अवघे पाऊणशे वयमान Print

alt

आरती कदम , शनिवार , ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एक ७२ वर्षांच्या तर दुसऱ्या ८२ वर्षांच्या आजी. रसरशीत जगणं जगणाऱ्या. नुकत्याच बंगळुरू येथे ‘इंडिया मास्टर्स अ‍ॅथलेटिक असोसिएशन’ने भरवलेल्या आंतरदेशीय शंभर मीटर धावणे, गोळाफेक, भालाफेक आणि थाळीफेक स्पर्धेत सुवर्ण वा रौप्य पदक पटकावलेल्या. स्वत:साठी असं जगतानाच समाजातल्या लोकांसाठीही आयुष्य वेचणाऱ्या या दोन आजींविषयी..
त्या दोन आजी. ‘अवघे पाऊणशे वयमान’ साजरं करणाऱ्या. अर्थात हे वाक्य त्यांना तितकंसं चपखलपणे बसत नाही कारण एक आजी, शैलाताई टिळक आहेत पाऊणशेपेक्षा जरा कमी म्हणजे ७२ वर्षांच्या तर दुसऱ्या कुसुमताई जगलपुरे आहेत जरा जास्तच म्हणजे ८२ वर्षांच्या. पण ‘अवघे’ हा शब्द अगदी त्यांच्यासाठीच बनवला आहे अशा या दोघी. एकदम खळाळतं व्यक्तिमत्त्व असणाऱ्या आणि प्रचंड उत्साही. त्यांच्यात आणखीही साम्यं आहेत, या दोघी आजही सामाजिक कार्यात मग्न तर आहेतच पण त्याही पलीकडे, बंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या ‘इंडिया मास्टर्स अ‍ॅथलेटिक असोसिएशन’ने भरवलेल्या आंतरदेशीय स्पध्रेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या गटात सुवर्ण वा रौप्य पदक पटकावलेलं आहे. या स्पर्धा होत्या शंभर मीटर धावणे, गोळाफेक, भालाफेक आणि थाळीफेक. इतकंच नव्हे तर नोव्हेंबरमध्ये तवान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पध्रेच्या तयारीलाही त्या लागल्या आहेत..
साठी झाली की, आता फक्त आराम करायचे दिवस, आमचं काय उरलंय आता किंवा अगदीच टोकाचं म्हणजे आता उरलेला प्रत्येक दिवस बोनसच, अशा मनोवृत्तीच्या  माणसांसाठी हे झणझणीत अंजन आहे. आम्ही भेटलो शैलाताई टिळक यांच्या मुंबईतल्या चेंबूरच्या घरी. माझ्या मागोमागच ८२ वर्षांच्या कुसुमताई आल्या नि माझ्याबरोबरच तीन मजले चढून माझ्यापुढे घरात शिरल्याही होत्या. दादरवरून (साधारण तासाभराचं अंतर) एकटय़ा आलेल्या कळल्यावर मी चकित झालेच. पण त्यानंतर त्या दोघींच्या कहाण्या ऐकत असताना थक्क होऊन ऐकणं एवढं एकच काम माझ्या हाती उरलं होतं..
पहिल्यांदा अर्थातच मी वळले कुसुमताईंकडे. संयुक्त महाराष्ट्र लढय़ाची पाश्र्वभूमी असलेल्या त्यांच्या आयुष्यावर त्या अनुभवांचा दूरगामी प्रभाव पडला असल्याने आजही त्यांचं आयुष्य हे दुसऱ्यांसाठीच आहे. महापालिकेतील रुग्णव्यवस्था ज्या वर्गासाठी आहे त्यांना त्यांचा लाभ मिळतच नाही हे लक्षात आल्यावर रुग्ण आणि रुग्णालय यांच्यातल्या दुव्याचं काम त्या आजही करताहेत. आजपर्यंत, म्हणजे गेल्या पन्नास वर्षांत त्यांनी अक्षरश: हजारो लोकांना alt
याचा लाभ मिळवून दिलाय, देताहेत. त्यांच्या असंख्य आठवणींपकी काही त्यांनी आमच्या गप्पांमध्ये उलगडल्या. त्यातली ती घटना होती जुल १९६६ची. त्या सांगत होत्या, ‘‘दादर-माटुंगा परिसरात त्या दिवशी फारच मोठा रेल्वे अपघात झाला होता. शेकडो माणसं मेली. तेव्हा आकाशवाणीवरून मदतीची मागणी करण्यात आली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा अक्षरश: शहारा आणणारं दृश्य होतं. मृतदेहांची ओळख पटणं कठीण होतं. त्यात पाऊस. प्रवाशांच्या नातेवाईकांच्या झुंडीच्या झुंडी तिथे लोटल्या होत्या. या सगळ्यात कुणाचा पायपोस कुणाच्यात नव्हता. शेवटी आम्ही, कृष्णा देसाई, जे.एल. रेड्डी यांनी पुढाकार घेऊन मृतदेह एका रांगेत लावायला सुरुवात केली. रात्री अकरापर्यंत काम सुरूच होतं. त्यातल्या ८५ मृतदेहांची ओळख पटवण्यात आम्ही यशस्वी झालो. पण त्यादरम्यान आणखी एक बाका प्रसंग होता. रेल्वेमंत्री स.का. पाटील यांनी मृतांच्या नातेवाईकांना एक हजार रुपयांची मदत जाहीर केली. खरं तर हे सगळे प्रवासी तसे गरीब वर्गातलेच होते. पण जेव्हा मदत वाटायला सुरुवात केली तेव्हा ते चक्क पसे आमच्या अंगावर फेकायचे. ‘पसे कसले देताय, आमचा माणूस काय परत येणार आहे का?’ मग त्यांना समजवण्याची अवघड कामगिरी मीही काही अंशी पार पाडली. मी समजावलं, ‘माणूस गेला खरा, पण त्यानंतरही अनेक गोष्टी करायच्या असतात. त्यासाठी पसे लागणारच.. तुमच्या मुलांसाठी घ्या.. तेव्हा कुठे त्यांनी ते घेतले. आजही ही घटना आठवली तरी मन हळवं होतं, पण त्या वेळी अशा कामांची िझगच होती. शिवाय अहिल्या रांगणेकरसारखी मत्रीण होती. ती, मृणाल गोरे, तारा रेड्डी, विमल रणदिवे या सगळ्याच जणींबरोबर काम करताना जोश असायचा. पण मी कुठल्याही झेंडय़ाला स्वीकारलं नाही आणि राजकारणात जायला माझ्या पतीचा विरोध होता. ते म्हणत, तुझं हेच काम खूप महत्त्वाचं आहे आणि खरोखरच सांगते पुढे रुग्णसेवा हा माझा श्वास झाला.’’  केवळ नीट बोलता येत नाही. कपडे चांगले नाहीत म्हणून पालिका रुग्णालयाची सेवा घेता येत नसणारे असंख्य रुग्ण कुसुमताईंच्या पाहण्यात होते. त्यांचं काम त्या वेळी मांटुगा, दादर, धारावी या परिसरांत होतं. साहजिकच रूग्णांना सायन हॉस्पिटल, केईएम, शिवडी येथील टी बी रुग्णालयात नेणं, त्यांची डॉक्टरांशी भेट घालून देणं सुरू झालं.
 ‘‘माझं काम पाहून डॉक्टरांना थेट भेटण्याची अ‍ॅथॉरिटी मला देण्यात आली, अर्थात सुरुवातीला हे सेवाभावी असलं तरी पशांची तंगी असायचीच. त्या वेळी दोन मुलींची मी आई होते. मग अहिल्याताईंच्या सांगण्यानुसार मी तिथे पार्ट टाईम जॉब सुरू केला. डॉक्टरांना माझ्या कामाची कल्पना आली आणि माझ्यासाठी ‘गाईड ऑर्गनायझर’ असं पूर्ण वेळ कामाचं पद निर्माण करण्यात आलं. माझं आवडीचं काम असल्याने कामाचा कंटाळा नव्हताच. रात्री-बेरात्री रुग्णाबरोबर जावं लागे. वेळेचा हिशेब नसे, ना खाण्याचा. अनेकदा तर मी पाण्याने पोट भरलं आहे. पण रुग्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप मोठा होता.’’
‘‘कुसुमताई, हे आलं कुठून पण,’’ या माझ्या प्रश्नावर त्या पटकन म्हणाल्या,  ‘‘दु:खातून! वयाच्या आठव्या वर्षी आई वारली. माझ्यात अचानक आईपण आलं, पण माझं बालपण संपलं. नंतर बाबांनी आम्हा भावंडांना बोìडगमध्ये ठेवलं. तिसरीनंतर पुण्यातल्या हुजूरपागेच्या शाळेत गेले. तिथे मी चार वष्रे बॅडिमटन चॅम्पियन होते. पण दहावी झाले आणि बाबांनी माझं लग्न करून टाकलं. माझ्यातल्या खेळाच्या वेडाला तिथे विराम मिळाला. पण तो अर्धविराम असल्याचं मला कळलं ते वयाच्या पासष्टाव्या वर्षी.’’
पती गेल्यानंतर कुसुमताई आपल्या दोन मुलींकडे ठाण्याला किंवा नाशिकला राहायला  जात. आजही जातात. ठाण्यात ‘ज्येष्ठ नागरिक संघ’ आहे तेथे त्यांच्या भावाने नाव नोंदवलं आणि alt
कुसुमताईंच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं. त्यांची ५० वर्षांची खेळाची इच्छा अशी नकळतपणे पूर्ण झाली. दादोजी कोंडदेव स्टेडियमवर झालेल्या शंभर मीटर धावणे, भाला आणि गोळाफेक  स्पर्धेत त्या चक्क पहिल्या आल्या आणि त्यांचा आत्मविश्वास एकदम वाढला. त्यांनी आपलं खेळातलं नपुण्य अधिक धारधार करायला सुरुवात केली. आंतरराज्य, आंतरदेशीय आणि आतंरराष्ट्रीय स्पध्रेत भाग घेऊ लागल्या. इंडिया मास्टर्स अ‍ॅथलेटिकच्या स्पर्धेत सतत १५ वर्षे त्या विविध पुरस्कार मिळवीत आहेत. २०१० मध्ये इंटरनॅशनल अ‍ॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने पुण्याला बालेवाडी येथे झालेल्या भालाफेक, शंभर मीटर स्पध्रेतही त्यांनी भाग घेतला होता. तर १४ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत रौप्य पदक मिळवलं आणि आता वयाच्या ८२व्या वर्षी त्या पुन्हा एकदा तवानला होणाऱ्या स्पध्रेसाठी सज्ज आहेत. (मात्र प्रायोजक मिळाले तरच. माझा पसा खर्च करून मी जाणार नाही. तेवढे माझ्या रुग्णांना देईन असं त्यांचं म्हणणं.)
पण या वयात इतका स्टॅमिना कसा काय, यावर त्या म्हणाल्या, ‘‘कुटुंबाची सोबत, आत्मविश्वास आणि शिस्त. आजही मी रोज तीन ते चारमीटर चालते. सकाळी साधारण तासभर योगासनं, इतर व्यायाम करते..’’
कुसुमताईंप्रमाणेच शैलाताई टिळक यांनाही हीच शिस्त त्यांना विविध स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी आणि पुरस्कार मिळवण्यासाठी उपयुक्त ठरली. रोज पाऊण तास फिरणं, योगासनं, प्राणायाम आणि पंधरा सूर्यनमस्कार त्यांचा स्टॅमिना टिकवून ठेवायला मदत करतो. शैलाताईही पुण्याच्या आहिल्यादेवी हायस्कूलमध्ये आणि फग्र्युसन कॉलेजमध्ये चॅम्पियन होत्या. खोखो, लंगडी, हुतूतू आदी आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजविलेल्या होत्या. आईचं त्यासाठी प्रोत्साहन असे. गोळेफेक किंवा भालाफेकीनंतर दुखणाऱ्या खांद्यांना मालिश करणाऱ्या आईमुळेच त्या दुसऱ्या दिवशी तेवढय़ाच उत्साहाने क्रीडांगणात उतरत. पण लग्न झालं, मुलगा झाला आणि त्या संसारात रमल्या. पण अर्थात स्वस्थ बसल्या नाही. सदाशिव िनबाळकर आणि श्रीकृष्ण व्यवहारे यांच्याकडे त्यांचं योग प्रशिक्षण सुरू होतं. योग विद्या निकेतनशी त्या संलग्न होत्या. त्यात त्यांनी टीचर्स ट्रेनिंग कोर्स केला. नंतर निसर्गोपचारही शिकल्या.
पण त्याही पेक्षा त्यांचं वेगळेपण म्हणजे स्वत:हून वृद्धाश्रमात भरती होणं. एकदा त्या पती नरसिंह दामोदर टिळक यांच्याबरोबर खोपोलीजवळील जांभूळपाडा येथील आनंदधाम वृद्धाश्रमात सहज भेट द्यायला गेल्या होत्या. ‘‘तो वृद्धाश्रम आहे हे सांगूनही खरं वाटणार नाही. इतकं छान आहे,’’ शैलाताई सांगत होत्या. ‘‘इतकं छान वातावरण, तिथल्या लोकांचं आपापसातलं नातं, त्यांची घेतली जाणारी काळजी. मुख्य म्हणजे मुंबईबाहेर दूर, प्रदूषणविरहित ठिकाणी. चटकन मनात आलं, आपण का येऊ नये इथे राहायला? खरं तर वैद्य असणाऱ्या त्यांच्यात अन् सुनेमध्ये, भाग्यश्रीमध्ये अगं तुगं करण्याइतकं जवळचं, आई-मुलीचं नातं आहे. पण तरीही त्या दोघांनी निर्णय घेतला आनंदधाममध्ये जाऊन तिथल्या वृद्धांची सेवा करायचा. आजही त्या फक्त महिन्यातून एकदा घरी येतात. अर्थात मुलांना जेव्हा त्यांची गरज असते. सुनेला कुठे दौरा असेल, नातवांची काही गरज असेल, कौटुंबिक कार्यक्रम असतील तर त्या घरी येतातच. पण बाकी सगळा वेळ त्यांनी आनंदधामला दिला आहे. आम्ही सगळे जण खूप जवळचे झालो आहोत. सगळे सणवार करताना एकत्र असतोच पण अगदी जेवणाला मटार किंवा डाळिंब्या सोलायच्या असल्या तरी पुरुष-स्त्रिया सगळे एकत्र हॉलमध्ये बसतो. मग गप्पागोष्टींनाही पूर येतो. ताईंनी निसर्गोपचार आणि योगासनांचं प्रशिक्षण घेतलं असल्याने तिथल्या वृद्धांना आवश्यक योगासनं करवून घेण्याचं काम त्या श्री. गोडबोले यांच्या मदतीने करतात. रात्री-बेरात्री कुणाला रुग्णालयात दाखल करायची वेळ आली की, त्यांना हक्कानं सोबतीला बोलावलं जातंच. पण त्याशिवाय छोटीमोठी दुखणी असतातच. मग कुणाला अ‍ॅक्युप्रेशर, व्हायब्रेटर कुणाला चक्क लाटण्याचाही मसाज देतात. शिवाय रिलॅक्सेशनसाठी हेड मसाज आणि फेशल मसाज हे त्यांचं आवडीचं काम झालं आहे. इतकंच कशाला जेव्हा कुणी नवे वृद्ध या आश्रमात दाखल होतात तेव्हा बरेचसे मनाविरुद्ध आलेले असल्याने निराश असतात. अस्वस्थ असतात. त्यांना इतरांच्या मदतीने आपल्यात सामावून घेण्याचं कामही शैलाताई आवडीने करतात. त्या सांगतात, ‘‘साधारण चार-पाच महिने जातात त्यांना नॉर्मल होण्यात, पण होतात.’’ म्हणूनच ताई घरी आल्या तरी त्यांना जांभूळपाडय़ाची ओढ लागते. कारण तिथेही त्यांची वाट बघणारं कुणी असतं..
हे थोडं म्हणून की काय त्यांनी जांभूळपाडय़ातल्या शिक्षकांसाठी योगासन वर्ग सुरू केले आहेत, शिवाय संस्थापक विलास चाफेकर यांच्या वंचित विकास संस्थेसाठी निधी गोळा करण्याचं कामही त्यांनी पतीसह सुरू केलं, समाजातल्या वंचित गटासाठी ही संस्था काम करते. आत्तापर्यंत चार लाख रुपये त्यांनी मिळवून दिले आहेत. याशिवाय मराठवाडय़ातील परित्यक्ता, विधवांसाठी सुरू करण्यात आलेल्या महिला सबलीकरण केंद्रासाठीही त्या निधी गोळा करतात. शिवाय आधार सपोर्ट ग्रुपशीही त्या संलग्न आहेत. ज्यात त्यांच्या मुलानेही आíथक हातभार लावला आहे, इतकंच नव्हे तर त्यांच्या नातवाने - शंतनूने - स्कॉलरशिप म्हणून मिळणारे दरमहा सहाशे रुपये या कामासाठी दिले आहेत. संस्कारांचा वारसा असा पिढीतून वाहतो आहे..
या सगळ्या सामाजिक कार्याबरोबरच त्या मनापासून रमतात त्या बागकामात.  आनंदधाममध्ये साधारण दीड एकर जमिनीवर नर्सरी आहे. अप्पा टोळ आणि त्या तिथल्या रोपांवर मनापासून प्रेम करतात. एकदा कुणी तरी शैलाताईंना तुळस, पुदिना आणि निलगिरी या तीन रोपांचे गुणधर्म असलेली त्रिगुणी तुळस आणून दिली. रोप लावलं पण ते जळायला लागलं. म्हणून मग त्यांनी ते सावलीत लावलं तसं अगदी डेरेदार झालं. आपल्या आनंदधाममधल्या मित्रमत्रिणींना तुळशीची पानं वाटली. मग त्या काडय़ांचं काय करायचं तर त्यांनी त्या पुन्हा रुजवल्या तर त्यांची रोपं इतकी छान रुजली की, आत्तापर्यंत त्यांनी हजारांच्या वर रोपांची विक्री केली आहे. या शिवाय त्यांनी गांडूळखत प्रकल्पही हाती घेतला आहे. आनंदधामची लोकप्रियता खूप आहे. अनेक ठिकाणांहून माणसं तो बघायला येतात. परिसर छान असल्याने त्यांची ट्रिपही होते. त्या लोकांना या नर्सरीतील रोपे विकली जातात. गांडूळखत विकलं जातं. हे पसे अर्थातच आनंदधामला जातात. पण शैलाताई म्हणतात, ‘‘बागकाम करण्याचा आनंद काही वेगळाच. ते करून मी ताजीतवानी होते.’’ आणि हाच उत्साह त्यांना खेळायला भाग पाडतो. जेव्हा त्यांनी आंतरराज्य-देशीय स्पर्धामध्ये भाग घेतला तेव्हा धावणं, गोळा-भालाफेकीचा सराव करायचा होता. त्यांनी आनंदधामच्या व्यवस्थापक उषा टोळ आणि सचिव विनायक पालेकर यांची परवानगी घेतली आणि आवारातच सराव सुरू केला. इतकंच नाही तर परिसरातल्या शाळेत जाऊन तिथल्या मुख्याध्यापकांना भेटून तिथल्या गोळा-भाल्याची मागणी केली. मुलं जेव्हा वापरत नाहीत तेव्हा शैलाताई ते वापरतात. त्यामुळे त्यांचा सराव अखंड सुरू असतो. अलीकडेच त्या जेव्हा आंतरराज्य स्पध्रेत भाग घ्यायला बंगळुरूला गेल्या होत्या तेव्हा दुर्दैवाने व्यवस्था फारच वाईट ठिकाणी केली होती. अन्नही चांगलं नव्हतं. ताईंच्या सुनेने त्यांना बदाम-बेदाणा आदी सुक्या मेव्याच्या वडय़ा तयार करून दिल्या होत्या. त्यामुळे त्यांचा स्टॅमिना टिकला आणि दहाजणींमध्ये थाळी-भालाफेकीत पहिलं आणि धावण्यात, गोळाफेकीत दुसरं बक्षीस मिळवलं. साहजिकच आता त्या आंतरराष्ट्रीय स्पध्रेत भाग घेणार आहेत.
शैलाताईंच्या आयुष्यातली खेळाची ही दुसरी इनिंग चक्क ५२ वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात आली. तेव्हा जिंकायचंच हा त्यांचा निर्धार होता. आणि आयुष्यातल्या या निर्धारानेच त्यांना इतरांसाठी जगण्याचं बळ दिलंय..
आजही दोघीही तंदुरुस्त आहेत. स्वत:ची कामं स्वत: करतात. कुसुमताई तर स्वत:चे कपडे स्वत: धुतात आणि प्रसंगी (घरच्यांचा विरोध पत्करून) स्वत:चं जेवणही करतात. तर शैलाताई म्हणतात, आज जर एखाद् दिवशी कामवाली आली नाही तर या चार मोठय़ा खोल्या पुसून काढण्यापासून सगळं काम करण्याची धमक माझ्यात आहे.
ही धमक या वयात या दोघींमध्ये आली कुठून? या प्रश्नाचं उत्तर कुसुमताईंच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘ज्यांना थोडी जरी खेळाची आवड असेल त्यांनी वयाची पर्वा न करता मदानात उतरावं. म्हातारपणी जो उत्साहाचा गॅप पडतो तो पडू द्यायचा नाही, बघालच तुम्ही, आयुष्य नव्याने सापडेल..’’