भारतीय मन जपणारी चिनी स्त्री Print

डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या पत्नी ही
डॉ. नागेश टेकाळे , शनिवार , १४  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

डॉ. गुओ यांची एक ओळख. परंतु आयुष्यभर म्हणजे ९६ वर्षांपर्यंत गरिबांची डॉक्टर म्हणूनच त्या कार्यरत राहिल्या. डॉ. गुओ यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्याविषयी..
व्यवसायाने परिचारिका, पण शेवटपर्यंत डॉ. कोटणीसांची पत्नी आणि गरिबांच्या डॉक्टर म्हणून स्वत:ची ओळख जपणाऱ्या श्रीमती गुओ क्विंग्लान-कोटणीस यांचे नुकतेच २८ जूनला चीनमधील शांक्सी प्रांतामधील दलियन या शहरात वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळामुळे निधन झाले. माझ्या चिनी मित्राकडून ही बातमी मला त्याच दिवशी समजली. मन उदास झाले. काही व्यक्ती जाऊच नयेत असे वाटत असताना हे असे का घडते? मनात फक्त विचारांचे काहूर उमटले..
आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने मला तीन वेळा चीनला जाण्याची संधी मिळाली. प्रखर इच्छाशक्ती असूनही माझी आणि गुओंची भेट होऊ शकली नाही. कारण अर्थातच फार मोठे अंतर. मूळचा महाराष्ट्रीय आणि त्यातूनही डॉ. कोटणीस यांच्या सोलापूरजवळचा राहणारा हे माझे मीपण माझ्याजवळच राहिले. मात्र मी डॉ. द्वारकानाथ कोटणीसांची पत्नी हे सर्व जगास अभिमानाने सांगणाऱ्या गुओ मात्र डॉक्टरांच्या स्मृतीत मिसळून हे जग कायमचे सोडून गेल्या.
लग्न हे म्हटले तर बंधन आहे आणि नाहीसुद्धा. अनेक स्त्रिया या बंधनात अडकून स्वत:चे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व हरवून बसतात. मात्र असाही एक स्त्रीवर्ग आहे ज्यांनी आपल्या भावी जोडीदाराचे समाजासाठी, तळागाळातील उपेक्षित लोकांसाठी समर्पित जीवन पाहिले, त्यांना आपले जीवनसाथी निवडले आणि स्वत:स त्यांच्या सेवाकार्यात झोकून दिले. देश-विदेशात अशी अनेक उदाहरणे दिसून येतात. अशा थोर स्त्रियांच्या मांदियाळीमध्ये एका चिनी स्त्रीचे, गुओ क्विंग्लान-कोटणीस यांचे नाव कायम अग्रस्थानी असेल. साधनाताईंना बाबा आमटे यांच्या तेजोमय दिव्यातील वातीची भूमिका निभावण्यासाठी तब्बल सहा दशकांचा कालावधी मिळाला. मात्र गुओ यांची वात डॉ. द्वारकानाथ कोटणीसांच्या अकाली मृत्यूमुळे दोन वर्षांतच विझून गेली, पण तिच्यामध्ये असलेले सेवेचे तेल त्यांना वयाच्या ९६ वर्षांपर्यंत पुरले.
 जपानविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या महायुद्धात चिनी लष्करामध्ये परिचारिकेच्या माध्यमातून हजारो जखमी सैनिकांच्या जखमांची दिवसरात्र मलमपट्टी करून त्यांची जीवापाड काळजी घेणारी ही चिनी स्त्री शेजारच्या भारत देशाची सीमा ओलांडून फक्त आपल्या देशातील सैनिकांच्या तीव्र वेदनावर वैद्यकीय उपचारांची फुंकर घालण्यास आलेल्या डॉ. द्वारकानाथ  कोटणीस यांच्या प्रेमात पडली. या शुद्ध प्रेमाचे ठिकाण एखादी सुंदर बाग नव्हती, ती होती रक्ताने माखलेली धगधगती युद्धभूमी आणि साक्षीदार होते डॉ. बेथून शांतता रुग्णालयातील जखमी, पण हसऱ्या चेहऱ्यांचे हजारो चिनी सैनिक.
१९३९ साली सुरू झालेल्या या नितांत सुंदर प्रेमाची परिणिती नोव्हेंबर १९४१ मध्ये लग्नात झाली. पं. नेहरू आणि नेताजी बोस यांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन १९३८ साली वयाच्या २८ व्या वर्षी मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकलचा हा हुशार विद्यार्थी, डॉ. द्वारकानाथ कोटणीस चीनच्या वायव्य भागात जपानी सैन्याशी लढत असणाऱ्या चिनी तुकडीत सामील झाला. घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात चिनी सैन्य लढत होते आणि डॉ. कोटणीस गोळ्यांच्या वर्षांवामध्ये त्यांच्यावर तातडीचे उपचार करून त्यांना युद्धभूमीच्या पायथ्याशी असलेल्या बेथून आंतरराष्ट्रीय रुग्णालयात पुढील उपचार व जखमांची काळजी घेण्यासाठी पाठवत असत. याच रुग्णालयात ही २२ वर्षांची सुंदर चिनी मुलगी परिचारिका म्हणून काम करत होती आणि तिचे मुख्य काम म्हणजे डॉ. कोटणीसांनी युद्धभूमीवरून पाठवलेल्या जखमी सैनिक रुग्णांची काळजी घेणे. त्या काळात अपुरे साहित्य आणि औषधांची कमतरता असूनसुद्धा डॉक्टरांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर ८०० च्यावर शस्त्रक्रिया केल्या आणि त्यातील काही तर ७२ तास एक सेकंदही न झोपता. डॉ. कोटणीसांच्या या मानवतावादी वृत्तीने ही चिनी मुलगी प्रचंड प्रभावीत झाली. डॉ. कोटणीस बेथून रुग्णालयास जेव्हा जखमी सैनिकांना पाहावयास येत तेव्हा त्यांना खडखडीत बरे झालेले पाहून आश्चर्यचकित होत, पण यामागे गुओ यांच्या नाजूक हातांचे तेवढेच मोल आहे हे समजल्यावर डॉक्टरांच्या त्यांच्याबद्दलच आदर वाढला आणि यातूनच दोघांच्या निस्सीम प्रेमाचे फूल उमलत गेले..
गुओ यांनी इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण केले होते आणि नंतर नर्सिगच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. त्यांची पहिली नियुक्ती बेथून रुग्णालयातच झाली. त्यांची आई आधुनिक विचारसरणीची असल्यामुळे या आंतरदेशीय विवाहास त्यांना सहज परवानगी मिळाली. युद्धभूमीवर दिवसरात्र केलेल्या सैनिक सेवेचे चीज म्हणून डॉ. कोटणीस यांना बेथून रुग्णालयाचे अध्यक्षपद मिळाले आणि गुओसारखी सुंदर समविचाराची पत्नीसुद्धा. ते वर्ष होते १९४१. उभयतांना ऑगस्ट १९४२ ला मुलगा झाला. त्याचं नाव इनहुआ, पण डॉ. कोटणीसांना पत्नीसुख जेमतेम एक वर्ष आणि बाळाचे प्रेम फक्त तीन महिनेच मिळाले. युद्धभूमीवर घेतलेल्या अविश्रांत मेहनतीमुळे या तरुण डॉक्टराचे अवघ्या ३२ व्या वर्षी असाध्य आजारामुळे निधन झाले. गुओ कोटणीसावर दु:खाचा डोंगर कोसळला. युद्धभूमीवर हजारो चिनी सैनिकांना जीवदान देणाऱ्या या देवदूत डॉक्टरला वाचवता न आल्याचे शल्य त्यांना कायम सलत राहिले. बेथून रुग्णालयात लहान बाळास जवळ घेऊन गुओ यांनी रात्रंदिवस पतीची सेवा केली. ९ डिसेंबर १९४२ रोजी डॉ. कोटणीस मृत्यू पावले. अवघे चीन हळहळले. गुओ यांनी तो विरह सहन केला तो रुग्णांची सेवा करत. त्यांनी इनहुआला वैद्यकीय पदवीधर केले ते फक्त डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे उरलेले कार्य पूर्ण करण्यासाठीच पण नियती कठोर होती. गुओ-द्वारकानाथ कोटणीस यांच्या वेलीवरील भारत-चीन मैत्रीचे प्रतिक असलेले हे सुंदर फूल पूर्ण उमलण्या अगोदरच काळाने डिसेंबर १९६७ ला खुडून नेले. मृत्युसमयी इनहुआचे वय अवघे २४ होते. नियती, एवढी निष्ठुर असू शकते यावर विश्वास ठेवणे कठीण होते, पण वास्तव्य समोरच उभे होते. एवढय़ा प्रेमाने वाढविलेला आणि विद्याविभूषित केलेला डॉ. कोटणीसांच्या स्मृतीचा ठेवा असा अचानक ध्यानीमनी नसताना काळाच्या पडद्याआड जाणे गुओ यांच्या खूप जिव्हारी लागले, पण त्यांच्या आठवणीच त्यांच्या जगण्याचीच उमेद होती.
भारतातून चीनच्या दौऱ्यावर येणारे अनेक अतिथी मान्यवर त्यांना आवर्जून भेटत असत आणि अशा भेटीमधून अनेक जुन्या स्मृतींना उजाळा मिळत असे. श्रीमती गुओ कोटणीस यांना भारताचे राष्ट्रपती के. आर. नारायणन दोन वेळा भेटले होते. राष्ट्रपतींची भेट गुओ यांच्या दलियन शहरातील घरी झाली होती. समोरच्या टेबलवर डॉ. कोटणीस आणि मुलाचे फोटो, पुस्तके आणि इतर साहित्य. गुओच्या अंगावर भारतीय पद्धतीची वस्त्रे आणि त्यावर डॉ. कोटणीसांचा फोटोसुद्धा होता. त्या राष्ट्रपतीस म्हणाल्या, ‘‘माझे हे अंगावरचे कपडे दर्शवतात की मी मनाने नव्हे तर शरीरानेसुद्धा एका भारतीय डॉक्टरची पत्नी होते.’’
गुओ कायम डॉ. कोटणीस यांच्या १९३९-४२ या तीन वर्षांच्या तेजपुज्य सहवासात सामावून गेलेल्या दिसल्या. त्यांनी डॉ. कोटणीस यांच्याशिवाय त्यांची वेगळी अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्नच केला नाही. पती विरहाने दु:खी जीवन जगणाऱ्या ऐन पंचविशीतील गुओना त्यांच्या नातेवाईक आणि सहकारी मित्रवर्गाने दुसरा विवाह करण्यास प्रद्युत केले आणि त्यांनी तो पर्याय स्वीकारला, पण वयाच्या ९६ व्या वर्षी देह सोडेपर्यंत त्यांच्या घरावरील पाटी आणि त्यांचे भेटकार्ड गुओ क्विंग्लान-कोटणीस असेच होते.
गुओ या भारत-चीन मैत्रीच्या भक्कम धाग्याच्या रूपाने शेवटपर्यंत कार्यरत राहिल्या. त्याच प्रयत्नामुळे प्रतिवर्षी भारत-चीन वैद्यकीय पदवीधारकांची देवाणघेवाण होते आणि या कार्यक्रमांतर्गत दहा भारतीय डॉक्टर चीनच्या ग्रामीण भागांत वैद्यकीय सेवेचा अनुभव घेण्यासाठी जात असतात.
श्रीमती गुओ यांनी भारतास ५ वेळा भेट दिली. त्या प्रत्येक वेळी सोलापूरला आपल्या दिवंगत पतीच्या घरी आवर्जून गेल्या. १९५८ सालची त्यांनी आपल्या इनहुआ या १५ वर्षांच्या मुलासबरोबर घेऊन सोलापूरला दिलेली भेट सर्वात जास्त हृदयस्पर्शी होती. कोवळ्या इनहुआने उंबरा ओलांडून पहिले पाऊल घरात टाकताच डॉ. कोटणीसांच्या वृद्ध आईने त्याला हृदयाशी धरून घातलेली मिठी घरातील इतरांना सोडवणे कठीण झाले होते. देशांच्या सीमा विरघळून टाकणारा तो प्रसंग परिवारातील सर्व सदस्यांना दु:ख सागराबरोबरच आनंदडोही घेऊन गेला होता. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या आईसाठी ती पुत्रभेटच होती, या भेटीची स्मृती म्हणून गुओ यांनी इनहुआच्या हस्ते कोटणीसांच्या अंगणात अशोकाचे रोप लावले. आज त्याचे छान वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे.
२ जून, २००० साली चीनचे मुखपत्र असलेल्या ‘पिपल्स डेली’मध्ये श्रीमती गुओंची एक छान मुलाखत आली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, ‘‘मी भारत आणि चीन या दोन देशांवर सारखेच प्रेम करते आणि या दोन देशांतील ही मैत्री अशीच पिढय़ान्पिढय़ा पुढे चालावी अशी माझी इच्छा आहे.’’ ८४ व्या वर्षीसुद्धा ५८ वर्षांपूर्वी निधन झालेल्या पती विरहाने व्यथित झालेल्या गुओची ही मुलाखत त्यावेळी खूप गाजली होती. गुओ कोटणीस या भारत-चीन मैत्रीचे कायम प्रतीक म्हणूनच जगल्या.