नारीशक्तीचा आविष्कार Print

अनिरूध्द भातखंडे , शनिवार , १४  जुलै २०१२

‘बाया कर्वे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलेल्या १५ जणींच्या कार्याची ओळख करुन देणारं  ‘कर्त्यां-करवित्या’ हे पुस्तक नुकतंच मेनका प्रकाशनने प्रकाशित केलं आहे. त्याची ही ओळख.
‘जि च्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ अशी एक म्हण रूढ आहे. ‘माझं घर, माझा संसार’ ही संकुचित वृत्ती सोडून निरपेक्षपणे जगाचा उद्धार करण्यास निघालेल्या अनेक स्त्रिया आज समाजात कार्यरत आहेत. असंख्य अडचणी, प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक चणचण, विविध स्तरांवर होणारा विरोध या साऱ्याला तोंड देऊन या स्त्रियांनी भरीव सामाजिक कार्य केल्याचे दिसते. पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रियांना दरवर्षी ‘बाया कर्वे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत अशा १५ जणींना हा पुरस्कार लाभला असून त्यांच्या कार्याची तपशीलवार ओळख ‘कर्त्यां-करवित्या’ या पुस्तकात करण्यात आली आहे. या १५ जणी म्हणजे गंगूताई पटवर्धन, डॉ. मंदाकिनी आमटे, नसीमा हुरजूक, पुष्पा नडे, प्रेमा पुरव, लीला पाटील, सुनंदा पटवर्धन, निर्मला पुरंदरे, विजया लवाटे, रेणू दांडेकर, डॉ. स्मिता कोल्हे, रजनी परांजपे, मीना इनामदार, सिंधू अंबिके आणि डॉ. माया तुळपुळे.
या सर्व जणींची जडणघडण, त्यांची उद्दिष्टे, कार्याचे स्वरूप व व्याप्ती, त्यांचे अनुभव, यशापयश याचा लेखाजोखा अतिशय प्रभावीपणे या पुस्तकात मांडण्यात आला असून या ‘कर्त्यां-करवित्यां’च्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करू इच्छिणाऱ्या तरुणींसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही. या पुस्तकाची सुरुवातच मोठी चित्तवेधक ठरली आहे. ज्यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो त्या बाया कर्वे यांच्या ‘माझे पुराण’ या आत्मचरित्राचा धावता आढावा पहिल्या प्रकरणात घेण्यात आला आहे. स्त्रीशिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी बालविधवा असणाऱ्या आनंदीबाई ऊर्फ बाया यांच्याशी १८९३ मध्ये दुसरे लग्न केले. विधवेशी लग्न केल्याने कर्वे यांना मोठय़ा जनक्षोभाला व बहिष्काराला सामोरे जावे लागले. मात्र यामुळे न डगमगता त्यांनी विहित कार्य सुरूच ठेवले. बाया यांनीही कव्र्याच्या कार्यात हळूहळू स्वतला वाहून घेतले. कव्र्याचा पाय घरात कधी टिकत नसे, त्यात पैशांची सतत चणचण. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी सुईणीच्या कामाचा डिप्लोमा केला. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे आणि कष्टाळू स्वभावाचे कव्र्यानी नेहमीच कौतुक केले. कव्र्याच्या अफाट सामाजिक कार्यासाठी आनंदीबाईंची साथ पूरक ठरली. १९५६ मध्ये वयाच्या ८६व्या वर्षी बायांचे निधन झाले. त्यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येत असल्याने यातील पुरस्कार्थीच्या कार्याची ओळख होण्यापूर्वी बाया यांच्या चरित्राची झालेली तोंडओळख सयुक्तिक ठरते.
या पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरलेल्या गंगूताई पटवर्धन यांच्या बालपणी स्त्रीशिक्षण निषिद्ध होते. परंतु मेहुणे बापूसाहेब चिपळूणकर यांचा त्यांना पाठिंबा लाभला आणि त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. पुढे बापूसाहेब हे महर्षी कर्वे यांच्या हिंगणे येथील भारतीय महिला विद्यापीठात रुजू झाले आणि त्यांच्यापाठोपाठ गंगूबाईही तेथे दाखल झाल्या. याच संस्थेतील एक विधुर शिक्षक ना. म. पटवर्धन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर लंडन येथे जाऊन मॉण्टेसरीचा अभ्यासक्रम शिकण्याची संधी त्यांनी साधली. याशिवाय अन्य लहान-मोठे अभ्यासक्रमही त्यांनी तेथे पूर्ण केले. मायदेशी परतल्यानंतर बडोदे येथील स्त्री अध्यापन पाठशाळेत हेडमिस्ट्रेस पदासाठी त्या निवडल्या गेल्या. भाषेची अडचण नको म्हणून अल्पावधीत त्या गुजराती भाषा शिकल्या! तेथे २५ वर्षे नोकरी केल्यानंतर त्या पुण्यात परतल्या आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी कन्याशाळा नावारूपाला आणली तसेच महर्षी कर्वे यांच्या स्त्री शिक्षण संस्थेत विनावेतन काम केले. या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार लाभले. मात्र त्यांनी ते समाजालाच परत केले! वयाच्या ९८ व्या वर्षी म्हणजे १९९८ मध्ये त्यांचे निधन झाले.
बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी देशपांडे यांनी १९७२ मध्ये प्रेमविवाह केला आणि भामरागड येथील हेमलकसा या पाडय़ावर आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या हेतूने विजनवास पत्करला. भूलतज्ज्ञ असणाऱ्या मंदाताईंना आदिवासींवर उपचार करताना प्रसंगी अन्य शाखेतील उपचारही करावे लागले, यासाठी डॉ. प्रकाश यांच्याशी चर्चा आणि वैद्यकशास्त्रावरील नवनवीन पुस्तके वाचणे एवढेच त्यांच्या हातात होते. अतिशय खडतर परिस्थितीतून सुरू झालेला हा प्रकल्प आता स्थिरावला आहे. पायाभूत सुविधाही तेथे पोहोचल्या आहेत. मंदाताईंचा मुलगा डॉ. दिगंत आणि सून डॉ. अनघा आता तेथेच कार्यरत आहेत.
सुसंस्कृत मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या नसीमा हुरजूक या सातवीत असताना त्यांच्यावर मोठा आघात झाला. शाळेच्या कार्यक्रमात नृत्य करताना रंगमंचाची एक फळी कोसळली आणि त्या पाठीवर पडल्या. या अपघातामुळे त्यांच्या पाठीचा एक मणका दबला गेला आणि त्यांच्या कंबरेखालील शरीराची संवेदनाच नष्ट झाली. यानंतर केवळ सहाच महिन्यांत त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात भर पडली. चाकाच्या खुर्चीला खिळलेल्या नसीमा पार खचून गेल्या. मात्र अपघातामुळे सैन्यातून निवृत्त झालेले आणि चाकाच्या खुर्चीवरून सर्व व्यवहार करणारे बाबूकाका दिवाण यांच्याशी परिचय झाल्यानंतर त्यांना उभारी मिळाली. त्या प्रेरणेतून त्यांनी १९७२ मध्ये ‘अपंग पुनर्वसन संस्था’ आणि १९८० मध्ये ‘हेल्पर्स ऑफ द हॅण्डिकॅप्ड’ या संस्था सुरू केल्या. या माध्यमातून त्यांनी अनेक समदु:खींना मानसिक आधार देण्याचे, मार्गदर्शन करण्याचे मोलाचे कार्य केले.
प्रेमा पुरव या पूर्वाश्रमीच्या प्रेमा तेंडुलकर. गोव्यात एका संपन्न कुटुंबात त्या वाढल्या. मात्र डाव्या विचारसरणीचा प्रभाव आणि बंडखोर वृत्तीमुळे पोर्तुगीजांविरुद्धच्या लढय़ात त्या सहभागी झाल्या. अवघ्या १३व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि मजल-दरमजल करीत मुंबई गाठली. कम्युनिस्ट चळवळीतील दादा पुरव यांच्याशी प्रेमविवाह झाल्यानंतर परळ, लालबाग येथे खाणावळ चालवणाऱ्या महिलांना एकत्र करून त्यांनी ‘अन्नपूर्णा’ संस्थेची स्थापना केली. त्यांच्या तीन मुली या कार्यात आता त्यांना सहकार्य करतात.
प्रसिद्ध लेखक ना. सी. फडके यांची कन्या असणाऱ्या लीला पाटील यांचा जन्म १९२७चा. १९४२च्या चळवळीत त्या सहभागी होत्या. शिक्षणपद्धती अतिशय रूक्ष, विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव न देणारी आहे, या निष्कर्षांमुळेच १९८५मध्ये त्यांनी कोल्हापूर येथे सृजन आनंद विद्यालय सुरू केले. मुलांच्या सृजनशील वृत्तीला प्रोत्साहन देणारी शाळा अशी ख्याती अल्पावधीतच या शाळेने मिळवली.  
शशिकला घोटवडेकर या तरुणीचा वयाच्या १८व्या वर्षी वसंतराव पटवर्धन यांच्याशी विवाह झाला आणि त्या झाल्या सुनंदा पटवर्धन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असणाऱ्या वसंतरावांवर ठाणे जिल्ह्य़ाची जबाबदारी होती. या दरम्यान जव्हार, मोखाडा येथील आदिवासींची स्थिती पाहून त्यांचे मन हेलावले आणि या आदिवासींसाठी झटण्याचे त्यांनी ठरवले. जव्हार, मोखाडा येथे कामाला सुरुवात करण्यापूर्वी ठाणे शहरातील झोपडपट्टय़ा विकसित करण्याचे काम त्यांनी केले. या दोन्ही कामांत सुनंदाताईंनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.  वयाच्या ७३व्या वर्षी आजही त्या दिवसाचे १३-१४ तास काम करतात, हे विशेष.
निर्मलाताई पुरंदरे म्हणजे प्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी. बाबासाहेबांसारख्या व्यक्तिमत्त्वाची सहचारिणी म्हणून जगताना त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व राखले. एवढेच नव्हे तर ‘वनस्थळी’ संस्थेच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य उभारले!  ‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्रा’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलींना बालवाडीचे शिक्षण देऊन त्याच परिसरातील लहान मुलांना ते शिक्षण देण्याचा अभूतपूर्व प्रयोग त्यांनी यशस्वी केला.  
वेश्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विजया लवाटे यांच्या  आयुष्यातील टर्निग पॉइंट म्हणजे १९७० मध्ये पुणे महानगरपालिकेच्या गुप्तरोग विभागात झालेली बदली. या विभागात काम करताना त्यांना वेश्यांचे प्रश्न जवळून अनुभवता आले. नोकरीपलीकडे जाऊन वेश्यांच्या समस्या सोडवताना त्यांनी या वेश्यांच्या मुलांसाठी बालवाडी व वसतिगृह सुरू केले.
बालपण कोकणात गेल्याने तेथील शैक्षणिक दुरवस्थेची जाणीव असणाऱ्या रेणू दांडेकर यांनी १९८४ मध्ये ‘लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून चिखलगावात एका गोठय़ात शाळा सुरू केली. कालांतराने ही शाळा ‘लोकमान्य टिळक विद्यामंदिर’ या नावाने स्वत:च्या वास्तूत आली. अनेक देणगीदारांमुळे हे शक्य झाले. आज या शाळेने मोठा लौकिक मिळवला आहे. तसेच तेथे शिकलेले अनेक विद्यार्थी नावारूपाला आले आहेत.    
डॉक्टरकीची पदवी मिळवल्यानंतर सुखासीन आयुष्य जगणाऱ्या डॉ. स्मिता कोल्हे आपले पती डॉ. रवींद्र यांच्यासह विदर्भातील बैरागड येथे १९८५ मध्ये दाखल झाल्या आणि त्यांचे आयुष्यच बदलून गेले. बैरागडमधील आदिवासींचा विश्वास संपादन करण्यापासून त्यांच्या हानिकारक सवयी बदलण्याचे आव्हान या जोडप्याने उचलले, तसेच आदिवासींवर केवळ वैद्यकीय उपचार न करता शेतीविषयक मार्गदर्शनही त्यांनी दिले.
रजनी परांजपे यांचे पती म्हणजे राज्याचे मुख्य सचिव केशवराव परांजपे. एवढय़ा उच्च अधिकाऱ्याच्या पत्नीने सुखाच्या राशीत लोळण्याऐवजी ‘डोअर स्टेप स्कूल’ या संस्थेमार्फत भिकाऱ्यांच्या मुलांपर्यंत तसेच झोपडपट्टीतील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली! ‘मास्टर ऑफ सोशल वर्क’ ही पदवी घेतल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने ग्राऊंड वर्क केले. बांधकाम मजुरांच्या मुलांनाही त्यांनी शिक्षणाचे धडे दिले. मुंबईतील हे कार्य त्यांनी पुण्यातही वाढवले. शाळेच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ‘स्कूल ऑन व्हील्स’ हा उपक्रम सुरू केला, तोही यशस्वी ठरला.
मीना इनामदार यांनी आपल्या मतिमंद मुलीसाठी ‘डिप्लोमा इन टीचिंग मेंटली रिटार्डेड’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे अशा असंख्य मुलांसाठी ‘जीवनज्योत मंडळ’ स्थापन केले. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी बाल मार्गदर्शन केंद्र, मुक्तशाळा, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पालक मार्गदर्शन केंद्र, जीवनज्योत वसतिगृह आणि तहहयात वसतिगृह सुरू केले.
 सिंधताईू अंबिके यांनी कोसबाड या आदिवासी भागातील ‘ग्राम बाल शिक्षा केंद्रा’त शिक्षणाचे कार्य केले. वयाच्या २२व्या वर्षी वैधव्य आल्यानंतर स्वत:च्या मुलांना दूर ठेवून शेकडो आदिवासी मुलांसाठी त्यांनी ही समाजसेवा केली. कोसबाडमधील आदिवासींचे उंचावलेले जीवनमान, त्यांच्यात आलेला आत्मविश्वास ही सिंधूताईंच्या कार्याची पावतीच आहे.
अंगावरील पांढऱ्या डागांमुळे खचलेल्यांना सावरण्यासाठी डॉ. सौ. माया तुळपुळे यांनी श्वेता असोसिएशनची स्थापना केली. अशा तरुण-तरुणींसाठी त्यांनी वधू-वर सूचक मंडळही काढले. या व्याधीबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत, यासाठी त्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून ‘नितळ' या चित्रपटाची निर्मिती केली. राज्यातील अनेक शहरांत आज श्वेता असोसिएशनच्या शाखा आहेत.
मेनका प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकात या १५ जणींच्या अफाट सामाजिक कार्याबद्दल याहून विस्तृतपणे वाचण्यास मिळते. मृणालिनी चितळे यांनी या पुस्तकाचे नेटके संपादन केले असून त्यांच्यासह मीनल वैद्य, डॉ. करुणा गोखले, भारती पांडे, रत्नप्रभा राजहंस, डॉ. निवेदिता जोगळेकर, विनया बापट या लेखिकांनी या सेवाव्रतींना बोलते केले आहे. सुखासीन आयुष्याचा त्याग करून समाजकार्यात स्वत:ला झोकून देणाऱ्या या ‘कर्त्यां-करवित्यां’मुळे समाजाची घडी टिकून आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. नारीशक्तीचा हा आविष्कार थक्क करणारा आहे.