पालकत्वाचे प्रयोग : टाकीचे घाव… Print

मधुकर खोचीकर , शनिवार , १४  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आई - बाबा तुमच्यासाठी

टाकीचे घाव घातल्याशिवाय देवपण येत नाही म्हणतात. आम्ही पण मुलांवर ‘टाकीचे घाव’ घातले, पण ते योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी ..
आम्हाला दोन मुलं. एक मुलगी आणि एक मुलगा. दोघांमध्ये ठरवून सात वर्षांचं अंतर. कारणही तसंच होतं. मुलगी थोडी मोठी होऊन शाळेत जायला लागेल, स्वावलंबी होईल, तेव्हाच दुसऱ्या अपत्याचा विचार आम्ही करायचं ठरवलं. मुलगी लहानपणापासूनच समजूतदार, आज्ञाधारक व बुद्धीनं तल्लख; पण मुलगा धडपडय़ा, चळवळ्या. त्याला सांभाळायचं, वाढवायचं म्हणजे आम्हा दोघांसाठी आव्हानच होतं.
कुंभार सुंदर घट तयार करताना वरून घटावर थपडा मारतो, पण आतून त्याचा दुसरा हात त्या घटाला आधार देत असतो, तो मायेचा असतो! मुलं वाढवताना हा सिद्धांत ध्यानी ठेवावा लागतो. आम्हीही तेच केलं. तो करीत असलेल्या खोडय़ा, त्याच्या चौकस बुद्धीमुळं त्याने खेळण्यांची केलेली मोडतोड, अभ्यासापेक्षा खेळाकडं त्याचा कल, गाण्याची आवड, नेतृत्वगुणांचा त्याच्यातील अंकुर हे आम्ही हेरलं आणि पासापुरते गुण मिळाले तरी थोडासा धाकधपटशा दाखवला, पण त्याच्या आवडीच्या कलागुणांना आम्ही वाव देत गेलो. त्याचा परिणाम दिसू लागला, हस्ताक्षर स्पर्धेत तो शाळेत प्रथम आला, विविध गुण दर्शनात त्याने भाग घेतला, समूहगीतात म्होरक्या झाला. त्याची आई गाणं छान म्हणायची. ते त्याच्या कानावर पडे. एकदा तर एका कार्यक्रमात गाणं म्हणणार म्हणून हट्ट धरून बसला. आईनं संधी दिली आणि त्याचं त्याने सोनं केलं. वाहवा मिळवली. आजही तो शास्त्रोक्त पद्धतीनं गाणं शिकला नसला तरी त्याला सुरांचं ज्ञान मिळाल्यानं आणि सतत नवनवीन गाणी ऐकल्यामुळे सुंदर गातो.
आमची दोन्ही मुलं ना इंजिनीअर आहेत ना डॉक्टर. मुलगी बी. एस्सी. तर मुलगा बी. कॉम. मुलीनं चौथी आणि सातवीची स्कॉलरशिप मिळवली. माझ्या बँकेतल्या नोकरीमुळे एकेठिकाणी सलग शिक्षण मुलांना घेता आलं नाही, पण मुलं जिथं जाईल तिथं रमली आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास त्यांनी करून घेतला. कुठल्याही परिस्थितीत वशिला, डोनेशन, शिकविण्याचा आधार आम्ही घेतला नाही. मुलांना साधी राहणी, स्वावलंबन, निव्र्यसनीपणाचे धडे आमच्या वागणुकीतून दिले. चोख सोनं पाहिजे असल्यास चोख परिस पाहिजे तरच लोखंडाचं रूपांतर परिसस्पर्षांनं सोन्याला होतं असं म्हणतात. आमची दोन्ही मुले मेरिटवर नोकरीला लागली. मुलगी टेलिफोन खात्यात कारकून म्हणून लागली आणि आज तिच्यातील कष्टाळू, अभ्यासू गुणामुळं कमर्शिअल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. शिवाय मैत्रीणींच्या ग्रुपमध्ये ती नेतृत्व करते, कथाकथन करते आणि तिच्या एकुलत्या एका मुलीलाही तसंच बनविण्यासाठी धडपडते.
मुलाची जिद्द तर औरच. आम्ही कष्टातून वर आलो. निव्र्यसनी राहिलो, काटकसर करून संसार चालवतोय हे त्याने पाहिलं होतं. त्याची जिद्द होती की, मी सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्याला नोकरी लागावी आणि झालंही तसंच! बी. कॉम.च्या दुसऱ्या वर्षांत असतानाच तो युनायटेड वेस्टर्न बँकेच्या परीक्षेस बसला. त्याला १३ मार्चला नोकरी मिळाली आणि मी ३१ मार्चला निवृत्त झालो! पुढं त्याने बी. कॉम. पदवी मिळवली. त्या बँकेचा अनुभव वाचन, मनन करून तो एच. डी. एफ. सी. बँकेत अधिकारी म्हणून निवडला गेला आणि आज तो केवळ पंधरा वर्षांच्या नोकरीत त्याच बँकेत असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट आहे. त्याच्या कष्ट करण्याच्या नवनवीन गोष्टी शिकण्याच्या सवयीमुळे त्याच्या कामाचं चीज होऊन तो वरिष्ठांच्या मर्जीतला झाला आहे. अनेक पारितोषिके त्यांनी मिळवली आहेत.
दुसऱ्यांना मदत करणे, प्रसंगावधान राखून प्रसंगी जीव धोक्यात घालून संकटग्रस्तांसाठी धावून जाणे ही त्याची सहज प्रवृत्ती आहे आम्ही केलेल्या त्याच्यावरच्या संस्कारांचे हे फळ आहे. त्यामुळेच आमच्या या दोन्ही मुलांचा आम्हाला अभिमान आहे, तसेच आम्ही जे संस्कार आमच्या मुलांत रुजविले तेच त्यांच्या एकुलत्या एक मुलीवर ते करतात हे पाहूनही समाधान होते.
विशेषत: आमचा मुलगा खोडकर, अभ्यासात बेताचा म्हणून मारून-मुटकून आमच्या आवडीच्या क्षेत्रात त्याला जबरदस्तीनं घातलं असतं तर आम्हाला आता उतारवयात मिळणारा हा समाधानाचा आनंद मिळाला नसता. मुलगा आमच्यापासून दुरावला असता! टाकीचे घाव घातल्याशिवाय देवपण येत नाही म्हणतात. आम्ही पण मुलांवर टाकीचे घाव घातले, पण ते योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी हेच शेवटी खरे!