॥ सद्गुरूची लेक॥ Print

डॉ. प्रतिभा कणेकर ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

नामाच्या बळावर देही असून मुक्त झालेल्या मुक्ताबाई, जनाबाई आणि बहेणाबाई या  संतपरंपरेतील तिघीजणी. दीर्घकाळ मूक राहिलेल्या स्त्रियांना सद्गुरूंनी संवादाची ताकद दिली. त्या स्व-संवाद करू लागल्या, जनांशी संवाद करू लागल्या, कारण त्यांचा गुरूंशी संवाद निर्माण झाला आणि त्यांचा विठ्ठलाशीही संवाद सुरू झाला. या संवादातूनच त्यांनी देवाला मनुष्यत्व बहाल केले व त्यांचा संतत्वाकडे प्रवास सुरू झाला..  आजच्या आषाढी एकादिशीनिमित्त तसेच ३ जुलैला साजऱ्या होणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त या गुरु-शिष्यांविषयी..
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात आषाढी आणि कार्तिकी एकादशी या दोन तिथींना अपरंपार महत्त्व आहे. या तिथींना महाराष्ट्रभरातील लाखो भाविक आपल्या जिव्हाळ्याच्या दैवताला, विठ्ठलाला भेटायला पंढरपुरी येत असतात. वारकरी संप्रदायाचा हा आचारधर्मच मानावा लागेल. अकराव्या शतकात निवृत्तीनाथांनी वारकरी पंथ महाराष्ट्रात रुजवला. गुरुप्रेरणेने निवृत्तीनाथांनी महाराष्ट्रात ‘नाथवारकरी’ संप्रदायाची  वेगळीच वाट निर्माण केली. आपले गुरू गहिनीनाथ यांनी ‘विठ्ठल हे श्रीकृष्णाचेच रूप’ असल्याचे गुज आपल्याला सांगितले असे निवृत्तीनाथ म्हणतात. त्यांनी लावलेला हा ‘मोगऱ्याचा वेलु’ मग गगनावेरी पोहोचला. या पंथाने त्या काळात एकीकडे संन्यासमार्ग, तपश्चर्या, व्रतवैकल्ये यांचे महत्त्व कमी केले व दुसरीकडे तत्कालीन समाजाची धर्मश्रद्धा बळकट करताना आध्यात्मिक क्षेत्रात वर्णजातिविरहित समतेची प्रस्थापना केली. व्यक्तिमानसात आत्मोद्धाराची प्रेरणा जागवताना भक्ती व नामसंकीर्तन यावर भर दिला. शुद्ध चारित्र्य, सहिष्णू वृत्ती या नतिक मूल्यांची कास धरताना वैश्य, शूद्र, स्त्रिया यांचा परमार्थाच्या क्षेत्रातील अधिकार मान्य करून नव्या सामाजिक मूल्यांचीही महाराष्ट्राला ओळख करून दिली. संतपरंपरा वाढली. मोठी झाली त्यातल्याच मुक्ताबाई, जनाबाई आणि बहेणाबाई या तिघींनीही संतसाहित्यात मोलाची भर घातली, आपल्या विचारांनी अनेकांना नवी दृष्टी दिली. आपल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवत भक्तीचा ‘बहरु कळीयासी’आणला..
 निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव-सोपान या आपल्या धाकटय़ा भावंडांबरोबर मुक्ताबाई या आपल्या धाकटय़ा बहिणीलाही गुरुमंत्र दिला; त्यामुळे मुक्ताबाईंचे अवघे जीवन तर उजळलेच परंतु त्यांच्यापासून वारकरी संप्रदायातील स्त्रीसंतांची एक परंपरा उभी राहिली. मुक्ताबाईंना लौकिक आयुष्य लाभले ते केवळ अठरा वर्षांचे. त्यांचा काळ इ.स. १२७९ ते १२९७ हा होय. गुरुकृपा झाल्यामुळे आपले जीवन कसे बदलून गेले ते मुक्ताबाईंनी अनेक अभंगांतून सांगितले आहे. ‘मी सद्गुरूची लेक’ या पदामध्ये त्या म्हणतात, ‘‘गुरुकृपा झाली आणि माझे ‘मीपण’ निमाले, संतसंग घडला, गुरूने गुह्य सांगितले व ‘जन्ममरण नाही’ असा भाव मनात उदेला.’’ त्या म्हणतात, ‘‘ऊर्णाच्या (कोळ्याच्या) गळ्याला दोरी बांधावी आणि त्याला घरी जाता येऊ नये तशी आपली अवस्था झाली होती, मी अंध वाया जात होते,’’ अशा वेळी गुरूने आपल्याला सावध केले.             
निवृत्तीने दिली शक्ती। चित्त पावले विश्रांती
विसाविया आले मन। मन जाहले उन्मन
धन्य जीविताची थोरी। एकविध चराचरी
भास मावळला ठायी। सुखी झाली मुक्ताबाई
असे ‘देणे’ लाभल्यावर, आदिअंती, सर्वाघटी हरी भरून राहिला आहे, हा अनुभव आल्यावर, रामनामाने चित्त ओसंडून गेल्यावर त्यांनाही सहजच उपदेशाचा अधिकार प्राप्त झाला. नामदेवांना त्यांनी ‘‘अखंड जयाला देवाचा शेजार। का रे अहंकार नाही गेला’’ म्हणून खडसावले. ‘‘आधी तू मुक्त होतासी रे प्राणिया। परी वासने पापीणिया नाडिलासी, तेव्हा आता वासना टाकून एका नारायणाची चाड धर,’’ असे जनांना बजावले; एवढेच काय, मांडय़ांसाठी खापर आणायला गेलेल्या ज्ञानदेवांचा कुणी मूढाने अपमान केला म्हणून ताटी बंद करून बसलेल्या त्या योगियांच्या राजाची ‘‘जीभ दातांनी चावली। कोणे बत्तीशी तोडिली। मन मारूनि उन्मन करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा’’ अशी समजूत त्यांनी घातली. ‘चौदाशे वरूषे’ शरीर जतन करून ठेवलेल्या चांगदेवांनी ज्ञानदेवांना कोरे पत्र पाठवले तेव्हा ‘अजून हा कोराच’ असे म्हणून त्यांना फटकारले आणि मुक्ताबाई त्यांची गुरुमाउली झाल्या. निर्गुणाचे डहाळीवर चांगया बाळाचा पाळणा बांधून त्यात त्यांनी त्याला जोजवले. निवृत्तीनाथांनी आपल्याला दिलेले देणे त्यांनी चांगदेवांपर्यंत पोहोचवले. एका अभंगात त्या म्हणतात,
व्यक्त अव्यक्ताचे रूपस मोहाचे। एकतत्त्व दीपाचे हृदयी नांदे।
चांगया फावले फावोनी घेतले। निवृत्तीने दिधले आमुच्या करी।।
परमार्थाचाच प्रपंच करणारी ही सद्गुरूची लेक!
अत्यंत लहान वयात त्यांनी केवढी आध्यात्मिक उंची गाठली! नामाच्या बळावर ती देही असून मुक्त झाली आणि हरिनामपाठाचाच मंत्र त्यांनी अवघ्या जनांस दिला.
मुक्ताबाईंच्या समकालीन असलेली दुसरी सद्गुरूची लेक म्हणजे जनाबाई. त्यांचा काळ अंदाजे इ.स. १२६५ ते १३३५ होय. गंगाखेडच्या दमा व करुंड या दांपत्याची ही मुलगी. ती लहान असतानाच तिच्या आई-वडिलांनी तिला नामदेवांच्या वडिलांकडे आणून सोडली आणि ती त्या कुटुंबातील एक होऊन गेली.
ज्ञानदेव-नामदेव यांचे संवाद ऐकता ऐकता जनाबाईंच्या मनात ईश्वरभक्तीची अनावर ओढ निर्माण झाली. ‘‘नोवरीया संगे वऱ्हाडीया सोहळा। मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न’’ तसा संतांच्या सहवासातून आपल्याला भक्तीचा प्रसाद मिळाल्याचे त्या सांगतात. त्यांना मुक्ताबाईंप्रमाणे गुरुमंत्र लाभला नाही; परंतु ‘‘सखा विरळा ज्ञानेश्वर। नामयाचा जो जिव्हार ।।   ऐशा संता शरण जावे। जनी म्हणे त्याला ध्यावे।।’’ किंवा ‘‘नामदेवाला सापडले माणिक। घेतले जनीने हातात॥’’ अशा त्यांच्या उद्गारांवरून ज्ञानदेव-नामदेवांना त्यांनी गुरू मानले असे दिसते. ‘‘ज्ञानाचा सागर। सखा माझा ज्ञानेश्वर’’ असे त्या एका अभंगात म्हणतात. त्यांच्या अभंगांतून त्या ‘नामयाची दासी जनी’ अशी आपली नाममुद्रा देतात. नामदेवांकडून आपल्याला ‘ठेवणे’ लाभले आणि विटेवरच धन सापडले अशी त्यांची भावना आहे. ‘‘नवल वर्तले नवल वर्तले नवल गुरूचे पायी। कापूर जळूनी गेला तेथे काजळी उरली नाही’’ सद्गुरूकृपेने आपली अशी अवस्था झाली
असे त्या सांगतात. त्या संत आणि देव एकरूपच मानतात.
विठ्ठलाची त्यांची प्रत्यक्ष जवळीक! किती? विठ्ठलाशी त्या प्रेमाने बोलतात, त्याच्याशी भांडतात, विठ्ठल त्यांच्या डोईच्या उवा काढतो, आंघोळीच्या वेळी त्यांना विसावणाला पाणी देतो, त्यांना न्हाऊ घालतो, दळण-कांडणात मदत करतो; इतकी. म्हणून त्या म्हणतात,
देव खाते देव पिते। देवावरी मी निजते
देव देते देव घेते । देवासवे व्यवहारिते ॥
देव येथे देव तेथे । देवाविणे नाही रिते
जनी म्हणे विठाबाई । भरूनी उरले अंतरबाही
आपले अनुभवाचे बोल जनांस ऐकवत ऐकवत त्या त्यांस बोधही घडवतात. सत्त्व-रज-तमाने बांधलेले, अहंकाराने दृढ झालेले माझे शरीर होते; पंढरीरायाच्या भक्तीला भुलून ते विठ्ठलाचे चरणी अर्पण झाले. मी नामाचा उत्सव केला आणि सर्व सुखे माझ्या पायाशी लोळू लागली. माझा जन्म धन्य झाला, माझा वंश धन्य झाला. ‘‘तेव्हा जनहो लक्षात घ्या, ‘जैसी वांझेची संतती’ तसा हा संसार फोल आहे म्हणून विठ्ठल आठवा. पंढरीच्या वाटेने विवेकाची पेठ उघडते ते ध्यानी घ्या. हे नश्वर शरीर जाणारच आहे, तेव्हा ‘‘आहे नाही देह । ऐसा धरी भाव?’’ असे त्या एका अभंगात सांगतात,
‘‘भृंगीचिये अंगी कोणते हो बळ। शरीरे अनाढळ केली आळी।’’ अळीने अशी तपमुद्रा धारण केली तेव्हा ती भृंगी होऊ शकली. म्हणून ‘‘अरे बा शहाणिया’’, तसा जप कर. संतयोगाने पाप नाहीसे होते, असा ‘‘नामयाची जनी डांगोरा पिटतेय’’ ते लक्षात घे. असे त्या नानापरीने, कळवळ्याने जनांस सांगत आहेत.
निवृत्ती-ज्ञानदेव-नामदेवांनी उलगडलेली ही भक्तीची वाट नामसंकीर्तन, कीर्तन, पंढरीची वारी यातून पुढील अनेक शतके आत्मोद्धारासाठी तळमळणाऱ्या जिवांसाठी मार्गदर्शक ठरली. या वाटेवरील सतराव्या शतकातील आणखी एक सद्गुरूची लेक म्हणजे बहेणाबाई. बहेणाबाई कुलकर्णी. सासरच्या त्या पाठक. ‘‘देवगाव माझे माहेर साजणी’’ अशी सुरुवात करून त्यांनी आपले आत्मचरित्र लिहून ठेवले आहे. त्यांचा काळ इ.स. १६२८ ते १७००. त्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांचा तीस वर्षांच्या ‘द्वितीय संबंधी’ वराशी विवाह झाला. लग्नाला घेतलेले कर्ज फेडता न आल्याने जावयाच्या सल्ल्यावरून बहेणाबाईंचे माहेरचे कुटुंब या दोघांसह गाव सोडून नाशिक, पंढरपूर, कोल्हापूर असे फिरत राहिले. या काळात बहेणाबाईंना नामसंकीर्तन, भागवत पुराण यांची गोडी लागली. जयरामस्वामी वडगावकरांच्या कीर्तनांचाही त्यांना लाभ झाला. त्यांचा पारमाíथक अधिकार जयरामस्वामींनी जाणलाही होता, परंतु लोकांकडून त्यांची होणारी निंदा ऐकून पतीही त्यांना मारहाण करू लागला, त्यावेळी त्यांचे वय होते अठरा वर्षांचे. एकदा मारहाणीने चार दिवस त्या बेशुद्ध पडल्या, सावध झाल्या आणि त्यांना हरिकथा स्मरू लागल्या, तुकोबांचे अभंग मनात घोळू लागले ‘‘तुकोबाची भेटी होईल तो क्षण। वैकुंठासमान होय मज’’ अशी तुकोबांच्या भेटीची त्यांना आस लागली. ‘‘त्यांची देहाकृती विठ्ठलची’’ हेही जाणवू लागले
सातव्या दिवशी तुकोबा स्वप्नात आले. त्यांनी गीता हाती दिली, मस्तकी कर ठेवला, कर्णरंध्री मंत्र सांगितला. मात्र यामुळे संतापलेल्या पतीने गृहत्याग करायचे ठरवले. अशावेळी त्या विठ्ठलालाच शरण गेल्या, स्वत: तुकोबांनी ब्राह्मणवेशाने येऊन पतीची समजूत घातली, उभयता देहूला गेले. तेथे तुकोबांचा त्यांना प्रत्यक्ष अनुग्रह लाभला, तुकोबांच्या आनंदओवरीत या जोडप्याने काही काळ वास्तव्य केले, तुकोबांच्या वैकुंठगमनानंतर हे कुटुंब शिऊरास गेले, त्यांना काशी व विठ्ठल अशी दोन अपत्ये झाली. विठ्ठलाने नंतर त्यांचे शिष्यत्व पत्करले. प्रपंच-परमार्थ एकरूप करून त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर त्यांनी ‘गगन झेलले.’ आयुष्याच्या उर्वरित काळात कीर्तने करून त्यांनी जनांस बोध केला.
अशा या बहेणाबाईंनी गुरुकृपेचा आनंद ‘‘सुख सुखावले कोणा सांगू गे माये’’, ‘‘स्व-रूप कोंदले दशदिशा’’, ‘‘दिवस ना राती, प्रकाश ना ज्योती। तेथे निजवस्ती केली जीवे’’ अशा वेगवेगळ्या परींनी व्यक्त केला आहे. भक्तांनाही त्या सांगतात की, सद्गुरूला शरण जा, मग वेद शास्त्र पठण, तप-व्रत-अनुष्ठान, तीर्थ क्षेत्र यात्रा, योग याग प्राणायाम, संन्यास, ब्रह्मचर्य हे काही लागत नाही. मात्र गुरूशिवाय मोक्ष प्राप्ती नाही. अरे प्राण्या, तू ‘पाचांचे उसने’ शरीर घेऊन आला आहेस, तर स्वहित साध. अंतर निर्मळ नसले तर तीथ्रे हिंडून फळ मिळणार नाही. संतसंग धर, नामसंकीर्तन कर. तुकाराम-एकनाथांप्रमाणेच बहेणाबाईंनीही फुगडी, पिंगा, हमामा, हुंबरी, िझपा अशा खेळगाण्यांमधून अध्यात्म मांडले आहे. एका हिंप्यात त्या म्हणतात,
‘‘करूणेचे बोल माझे नको करू फोल। धरी भक्तिभाव जेणे वसे ज्ञानवोल?
पंढरीचे पेठे सखये सुख आहे मोठे। धाऊनिया जाय बाई सर्व पांग फिटे?’’
अशा या सद्गुरूच्या लेकी.
खरे तर तिघींची जीवने वेगवेगळी. मुक्ताबाई विरक्त योगिनी, जनाबाई एका मोठय़ा हरिभक्त कुटुंबातील दासी आणि बहेणाबाई एक प्रापंचिक; मात्र तिघींची आयुष्ये लौकिकार्थाने अभावात्मक. परंतु सद्गुरूकृपेने त्यांना जीवनव्यवहारातून अलिप्त होता आले. आपले जीवन आपल्यापुरते त्यांनी अतिशय सुंदर, समृद्ध व आनंददायी करून घेतले.
‘‘स्त्री जन्म म्हणऊनी न व्हावे उदास’’ किंवा ‘‘तेथे सर्वाग सुखी झाले। िलग देह विसरले?’’ म्हणणाऱ्या जनाबाईकडे पाहिले, ‘‘अवघाची संसार केला आम्ही गोड’’ म्हणणाऱ्या मुक्ताबाईकडे आणि संसार तापाने तापलेल्या बहेणाबाईंचे तुकोबांना उद्देशून ‘‘तू माझी माउली मी तुझे बाळक। करितसे कौतुक नामी तुझे? तू माझी गाउली मी तुझे वासरू। करितसे हुंकारू नामी तुझे?’’ हे उद्गार पाहिले की सद्गुरूकृपेमुळे त्यांच्या पारंपरिक जीवनदृष्टीत आमूलाग्र परिवर्तन झाल्याचे लक्षात येते.
दीर्घकाळ मूक राहिलेल्या या स्त्रियांना सद्गुरूनी संवादाची ताकद दिली. त्या स्व-संवाद करू लागल्या, जनांशी संवाद करू लागल्या कारण त्यांचा गुरूंशी संवाद निर्माण झाला आणि त्यांचा विठ्ठलाशीही संवाद सुरू झाला. या संवादातूनच त्यांनी देवाला मनुष्यत्व बहाल केले व त्यांचा संतत्वाकडे प्रवास सुरू झाला.
आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट घडली. सद्गुरूनी कृपा केली आणि या भक्त स्त्रिया विलक्षण निर्भय झाल्या. परमेश्वर भेटीची जी अनावर ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली त्यामुळे एरवी सदासर्वकाळ सांस्कृतिक दबावाखाली असलेल्या या स्त्रियांनी मोठय़ा धीटपणाने आपली ही ओढ व्यक्त केली. ओव्या गाताना मुक्ताबाईने जाहीर केले की, ‘‘निर्गुण सोयरा पर्णियेला’’ ,‘‘परपुरूषा रतले जीवेभावे’’. जनाबाईने डोईचा पदर खांद्यावर आला तरी पर्वा केली नाही, ‘‘जनी म्हणे देवा मी झाले वेसवा। रिघाले केशवा घर तुझे ’’ असे ती म्हणू लागली. बहेणाबाई दोन अपत्यांची आई. तीही ‘‘माझियाहो मने घेतला उच्चाट। पहावे वैकुंठ पंढरी हे’’ अशी आपली भावना बोलू शकली. त्या काळात धीटपणे ब्राह्मणत्व जन्माने ठरत नाही हे सांगू शकली.
सद्गुरूच्या कृपेने या स्त्रियांना आनंदाचे लेणे लाभले व त्यांचे आध्यात्मिक जीवन उजळून निघाले हे तर खरेच, परंतु सद्गुरूकृपेने या संत स्त्रियांच्या मनाला जे मुक्तीचे आश्वासन मिळाले, त्यामुळे अनंतकाळ बंदिस्त असलेल्या एकूणच स्त्रीमनालाही मुक्तीचे आश्वासन मिळाले.