कायद्याशी मैत्री Print

पूर्र्वी कमानी , शनिवार , १४  जुलै २०१२
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ
’ मी एक ७२ वर्षांची गृहिणी आहे. कोकणात माझ्या वडिलांची वडिलोपार्जित प्रॉपर्टी म्हणजे बागायती व थोडी शेतजमीन आहे. सदर जमिनीला वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या भावांची नावे लागली आहेत. माझा विवाह सन १९५५ मध्ये झालेला होता. माझ्या पतीने निधन झाले असून माझा मुलगा आता माझा सांभाळ करतो. माझ्या विवाहावेळी असे कायदे नसल्याने वडिलोपार्जित प्रॉपर्टीला मुलीचे नाव लावता येत नाही असे सांगण्यात आले, ते खरे आहे का? आता काय करता येईल,याचे स्पष्टीकरण द्यावे.
-विमल फडके, विलेपार्ले
उत्तर- १९९४ मध्ये महाराष्ट्र सरकारने हिंदू वारसाहक्क कायद्यात सुधारणा करत मुलींना/महिलांना त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान वाटा असल्याचा अधिकार बहाल केला. फक्त तुमचा विवाह १९५५ साली झाला म्हणून या तुम्ही तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर अधिकार सांगू शकत नाही, असे अजिबात नाही. आता तुम्ही असे करा, तुमच्या भावांना नोटीस पाठवून तुमचा हिस्सा तुम्हाला देण्याबाबत विनंती करा. तुम्हाला या नोटीसच्या उत्तराची वाट पहावी लागेल. त्यांनी नोटिशीला उत्तर दिले नाही अथवा तुमचा हक्क नाकारला तर तुम्ही न्यायालयात केस दाखल करू शकता. या प्रकरणात तुमच्या भावांना तुमच्यासह वाटाघाटीचा पर्याय स्वीकारावाच लागेल. तुम्हाला नाही तर किमान तुमच्या मुलाला तरी त्याचा फायदा होईल. मात्र हा सल्ला देताना मी दोन बाबी गृहित धरल्या आहेत-१)तुमची शेतजमीन अजूनही तुमच्या भावांच्या नावे असून तिसऱ्या व्यक्तीसह जमिनीच्या विक्रीचा व्यवहार झालेला नाही.
२) १९९४ पूर्वी तुमच्या भावाने जमिनीचे आपापसात वाटण्या केलेल्या नाहीत.
तुम्ही चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या. कायद्याने तुमची केस मजबूत आहे.

’ माझ्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली असून मला अडीच वर्षांची मुलगी आहे. मी सरकारी कर्मचारी असून पत्नी गृहिणी आहे. पत्नी भांडखोर असून वारंवार मुलीला घेऊन माहेरी जाते. वाट्टेल तेव्हा येते-जाते. मी संध्याकाळी घरी परततो तरी ती रात्री ९ वाजेपर्यंत बाहेर फिरत असते. वेळेवर स्वयंपाक करीत नाही. ही बाब मी वेळोवेळी तिच्या आई-वडिलांच्या कानावर घातली. पण ते मलाच दोष देतात. उलट पत्नी माझ्याविरोधात माहेरच्यांचे कान भरते व माझी बदनामी करते. आतापर्यंत तिने तीन वेळा पोलीस ठाण्यात माझ्याविरोधात तक्रार केली असून माझ्या चांगल्या वर्तणुकीमुळे पोलिसांनी माझ्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. २४ मे २०१२ रोजी मी मुलीला घेऊन एका लग्नाला गेलो असता ती घरातून काही पैसे घेऊन माहेरी निघून गेली. मी तिच्या माहेरी आणायला गेलो असता तिने माझ्यासोबत येण्यास नकार दिला व मुलीला ठेवून घेतले. माझा प्रश्न- कुटुंबात व समाजात माझी बदनामी करणाऱ्या या सहचारिणीला घटस्फोट द्यावा काय? विभक्त होण्यास किती कालावधी लागेल? घटस्फोट दिल्यास मुलीचा ताबा कुणाकडे जाईल? ती चांगली शिकलेली असून विभक्त झाल्यास तिला पोटगी द्यावी लागेल का?
- अनिल निमगडे, अमरावती
उत्तर - तुमच्या पत्नीसह तुमचे संबंध तणावपूर्ण वाटत असल्याने घटस्फोट हाच पर्याय दुर्दैवाने तुमच्यासमोर आहे. याबाबत कुटुंब न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलाचा अवश्य सल्ला घ्या. मात्र तुम्ही व पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला तर साधारण एका वर्षांत तुमचा घटस्फोट होऊ शकतो. मात्र तुम्ही एकटय़ाने असा अर्ज केला तर अधिक कालावधी लागू शकतो. तुमची मुलगी अडीच वर्षांची असल्याने तिचा ताबा आईकडेच दिला जाईल. मात्र तिला भेटण्याचा अधिकार न्यायालयाकडून तुम्हाला निश्चित मिळू शकेल. मात्र कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीला मध्यस्थी ठेवून तुम्ही व पत्नी समोरासमोर बसून काही तोडगा निघतो का, असा प्रयत्न जरूर करून बघा. विभक्त होण्याशिवाय पर्याय नसेल तर पोटगी व मुलीच्या खर्चासाठी काही रक्कम परस्पर सामंजस्याने पत्नीला देण्याबाबत ठरवू शकता. मात्र तुमची पत्नी कमावती नसल्यामुळे तुम्हाला पोटगी द्यावीच लागेल. तुमचे उत्पन्न व संपत्ती यांचा विचार करून न्यायालयाकडून पोटगीची रक्कम निश्चित केली जाईल.

’ मी अभ्युदय नगर वसाहतीत राहतो. या इमारतीतील घरांना ऐसपैस गॅलरी, ऐसपैस जिने आहेत. शिवाय इमारतीच्या चारही बाजूंना मोकळी जागा व मैदानही आहे. या एकूण जागेच्या परिमाणानुसार मिळणाऱ्या ‘जादा एफएसआय’मध्ये एकच मोठे घर घेण्याऐवजी तेवढय़ाच जागेत दोन वेगळी, छोटी घरे उपलब्ध करून घेता येतील काय?
- भागोजी सैतवडकर, मुंबई
उत्तर - जर तुम्ही सध्या राहत असलेल्या इमारतीचा पुनर्विकास होत असेल तर संबंधित विकासकाकडे तुम्ही तुमच्या मागणीसंबंधी वाटाघाटी करू शकता. एका मोठय़ा घराऐवजी दोन लहान घरे हवीत, या मागणीसाठी तुम्ही विकासकाबरोबर वाटाघाटी करण्याला कायद्याचा कोणताही मज्जाव नाही. इमारतीतील एक सभासद विकासकासह अशी वाटाघाटी करणार आहे याबाबत कोणताही आक्षेप नाही, या अर्थाचा ठराव गृहनिर्माण संस्थेकडून संमत करून घ्या. सध्याच्या घराच्या क्षेत्रफळाइतकीच दोन घरे हवी असल्याचे जरूर नमूद करा.    
तुमचे  कायदेविषयक  प्रश्न थोडक्यात पाठवा या पत्त्यावर - ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा. This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it