पावसाळा नि भारंगीची भाजी Print

सुचेता  पावसकर , शनिवार , १४  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पावसाला सुरुवात झाल्यानंतर भारंगीची भाजी मिळू लागते. ही भाजी तशी खटपटीची. थोडी कडूसर चवीची, पण पावसाळ्यात किमान एकदा तरी खावीच. अतिशय चविष्ट!  एकदा मी माझ्या मुंबईच्या भाच्याला बोलले की, भारंगीची भाजी पुण्याला मिळत नाही. त्याने कुरिअरसाठीे ४० रुपये खर्च करून ही भाजी मला पाठविली.. आज तो नाही पण ती आठवण कायम राहिली..
पा वसाला सुरुवात झाल्यानंतर साधारण आषाढ महिन्यात कोकणात (आणि मुंबईलाही) भारंगीची भाजी मिळू लागते. ही पालेभाजी आहे. साधारणत: झाडाच्या कोवळ्या बोख्या तोडून आणलेल्या असतात. मी लहान असताना कोंडातील कुणबीण ही भाजी घेऊन यायची. त्या बदल्यात आजी तिला बागेतील नारळ, सुपाऱ्या, अठळया असं काही तरी द्यायची. तालुक्याच्या ठिकाणी ती भाजी विकत मिळत असावी. ही भाजी तशी खटपटीची. थोडी कडूसर चवीची, पण पावसाळ्यात किमान एकदा तरी खावीच. आम्ही आवडीने चवीने खातो. कारण ती लागतेच चविष्ट! पानांची मधील शीर (जून असेल तर) काढून टाकायची. सर्व पाने बारीक चिरून थोडी कढईत घालून झाकण ठेवून दोन मिनिटे वाफवायची. नंतर गरम असताना चुरायची व पिळून पाणी काढून टाकायचे नंतर उकडून घेऊन घट्ट पिळून घ्यायची व त्यात उकडलेले पावटे, चिरलेला कांदा, भरपूर ओले खोबरे. दैवज्ञ मसाला, मीठ, गूळ, हळद, हिंग सर्व भाजीला चोळायचे. कढईत तीन-चार पळ्या तेल घालून ठेचलेली लसूण लाल झाल्यावर त्यावर वरील मिश्रण घालून परतून झाकण ठेवून वाफ घ्यावी. झाकणावर पाणी ठेवावे दोन-तीनदा झाकण काढून परतावे. म्हणजे भाजी तयार. भाकरीबरोबर छान लागते. तांदळाचा रवाही या भाजीत घालण्याची पद्धत आहे. रवा घालून केलेल्या भाजीला ‘पलवा’ म्हणत. लग्न होऊन पुण्याला स्थिरावल्यावर ही भाजी क्वचितच मिळत असे. एकदा मी माझ्या मुंबईच्या भाच्याला बोलले की, आम्हाला भारंगीची भाजी खूप आवडते. पुण्याला मिळत नाही. आषाढाचा महिना होता. त्याचा फोन आला. कुरिअरच्या अमुक ऑफिसात जाऊन भाजी घेऊन या. त्यानेकुरिअरसाठी  ४० रुपये खर्च करून ही भाजी पाठविली होती. अर्थात ही गोष्ट दहा वर्षांपूर्वीची. आज तो भाचाही नाही पण त्याचे आगत्य, जिव्हाळा, प्रेम कायमचे मनावर कोरले गेले. तो स्वत: आला की बाळ मेथी, मुळ्याची भाजी, खेकडय़ाचे कालवण, उन्हाळ्यात ओले काजू असं आठवणीने आणत राहायचा.
बालपण कोकणात गेले, डोंगर आणि समुद्र किनारा तुडविण्यात. शिवाय गरिबीत पावसाळ्यात कोवळ्या टाकळ्याची व नंतर जून टाकळ्याची भाजी व्हायची. उन्हाळ्यात डोंगरातून कुडय़ाची फुले नंतर कुडय़ाच्या शेंगा आणून त्याची भाजी व्हायची. मार्च ते मेअखेर ओले काजूगर मिळायचे. एरव्ही फणसाच्या कुयरीची गऱ्या गोटय़ांची, केळफुलाची, केळ्यांची भाजी ही दारातलीच असे. आजोळचे गाव समुद्रकिनारी- हर्णे-मुरुड. समुद्रकिनाऱ्याला फिरून आम्ही भरतुल्या (खेकडय़ाचा प्रकार) गोळा करून आणत असू. समुद्रकिनारी मिळणारा आणखी एक प्रकार म्हणजे उबल्या! साधारण मसुराच्या आकाराच्या विविध रंगी शिंपल्या. त्या नेहमीच मिळतात असे नाही प्रत्येक लाटेबरोबर त्या किनाऱ्याच्या वाळूत सडा पडल्यासारख्या एक क्षणभर दिसतात. मग त्या गोळा कशा करायच्या! लाट किनाऱ्याला फुटताच गहू-ज्वारी चाळण्याच्या लोखंडी चाळणीत वाळू गोळा करायची व लगेच समुद्राच्या पाण्यात चाळण धरायची की वाळू खाली व उबल्या वर. अशा रीतीने उबल्या गोळा करून आणायच्या. त्या कच्च्या उबल्याच पाटय़ावर वाटून त्याचे पाणी गोळा करायचे ते खूप वेळा गाळून त्यातील कच काढून टाकून त्याचे पातळ कालवण केले जायचे. या कालवणात आत काहीच नसते. म्हणून त्याला आमच्याकडे उबल्याची कढी संबोधत आणि त्यावरून दोन ओळीही म्हटल्या जायच्या. उबल्याची कढी। सासुबाई वाढी। ... जावई भुरका मारी। ही कढी हिरवट लालसर रंगाची होते. कोकण सोडल्यावर या उबल्यांचा सडा मी कुठे पाहिला असेल? तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही. आम्ही २००३ साली अमेरिकेला मुलाकडे गेलो होतो. मुलगा, सून व नातू व आम्ही दोघे चार दिवस ओरलॅण्डोला गेलो होतो. डिस्नेलॅण्ड, युनिव्हर्सल स्टुडिओ पाहून झाल्यावर एक दिवस तेथील एका बीचवर गेलो. तेथे मला किनाऱ्याला प्रत्येक लाटेबरोबर पडणारा उबल्यांचा सडा दिसला. मला माझे बालपण आठवले. तो सडा पाहून मन हरखून गेले. माझ्या सुनेला त्या दाखवून गोळ्या कशा करतात हेही सांगितले.
लहानपणी आई, भाऊ व मी आम्ही तिघे करजगावला समुद्रकिनारी राहत होतो. माझी आई शिक्षिका होती. करजगाव व बुरोंडी या दोन गावांमध्ये खाडी आहे. समुद्राला ओहोटी असेल तेव्हा खाडीचे पात्र रिकामे असते. पाणी नसते तेव्हा जाडसर रेती करवंटीने उकरले की, त्यात लालसर रंगाच्या शिंपल्या मिळत असत. त्या मी गोळा करून आणत असे. शिंपले उकडून त्यातले गर व उकडलेले पाणी वापरून कांदा, दैवज्ञ मसाला, भाजके वाटण घालून कालवण केलं जायचं. हे पदार्थ आठवले की आठवतं ते लहानपण…