भूक माणसाला कोणतेही पाप करायला प्रवृत्त करत असेल त्याला पाप कसे म्हणायचे? भगवतीचरण वर्माच्या ‘चित्रलेखा’ कादंबरीतले एक वाक्य आठवते- ‘आदमी न पाप करता है न पुण्य। आदमी वही करता है जो उसे करना पडता है।’
आता उतारवयात कष्टाचे काम होईनासे झाले आहे. सुभीची खूपदा आठवण येते. शेवटी पाणावलेल्या डोळ्यांनी मी दिलेल्या साडीच्या घडीवरून हात फिरवणारी सुभीची प्रतिमा माझ्याही डोळ्यांसमोरून धूसर होऊ लागते. कुठे असेल सुभी आता?